नाटाचे अभंग... ४६

४५.    हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें ।
    आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥
    बैसतां संतांचे संगती। कळों आलें कमळापती ।
    आपुलीं कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥धृ॥
    येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड ।
    कनिष्ठीं रुचि ठेवूनि गोड । देखत नाड कळतसे ॥३॥
    मरती मेलीं नेणों किती । हाचि लाभ तयाचे संगती ।
    म्हणोनि येतों काकुळती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥४॥
    सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन ।
    आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे ते ॥५॥
    आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित ।
    तरी मी नष्टचि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥६॥
    तुकोबारायांना संतसंगतीचा असा लाभ झाला की, विनासायास संतमुखाद्वारे त्यांना सत्शास्त्राचे श्रवण झाले. संतांच्या उपदेशाप्रमाणे जीवनाचा उत्कर्ष साधावयाचा झाल्यास केवळ श्रवण पुरेसे ठरत नाही. जे श्रवण घडले त्याचे चिंतन, मनन आणि निदिध्यास या क्रमाने तुकोबारायांच्या अंतःकरणास चालना मिळून त्यांच्या ठिकाणी सद्विवेक जागृत झाला. याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की, संत आणि सद्‍गुरु हे मार्गदर्शक जरी होत असले तरी, 'उद्धरेत् आत्मनात्मानम्'- स्वतःचा उद्धार स्वतःच साधावयास हवा - या भगवद्वचनाप्रमाणे साधकाने तदनुकूल प्रयास केला, तरी फलप्राप्तीसाठी तसे करणे पुरेसे ठरेलच असे नव्हे. साधकाचे हे आद्यकर्तव्य ठरते की, स्वतःच्या हितार्थ आपल्या ठिकाणी अखंड जागृती, सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक ठरत असते. हे सर्व करीत असताना यच्चयावत् जीवमात्र ज्याचा अंश आहे, तो अंशी अर्थात् परमात्मा हाच जगन्नियंता, कर्ता-धर्ताऱ्हर्ता आहे, तोच सर्वसमर्थ आहे, हे जाणून जीवाने आपल्या उपास्याच्या स्वरूपातील भगवंताचे अवलंबन करणे, केव्हाही व्यर्थ ठरणारे नसते. तथापि, भगवंताच्या स्वरूपाचे अनुसंधान राहण्यासाठी भगवंताचेच सहाय्य हवे, असे तुकोबारायांना वाटते.   
    मागे 'नाटाच्या अभंगां' तील २७ व्या अभंगाची सुरुवात तुकोबारायांनी 'मज ते हांसतील संत । जिहीं देखिलेती मूर्तीमंत ।' असे म्हणून केलेली आहे. साधक अज्ञ अवस्थेतून बाहेर येण्यासाठी त्याचे संचित आणि त्याने केलेले श्रवण-चिंतन-निदिध्यासन उपयोगाचे असते. जसजसा काळ उलटतो, तसतसा साधक परमेश्वरप्राप्तीसाठी उतावीळ होणे स्वाभाविक असते. तेथे भगवंतापुढे आपल्या अंतःकरणाची झालेली स्थिती वर्णन करताना ज्याचे ध्यान धरावयाचे, ते स्वरूप वर्णन करता येत नसल्याची खंत तुकोबारायांनी व्यक्त केली आहे (ध्यानीं म्यां वर्णावेती कैसें ।). जोपर्यंत भगवंताचे स्वरूप आकळत नाही, तोपर्यंत खर्‍या अर्थाने भक्ती फळाला येणे शक्यच नसते, साधकाचे भक्तपण म्हणजे ढोंग दिसते आणि मग आपल्याला संत हंसतील, याची तुकोबारायांना भीती वाटते. त्यांनी केलेला भगवंताचा धावा कामी आला आणि त्यांना 'कमळापती' आकळला. त्याचे स्वरूपदर्शन त्यांना लाभले. या प्रसंगी त्यांच्या अंतःकरणातील भावना त्यांनी या अभंगातून व्यक्त केलेल्या दिसून येतात. 
