"खेड्यामधले घर कौलारू"!

काय मस्त दिवस होते  ते...

एप्रिल
महिन्यात परीक्षा संपत आल्यात की वेध लागायचे आजोळी जायचे... माझं आजोळ
विदर्भातलं एक छोटंसं गाव! गावाच नाव 'महान'. लहानपणी मैत्रिणी
चिडवायच्या  असं काय महान आहे गं तुझा आजोळी? पण कुणास ठाऊक मी
टाळायची ह्याचं उत्तर देणं, पण आज मागे वळून पाहताना असं दिसतेय की माझा कडे
तर आठवणीचा  खजिनाच आहे...!!
 
मामाच घर म्हणजे "खेड्या मधले घर कौलारू"! ऐसपैसं व्हरांडा, माजघर,
परस बाग, अंगण.. शेणानं सारवलेल्या अंगणात काढलेली नक्षीदार
रांगोळी... गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशी दाटीवाटी नि उभी फुलझाडे तर
डाळिंब, पेरू,   पपई, अंजीर, लिंबू अशी डौलाने उभी असलेली फळझाडे.
दारासमोरचा मांडवावर रेंगाळलेली दुधी, कारली, पडवळ, गिलकी ह्यांचे लगडलेले
वेल, तर कुठल्या तरी कोपऱ्या मधल्या वाफ्या मध्ये हिरवेगार पाने असलेला
पालक, तर कुठे मोठ्या ऐटीत एखाद्या कुंडीत उभे असलेलं टोमाटो नाही तर
वांग्याचं एखादं झाड.
 
साखर झोपेत डोळे
किलकिले व्हायचे ते नुकत्याच उमललेल्या मोगराच्या दरवळणाऱ्या 
सुगंधाने आणि कोंबड्याचा कु-कूच-कु नि. धारोष्ण दूध प्यायल्यावर आम्हा
पोरांचा नदी वर अंघोळीला जाण्यासाठी एकच गलका व्हायचा. पाण्यात मनसोक्त
डुंबल्यावर आमचा मोर्चा नदीपलीकडल्या महादेवाचा पुरातन मंदिरा कडे
वळायचा. मंदिरा कडे जाण्याचा मार्ग उंच, वळणा वळणाचा आणि खडकाळ होता.
रस्त्याचा दोन्ही बाजूला वडा, पिंपळाची मोठाली झाडी, तुरळक काटेरी झुडुपे
आणि मोठाली मोठ्या दिमाखात उभी असलेली मुंग्यांची वारुळं. नंदी चे दर्शन
घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं की सुंदर शिवलिंग दिसायचं, त्यावर केलेली
मोगऱ्याचा फुलांची आरास डोळ्याचं पारणं फेडायची. आई, मावशी प्रदक्षिणा घालत
असताना आम्ही मात्र आजूबाजूचा निसर्ग पाहण्यात रममाण झालेलं असायचो.
 
एवढी सगळी भटकंती केल्यावर पोटात कावळे ओरडणं
सुरू झालेलं असायचं, घरी आलो की आजी आंब्याचा माच उघडायची आणि खाण्याजोगी
आंब्याची भरलेली बादलीच आमचा समोर ठेवायची आणि मग आम्ही किती आंबे फस्त करत
असू ह्याचा तर काही हिशेबच नव्हता. आजी कडे एक सूर्यचूल होती त्यात आम्ही
पोर डाळ भात, बटाटे, मीठ लावलेले शेंगदाणे, कच्चा कैऱ्या अस ठेवत असू, आणि
सूर्य मावळतीला गेल्यावर त्यातून निघालेले उकडलेले बटाटे, खरपूस शेंगदाणे
आणि खमंग वरण भात ह्यावर तुटून पडत असू.
 
संध्याकाळचा गारवा हवेत जाणवायला लागला की शेतावरचा गडी उसाचा रसाने
भरलेली बादलीच आमचा समोर आणून ठेवायचा, त्याचा सोबतीला रस्त्यावरून जाणारे
कुल्फी, आईस फ्रूट तर होतंच. रात्री अंगणात खाटा टाकून मामाने लावलेली रेडिओ
वरची गाणी ऐकताना, आणि आकाशात म्हातारीच घर शोधताना झोप कधी लागायची
कळायचं नाही.
 
खरंच लहान पणी कधी कळलंच
नाही की आपण मोठे पणासाठी आठवणी गुंफतोय ते, म्हणूनच 'लहानपण देगा देवा'
ह्याची प्रचीती मोठा झाल्याशिवाय येत नाही. 'रम्य ते बालपण रम्य त्या
आठवणी'!