खरे म्हणजे तोच स्वतावर डोळे वटारीत असतो’

खरेच देव पावतो का …?
शप्पत त्याला कधी कळलेच नाही 
त्यानं  नाहीच मारला कधी देवाला मस्का 
भांडला  पण नाही 
कधीच कुणाशी भांडत नाही 
मग देवाशी कशाला भांडेन तो… ? 
नाही जमले तर निघून जातो दूर त्याच्या पासून 
पण शप्पत भांडत नाही 
आणि देवाशी भांडायचे कशाला …?
त्याने कुणाचे घोडे मारले….?  
तो कधी कुणाच्या मध्यात असतो…. ? 
देवाशी भांडत नव्हता 
देवावरून आईशी भांडत असायचा 
म्हणायची ती, कर रे पूजा 
म्हणत जा स्तोत्र 
तेवढेच जिभेला वळण लागते  
आता काय बोलू…? 
तेवढेच सालं त्याला जमत नव्हते 
एकदाच गणिताचा पेपर अवघड गेला होता 
तेव्हाच फक्त देवाला मस्का मारला होता
देवा मला पास कर रे 
तेव्हा फक्त तो हसला होता  
हल्ली हल्ली तो पस्तावतो आहे 
वाटते करायला हवी होती पूजा 
यायला हव्या होत्या आरत्या
बायको पटापटा सगळ्या आरत्या म्हणते 
आणि त्याच्या  पुटपुटण्याकडे बघून चक्क हसत असते  
तो  पक्का नास्तिक असेच तिला वाटत असते 
 
हल्ली हल्ली तो  मुलाला सांगत असतो 
आरत्या येत नाही म्हणजे काय … ?
मंत्र पुष्पांजली  येत  नाही म्हणजे काय….? 
नि तो  त्याच्यावर डोळे वटारून बघत बसतो  
त्याच्यावर कशाला 
खरे म्हणजे तोच स्वतावर  डोळे वटारीत असतो’
प्रकाश