नाटाचे अभंग... ४७

४६. आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत ।
 पहातां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ॥१॥
 विसरोनि आपला देहपणभाव । नामेंचि भुलविला पंढरीराव ।
 न विचारी याति कुळ ठाव । लागावया पाव संतांचे ॥धृ॥
 बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां ।
 होय अविनाश साहाकारी दाता । चतुर्भुज सत्ता* परि धाके ॥३॥
 होय आवडी साना थोर । रूप सुंदर मनोहर ।
 भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥
 तें वर्म आलें आमुच्या हातां । म्हणोनि शरण रिघालों संतां ।
 तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडीं आता जीवें भावें ॥५॥
  (*पाठभेद: संता)
 
 तुकोबारायांच्या साधक अवस्थेतील निष्ठेच्या वैशिष्ट्याचे दर्शन या अभंगातून होत आहे. या अभंगावर चिंतन करताना एक गोष्ट ध्यानात येते, ती ही की, येथे ईश्वराच्या महत्तेचे वर्णन जरी असले तरी संतांच्या सामर्थ्याचे वर्णन यात प्रामुख्याने दिसून येते. परंतु. असे करण्यामागे तुकोबारायांचा अंतस्थ हेतू ईश्वराला गौणत्व देण्याचा मात्र नाही. संतांची महत्ता वर्णन केल्याने ईश्वरालाही संतोषच होत असतो, असा भक्तीमार्गातील जो विश्वास आहे, तो तुकोबारायांच्या मुखातून आलेल्या या वर्णनाने प्रगट होत आहे. (ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले आहे, ‘तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जें भक्त चरित्रातें । प्रशंसती ॥’ - ज्ञाने.) असे दिसून येते की, या अभंगात संतांचे असे सामर्थ्य वर्णिलेले आहे की, प्रसंगी या संतांची आज्ञा प्रमाण मानून भगवंतालाही तिष्ठावे लागते. एकंदरीत, भगवंत आणि संत, या दोघांचाही महिमा येथे वर्णिलेला असला तरी, संतांना दिलेले प्राधान्य पाहता, या अभंगाला ‘संत’पर अभंग म्हणणे अनुचित ठरणार नाही.
 वास्तविकतः आपले उपास्य अथवा आराध्य हे एकमेव वंदनीय, प्रार्थनीय, वरेण्य असते, यात दुमत नाही. तरीसुद्धा, संतवचनांच्या आधारे ईश्वराच्या अंतःकरणाचा ठाव घेतल्यास असे दिसते की, या भगवंताला संतमहिम्यापुढे त्याचे स्वतःचे केलेले स्तवन हे पूर्णतः संतोष देऊ शकत नाही. कर्तुम्-अकर्तुम्-अन्यथा कर्तुम्, स्व-तंत्र असा सर्वसामर्थ्यसंपन्न, सर्वसत्ताधीश असूनही प्रसंगी हा भगवंत संतांपुढे याचक म्हणून उभा राहतो. तुकोबाराय एका अन्य अभंगात म्हणतात, ‘प्रमाण त्याच्या बोला । देव भक्ताचा अंकिला ॥धृ॥ न पुसतां जातां नये । खालीं बैसतांही भिये । अवघा त्याचा होय । जीवभावासहित ॥२॥ वदे उपचारें वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥३॥ उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धावें मागें ॥४॥’ सामान्य जनांना दुर्गम असणारा भक्त महिमा, जो देवालाही संतोष देणारा ठरतो, तो महिमा या अभंगात विषद करून सांगितला आहे.
 ‘युगे अठ्ठाविस’ एका विटेवर तिष्ठत उभा असलेल्या विठ्ठलाला डोळे भरून पाहताना, तुकोबारायांच्या मनात  भक्त पुण्डलिकाविषयी कृतज्ञतेची भावना जागी होते. पुण्डलिकाच्या भेटीसाठी आतुर होऊन आलेल्या या विठ्ठलाला, पुण्डलिकाचे भक्तीप्रेम पाहून आनंदाचे भरते आले. त्याच्या डोळ्यात प्रेमाश्रूंची दाटी झाली. त्या प्रेमाश्रूंचा निचरा करण्यासाठी भगवंताला वारंवार पापण्या मिटवाव्या लागल्या. भक्तीप्रेमाची प्रचिती दर्शनाला येणार्‍या नामदेव-ज्ञानोबा-एकनाथादी अनेक संतांच्या भक्तीप्रेमात पंढरीनाथाला वारंवार येतच राहिली. ते सुख अनुभवत हा विठ्ठल तसाच तिष्ठत युगानुयुगे उभा राहिला आहे. आजही (- आतां) भक्तांना भक्तीप्रेमाने सुखावलेल्या या पांडुरंगाची जवळिक लाभत आहे. ‘येणें बळें’ या शब्दातून संतांच्या अशा भक्तिप्रेमाचे बळ तुकोबाराय दाखवितात. असा हा सर्वसत्ताधीश, अनंत असलेला भगवंत केवळ याच कारणाने आम्हाला जवळ झाला आहे, आमचा आप्त झाला आहे. तुकोबारायांचे सांगणे आहे की, अशा प्रकारे भक्तीप्रेमासाठी आतुर असलेल्या पंढरीनाथाला आपल्या हृदयात साठवू. त्याचे हृदगत जाणून घेऊ.
