जयदेव डोळे यांचा लोकसत्तातला लेख

जयदेव डोळे यांनी रविवार (२८ डिसेंबर) लोकसत्ता पुरवणीत "'दीमो'क्रसी आणि मीडियाः उलटतपासणी" नामक लेख लिहिला आहे. मी त्यावर खालील प्रतिक्रिया संपादकांना पाठवली होती. पण 'चौकस' या टोपणनावाने ती प्रसिद्ध करता येणार नाही, माझे नाव-आडनाव द्यावे लागेल असे संपादकांशी झालेल्या तुटक पत्रव्यवहारातून उमजले. माझे नाव प्रसिद्ध करण्याचा माझा इरादा नसल्याने मी ती प्रतिक्रिया इथे डकवत आहे.
लेख दुवा क्र. १ इथे वाचता येईल.
===================================
एक भोंगळ उलटतपासणी
जयदेव डोळे यांचा "'दीमो'क्रसी आणि मीडियाः उलटतपासणी" हा अस्ताव्यस्त आणि भोंगळ लेख वाचला. भाजपच्या विजयाने ज्या लोकांना कोलायटिसचा तीव्र झटका आला आहे त्यात डोळे यांचा समावेश करावा लागेल. संपूर्ण लेख " ठोकुनी देतो ऐसाजे" अशा प्रकारच्या विधानांनी भरलेला आहे. काही नमुने खोलात जाऊन पाहू.
लोकशाहीचा हा चौथा खांब "ताठ व तटस्थ" असायला हवा होता. पण तसे झाले नाही असे "वरकरणी" दिसते. कारण? "आधी केजरीवाल, नंतर मोदी माध्यमांतून ओसंडून वाहिले". माध्यमांतून काही ना काही सतत ओसंडून वाहतच असते. हे वाहणे "ताठ व तटस्थ" नसल्याचा पुरावा कधीपासून झाला?
"जणू तमाम माध्यमे जुनाट, जीर्ण काँग्रेसला, थंड मनमोहनसिंग यांना आणि तुटक सोनियांना वैतागली होती. 'यूपीए' चा दहा वर्षांचा कारभार त्यांना नकोसा झाला होता. किळसवाणा भ्रष्टाचार, रखडलेले विकासाचे प्रकल्प, वाढत जाणारी महागाई आणि चलनवाढ, भयंकर गुन्हेगारी आणि मोजक्या व्यक्तींच्या हाती एकवटत गेलेली सत्ता याने नागरिक त्रासलेला होता. त्याच्या मनाचे प्रतिबिंब माध्यमांत उमटत होते का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो".
म्हणजे माध्यमांमधून केजरीवाल आणि मोदी ओसंडून वाहिले म्हणजे ते नागरिकांच्या मनाचे प्रतिबिंब नव्हे. हे कुणी ठरवले?
"लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१% मते पडली. त्या प्रमाणात - म्हणजे ३१ टक्क्यांचे प्रक्षेपण आणि वार्तांकन भाजप आणि मोदी यांना माध्यमांत लाभले का? "
१९९१ साली काँग्रेसला ३६.४% मते पडली. त्यानंतर १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २००९ साली ज्यांनी सरकार स्थापन केले त्या पक्षाला ३०%हून कमी मते मिळाली. माध्यमांमध्ये त्या पक्षांचे प्रक्षेपण त्या टक्केवारीइतकेच होते का? स्वातंत्र्यापासून आजतागायत केंद्रात सत्ताधारी झालेल्या पक्षाला ५०%हून अधिक मते मिळालेली नाहीत. पण नेहरू वा इंदिरा गांधींना ५०%हून कमी "प्रक्षेपण आणि वार्तांकन" कधी मिळाले होते का? भाजपचे ३१% बोचतात. मग २००४ सालचे काँग्रेसचे २६.५% आणि २००९ सालचे काँग्रेसचे २८.६% हे काय निखळ बहुमत मानायचे का?
पुढे श्री डोळे 'ओपन' या साप्ताहिकाला 'सपशेल मोदीविरोधक' असल्याचे प्रमाणपत्र देतात. आणि त्याच परिच्छेदात चौदा ओळी खाली 'ओपन'मध्ये राहुल गांधी आणि मोदीविरोधात लिहिल्याबद्दल हरतोषसिंह बल यांची हकालपट्टी झाल्याचे सांगतात. हे काय गौडबंगाल?
"मोदी यांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण घराघरांत होऊ लागले. खुद्द भाजपच या प्रक्षेपणाच्या मागे होता. वाहिन्यांचा खूप सारा खर्च वाचवून फुकटात अन नियोजित वेळेत ही भाषणे मिळू लागताच वाहिन्याही सुखावल्या अन सैलावल्या... माहिती असो की अभिप्राय, सारे काही जोखून व पारखून घ्यायचे हा पत्रकारितेचा नियम माध्यमांनी खिशात ठेवून दिला. गरम झालेल्या खिशात! " हा 'पेड न्यूज'चा आरोप आहे का? असल्यास पुरावे सादर करा. अन्यथा "गरम खिसा" हे तथ्य नसून मत असल्याचे मान्य करा. या लेखाला "रोखठोक पंचनामा" असा खुदपसंद मथळा दिलेला आहे. पंचनाम्यात तथ्ये मांडली जातात, मते नव्हेत.
"मोदी जिंकले. अगदी बहुमताने त्यांच्या भाजपने सत्ता काबीज केली. मात्र अशा एकतर्फी माऱ्यामार्फत". सत्तेवर असलेल्या पक्षाविरुद्ध विरोधी पक्षाने एकतर्फी मारा केला. सत्ताधारी पक्षाच्या हे लक्षात आले नसेल तर तो पक्ष सत्ताभ्रष्ट होण्याच्याच लायकीचा होता.
आणि एकतर्फी मारा म्हणजे काँग्रेसने १९८४ साली केला होता तितका एकतर्फी? विरोधी पक्षांचा आवाजही फुटत नसताना केलेल्या त्या पूर्ण पानभराचा विंचवाच्या जाहिराती आठवतात ना?
पुढे "सध्या बहुसंख्य पत्रकार व्हॉटस ऍप, फेसबुक या व्यासपीठांवर वावरतात. तिथूनच त्यांना म्हणे काही माहिती, सूचना, कल्पना मिळतात". आता हे "म्हणे" कोण म्हणते आहे? "बहुसंख्य" म्हणजे ५०%हून जास्ती. ही आकडेवारी कशी काढली?
मराठीतला विचार करू. जिथे श्री. डोळे यांनी हा लेख लिहिला आहे तो 'लोकसत्ता' तरी अशा विकाऊ पत्रकारितेत सामील नाही हे त्यांना मान्य असावे असे मी गृहित धरतो. मग उरलेल्या वृत्तपत्रांपैकी कुठल्या प्रमुख वृत्तपत्रांनी मोदींची आरती ओवाळली? लोकमत? सकाळ? जरा विनोद तरी बरा करा की राव!
एक गोष्ट स्पष्ट करतो. मी भाजपचा समर्थक नाही आणि मी भाजपला मतही दिलेले नाही. पण "रोखठोक पंचनामा" असली 'सामना'छाप भाषा वापरून लिहिलेल्या भोंगळ आणि तीव्र पोटदुखीने भरलेल्या लेखाने 'लोकसत्ता'सारख्या वृत्तपत्राची पाने नासू नयेत असे वाटले. भाजपचा जो निर्बुद्ध भोंगळपणा चाललेला आहे त्याला विरोध करायला हवाच. पण तो विरोध करताना नुसत्या मतांच्या पिंका टाकत बसणे महागात पडेल.