    भीमातीरीच्या पंढरीनाथाचे दर्शन घेत असताना त्यांना 'मुखमंडित चतुर्भुज' असे भगवंताचे स्वरूपदर्शन झाले आणि 'भक्तकाजासाठी लवलाही धावून येणारा हाच भगवंत आपला स्वामी असल्या' चे सत्य त्यांना उमगले. हेच ध्यान निरंतर आपल्या चित्तात दृढ राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. म्हणून ते देवाला विनवतात, 'हातींचे न संडावें देवें ।' या पदाचा अर्थ तसे पाहता अनेक पदरी असल्याचे दिसून येते.सकृत्
दर्शनी असे दिसते की, सत्शास्त्र-श्रवण आणि संतांचे मार्गदर्शन यांद्वारे तुकोबारायांना, भगवंताचे जे शरणागत आहेत, त्यांच्यात प्रवेश तर मिळाला आहे. आता कोणताही सारासार विचार न करता किंवा त्यांची लायकी न पाहता भगवंताने त्यांना दूर करू नये, त्यांचा अव्हेर करू नये. अन्य एक अर्थ दिसतो की, संत व सत्शास्त्र यांच्या संगतीतून जे काही इष्ट तुकोबारायांना प्राप्त झाले आहे व ज्यावर त्यांचा निष्ठावंत भाव जडला आहे, तो ठेवा त्यांच्या हातून निसटू नये. भगवंताने आपला अव्हेर करू नये, यासाठी ते विनयपूर्वक कथन करतात की, त्यांचे वेगळेपण किंवा अहंकार (जीवभाव) गळून पडला आहे आणि त्यांचा अनन्य भाव, त्यांची निष्ठा भगवंताच्या चरणी वाहिलेली आहे. भगवंताने आपल्याला 'आपले म्हणावे', त्याचा निरंतर आश्रय त्यांना लाभावा, यासाठी ते त्यांच्या जीवावरही उदार झाले आहेत (करितों जीवें निंबलोण). त्यांच्या आयुष्याची आता ते तमा बाळगत नाहीत. 'आपुलें ऐसें म्हणावें' या मागणीमागे तुकोबारायांच्या अंतःकरणातील भाव असा आहे की, संपूर्ण शरणागत झाल्यानंतर त्यांना जवळ करण्यासाठीच्या योग्यायोग्यतेचा विचार भगवंताकडून केला जाऊ नये.
    तुकोबारायांनी आपल्या जीवनाविषयीची त्यांना झालेली उपरती वेगवेगळ्या अंगांनी वेळोवेळी भगवंताला निवेदन केली आहे. प्रारब्धाचे भोग, संसाराची अभिलाषा, स्वजन-धनसंपत्ती-मानमरातब आदीची तहान, प्रपंचाचे कोड, कर्मसंचित व त्यातून प्राप्त होणार्‍या जन्म-मृत्यु-जन्म शृंखलेचे बंधन, त्यातून जीवाची होणारी ससेहोलपट आदी कारणांनी तुकोबारायांना पश्चात्तापदग्ध केले आहे. भगवंताचे स्वरूपदर्शन लाभल्यानंतर त्यांच्या मनाचा झालेला निश्चय ते व्यक्त करतात. ज्यामधून उन्‍ऋण होता येत नाही, असे संतांचे झालेले उपकार ते स्मरतात व त्याची स्पष्ट कबुली ते भगवंतासमोर देतात. संतांचा यथार्थ संग केला तरच भगवंताचे स्वरूप कळेल, 'कमळापती' खर्‍या अर्थाने कळून येईल, याची जाणीव या अभंगाच्या धृपदाद्वारे ते जनांना देतात. त्याचप्रमाणे आपली