गीतारहस्य

    ( १ ऑगस्ट हा लोकमान्यांचा पुण्यस्मरण दिन  या निमित्ताने हा लेख ! "श्रीमद्भगवद्गीतारहस्य "   हा  ग्रंथ बऱ्याच जणांनी  वाचला असेल  किंवा माझ्याप्रमाणेच वाचू या सावकाश म्हणून अजून वाचला नसेल. त्यांच्यासाठी  हा थोडा ग्रंथपरिचय  )  
             श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र म्हटले की लोकमान्य टिळक किंवा लोकमान्य टिळक म्हटले की गीतारहस्य याच ग्रन्थाची आठवण होते इतका हा ग्रन्थ लोकमान्य टिळकांच्या जीवनाशी जोडला गेलेला आहे.खरे तर टिळकांच्या आयुष्याचे सारच त्या ग्रन्थात आहे म्हटले तरी चालेल.असा ग्रन्थ लिहिण्याची कल्पना अनेक वर्षे त्यांच्या डोक्यात घोळत होती.वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांच्या अंतीम आजारात त्यानी भगवद्गीतेवरील भाषाविवृत्ती हा प्राकृत टीकाग्रन्थ वाचल्यानन्तर आणि गीतेवरील अनेक संस्कृत  व प्राकृत भाष्यांचा पुढील वयात अभ्यास केल्यावर त्या सर्वांमधील महत्त्वाची त्रुटी त्याना जाणवली ती म्हणजे सर्व ग्रन्थांनी दिलेला ब्रह्मज्ञान व मोक्षमार्गावर दिलेला भर.अर्जुनाची मूळ शंका ही युद्ध करून स्वजन, गुरुजन व मित्रगण या सर्वांचा वध करण्याचे पाप का करायचे ?  त्यापेक्षा अगदी संन्यास घेऊन भिक्षा मागणे बरे नव्हे का इतका उद्वेग त्याला आलेला असताना पुन्हा त्याला संन्यास ,ब्रह्मज्ञान व मोक्षमार्गाचा उपदेश करून  युद्धाला प्रवृत्त करणे कसे काय शक्य आहे या लोकमान्यांच्या शंकेला उत्तर या संस्कृत  व प्राकृत टीका ग्रन्थात मिळत नसल्याने स्वतंत्रपणे त्याचा विचार करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्यातून त्याना सापडलेल्या उत्तराचाच हा प्रकट आविष्कार असे म्हणता येईल.
    ग्रन्थातील प्रस्तावनेत उल्लेखल्याप्रमाणे त्यांच्या या विचारांचे जाहीर प्रकटीकरण त्यांनी १९०२ ते १९०४ या काळात काही ठिकाणी व्याख्याने देऊन केले व त्यानी हा ग्रन्थ लिहावा असे त्यांचे मित्र दाजीसाहेब खरे व दादासाहेब खापर्डे यांनी आग्रह केला व तसे जाहीरही केले पण तसा निवान्तपणा त्याना मिळाला तो त्याना १९०८ ते १९१४ हा तुरुंगवास  मंदले ( आपण मंडाले असा उच्चार करतो पण गीतारहस्य प्रस्तावनेत असा उल्लेख आढळ्तो ) येथे भोगावा लागला त्या काळात मिळाला.
