नाटाचे अभंग... ४४

४३.कां हो माझा मानियेला भार । ऐसा तंव दिसतसे फार ।
    अनंत पावविलीं उद्धार । नव्हेचि थार मज शेवटीं ॥१॥
    पाप बळिवंत गाढें । तुजही राहों शकतें पुढें ।
    मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥धॄ॥
    काय मानिती संतजन । तुमचें हीनत्व वचन ।
    कीं वृद्ध झाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥
    आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी ।
    पडदा काय घरच्या घरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥
    नको चाळवूं अनंता । कासया होतोसी नेणता ।
    काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥५॥
   
    संसाराचा उबग आलेल्या तुकोबारायांना संतमुखावाटे सत्शास्त्राचे श्रवण झाले. त्याचे चिंतन, मनन, निदिध्यास तुकोबारायांना घडला. त्यायोगे त्यांच्या मनाचा असा निश्चय झाला की, या भवसागरातून तारून नेणारा एका भगवंताविना अन्य कुणी असू शकत नाही. घडलेल्या चिंतनाद्वारे त्यांच्या असेही लक्षात आले की, भगवंतापुढे संपूर्णतः बिनशर्त शरणागती पत्करण्याशिवाय जीवाकडे दुसरा मार्ग शिल्लक राहात नाही. साधकाने ज्ञान, वैराग्य, विवेक आदींचा कितीही संचय केलेला असला तरी भगवंतास रिझविण्यासाठी तो संचय अत्यल्प व असमर्थ ठरतो. शरणागती पत्करताना अत्यंत महत्त्वाचा भाग असा की, आपल्याक्डे असणारे न्यूनत्व अथवा हीनत्व, अल्पज्ञता आदींचा परिहार देऊन भगवंताच्या अलौकिक औदार्याची त्याला जाणीव करून देणे, हेच त्याच्या कृपेला सहाय्यक ठरते.
    तुकोबारायांच्या अंतःकरणात भगवंत-भेटीची आतुरता शिगेला पोहोचली आहे. जे हवे आहे, ते मिळण्यात लागत असलेला विलंब आता असह्य झालेला आहे. त्यांची करुणास्पद स्थिती पाहून भगवंताच्या हृदयाला अद्याप पाझर फुटत नाही. अशा परिस्थितीत तुकोबारायांच्या मनात अनेक विचारांचे काहूर उठलेले आहे. स्वतःच्या न्यूनतेचा तसेच भगवंताने त्यांच्याविषयी निष्ठुरता धारण का करावी, याचा दोन्ही अंगांनी विचार ते करतात. या अभंगाचा अशा पार्श्वभूमीवर विचार करताना अभंगाच्या प्रथम चरणाच्या चार चरणखंडांचा अन्वय लावण्यासाठी दुसरा व तिसरा चरणखण्ड आणि पहिला व चौथा चरणखण्ड जोडून घ्यावा लागतो. 'ऐसा तंव दिसतसे फार' यातून तुकोबारायांना भगवंताविषयी काय दिसते, याचा विचार करायचा. त्याचे स्पष्टीकरण ते अभंगाच्या तिसर्‍या चरणखण्डातून देतात. भगवंताचा महिमा शास्त्रे-पुराणे-ज्यांना भगवंताने जवळ घेतले त्या संतांच्या वचनातून, अमाप गाइलेला प्रत्यक्ष दिसतो आहे (तंव दिसतसे फार). भगवंताचा हा महिमा असा की, भक्त असो वा महापापी, असे अगणित आहेत की, भगवंताकडून त्यांचा उद्धार झालेला आहे. म्हणून तुकोबारायांचे भगवंताला काकुळतीचे विचारणे आहे की, 'का हो तुम्हाला माझाच भार वाटावा?' तुकोबाराय काहीसे नैराश्याने उद्‍गारतात की, 'अखेरी मला मात्र तुमचा आश्रय लाभत नाही.' या चरणाचा असाही अन्वय लावता येतो की, भगवंताचा महिमा अपार जरी असला तरी भगवंताची अविचल चर्या पाहून भगवंताशी ते संवाद साधतात व म्हणतात, 'काय हो, तुम्हाला माझा फार भार वाटतो आहे का? तुमच्या चर्येवरून तरी मला तसे तीव्रतेने वाटते आहे.' भगवंताने तसे मानण्याचे कारण त्यांना समजत नाही. ते निवेदन करतात की, 'तुझ्या महानतेचे दाखले जागोजागी पाहावयास मिळतात (तंव दिसतसे फार). भक्त असोत् वा महापापी, तू अनंत जीवांचा उद्धार तत्परतेने केलेला आहेस.' आपल्याला मात्र भगवंताने ताटकळत ठेवावे, याचे वैषम्य तुकोबारायांना वाटत आहे. ते भगवंताला म्हणतात, 'तुझ्या प्राप्तीसाठी मी एव्हढा तळमळतो आहे, तरीही मला मात्र तुमच्या आश्रयापासून वंचित राहावे लागत आहे. (नव्हेचि थार)'.
