नाटाचे अभंग... भाग ५१

५०. शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार ।
 शरीर दुर्गंधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥
 शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचें घोसुलें ।
 शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥धृ॥
 शरीर विटाळाचे आळें । मायामोहपाश जाळें ।
 पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥३॥
 शरीर सकळही शुद्ध । शरीर निधींचाही निध ।
 शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यभागीं देव शरीरा ॥४॥
 शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणांचा रांधा ।
 शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुधा एक शरीरीं ॥५॥
 शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग ।
 शरीर वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ॥६॥

 (हा अभंग वाचला असताना प्रथमदर्शनी असे दिसते की, यात ईश्वराराधनेतील साधन आणि साध्य या घटकांचा विचार केलेला आहे. तुकोबाराय ‘शरीर आद्यम् खलु धर्मसाधनम्’ या शास्त्रवचनाला अनुसरून मानवी देह हे जे आद्य साधन आहे, त्याचा निंद्य आणि वंद्य या दोन्ही अंगांनी विचार मांडतात आणि त्याचा योग्य विनियोग करावयास सांगतात. त्यामुळे हा अभंग ‘नाटाचा अभंग’ नसून उपदेशपर असावा, असे म्हणता येते. तथापि, मानवी देहाचे असाधारणत्व लक्षात घेऊन परमेश्वराच्या कौशल्याचे कौतुक आणि दैवाधिन असलेल्या मानवाच्या परावलंबित्वाचे यात अप्रत्यक्षरित्या वर्णन केलेले आहे, असे म्हणता येते. या दृष्टीने मात्र हा अभंग नाटाचा अभंग आहे, असे म्हणता येईल.)
 मानवी देहाच्या वैशिष्ट्याविषयी पाहताना असे लक्षात येते की, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीची प्रक्रिया होत असताना नानाविध योनी (८४ लक्ष) निर्माण झाल्या, परंतु ‘कोठे कांहीं कोठें कांहीं । एक आहे दुजे नाहीं ।’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक योनीमध्ये कमी-अधिक प्रमाणात गुण-दोष दिसून येतात. सृष्टीतील अचर वस्तू बाजूला ठेवून ज्या चर (सजीव) योनी निर्मिल्या गेल्या, त्यात जड आणि चेतन यांच्या योगाने जीवाला देहाचा आधार दिला गेला आणि त्यायोगे मायेचा खेळ अर्थात् जगत् व्यापार सुरू झाला.
 सर्व योनींमध्ये मनुष्य योनी ही एकच अशी योनी अशी आहे, जी मानवाचा आत्यंतिक उत्कर्ष, मग तो निरनिराळ्या शोधातून क्षणिक अशा ऐहिक सुखोपभोगांची साधने प्राप्त करण्यापुरता मर्यादित असो किंवा पारमार्थिक मार्गाने अनंताची प्राप्ती करून घेऊन परमोच्च सुखानंदाचा अखंड उपभोग घेणे असो, दोन्ही प्रकारचा उत्कर्ष साधून घेऊ शकणारी आहे. असा दोन्ही प्रकारचा उत्कर्ष साधण्यासाठी मानवी देह हेच एकमात्र, अद्वितीय असे सक्षम साधन आहे.
 असे हे मानवी शरीर कसे व का प्राप्त झाले, याचा सारासार विचार अध्यात्मात आवश्यक ठरतो. मानवाला हे शरीर कसे प्राप्त झाले, हे न्याय-शास्त्राचा आधार घेऊन सांगताना तुकोबाराय अन्यत्र सांगतात, ‘पावलों हा देह कागटाळी न्यायें ।’ माणसाला ठरवून एक वेळ देवत्व प्राप्त करून घेता येईल, परंतु मनुष्यदेहाची प्राप्ती त्याला स्वेच्छेने करून घेता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की, एकनाथ महाराज म्हणतात, त्याप्रमाणे ‘भरतखंडीं नरदेह प्राप्ती । हें तो बहुत पुण्याची संपत्ती ॥’ केवळ पुण्य-संचय झाला तरच मनुष्यदेह प्राप्त होत असतो. पुण्यसंचय एका जन्माचा पुरेसा असेलच असे नाही. म्हणून असेही एक वचन आहे की, ‘दुर्लभो मनुष्यदेहो’. मानवी देह प्राप्त झाला, तो कशासाठी, या प्रश्नाचा विचार करताना लक्षात येते की, मनुष्य योनीव्यतिरिक्त अन्य सार्‍या योनी, अगदी देवयोनीदेखील, भोगयोनी म्हणून गणल्या जातात. त्या योनींमध्ये आत्महिताचा विचार करण्याची कोणतीही सोय नाही. यासाठीच नरदेहाला ‘निधान’ म्हणून संबोधिले जाते (नरदेह निधान लागलें हातीं ।).  सजीवांचे चार प्रकार सांगितले जातात. वृक्ष-पशु-कीटक आदींना देह असला तरी मानवी देहासारखी वैशिष्ट्ये तिथे नाहीत आणि म्हणूनच त्यांना मानवी देह कळणे शक्य नाही. माणसाला देह मिळाला पण कळला नाही. माणूस सारासार विचार बाजूला ठेऊन केवळ वासनेपोटी भोगसामग्री (अमर्यादपणे) साठवून त्यामध्येच लिप्त राहतो अन् आयुष्य संपवून जन्म-मरण-जन्माच्या चक्रात स्वतःला अडकवून घेतो. क्वचित् प्रसंगी आयुष्याच्या संध्याकाळी विवेक जागृत झालाच तर प्राप्त झालेल्या देहाचा योग्य तो विनियोग करण्यासाठी उपाय मिळत नाही आणि अवधीही हाती राहिलेला नसतो. पुण्यकर्माच्या सामर्थ्यावर ज्यांनी स्वर्गात जाऊन देवत्व प्राप्त करून घेतले, त्यांना काही काळानंतर पुण्याची पाउटी सरल्यावर प्रारब्धानुसार मिळेल त्या योनीत जन्म घेणे भाग पडते. एकंदरित, देवयोनीतील जीवांना मनुष्यदेहाचे श्रेष्ठत्व कळते, परंतु तो देह न मिळाल्यामुळे केवळ वैफल्य त्यांच्या पदरी पडते. म्हणजे, देवांना मानवी देह कळला पण मिळाला नाही. आणि, संतांना मानवी देह मिळाला आणि तो कळलाही. म्हणून शरीराविषयीचा साधक-बाधक विचार करून संतांनी सर्व मानव कल्याणार्थ या विषयीचा त्यांचा निष्कर्ष प्रगट केला.
 तुकोबारायांनी जे चिंतिले, ते त्यांना मिळाले. आत्मप्रचिती आल्यानंतर थोडे मागे वळून पाहताना, भगवंताची प्राप्ती करून देणार्‍या ‘आद्य साधना’विषयी म्हणजेच ‘शरीरा’विषयी त्यांनी जे अनुभवले, ते अनुभव त्यांनी या अभंगातून व्यक्त केले आहेत. त्यांनी शरीररूपी अद्वितीय साधनाचे वर्णन निंद्य व वंद्य या दोन्ही अंगांनी सप्रमाण दिलेले आहे. प्रारंभीच्या चरणात तसेच पुढे तिसर्‍या व पाचव्या चरणात मानवी शरीर निंद्य कसे ते सांगून दुसर्‍या व चवथ्या चरणात या साधनाचे वंद्यत्व ते कथन करतात. हे शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार (जिथे दुर्गंधीने ठाण मांडलेले असते, अशी जागा, उकिरडा) असल्याचे सांगून या शरीरासारखे घाणेरडे अन्य काही नसल्याचे ते म्हणतात. शरीराला अपवित्र म्हणायचे कारण, जन्माला आल्यानंतर सोहेर आणि मेल्यानंतर सुतक लागून देहसंबंधी जनांनाही त्या अपवित्रतेची बाधा होते आणि शरीर सचेतन असताना शौच-मार्जनादी उपचार टाळल्यास त्या शरीराच्या संपर्कात येणार्‍यासदेखील व्याधी संभवतात. (तुकोबारायांनी दोन वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळातील जनजीवन अनुभवलेले आहे. अन्न-पाण्याविना शरीराची होणारी स्थिती किती तिरस्करणीय होत असेल, याचा अंदाज या वर्णनावरून येतो.)
 पुढील चरणाद्वारे तुकोबाराय शरीरातील दहा इंद्रियांच्या योगे जी निरनिराळी सुखे भोगता येतात, त्यांचे वर्णन ‘घोसुलें’ म्हणजे घोस, घड या शब्दाने करतात. निरनिराळ्या प्रकारची सुखे या इंद्रियांमुळेच जीवाला मिळत असतात. जे योजावे, जे कल्पावे, ते या शरीराद्वारेच साध्य करता येते. लौकिक सुखे असोत वा पारमार्थिक, ती या शरीराद्वारेच मिळविता येतात, हा तुकोबारायांचा अनुभव आहे. त्यांनी परब्रह्म साधले, ते या शरीराच्याच योगे, हे ते ध्रुपदातून सांगतात.