      त्यातही पहिली दोन वर्षे त्यांना वाचन व लेखनाची परवानगी नसल्यामुळे ऑक्टोबर १९१० ते मार्च १९११ या फक्त पाच महिन्यात त्यांनी या ग्रन्थाचा कच्चा खर्डा आणि तोही शिसपेन्सिलीच्या सहाय्याने लिहून काढला. फक्त पाच महिन्याच्या काळात अनेक संस्कृत , मराठी व इंग्रजी ग्रन्थांचे सम्दर्भ देऊन असा विद्वत्तापूर्ण ग्रन्थ लिहिणे आणि तेही मंदले सारख्या ठिकाणच्या तुरुंगवासात (कारण मंदले म्हणजे दुसरे अन्दमानच )  हे किती कठिण काम आहे .हे सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या वर्णनातून जाणवते .सुभाषचन्द्र बोस यांना या तुरुंगात रहावे लागले त्यावेळी त्यांनी त्याचे केलेले वर्णन असे आहे.आणि  अश्या ठिकाणी राहून ळोकमान्यांनी असा महान ग्रंथ लिहावा याची त्यानी विशेष प्रशंसाही केली आहे. ते म्हणतात ,
"मन्दले म्हणजे धुळीचे मूर्तिमंत साम्राज्य-इतर कोणाला तिथे थाराच नाही.ती तुम्हाला श्वासात भरून घ्यावी लागते.ती तुमच्या अन्नात असते त्यामुळे तुम्हाला खावीच लागते,ती तुमच्या टेबलावर असते,खुर्चीवर असते,अन्थरुणावर असते.इथले हवामान शक्तिक्षय करणारे आहे,बहुतेकांना सन्धिवात झालेला असतो."
लोकमान्यांना ठेवण्यात आलेली कोठडी सुभाषचंद्रांनी पाहिली व तिचे वर्णन असे केले आहे,
" लोकमान्यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते ती कोठडी अजूनही तशीच आहे तिच्यात थोड्याश्या सुधारणा करण्यात आल्या आहेत,आकारही वाढलेला आहे.आमच्या कोठडीप्रमाणेच तीही लाकडीच आहे त्यामुळे उन्हाळ्यात उकाडा आणि उन्हाची तिरीप सहन करावी लागते.पावसाळ्यात पाऊस आत येतो व हिंवाळ्यात बाहेरचा गारठा आत घुसतो.येथे नेहमीच धुळीची वादळे होत असतात.त्यावेळी सारा तुरुंग धुळीने माखला जातो."
 " लोकमान्य येथे सहा वर्षे होते हे सगळ्यांनाच ठाउक आहे.परंतु येथे त्यांना केवढ्या शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या;याची फारच थोड्यांना कल्पना असेल.येथे त्यांना एकाकी अवस्थेत ,एक नव्हे,दोन नव्हे सहा वर्षे रहावे लागले ज्याच्याशी चर्चा करावी असा एकही सहकारी जवळ नव्हता.लोकमान्यांना इतर कैद्यांपासून दूर ठेवले जाई.पुस्तके हाच त्यांचा एकमेव विरंगुळा होता "
"लोकमान्यांच्या शारीरिक यातनांबद्दल जितके कमी लिहावे तितके बरे.त्यांना भारतीय दंडसंहितेखाली शिक्षा झालेली असल्यामुळे आजच्या राजबंद्यांपेक्षा त्यांची अवस्था अधिकच बिकट असली पाहिजे.त्यातून त्यांना मधुमेह होता.मन्दलेमध्ये सध्या जे हवामान आहे तेच लोकमान्य येथे असतांना असले पाहिजे आणि आज जर पंचविशी-तिशीतील तरुण माणसे इथल्या हवामानाबद्दल तक्रार करत असतील,त्यांना अपचनाचे आणि सन्धिवाताचे विकार जडत असतील,हळूहळू आपला शक्तिक्षय होत आहे असे जाणवत असेल तर पन्नाशी पार केलेल्या लोकमान्यांना येथे रहाणे किती कष्टप्रद आणि यातनामय ठरले असेल?"
  " या कारागृहाच्या आवारात लोकमान्यांनी जे मूकपणे सोसले त्यासंबंधी फारसे बाहेर काही माहीतच नाही.कैद्याला प्रसंगाप्रसंगाने किती विवंचना छळतात आणि कधीकधी त्या किती असह्य होतात,याची कितीजणांना कल्पना असते ?गीतेची शिकवण लोकमान्यांच्या मनोमानसी मुरलेली असल्यामुळेच त्यांनी या यातनांची आणि वेदनांची फिकीर केली नसावी त्यासंबंधी त्यांनी कधीही,कोणापाशीही तक्रारीचा शब्द उच्चारला नाही."
