व्हाया वस्त्रहरण - भिरभिर भिरंती

'वस्त्रहरण' हे नाटक तुम्ही पाहिले आहे का?
मूळ मालवणी भाषेतले आणि मच्छिंद्र कांबळींचे हां. मराठीतले 'वस्त्रहरण' ही एक भीषण 'ऍडजस्टमेंट' होती. कुणी आणि कुणासाठी केलेली ते रवळनाथ जाणे.
तात्या सरपंच, गोप्या, मास्तर आणि इतर अर्कट मालवणी नमुने यांनी घातलेले धुमशान आजही आठवले की चेहरा सैलावतो! 'सारे प्रवासी घडीचे'नंतर असले निर्व्याज आणि धमाल कथानक अनुभवले नव्हते. मच्छिंद्र कांबळी यांनी तात्या सरपंच अफलातून वठवला. मूळ लिखाणच इतके विस्कळित आणि आटोपसूत यांचे मजेदार मिश्रण होते की आता गाडा भलत्याच मार्गाला लागला असे वाटेस्तोवर नीट चाकोरीत येई आणि चाकोरीबद्ध चालीचा ताल पकडला की मधूनच नाकात वारे गेलेल्या वासरासारखा उधळू लागे.
गंगाराम गवाणकर हे 'वस्त्रहरण'चे लेखक म्हणून माहीत होते. त्यांच्या नावावर इतरही नाटके जमा आहेत याची थोडीशी कल्पना होती. पण वस्त्रहरणचा झगझगीत स्पॉट इतका प्रखर होता की इतर काही त्यात झाकोळलेच जावे.
'वस्त्रहरण'च्या ऑडिओ कॅसेटसचा संच ऐकून ऐकून पाठ झाला होता.
'व्हाया वस्त्रहरण' हे आत्मचरित्र त्या काळातल्या धुंदीच्या आठवणींना अजून विनोदी किश्श्यांची फोडणी देईल म्हणून ते खरेदी केले. अडीचशे पानांच्या पुस्तकातली पहिली शंभरेक पाने गवाणकरांनी 'वस्त्रहरण'च्या गजाली रंगवण्यात खर्ची घातली आहेत.
आणि मग अचानक सूर, ताल, वाद्य आणि राग हे सगळेच बदलून गवाणकर त्यांच्या जडणघडणीच्या दिवसांबद्दल लिहायला लागतात आणि अंगावर सरसरून काटा उभा राहू लागतो. आतापर्यंत चाललेली गावच्या जत्रेतली धमाल गंमत बाजूला सरते. सोल्झेनित्सिनच्या "वन डे इन द लाईफ ऑफ इवान देनिसोविच" या मुळापासून हादरवून टाकणाऱ्या कलाकृतीच्या तोडीचे आपण काहीतरी अनुभवत आहोत याची जाणीव होऊ लागते. पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. ज्याअर्थी 'वस्त्रहरण' लिहिण्यास गवाणकर शिल्लक राहिले त्याअर्थी त्यांचे पुढे सगळे नीट झाले असावे याची जाणीव तेवढी मधूनच दिलासा द्यायला असते.
गवाणकरांचे नंतर सगळे मार्गी लागून यथास्थित झाले हे खरेच. पण त्याआधीचे धक्के जे बसतात ते कल्पनातीत आहेत.
विशेष म्हणजे त्या प्रसंगांचे वर्णन करीत असतानाही गवाणकर कुठे 'आपण कसे स्मशानात जळणाऱ्या प्रेतांच्या उजेडात अभ्यास करून शिकलो', 'आपण कसे कलाकार' असले पोकळ आवेश आणत नाहीत. गवाणकरांनी जे जे भोगले त्याची नुसती यादी वाचून मराठीतील तथाकथित "क्रांतीकारी" साहित्यिकांच्या धोतरांचे पितांबर होतील. असल्या "क्रांतीकारी" साहित्यिकांनी मराठी साहित्याची जी विधुळवाट लावलेली आहे तिच्या तुलनेत गवाणकरांचा खेडवळ भोळसरपणा, थोडासा भावुकपणा, थोडासा कोंकणी बेरकीपणा अगदीच आल्हाददायक वाटतो.
थोडक्यात, 'वस्त्रहरण' पाहिले वा ऐकले असेल तर तुम्हांला एका वेगळ्या गवाणकरांचे दर्शन इथे घडेल. पण 'वस्त्रहरण'च्या जाळ्यापासून (अद्याप) सुटलेले असाल तरीही हे पुस्तक तुम्हांला भारून टाकेल हे नक्की.

व्हाया वस्त्रहरण
- गंगाराम गवाणकर
डिंपल प्रकाशन
प्रथमावृत्ती १५ ऑगस्ट २००८
द्वितियावृत्ती ९ नोव्हेंबर २००८
किंमत २५० रु.