 नरदेहाचा भौतिक दृष्टीकोनातून विचार करताना तुकोबाराय निवेदन करतात की, हे शरीर विटाळाचे आळे आहे. वारंवार ते विटाळले जाते. हे शरीर ‘माया आणि मोह’ या दोन पाशांनी बद्ध असल्याचे ते म्हणतात. (शास्त्रात मानवी देह हा सप्त पाशांनी बद्ध असल्याचे सांगितले आहे. ते सात पाश आहेत ते असे - जन्म, मृत्यु, धर्म, कर्म, माया, मोह आणि ब्रह्म.) यातीला माया आणि मोह या दोन पाशांनी देवांना-ऋषींनादेखील सोडलेले नाही. ‘कर्मानुबंधीनि मनुष्यलोके’ या वचनानुसार विवेकहीन कर्मविपाकामुळे जीवाचा पापांचा साठाच वेगाने वाढणारा असल्याने जीवाला पतनाच्या गर्तेत ढकलत असल्याचे शास्त्र-पुराणादीतून वर्णिले आहे. सर्वात कळस म्हणजे हे शरीर काळाच्या सत्तेने व्यापलेले आहे. त्यामुळे जरा-व्याधी-मृत्यु यातून त्याची सुटका होत नसते.
 असे असले तरी या शरीराचे आध्यात्मिक अलौकिकत्व सांगताना तुकोबाराय ‘देह देवाचे मंदीर’ असल्याचे सांगतात. या शरीरातच देव राहत असल्याने ते एखाद्या मंदीराप्रमाणे पवित्र आहे, शुद्ध आहे. अनेक देवता एकेका इंद्रियाच्या ठिकाणी वास करीत असतात आणि जीवाचे चोचले पुरवीत असतात. म्हणूनच या शरीराला तुकोबाराय ‘निधींचा निध’ म्हणतात. नरदेहाचे वैशिष्ट्य असलेली बुद्धी जीवाचे अज्ञान दूर करण्यास सहाय्यभूत होते आणि दुर्लंघ्य असणार्‍या भवबंधातून जीवाची सुटका करून देते, स्वस्वरूपाचा साक्षात्कार घडविते.
 ‘देवाचे मंदीर’ असलेले शरीर असणे, ही काही नित्याची बाब नाही. अज्ञानाने ग्रस्त असणे हा जीवाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे सारासार विवेक जीवाच्या ठायी राहात नाही. जे करू नये, तेच आचरले जाते. शरीर त्यामुळे अवगुणांचा रांधा (अर्क) बनते. अनेक बाधा, अडथळे परिणामी पुढे येतात आणि जीवन दुष्कर करून सोडतात. किंबहुना, अज्ञान आणि अवगुण यांयोगे त्रिविध तापांचे दुःख जीवास वारंवार भोगावे लागते. आयुष्याचे आत्यंतिक कल्याण साधून देण्यास योग्य असा एकही गुण या शरीराच्या ठायी स्वभावतः आढळत नाही.
 शरीराबाबत साधक-बाधक विचार मांडताना तुकोबारायांचे सांगणे आहे की, शरीर हे निसर्गतः गुणावगुणांच्या अतीत असते. ते चांगलेही नाही किंवा वोखटे किंवा किळसवाणेही नाही. केवळ अज्ञानमूलक बुद्धीच्या परिणामाने शरीराचा आपण चांगल्या किंवा वाईट रीतीने उपयोग करीत असतो. अज्ञान आणि अवगुण अंगिकारून किंवा सुखाच्या मागे धावाधाव करून शरीरास ना क्लेष द्यावेत ना सुख देण्याचा प्रयत्न करावा. तुकोबारायांचे हे जे समन्वय साधणारे सांगणे आहे, त्यामागे त्यांची अशी धारणा आहे की, प्रारब्धाने सार्‍याच जीवांना सुख-दुःखाचे भोग, मग ते अवांछनीय असले तरी, असहाय्यपणे भोगावे तर लागतातच. त्यातून सुटका करून घेण्याच्या मागे लागून व्यर्थ आयुष्याचा नाश ओढवून घेऊ नये किंवा वाट्याला आलेल्या सुख-दुःखांचा आळेबळे त्याग करण्याचे सायासही करू नयेत. तुकोबारायांनी जो उपाय उपदेशिला आहे, तो तत्परतेने हरिभजन सुरू करण्याचा. यात एकदा मन रमले की, दुःख हे दुःख राहात नाही. किंबहुना तकलुबी सुख-दुःखाचे खरे स्वरूप उमगल्यामुळे परिणामी जीव तसल्या क्षणिक सुख-दुःखाने क्लेष न पावता खर्‍या आत्मसुखाचा अनुभव घेऊ लागतो.

(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)