नाटाचे अभंग...४५

४४.    तुळसी माळा घालूनि कंठीं । उभा विटेवरी जगजेठी ।
    अवलोकोनि पुंडलिका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीये ॥१॥
    भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि वोळगती द्वारीं ।
    सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥धृ॥
    जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगी ।
    जैसी विद्युल्लता झळके मेघीं । दर्शनें भंगी महा दोष ॥३॥
    सुखसागर परमानंदु । गोपी गोपाळां गोधनां छंदु ।
    पक्षिश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥
    मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहन गरुडध्वजा ।
    तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तकाजा लवलाहीं ॥५॥

    तुकोबारायांच्या अभंगरचनेत उत्स्फूर्तता आहे. आपल्या अंतःकरणातील वृत्तींना शब्दरूप देताना त्यांनी काळ-वेळ-प्रसंगांचे औचित्य पाहिलेच आहे, असे म्हणता येत नाही. देवापुढे गेले असताना प्राथमिक साधक अवस्थेत आपल्या अंतःकरणातील वेदना त्यांनी स्पष्ट शब्दात मांडलेल्या आहेत. तसेच बर्‍याचदा जनकल्याणार्थ जीवाविषयीच्या आत्यंतिक करुणेपोटी त्यांनी देवाकडे साकडेही घातलेले आहे. साधकाच्या तीव्र मुमुक्षु अवस्थेमध्ये काही अपूर्व बदल घडून येणे स्वाभाविक असते. त्यामागेदेखील उपास्याची कृपा आणि संतसंगतीतून निर्माण झालेला विवेक यांचे मीलन दिसून येत असते. अशा अवस्थेत देवाकडे मागणी करणे, तक्रार करणे, देवाशी भांडणे वगैरे गोष्टी विसरून तुकोबाराय आपल्या वृत्तींना एकाग्र करून उपास्याच्या तटस्थ स्वरूपाशी तल्लीन होतात आणि त्याचे वर्णन नाइलाजास्तव शब्दाद्वारेच करतात. भगवंताच्या रूपवर्णतात्मक एका अन्य अभंगात, भगवंताच्या मुखदर्शनाने उद्दीपित झालेल्या वृत्तींना तुकोबाराय भगवंताच्या मुखावरतीच केंद्रित होण्यास सांगतात (सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ॥).
    या अभंगातही, पंढरीचा राणा असलेल्या विठ्ठलाचे स्वरूप दर्शन घेताना, तुकोबारायांच्या वृत्ती प्रफुल्लित झाल्या आहेत. आपल्या उपास्यापुढे उभे राहून त्याला डोळे भरून पाहताना त्यांच्या इंद्रियांना तृप्ती लाभत नाही. भगवंताच्या दर्शनाची गोडी पूर्णत्वापर्यंत पोहोचत नाही. या अवस्थेचे वर्णन करताना एकनाथ महाराज 'तृप्ती भुकेली राहते' म्हणतात, तर तुकोबाराय पांडुरंगाच्या शब्दातीत गुणांचे वर्णन करताना शब्दाचेच सहाय्य घेत 'धणी न पुरे गातां' असे उद्‍गारतात.
    विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करताना तुकोबाराय भगवंताची भक्तप्रियता कशी ओसंडून जात आहे, ते दर्शवितात. तुकोबारायांचा भाव असा आहे की, हा जगजेठी, त्रैलोक्याधिपती असूनही सुवर्णालंकार, रत्नमाला आदी बाजूला ठेवून भक्ताने अर्पिलेल्या तुळसीमाळा आदराने मिरवीत आहे. भक्ताने फेकलेल्या एका विटेवर स्वतःला सावरीत भीमा नदीच्या वाळवंटात ताटकळत उभे राहताना संकोच न करता, हा त्यातच आनंद मानतो. प्रत्यक्ष भगवंत दारी आला असतानाही त्याचे आदरातिथ्य गौण मानून आपल्या मातापित्यांच्या सेवेत रंगून जाणार्‍या भक्त पुण्डलिकावर याची कौतुक-दृष्टी स्थिरावली आहे.