प्रत्यक्ष अनुभूतीही ते कथन करतात. इथे तुकोबारायांनी योजलेले 'कमळापती' हे भगवंताचे संबोधन भगवंताचे गुणवर्णन करणारे आहे. अमृतमंथनाच्या वेळी सागरातून उत्पन्न झालेल्या 'कमळा' म्हणजे 'लक्ष्मी'ने पाहिले की, सारे देव-दानव तिच्या दिव्य रूपाने आकर्षित होऊन काहीशा अभिलाषेपोटी तिच्याकडे पाहात होते. केवळ विष्णु मात्र स्वकार्यात तल्लीन झालेला तिला दिसला. सार्‍या जीवांचा आधार असलेला, त्यांचे भरण-पोषण करणारा हा भगवान् विष्णु निरभिलाष असलेला पाहून, 'शरणागतदीनार्त परित्राणपरायण' असलेल्या लक्ष्मीला आधार गवसला आणि तिने पति म्हणून विष्णूचा स्वीकार केला. विष्णूच्या जगत्कल्याणकार्यात ती सहभागी झाली. तुकोबारायांना संताच्या संगतीत 'बसल्याने' म्हणजेच संतांच्या शिकवणुकीचे यथार्थ अनुशीलन तसेच अनुपालन केल्याने या कमळेच्या नि तिच्या पतीचे यथार्थ स्वरूप उमगले. या कमळापतीशिवाय जीवाचे कल्याण साधून देण्यास अन्य कोणीही समर्थ नसल्याचा निश्चय तुकोबारायांच्या मनात दृढ झाला. इथे हे लक्षात घ्यावयाचे की, संतसंग हे ईश्वरप्राप्तीसाठी साधन आहे तसेच ते साध्यही आहे. दुसरी गोष्ट ही की, ईश्वर उमगणे म्हणजे 'बरव्या ज्ञानाची प्राप्ती होणे' असते आणि ज्ञानेश्वरमाऊली सांगतात त्यानुसार वैराग्याची बैठक असल्याशिवाय ज्ञानाचे तगणे, कायमस्वरूपी चित्तात ठसणे, शक्य नसते. (तरी विरक्तीवांचूनि केहीं । ज्ञानासि तगणें नाहीं ॥- ज्ञाने.)
    'आपुलीं कोणीच नव्हती' यातून प्रपंचाचा व्यवहार सांभाळताना तुकोबारायांना त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात आलेली प्रचिती, त्याचप्रमाणे भगवंताचे स्वरूपदर्शन झाल्यानंतर, जो खरोखरीच, यथार्थतः 'आपला' म्हणविण्याच्या योग्यतेचा आहे, तो अनुभूतीस आल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. प्रपंचात आपल्या विविध नात्याच्या व्यक्ती, ज्यांना आपण ‘आपले’ म्हणून समजत असतो, ती खर्‍या अर्थाने आपली होऊ शकत नाहीत. याविषयी एक दृष्टांत दिला जातो. भगवत्भजनात रत झालेल्या एका साधूला एक धनिक भेटला. बोलता बोलता त्याने आपल्या स्वजनांचे फार कौतुक साधूला निवेदन केले. साधूने स्मित केले. साधू काही दिवस त्या गावातल्या मंदिरातच राहिला. धनिकाने त्या साधूची सेवा केली. साधूने धनिकाला प्राणनिरोधन शिकविले. एक दिवस साधूने त्या धनिकाच्या स्वजनांचा विषय काढला आणि 'चला, आपण तुझ्या स्वजनांची परीक्षा पाहू' असे म्हणून धनिकाला काय करायचे, ते समजाविले. दोघेही धनिकाच्या घरी गेले. साधूने सांगितल्याप्रमाणे