  "लोकमान्यांच्या ’गीतारहस्या ’ सारखा व्यासंगपूर्ण आणि विचारभव्य ग्रंथ तुरुंगाच्या प्रतिकूल आणि निरुत्साही वातावरणात लिहिताना बौद्धिक सामर्थ्याबरोबर अदम्य इच्छाशक्तीची किती गरज असते,याची कल्पना ज्याने तुरुंगात काही काळ काढलेला आहे त्यालाच येऊ शकेल.माझ्यापुरते सांगायचे तर या गोष्टीचा मी जेव्हां अधिक विचार करू लागतो,तेव्हां लोकमान्यांसंबंधी अधिकच आदर आणि भक्तिभाव वाटू लागतो.लोकमान्यांच्या महनीयतेचे मूल्यमापन करताना आपले देशबांधव या सर्व गोष्टी विचारात घेतील अशी मी आशा करतो.लोकमान्य मधुमेहाचे रुग्ण होते,उतारवयात त्यांना सहा वर्षे दूरवरच्या तुरुंगात एकाकी अवस्थेत काढावी लागली;आणि तरीही त्यांचे बौद्धिक सामर्थ्य आणि लढाऊ वृत्ती किंचितही कमी झाली नाही.त्या तश्या अंधाऱ्या कालखंडात त्यानी ’ गीतारहस्या ’ च्या रूपाने आपल्या मातृभूमीच्या  चरणी अमोल नजराणा ठेवला. "
   सुभाषचन्द्रांना मन्दलेच्या हवेत ते क्षीण होऊन ते जगतील की नाही या शंकेमुळे ब्रिटिश सरकारला  नाइलाजाने दोन वर्षे सहा महिने आणि एकवीस दिवसांनी तेथून हलवावे लागले अश्या ठिकाणी सहा वर्षे तक्रार न करता राहून "गीतारहस्य" लेखनासारखे अभूतपूर्व ग्रन्थनिर्मितीचे कार्य लोकमान्यांच्या हातून घडावे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. यामागे त्याना आपल्या देशवासियांना जागृत करण्याची जी तळमळ लागलेली होती तीच कारणीभूत होती,कारण निवृत्तिपर संदेश घेऊन संन्यस्त होऊन हा देश स्वातंत्र्य  मिळवू शकणार नाही.  पण अश्या वेळी फळाची आशा न करता कर्मयोगाचे आचरण करणे महत्त्वाचे होते आणि त्यासाठी हतबुद्ध झालेल्या देशबांधवांना "उत्तिष्ठ जाग्रत " म्हणून कार्यप्रवण करणे आवश्यक होते आणि म्हणूनच इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लोकमान्यांनी हा ग्रन्थ लिहिला. आणि त्यात प्रत्येक पानावर "कर्मयोग हाच गीतेचा सन्देश आहे" असा त्यांनी जणु पुकाराच केला.