    या भक्तप्रिय जगजेठीच्या अलौकिक सामर्थ्याचे तुकोबाराय वर्णन करतात. भोग आणि मोक्ष देणार्‍या भुक्ती-मुक्ती ह्या पडेल ते काम करण्यास सदैव तयार राहून, कामारी होऊन, याच्या दासी झाल्या आहेत तर, रिद्धी-सिद्धी ह्या दोघी याच्या द्वारी स्वतःहून सेवेसाठी उभ्या आहेत. भगवंताच्या हातातील शंख-गदा-पद्म यांचा तुकोबाराय उल्लेख करीत नाहीत. सुदर्शन चक्र घिरट्या घालीत असल्याचे मात्र त्यांना दिसते आहे. सुदर्शन चक्र हे चंचल, अजिबात स्थिर न राहणारे आहे. म्हणून ते मनाचे तसेच काळाचे द्योतक आहे. भगवंताच्या दर्शनाने मनाची गती थांबते. ते आपोआपच निश्चल होते तर भगवंताचीच विभूती असलेला काळ विठ्ठलरूप ल्यालेल्या या भगवंताच्या आज्ञेची वाट पाहात दूर फिरते आहे. भगवंताच्या करांगुलीचा आधार नसल्याने त्या सुदर्शनाला कापरे भरले आहे; किंवा, जगाला खाणारा काळ, ज्याला नियंता म्हणून भगवंताने नेमलेले आहे, तोदेखील भगवंताच्या धाकापोटी मर्यादा सांभाळित अंतर राखून थांबलेले आहे, असे तुकोबारायांना वाटते. तुकोबारायांच्या या कथनातून असा अर्थ ध्वनित होतो की, या पंढरीरायाचे दर्शन घेताना मनातले सारे विषय लोप पावतात अन् काळाचे भान राहात नाही.
    जगज्जेठी असलेल्या आपल्या उपास्याचे रसभरित वर्णन करताना तुकोबारायांना जगज्जननीचेही दर्शन जसे घडले, त्याचेही वर्णन करावेसे वाटते. इथे तुकोबाराय भीमकीच्या दर्शनाने महादोष भंग पावतात, असे सांगतात. या विषयी असे म्हणता येते की, भीमकी हे आदिशक्तीचे वैष्णवी रूप आहे. तुकोबारायांच्या उपास्याचा महिमा या शक्तीमुळे व्यक्त होत असतो, याची त्यांना जाणीव आहे. भगवंत आपल्या धर्मकार्यासाठी जे रूप धारण करतो, त्याच्या अनुरूप शक्तीही रूप धारण करत असते. तुकोबारायांना ही वैष्णवी शक्ती ‘भीमकी’च्या रूपात भगवंताच्या डाव्या भागी अर्धांगी होऊन उभी असलेली दिसते. भगवंताच्या दिव्य रूपाला तिच्यामुळे अधिकच शोभा आलेली आहे. भीमक राजाच्या या कन्येचे वर्णन एकनाथ महाराज ‘रुक्मिणी स्वयंवर’ ग्रंथात करतात. 'श्रद्धा शांति निवृत्ति भक्ती । ते हे भीमकी निजमूर्ती ।' असे शब्द त्यांनी भीमकाच्या मुखी योजून, भीमकी, जी श्रीकृष्णाची पत्नी झाली होती, तिचे वर्णन केलेले आहे. देवी-अथर्वशीर्षात या शक्तीला वंदन करताना 'नमामि त्वां महादेवीं महाभयविनाशिनीम् । महादुर्गप्रशमनीम् महाकारुण्यरूपिणीम् ॥' असे तिचे माहात्म्य गाइले आहे. मार्कण्डेय पुराणातील 'श्रीदुर्गा सप्तशती' या दीर्घ रचनेच्या अकराव्या अध्यायात म्हटले आहे, 'शरणागतदीनार्त परित्राणपरायणे । सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ॥' आपल्या अभंगात भीमकीचे वर्णन करताना तुकोबाराय कुठलाही अतिक्रम होऊ नये, यासाठी मोजक्या शब्दात वर्णन करतात. ते म्हणतात, ‘जैसीं विद्युल्लता झळके मेघी ।’ (स्त्रीरूपाचे वर्णन मर्यादेत असावे, असा लक्ष्यार्थ येथे आहे.). आपल्या उपास्याची अर्धांगी असलेली ही भीमकी देवी जगज्जननी आहे, मातृस्वरूप आहे. मेघातून चमचमणार्‍या वज्ररूप विद्युल्लतेसम हिचे तेज आहे. अशा या जननीच्या केवळ दर्शनाने महादोष भंग पावतात. ती मातृस्वरूप असल्याने वात्सल्यापोटी भक्तांच्या दोषांचे निर्दालन करते.