 भगवंताचे असे हे हृद्‍गत तुकोबाराय स्पष्ट करतात. ते प्रथम सांगतात, ‘विसरोनि आपला देहपणभाव’. ‘मी कोण आणि कुठचा’ या दोहोंचा विचार ही परमार्थाच्या प्रवासाची पहिली पायरी असते. ‘मी भगवंताच अंश आहे आणि भगवंताचे चरण हेच माझे निजस्थान आहे’ या विचारांच्या योगे परमार्थात साधक सुलभतेने मार्गक्रमण करू लागतो. या पाच भौतिकदेहाच्या सहाय्यानेच साधन आचरून भगवंताला भुलवता येत असते, हे जरी खरे असले, तरी हा देह परमार्थप्राप्तीचे केवळ साधन असते. साधकाच्या अंतःकरणात रुजलेला ‘माझा देह म्हणजे मी’ हा दृढ देहभाव निरसावा आणि ‘जें जें देखें भूत । तया मानिजे भगवंत ।’ हा विचार दृढ होऊन साधकाला ब्रह्मैक्य साधता यावे, यासाठी संत-सद्‍गुरूंचा आशिर्वाद लागतो. तुकोबारायांनी योजलेला ‘देहपणभाव’ हा शब्द त्रिकूटी आहे. तो भगवंतासाठीही सार्थ ठरतो, संताना लागू होतो नि साधकासाठीही खरा ठरतो. भक्तीप्रेमाने सुखावलेल्या, त्या प्रेमाला भुललेल्या भगवंताला स्वतःचा विसर पडला आहे (आपुले तें थोरपण । नारायण विसरला ॥). त्याचे विश्व आता केवळ ‘अनंत असलेल्या भक्तांची मांदियाळी’ इतकेच आहे. आणि, या प्रेमळ विठोबाच्या जवळीकतेसाठी असलेल्या लोभापोटी त्याच्या नामसंकीर्तनात भक्तांनाही आपल्या देहभावाचा विसर पडलेला आहे. या भक्तांनी नामाच्या योगे या भगवंताला भुलविले आहे. त्यासाठी अन्य कुठल्याही उपचाराची या भगवंताला आवडी नाही. आणि, साधकाच्या अंतःकरणाला जो भावेल, तो संत-प्रेषित-भगवंत साधकाची निष्ठा पाहून सुखद होत असतो. तुकोबाराय ‘देहपणभाव’ म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात, ‘याति कुळ ठाव’. भक्तीमध्ये असा देहपणभाव विचारला जात नाही. यात भगवंत-संत यांची जवळीक, संत-साधक यांची जवळीक, तसेच साधक-संत-भगवंत या तिघातील जवळीकतेचा विचार सामावलेला आहे. भगवंत संतांचे याति-कुळ-ठाव विचारात घेत नाही, त्याचप्रमाणे संतांना साधकाच्या याति-कुळ-ठावाशी काहीही देणे-घेणे नसते. तिसरी बाजू ही की, साधकाच्या अंतःकरणात कुणा संत-सद्‍गुरूंच्या ठायी श्रद्धा निर्माण होणे, हा दैवी संकेताचा भाग असतो. त्यातूनच त्याला अंतःस्फूर्ती होत असते. मग तेथे त्या संत-सद्‍गुरूच्या याति-कुळ-ठावाच्या सापेक्षतेला काहीच स्थान नसते. म्हणूनच ‘ऋषीचे कूळ नि नदीचे मूळ’ विचारू नये, असा संकेत आहे. संत-सद्‍गुरूच्या पायीं लागण्यासाठी, तेथे मस्तक ठेवण्यासाठी, साधकाच्या स्वतःच्या किंवा संत-सद्‍गुरूच्या याति-कुळ-स्थानाला काहीही किंमत राहात नसते. भगवंताच्या निर्देशाने विसोबा खेचर नामदेवांचे गुरू झाले, तर रामेश्वर भट्ट, निळोबाराय तुकोबारायांचे शिष्य झाले. नाथ सांप्रदायी निवृत्तीनाथादी भावंडे विठ्ठलाचे भक्त झाले, तर, संत एकनाथ हे दत्त सांप्रदायी होते.