      लोकमान्यांनी ग्रन्थलेखन २ नोव्हेंबर १९१० ते ३० मार्च १९११ फक्त ५ महिने एवढ्या कमी अवधीत केले . त्यासाठी त्यांनी एकूण ३५० ते ४०० पुस्तके संदर्भग्रन्थ म्ह्णून वापरली लेखनासाठी त्यांना सुरवातीस एकावेळी चारच पुस्तके जवळ ठेवण्याची परवानगी होती. लेखनासाठी कागद वह्यांच्या स्वरूपात व पाने मोजून देण्यात येत (कारण त्या कागदांचा काही क्रान्तिकारी लेखन करायला त्यांनी उपयोग केला तर ?) लिहिण्यासाठी टोक काढलेल्या पेन्सिलीच मिळत ( हो त्या चाकूने जर काही क्रान्तिकारी प्रकार झाला तर ?   ) या पेन्सिलींनी चार वह्यांमध्ये लेखन केले व एकूण मजकूर छापील ८३६ पानांचा  त्यासाठी त्यांनी वह्यांची जवळ जवळ त्याच्या दुप्पट संख्येने पाने वापरली व प्रत्येक भाग कोणत्या वहीच्या कोणत्या पृष्ठक्रमांकावर व कोणत्या कालखंडात लिहिला याची नोंद ,समर्पण अनुक्रमणिका व प्रस्तावना शिवाय पुस्तकातील कोठला भाग कोणत्या भागापुढे जोडावयाचा याविषयी सूचनाही त्या वह्यांमधून होत्या थोडक्यात आपण तुरुंगातून जिवंत बाहेर पडू की नाही असे त्यांना वाटत होते आणि तुरुंगातील सुभाषबाबूंनी वर्णन केलेल्या परिस्थितीवरून ते केवळ आत्मिक बळावर ,योग्य वयात प्रकृती सुदृढ करण्यासाठी केलेल्या व्यायामामुळेच तुरुंगातून बाहेर पडू शकले व पुढे बिदान सहा वर्षे तरी जगू शकले असे म्हणावे लागेल. 
    हा ग्रन्थ वाचण्यापूर्वी कोणाचीही अशी कल्पना होईल की ज्ञानेश्वरी किंवा "भगवद्गीता जशी आहे तशी (ShrimadBgavadgita as it is) या भक्तिवेदान्त  यांच्या किंवा विनोबाजी किंवा इतर भाष्यकारांच्या ग्रंथांप्रमाणे एक एक अध्याय घेऊन त्यावर टीका या पद्धतीने ग्रंथ लिहिला असेल निदान मला तरी तसे वाटत होते प्रत्यक्षात ग्रन्थ  दोन भागात विभागलेला आहे.पहिल्या भागात १५ प्रकरणे आहेत व दुसऱ्या भागात प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोकाचे भाषांतर देऊन पूर्वापार संदर्भ लक्षात येण्यास,()टिळकांच्या मते इतर ग्रंथकारांनी अर्थ लावताना कशी ओढाताण केली आहे हे दाखवण्यासाठी स्पष्टीकरणात्मक टीपा दिल्या आहेत त्यामुळे हा भाग २६१ पृष्ठांचा झाला आहे तर पहिला भाग ५३२ पृष्ठांचा आहे. याशिवाय उल्लेखसूचीप्रमाणे गीतेतील श्लोकांचीही वेगळी सूची जोडल्यामुळे एकाद्या श्लोकाचा संदर्भ शोधण्यासाठी अतिशय सुलभ झाले आहे.वाचकाच्या अडचणींचा विचार करूनच जणु टिळकांनी हा ग्रन्थ लिहिला आहे.
    " गीतारहस्य " किंवा "कर्मयोगशास्त्र "याप्रमाणे भगवद्गीतेवरील टीकाग्रन्थ नसून तो गीतेतील तत्वज्ञानाचा टिळकांच्या तर्ककठोर पद्धतीनुसार स्वतंत्र अर्थ लावणारा स्वतंत्र ग्रंथच आहे.   