    तुकोबाराय पुढे त्यांच्या या उपास्याचे वर्णन 'सुखसागर' आणि 'परमानंदु' या दोन पदांनी करतात. सागराच्या लहरींवर चमचमत्या तेजामुळे आगळीच झळाळी दिसत असते. ही झळाळी सागराच्या विशाल पृष्ठभागावर सर्वत्र चमचमत असते. भीमकीच्या सान्निध्यामुळे भगवंताचे तेज अधिक उजळून निघाले आहे. उपास्याच्या भोवताली असलेली भक्तांची मांदियाळी त्याचे ऐश्वर्य प्रगट करते आहे. तिथे भगवंत आणि भक्त दोघेही आनंदाचा उपभोग घेत आहेत. तेथे निखळ सुखाशिवाय अन्य कुठलीही वृत्ती शिल्लक राहिलेली नाही. गोप-गोपी, गाई-वासरे, पक्षी-श्वापदे यांना या स्नेहाळ भगवंताचा तर भगवंताला या सार्‍यांचा परस्पर छंदच लागलेला आहे. भगवंताचे रूप-गुण आणि त्याच्या मुरलीने सार्‍यांना मोहविले आहे. त्यांचा आनंद अखंडित राहावा, यासाठी घनरूप परमानंद असलेला हा भगवंत पांवा (मुरली) सतत जवळ बाळ्गत असतो. भगवंताचे आपल्या भक्त मांदियाळीसह असलेले, जिथे आनंदाचा अनवरत वर्षाव होतो आहे, असे परमसुंदर चित्र तुकोबाराय उभे करतात व त्यायोगे आपल्या मनाला आल्हाद देतात.
    मंडित म्हणजे शोभायमान्. अलौकिक सौंदर्याने सुशोभित असे दिव्य रूप या भगवंताचे आहे. विठ्ठल हा प्रत्यक्षात दोन भुजांचा आणि तोही आपले हात कमरेवर ठेवलेला असा उभा आहे. तुकोबाराय इथे पांदुरंगाला 'चतुर्भुज' असे संबोधतात. भगवंत हा ज्ञानस्वरूप आहे. तो वेदमूर्ती आहे. हे वेद हेच त्याच्या धर्मकार्याचे विधान आहे. कार्याचे साधन असलेले वेद या त्याच्या भुजा आहेत, असे म्हणता येते. भगवंताच्या विभूती या चार, सहा वा अठरा हातांच्या कल्पिलेल्या आहेत. (ज्ञानेश्वरमाऊलींनी हरिपाठात 'चहुं वेदी जाण साही शास्त्री कारण । अठरा ही पुराणे हरिसी गाती ॥' असे म्हटलेले आहे. यात वेदातून 'जाण' म्हणजे ज्ञान, 'कारण' म्हणजे जगत् निर्मितीचे आदिकारण आणि 'गाती' यातून कीर्तीवर्णन असा बोध होतो.) पुढे ते भगवंताला 'मनमोहना' आणि 'गरुडध्वज' या नावांनी संबोधतात. एखाद्या विषयाचा मनाला मोह होतो, तेव्हा स्वाभाविकरित्या अन्य विषय विसरले जातात. भगवंताच्या दर्शनाने त्याच्याच रूप-गुणांनी मन मोहित होते. इतर विषय लोप पावतात. 'गरुड' हा पक्षीराज 'गती'चे द्योतक आहे. भक्तकार्यार्थ गरुडवेगाने धावणारा हा भगवंत आहे. प्रसंगी हा भगवंत गरुडपेक्षाही शीघ्र गतीने धावून जातो (गजेंद्रमोक्षासाठी भगवंताने हरि-अवतार घेऊन अशाप्रकारे कार्य संपादिले असल्याचे वर्णन पुराणातून केलेले आहे.). तुकोबारायांना या विठ्ठलाच्या जागी त्यांच्या हृदयसंपुष्टात साठून राहिलेला हा 'हरि' दिसतो आहे. आणि म्हणूनच ते 'माझा स्वामी, ज्याला मी माझे अंतःकरण समर्पिलेले आहे, तो भक्तकार्यासाठी त्वरा करीत असतो' असे उद्‍गारून अभंगाचा समारोप करतात.
(क्रमशः)   
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)