  पंढरीनाथाचे दर्शन घेत असताना भक्त पुण्डलिकाविषयी मनात आलेल्या विचारांचे अशा प्रकारे तुकोबारायांना चिंतन घडले. या चिंतनातून एक खुबी (- वर्म) त्यांना उमगल्याचे ते सांगतात. त्यासाठी त्यांना कुठेही धावाधाव, शोधाशोध करावी लागली नाही. ‘बरें झाले, हे वर्म अगदी सहजपणे आमच्या हातीं आले’, असे म्हणून तुकोबाराय आपला आनंद व्यक्त करतात. भगवंताला आपल्या जवळ तिष्ठत ठेवण्याचे बळ केवळ नामसाधनाने लाभते, त्यासाठी अन्य काहीही उपचार-कर्म अनावश्यक आहे, हे ते वर्म होय. तुकोबारायांना संतसंगातून हेही उमगले आहे की, अविनाशी अशा नामसाधनाची गोडी भगवंताला लुब्ध करू शकते. तुकोबाराय भगवंताचे वर्णन करताना त्याला ‘चतुर्भुज’ संबोधतात. सृजन-स्थिती-लय आणि ज्ञान यांवर ज्याची संपूर्ण सत्ता आहे, जो कर्तुम्-अकर्तुम्-अन्यथा कर्तुम्, स्व-तंत्र सत्ताधीश आहे, त्रैलोक्यात अशी अन्य कोणतीही सत्ता नाही, जी या भगवंताच्या आधाराशिवाय असू शकते, असा हा भगवंतदेखील या संतांच्या विषयी विचार करताना मर्यादेचे अतिक्रमण होऊ नये, म्हणून संतांच्या धाकात राहण्यास तयार असतो (प्रमाण त्यांच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥). नामावर लुब्ध झालेला भगवंत मग दूर जाऊ शकत नाही. ‘संता’ हा पाठभेद अभंगाचा भावार्थ अधिक उघड करून दाखविणारा आहे. चतुर्भुज असे ज्याचे स्वरूप आहे, जो स्वतः ‘धाकट’ आहे, तो प्रत्यक्षात मात्र संतांचा धाक मानतो.
 भगवंताचे आणि संतांचे दोघांचेही सामर्थ्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुंदर, मनोहर रूप असणारा हा पंढरीनाथ, लहान-थोर सार्‍यांनाच आवडतो. या चरणाचा असाही अर्थ होतो की, भक्ती निरतिशय प्रिय असलेला, भक्तीचा लोभ जडलेला हा निरुपाधिक, निराकार, निर्गुण, ब्रह्मस्वरूप भगवंत संतांच्या आवडीचे अनुसरण करीत लहान-मोठे, कुठलेही रूप धारण करतो (होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥...आला नांवारूपा । तुका म्हणे झाला सोपा ॥). अनेक रूपे धारण करून हा संतांच्या सेवेसाठी धावून जातो. संतांनी काही मागावे, यासाठी तो याचक होऊन आदराने त्यांची विनवणी करतो. किंबहुना, संतांची याचना करताना या भगवंताला स्वतःचा गौरव वाटतो. वैशिष्ट्य हे की, संत भगवंताकडे काही मागणी करण्यासाठी मात्र उदासीन असतात. त्यांना भगवंताच्या जवळीकीशिवाय आणि जनांचे यथार्थ हित साधून देण्याशिवाय अन्य कशाचीही वासना नसते.
 संतांचा अंकिला होण्याचा भगवंताचा स्वभाव, तसेच, भगवंताला अंकिला होण्यास भाग पाडणारे अनोखे बळ कोणते, आणि ते लाभते कसे, याचे वर्म, तुकोबाराय म्हणतात, आमच्या हाती असे आपसूक आलेले आहे. आता भगवंताला आकळण्याचा आमचा मार्ग सुगम झाला आहे. भक्तीमार्गात पुढे जाण्यासाठी विशेष वर्मस्वरूप असणारे नामाचें, संतांचे तसेच भगवंताच्या स्वभावाचे महिमान् आमच्या चित्तात ठसावलेले आहे (आलें आमुच्या हातां). यासाठी भगवंत आणि संत या दोघांचेही उपकार असल्याची भावना तुकोबारायांच्या अंतःकरणात आहे. पंढरीनाथाला त्याच भावनेने ते वचन देतात की, आमच्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्यासाठी आम्हाला जे अलौकिक वर्म प्राप्त झालेले आहे, त्याला अनुसरून या संतांचे चरण आता ‘जीवें’ अन् ‘भावें’ धरून ठेवू. त्यांची शिकवणूक निष्ठेने आचरू.’ तुकोबारायांच्या या वचनाने भगवंत मनातून सुखावलेला असणे स्वाभाविक आहे, कारण त्याला संतांचे महिमान् वर्णन करणे अतिशय प्रिय आहे.
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)