बोलता बोलता धनिकाने प्राणनिरोध केला. तो धनिक अचानक मृत झाल्याचे समजून घरात एकच हलकल्लोळ माजला. तेव्हा साधूने त्या सार्‍यांना धीर देत एक वाटी दूध मागविले. ते दूध निश्चेष्ट पडलेल्या धनिकावरून उतरवून ती वाटी बाजूला ठेवली आणि निश्चेष्ट पडलेल्या धनिकाला लहानशी चापटी मारून सावध केले. मात्र धनिक त्याच अवस्थेत पुढील संवाद ऐकत होता. साधू त्या धनिकाच्या स्वजनांना म्हणाला, 'हे दूध जो प्राशन करेल, त्याचे प्राण जातील परंतु हा परोपकारी जीव पुन्हा जिवंत होईल.' असे म्हणून त्याने एकेकाला बोलावून ते दूध पिण्यास सांगितले. कोणीही तयार होईना. प्राणनिरोधातून बाहेर आलेल्या धनिकाने हा सारा प्रकार पाहिला. तो उठला आणि त्याने साधूचे पाय धरले. साधूचा उपदेश ग्रहण केला व स्वोद्धाराच्या प्रयत्नाला लागला. वाल्या कोळ्याचा अनुभवही प्रातिनिधिक असाच आहे. स्वार्थापोटी लटक्या प्रेमाच्या पाशात गुंतवणारे हे स्वजन; त्यांना 'आपले' कसे म्हणावे? तुकोबाराय हेच सांगतात. आपापल्या लोभापायी प्रपंचाचे कोडकौतुक करून प्रलोभन दाखविताना हे स्वजन माणसाला परमार्थापासून दूर ठेवत असतात. त्यांच्या अंतःकरणातील रुचि ही प्रशंसनीय नसून हीन प्रकारची असते. तुकोबाराय म्हणतात, 'देखतां' म्हणजे सारासार विचार करून पाहिल्यास या तथाकथित स्वजनांचा स्वभाव (- नाड) कळून येतो. हे सारे 'आपले' भासणारे साधकास नाडणारे, त्याच्या साधनात अडथळाच आणणारे असतात. साधकाची एक प्रकारे फसवणूक करणारे असतात. येथे तुकोबाराय त्यांच्या अंतःकरणात उदित झालेल्या वैराग्याचा निर्देश करतात.
    तुकोबाराय पुढे स्पष्ट करतात की, अशी ही देहसंबंधित माणसे; त्यांना आपण केवळ अज्ञानाने 'आपले' समजत असतो... त्यांना कितीही जीव लावला तरी मृत्युरूपी कुठाराघात दोघांच्यात वियोग घडवणारा असतो (मरती मेली नेणों किती ।). त्यांच्या मरणाचे दुःख झेलीत आपण मात्र अनाठायी आत्मक्लेष सहन करीत बसतो. अशा वियोगावर खरे तर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा उपाय नसतो. स्वजनांचा संग करून लाभ म्हणावा तर केवळ क्लेष वाट्यास येण्याचा. वास्तविकतः त्यांची केलेली संगती हानीकारकच ठरत असते. (येथे 'लाभ' या शब्द उपरोधात्मक आहे.) तुकोबाराय देवाला ही स्थिती निवेदन करून आपणास खरोखरीच वैताग नव्हे तर वैराग्य आल्याचे दाखवितात. आपल्याला 'तुझ्या' खर्‍या आधाराची तहान लागली असल्याचे भगवंताला काकुळतीला येऊन ते सांगतात आणि त्यांच्या निराधार अंतःकरणाला भक्कम धीर भगवंताने द्यावा, असे विनवतात.