        विषयप्रवेश या पहिल्या प्रकरणात त्यांनी श्रीमद्भगवद्गीता हा उपनिषदे व वेदान्तसूत्रे यातील धार्मिक तत्त्वज्ञानाची पूर्ती करणारा कसा हे दाखवले आहे..त्यामुळेच उपनिषदे,वेदान्तसूत्रे व श्रीमद्भगवद्गीता या तिन्हींना मिळून प्रस्थानत्रयी असे संबोधण्यात येते. या ग्रन्थाच्या लोकप्रियतेमुळे त्यातील तत्त्वज्ञानाचेच अनुकरण करणारे अनुगीता ,अष्टावक्रगीता,पांडवगीता,गणेश गीता,राम गीता असे ३०-३५  गीता याच उपपदाचे ग्रन्थ निर्माण झाले व त्यातील श्रीमद्भगवद्गीता अथवा हरिगीता हाच आद्य व सर्वश्रेष्ठ कसा आहे हे त्यांनी दाखवले आहे.या अश्या महान ग्रन्थावर शंकराचार्यांपासून अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत अश्या अनेक सम्प्रदायाच्या आचार्यांनी केलेल्या भाष्यांचा समाचार घेऊन या सर्व भाष्यातून गीतेचा मुख्य रोख कर्मयोगावर आहे हा मूळ सिद्धान्तच कसा दुर्लक्षित झाला आहे हे दाखवून तो सिद्धान्त प्रस्थापित करण्यासाठीच या ग्रन्थाचे प्रयोजन आहे हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 
   कर्मजिज्ञासा या दुसऱ्या प्रकरणात अर्जुनावर जो प्रसंग आला तो काही अपूर्व नव्ह्ता अश्याच प्रकारचे प्रसंग शेक्सपियरच्या हॅम्लेट किंवा करॉयलेनस या नायकांवरही आले होते आणि सर्वसामान्य माणसावरही येतात असे सांगून अश्या प्रसंगात कसे वागावे व त्यावर शास्रानुसार मार्ग कसा काढायचा हा पेच कसा पडतो याचे दिग्दर्शन करण्यात आले आहे व अहिंसा, सत्य , अस्तेय या सर्व गुणांचा कमी किंवा अधिक प्रमाणात वापर करणे याविषयी सामान्य माणसाचा कसा गोंधळ उडतो हे दाखवले आहे.यात धर्माने "नरो व कुंजरो वा " असा उद्गार काढणे किंवा "गांडीव धनुष्य दुसऱ्याला देऊन टाक "  या धर्मराजाच्या उद्गारावर अर्जुनाने आपल्या प्रतिज्ञेनुसार त्याचा वध करायला निघाल्यावर त्यावर कृष्णाने सुचवलेला उपाय इ.गोष्टींचा उल्लेख करून अश्या प्रसंगात कसे वागावे याचा विवेक करणे कसे दुरापास्त आहे हे दाखवले आहे."महाजनो येन गतो स पन्थ :" असे म्हटले तरी महाजनांनीच वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आचरण केलेले आढळते त्यामुळे हा उपदेशही आचरणात आणायला कोणता सारासार विचार करणे आवश्यक आहे हे समजत नाही असे प्रतिपादन केले आहे.त्यामुळे अर्जुनाची शंका निराधार नसून मोठमोठ्या पंडितांनाही "काय करावे व काय न करावे " असा व्यामोह पडतो.असे टिळकांनी दाखवले आहे आणि सामान्य माणसाची हीच अडचण असते.
    कर्मयोगशास्त्र या तिसऱ्या प्रकरणात कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्भवतात म्हणून कर्म सोडून देणे युक्त नसून जेणेकरून जगातील कर्मांचा लोप ब होता त्यांचे पाप किंवा बंधन मात्र आपणास लागणार नाही अश्या प्रकारचा ’योग’म्हणजे युक्ति शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे हे श्रीकृष्णाचे सांगणे आहे असे प्रतिपादन करून प्रथम "कर्म" या शब्दाचा विचार या प्रकरणात केला आहे व  कर्माचे नित्य म्हणजे दररोज करावयाचे व  नैमित्तिक म्हणजे कारणपरत्वे करावयाचे काम्य म्हणजे  काही इष्ट हेतू साध्य करण्यासाठी करावयाचे, निषिद्ध म्हणजे सुरापानासारखे त्याज्य असे प्रकार सांगून श्रौत म्हणजे श्रुतीने सांगितलेले व स्मार्त म्हणजे स्मृतीने सांगितलेले इतकाच संकुचित अर्थ न घेता कोणतीही कायिक अथवा वाचिक अगदी श्वसनासरखी प्रतिक्षिप्त क्रियाही "कर्म’ या शब्दात अंतर्भूत होते असे गीतेचे मत आहे.