    पुढील चरणात तुकोबाराय परिहार देताना म्हणतात की, 'असे वाटते, माझे पाप अथवा कृतकर्म इतके बळिवंत आहे की, तुमच्यापुढेही ते निष्प्रभ होऊ शकत नाही. कदाचित मागील काही दुष्कर्म असे राहिलेले असावे की, तुम्हाला सन्मुख होताना ते मागचा वचपा काढण्यासाठी आड उभे राहात आहे.' (तुकोबारायांचे अन्यत्र एक वचन आहे - जळोत तीं येथें उपजविती अंतराय ।) तुकोबाराय उद्‍गारतात, 'नवल कोडें देखियलें'. त्यांना नवल या गोष्टीचे वाटते, की त्यांचे पाप असे तगडे आहे, जे भगवंतालाही निष्प्रभ करू शकते. आणि, कोडे या गोष्टीचे वाटते आहे की, त्यांच्या मागील कोणत्या पापाचा हिशोब चुकता व्हावयाचा राहिला आहे?
    'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ती चारी साधियेल्या ॥' असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पाप, ते कितीही मोठे असो, ते भगवंताच्या नामापुढेही टिकू शकत नाही, असे सार्‍या शास्त्रांचे-संतांचे सांगणे आहे. अशा अनेक वचनांचे श्रवण संतसंगातून तुकोबारायांना झालेले आहे. त्यांच्या प्रामाणिक प्रयासांना येणारे अपयश, त्यांच्या स्वभावानुसार ते संतांना विदित केल्याशिवाय राहणारे नाहीत. भगवंताला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी ते भगवंतापुढे त्यांचे मानस व्यक्त करताना खोचक उद्‍गार काढतात की, 'भगवंता, मला असे म्हणावेसे वाटते की, तुमचा प्रभाव आता राहिलेला नाही. तुम्ही वृद्ध झाला आहात. पतितपावनासारखी ब्रीदावली तुम्हाला आता सांभाळता येत नाही. तुम्हाला प्राप्त झालेले हीनत्व मी जर संतांना कथन केले, तर त्यांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसणार नाही आणि भगवंता, तुम्ही हे जाणता.' तुकोबारायांचे हे उपरोधात्मक उद्‍गार भगवंताची शरणागत-वत्सलता जागृत करण्यासाठी आहेत. अशी अपेक्षा ते व्यक्त करतात की, आता या करुणासागराने त्यांच्या अविलंब उद्धाराबद्दल उदासीन राहू नये.
     संतांच्या गाढ्या विश्वासाचा दाखला देऊन भगवंताचे मन वळविण्याचा तुकोबाराय प्रयत्न करतात. भगवंताच्या साम्रर्थ्याविषयी त्यांच्या मनात दृढ विश्वास आहे. भगवंताचे हे उदासीन राहणे, म्हणजे भगवंताने केवळ त्यांची परीक्षा पाहण्यासाठी धरलेले लटकेपण आहे, असे त्यांना वाटते. म्हणून ते भगवंताला विनवतात की, 'भगवंता, आता अंग चोरू नकोस्, संकोच सोडून दे. मला दूर ठेवू नकोस्.' 'पडदा काय घरच्या घरीं' असे तुकोबाराय भगवंताला विचारतात, ते एव्हढ्यासाठी की, 'ममैवांशो जीवलोके' असे त्या भगवंताचेच वचन आहे. प्रत्येक जीव हा त्याचा अंश आहे. हा अंश-अंशी संबंध आई-मुलाच्या संबंधाप्रमाणे आहे. मूल कितीही मलिन झालेले असो, त्याला मायेने कवटाळताना मातेला कधीही संकोच वाटत नसतो. बालकाची मलिनता तिच्या मायेत न्यून आणू शकत नाही. तिथे लज्जा-संकोच यांना थारा नसतो. किंवा, पत्नीने पतीस एकदा समर्पण केले की, तिथे दूरत्व राहत नाही. घरात असताना तर अंगसंगाला कोणताही प्रत्यवाय राहत नाही. जेव्हा जीव अजाणतेपणामुळे भगवंताला सन्मुख नसतो, तेव्हा त्याचे भगवंतापासून दूर राहणे, स्वाभाविक असते. आता तसे नाही. समर्पित झाल्यानंतर भगवंताने त्यांना दूर लोटू नये, असे त्यांना भगवंताला सांगावयाचे आहे.
    तुकोबाराय आपली अगतिकता व्यक्त करताना म्हणतात, 'हे अनंता, तुमच्याबद्दल माझ्या अंतःकरणात जो विश्वास संतवचनांमुळे दृढ झालेला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. माझ्या विचारांना चळू देऊ नका.. माझा अंगिकार करण्याविषयी चाळवाचाळव किंवा चालढकल करू नका. सर्वार्थाने पाहता माझ्या बाह्य-अभ्यंतर ठिकाणी तुमचा वास असल्याने तुम्ही नेणते होऊ नका. त्रैलोक्याधिपती म्हणविणारे तुम्ही असताना अशी कोणती सत्ता आहे, जी तुमच्या अंकित नाही. मला असे कोणतेच कारण दिसत नाही, ज्यामुळे तुम्हाला माझा अंगिकार करण्यास उदासीन ठेवत आहे.' अखेरीस ते भगवंताला साकडे घालतात की, 'सार्‍या गोष्टींचा सारासार विचार करून, हे अनंता, आपण प्रगट होऊन मला आश्रय द्यावा.'
  (क्रमशः)   
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)