    साधकाच्या मार्गात येणारे आणखी एक संकट तुकोबाराय नमूद करतात. हे संकट लोकेषणामुळे येणारे असते. मनमोकळेपणाने काही करायला जावे तर, 'लोक काय म्हणतील' हा विचार माणसाला पदोपदी त्रस्त करीत असतो. पाठीवरचा भार रिकामा झालेल्या गाढवाची कणव येऊन त्याच्या बरोबर चालताना कुंभाराला लोक हसतात. 'कशाला चालायचा त्रास भोगतोयस्, गाढवावर बसून आरामात जा' असे सांगणार्‍या लोकांचे ऐकावे, तर 'चक्क गाढवावर बसून हे गाढव जात आहे' असे म्हणून हिणवणार्‍या लोकांचे टोमणेही ऐकावे लागतात. खोट्या अहंभावापोटी माणसाला लोकेषणा टाळणे अनुल्लंघनीय वाटते खरे, परंतु, भगवंताचे स्वरूपदर्शन लाभलेल्या तुकोबारायांना हे सारे उमगले आहे. लोकेषणा झुगारून देऊन आपले साधन निष्ठेने चालू ठेवण्याचा त्यांचा निश्चय पक्का झालेला आहे. भले लोकांनी कितीही निंदा केली, तरी त्याचे सोयरसुतक आता त्यांच्या मार्गात नाडणारे नाही. ज्ञानी-पंडित असो वा इतर कुणी महाजन असो, तुकोबाराय अनुसरत असलेल्या मार्गाविषयी कोणीही काहीही बोलत असले, तरी त्यांना प्रत्युत्तर करून आपला वेळ व्यर्थ घालवण्यात काहीही अर्थ नाही, त्यांच्याशी न बोलणेच चांगले, असा तुकोबारायांनी निश्चय केला आहे. त्यांची अविचल श्रद्धा ही आहे की, हा नारायणच आदिपिता असल्याचे संतांचे सांगणे आहेच आणि 'भूतानाम् अव्ययः पिताः' असे सत्शास्त्राचेही जे सांगणे आहे, तेच प्रमाण मानून भगवंताच्या चरणांची जोड प्राप्त करून घ्यायची. 'मी आता या निष्ठेपासून चळणार नाही' असा तुकोबारायांचा भाव आहे. 
    भगवंतापुढे 'हातींचें न संडावें देवें' असे जे विनवणे आहे, त्यामागचे एक महत्त्वाचे कारण तुकोबाराय शेवटी भगवंताजवळ प्रगट करतात. माणूस जे काही कर्म आचरतो, त्याला प्राक्तन किंवा संचित हेच प्रमाण असते. हे संचित माणसाला अनाकलनीय असते. अशा परिस्थितीत कुठल्याही अवस्थेतला जीव स्वतःचे आत्यंतिक हित समजण्यास व तसे हित स्वबळावर साधून घेण्यास असमर्थ असतो. त्यातही जर कुणी दुष्ट प्रवृत्तीचा असेल तर तो खचितच स्वतःला सावरू न शकणारा असतो. किंबहुना, 'बुडत्याचा पाय खोलात' अशी त्याची गत असते. तुकोबाराय स्वतःच्या पूर्वायुष्याचा सारांशाने विचार करतात आणि आपले हीनत्व प्रकट करून (- मी नष्टचि पतित), त्यांच्या आत्यंतिक हितासाठी भगवंताचे सहाय्य मागतात. 'दैव देते अन् कर्म नेते' असे म्हणण्याची पाळी आपल्यावर येऊ नये, असे तुकोबारायांना वाटते. आपल्या कर्मदरिद्री स्वभावामुळे संतकृपेने जो ठेवा हाती लागला आहे, तो दवडताना पाहून संत आपला उपहास करतील. याकरिता तुकोबारायांची कळकळीची याचना आहे की, आदिपिता नारायणाने आता त्यांचा अव्हेर करू नये आणि त्याच्या चरणांचा अतूट आश्रय त्यांना निरंतर लाभावा. तुकोबारायांच्या मागणीमागे जे कारण आहे, ते म्हणजे संतसंगतीमुळे त्यांच्या अंतःकरणात दृढ झालेला हा विश्वास की, 'अंगिकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तेंहि त्यानें वंद्य केलें ॥'
(क्रमशः)   
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)