माझी इतका खर्च करण्याची ऐपतही नव्हती आणि पसंतीदेखील नव्हती. मी विषय निवडला - टेलिव्हिजन. त्याकरिता १८५ रुपयांचे गुलाटींचे पुस्तक विकत घेतले. दूरचित्रवाणी केंद्रावरून प्रसारण कसे होते आणि आपल्या कडील संचात त्याचे ग्रहण कसे होते याचा मुळातूनच अभ्यास केला. स्वतः समजून घेतला म्हणजे तो विषय इतरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडता येतो. त्यानंतर एकही स्लाइड न बनविता केवळ फूटपट्टी व स्केचपेन्स च्या साहाय्याने काढलेली साध्या कागदावरील तीन रंगीत रेखाचित्रे समोर ठेवून मी सेमिनार सादर केला. इतर विद्यार्थ्यांच्या सेमिनार मध्ये ओ एच पी स्लाईडस चा प्रचंड प्रमाणात वापर होता. शिवाय त्यांच्या कॉम्प्युटर टाईप्ड - इंक जेट प्रिंटेड - गोल्डन एंबॉस्ड बाईंडिंग केलेल्या अहवालासमोर माझा स्वतःच्या हातांनी फॅसिट टाइपराइटरवर टाईप केलेला आणि ट्रान्स्परंट क्लिप फाइलमध्ये लावलेला अहवाल देखील साधा दिसत होता. शिवाय मी कागद देखील इतरांप्रमाणे एक्झिक्युटिव्ह बॉण्ड न वापरता साधेच कॉपी पॉवर वाले वापरले होते. असे असूनही आमच्या परीक्षकांना माझा सेमिनार व अहवाल प्रभावी नाही तरी परिणामकारक वाटला. ६० विद्यार्थ्यांच्या वर्गात मला त्यांनी सर्वात जास्त गुण दिले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून मला रुपये अडीचशे रोख मिळालेत. अहवाल टंकलेखन आणि गुलाटींच्या पुस्तकाची किंमत असा मी केलेला सर्व खर्च (जो इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत नगण्य होता) वसूल झाला.
हा साधेपणा माझ्यात कुठून आला? तर शालेय पाठ्यपुस्तकांतून १ली ते ७ वी च्या भाषा विषयांत साध्या कथा व लेख असत. तरीही ते समजण्याकरिता त्या सोबत चित्रे दिलेली असत. आठवी पासून कुमारभारती च्या पुस्तकांत आशयघन वैचारिक लेख तसेच विचारप्रवर्तक कथा असत. परंतु त्यांच्या पुष्ट्यर्थ कुठेही चित्रे दिलेली नसत कारण अशा दर्जेदार लिखाणाला अशा कुठल्याही बाह्य आधाराची गरज नसायची, मजकूरच पुरेसा परिणामकारक असे.
हा साधेपणा कुठे हरवत चालला आहे. कलाकृतींच्या प्रदर्शनात साधेपणा असेल तर त्या प्रभावी वाटत नाहीत असे अनेकांना वाटते. परंतु हे समजून घ्यायला हवे की कलाकृती प्रभावी हवी की परिणामकारक? अनेकदा एखाद्या वक्त्याचे मोठे एखाद्या विषयावर आलंकारिक भाषेत मोठे प्रभावी भाषण होते पण त्याचा परिणाम काय होतो? लोक त्याला चांगला हशा व टाळ्यांचा प्रतिसाद देतात पण त्या भाषणातील विचार किती अमलात आणतात? करोडो रुपये खर्चून चित्रपट बनविले जातात, पण कथेतला आशय लोकांवर किती परिणाम करतो? विनोदी चित्रपट व उपग्रह वाहिन्यांवरच्या कॉमेडी सर्कशी पाहताना तर हे फारच जाणवते. विनोद करताना त्यांना कसरती कराव्या लागतात तरी पुन्हा मागून नकली हसू ऐकवावे लागते. जर विनोदी संवाद आहे तर प्रेक्षक हसतीलच ना? त्यांना हसा असे सुचविण्यासाठी नकली हसू भरायची गरज का लागते? तसेच टाळ्यांचे. गिव्ह हिम / हर अ बिग हॅंड हे वाक्य तर रिअलिटी शो मध्ये अनेक वेळा ऐकू येते. अरेच्च्या! कौतुकास्पद करामत असेल तर आपणहूनच टाळ्या वाजतील, मागणी का करावी लागतेय?
शाळेत असताना एक विनोद वाचलेला आठवतोय - एक विद्यार्थिनी चित्र काढते आणि शिक्षिकेला तपासण्यासाठी देते. शिक्षिका विचारतात, कसलं चित्र आहे? विद्यार्थिनी म्हणते - हत्तीचं. शिक्षिका उत्तरता - मग तसं बाजूला लिही ना की हे हत्तीचं चित्र आहे म्हणून. मला कसं कळणार ते कसलं चित्र आहे? थोडक्यात काय जर तुमची कलाकृती काय आहे, कशाबद्दल आहे हे रसिकांपर्यंत पोचवायला ती असमर्थ ठरत असेल तर तिला बाहेरून अशी वेगळी लेबले लावावी लागतात. करोडो खर्चून चित्रपट बनवायचा, वर त्यातून आम्ही काय संदेश देतोय, तो किती चांगला आहे हे सांगायला देशातल्या विविध शहरांत त्याचे प्रमोशन करत फिरायचे हे कशासाठी? चित्रपट बघितल्यावर कळेलच ना तो कसला संदेश देतोय ते? त्याकरिता स्पॉटबॉयपासून निर्मात्यापर्यंत झाडून सर्वांनी मुलाखती देत का सुटायचे?
सध्या झी जिंदगी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या साध्या परंतु आशयघन मालिका पाहताना आपल्या देशी कलाकृतींमधला फोलपणा प्रकर्षाने जाणवू लागलाय. खोट्या डामडौलाच्या प्रभावातून बाहेर येऊन अशा कुठल्याही बाह्य आधाराशिवाय आंतरिक साधेपणातील परिणामकारकता आपल्या देशातले कलाकार (खरेतर कलेचे सादरकर्ते व्यावसायिक) कधी समजून घेणार?