मी ठाण्याची, ठाणं माझं!! (वरदाचा लेख)

                                                                                     मी ठाण्याची, ठाणं माझं!!
चित्रकलेच्या तांबे सरांनी आम्हांला कल्पनाचित्र काढण्यासाठी विषय दिला होता- ‘माझ्या कल्पनेतील ठाणे शहर. ते चित्र काढता काढता मी खरोखर अंतर्मुख होऊन गेले होते. खरंच! कसं असावं माझं ठाणे शहर???
मी लहान असताना मला आईबाबा बाहेर फिरायला घेऊन जायचे तेव्हा अगदी बालसुलभ कुतूहलापोटी मी भिरभिरत्या नजरेने मला दिसणारं सगळं जग माझ्या नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करायचे. बारा-तेरा वर्षांपूर्वीचं ठाणं, आत्ताचं ठाणं आणि भविष्यातलं ठाणं यांत निश्चितच जमीन-अस्मानाचा फरक आहे. मी सर्वांत पहिल्यांदा पाहिलेली सर्वांत मोठी इमारत (माझ्या दृष्टीने हं) म्हणजे मी राहत असलेली चार मजली बिल्डिंग! आज मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा मी लहानपणी पाहिलेल्या बर्यारच चार मजली बिल्डिंग्ज मला नाहीशा झालेल्या दिसतात. आज ठाण्यात किमान तीस मजली इमारती पाहायला मिळतात! ते राहू दे... त्यापुढेही मजले बांधण्याची किमया आपण साधली आहे...!!
पण एवढ्या मोठ्या इमारतींमुळे प्रचंड जागा व्यापली जाते, पैसाही अफाट खर्च होतो... बेसुमार वृक्षतोड होते, सिमेंट, काँक्रीट, विटा, माती, वाळू, रेती, पाणी इत्यादींचा प्रचंड वापर होतो, अनियंत्रित प्रदूषण होतं... त्यात लोकसंख्यावाढीची समस्या तोंड वर काढून बसते...
अशा अवस्थेत कशी होईल प्रगती एखाद्या शहराची? म्हणूनच मी माझ्या लाडक्या ठाण्याचं एक उदात्त, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि आधुनिक रूप मनात कोरायला घेतलं... आणि माझ्या लक्षात आलं, माझ्या ठाण्यात सगळं काही आहे! काय नाहीये माझ्या ठाण्यात?
                                                                         जिथे संस्कृती-साहित्याचा सुरेख संगम झाला,
                                                                         तिथे मराठी संमेलन हा योग जुळुनिया आला!
ठाण्यात जेव्हा ८४वं अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन झालं, तेव्हा अनेक मान्यवरांनी माझ्या ठाण्याबद्दल असे गौरवोद्गाीर काढले! ठाण्यामधलं सर्वोत्तम, रसिकमान्य असं गडकरी रंगायतन गेल्या कित्येक पिढ्यांचा संपन्न सांस्कृतिक वारसा जपत आज दिमाखात उभं आहे. तलावांचं शहर म्हणून सर्वदूर कीर्ती असलेल्या माझ्या ठाण्यातल्या मासुंदा तलावाकाठीच हे नाट्यगृह ताठ मानेनं उभं आहे. शतकापूर्वीची समृद्ध्, श्रीमंत ग्रंथपरंपरा जपणारं ‘मराठी ग्रंथसंग्रहालय’, मराठी माध्यमाच्या शाळांत अग्रगण्य असलेली, हीरक महोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेली, समृद्ध शिक्षण देणारी माझी ‘सरस्वती विद्यासंकुल’ ही सुसज्ज शाळा, उच्चण दर्जाचे चित्रपट दाखवणारी जुनीजाणती मल्हार, वंदना, गणेश ही चित्रपटगृहं, विविध दुकानांनी सजलेलं ठाणेकरांचं आवडतं शॉपिंग डेस्टिनेशन ‘जांभळी नाका’ आणि तसंच ठाण्याच्या विपुल सौंदर्याची जाणीव करून देणारी रम्य अशी येऊर हिल्स, ओवळा इत्यादी ठिकाणं, ठाण्याचं आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता यांचा आलेख उंच करत असलेल्या नामांकित अग्रगण्य कंपन्या, कोरम-विविआना मॉलसारखी शॉपिंग कॉम्प्लेक्सेस अशा अगणित बाबी डोळ्यांसमोर येतात!
अगदी खरं सांगू का... माझं-माझ्या कल्पनेतलं ठाणं अगदी असंच आहे! काही बदल होणं अगदी अनिवार्य असलं तरी उरलेल्या चांगल्या गोष्टी मला आहेत तशाच आवडतात आणि मनाला भावतात... भविष्यातही त्या तशाच असाव्यात असं वाटतं मला!
भारतातल्या जवळपास सगळ्याच गावांत स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि जलस्रोतांच्या संरक्षणाबाबत अत्यंत आनंदीआनंद आहे! ठाणे शहर जरी सुंदर निसर्ग, आधुनिकता, सुबत्ता, स्थैर्य, सुशिक्षितता आणि सुसंस्कृतता यांसाठी सुप्रसिद्ध आहे, तरी आज या शहरातली पाण्याची बोंब, कचरा-घाणीचं साम्राज्य इत्यादी गोष्टी या सुखावर बोळा फिरवतायत...
भविष्यातल्या माझ्या ठाण्यात कचर्याआची योग्य विल्हेवाट लावली जाईल! जलस्रोतांचं रक्षण करून पाण्याच्या वापराचं कटाक्षानं नियोजन होईल... रस्ते नीटनेटके असतील, कुठेही कचरा नसेल! ट्रॅफिक नियंत्रणातच असेल... प्रदूषण शक्य तितकं कमी करण्याचा प्रयत्ने असेल!
खरंच! हे सगळं स्थिरस्थावर व्हायला वेळ द्यावा लागेल असं इतरांचं म्हणणं असायची शक्यता नाकारता येत नाही... पण माझं मत असं आहे; की निश्चितच, तरुण पिढी सक्षम हातांनी जेव्हा काम करेल तेव्हा ठाण्याचं एक नवं, अनोखं, सक्षम, स्थिर, आरेखित आणि बलशाली रूप निर्माण व्हायला वेळ लागणार नाही...!! 
                                                                                                                                - वरदा अभिजित मुग्धा रिसबूड