   याच प्रकरणात पुढे 'योग'  या शब्दाचे विवरण ' कर्मसु कौशलम '  असे केले आहे व गीतेतील त्याचा अर्थ "कर्माचे ठायी स्वभावत: असणारे जे बंधकत्व ते नाहीसे करण्याची युक्ती आणि ती युक्ती म्हणजे  "सिद्धि व असिद्धीविषयी समत्वबुद्धीने कर्म करणे म्हणजे अनासक्त वृत्तीने कर्म करणे होय." हाच उपदेश गीतेमध्ये आहे हे सांगण्याचे कारण म्हणजे शंकराचार्यांपासून अनेक संप्रदायांच्या प्रवर्तकानी कर्मसंन्यासावर भर देऊन गीतेतून तोच अर्थ काढण्याचा प्रयत्न केला आहे तो तसा नाही हे ठामपणे दाखवून देणे.कर्मसंन्यास या शब्दाचा सोयिस्कर अर्थ काढून काहीही कार्य न करता मी "सर्वसंगपरित्याग केला आहे" असा दावा मिरवण्याचा सर्वसामान्यास मोह होणे स्वाभाविकच असून प्रत्यक्षात  फलासक्ति न ठेवता सतत कर्म करत रहाणे अश्या प्रकारे निस्पृह होऊन जो पुरुष व्यवहारात वागतो व ज्याला ममत्व व अहंकार नाही त्यालाच शान्ति मिळते.    
   पारतंत्र्यात असताना संन्यास व भक्ती अश्या निष्क्रियतेला उत्तेजन देणाऱ्या प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासाठी श्रीमद्भगव्द्गीतेसारख्या ग्रंथाचे प्रयोजन नसून अखंड कर्म आणि तेही कोठलीही फलाशा न धरता करण्याचाच संदेश त्यातून श्रीकृष्णांनी दिला आहे हे ठासून सांगण्यासाठीच या ग्रंथबिर्मितीचा प्रचंड उद्योग लो.टिळकांनी केला होता,ग्रंथात एका ठिकाणी त्यांच्या उपहासात्मक शैलीत त्यानी म्हटले आहे,
"सांसारिक कर्मापासून निवृत्त होऊन भगवद्भजनी लाग किंवा संन्यास घे हेच जर गीतेचे तात्पर्य म्हणावयाचे,तर अर्जुन लढाईचे घोर कर्म सोडून भिक्षा मागण्यास आयताच तयार झाला असल्यामुळे त्याला हा उपदेश करण्याची जरूर नव्हती.पहिल्याच अध्यायाचे अखेरीस "वा:! काय उत्तम गोष्ट बोललास ! तुला झलेली उपरति पाहून मला आनंद वाटतो! चल;आपण दोघेही हा कर्ममय संसार सोडून संन्यासाश्रमाने किंवा भक्तीने आपल्या आत्म्याचे कल्याण करून घेऊ !" अश्या अर्थाचा एकाददुसरा श्लोक श्रीकृष्णाचे तोंडात घालून तेथेच गीतेची समाप्ति करावयास पाहिजे होती,मग इकडे लढाई होऊन व्यासांनी तिचे वर्णन करण्यात तीन वर्षे (महाभारत आ. ६२.५२) आपल्या वाणीचा दुरुपयोग केला असता,तर निदान अर्जुन आणि श्रीकृष्ण यांस तरी त्याचा दोष लागला नसता "आणि त्याचमुळे ग्रन्थाच्या "गीताध्यायसंगती या १४ व्या प्रकरणात त्यांनी अगदी परखड भाषेत आपले मत मांडताना म्हटले आहे,
"गीता म्हणजे कर्म,भक्ती व ज्ञान या तीन स्वतंत्र निष्ठांची खिचडी,किंवा कापूस ,रेशीम व जर यांच्या चिंध्या शिवून तयार केलेली गोधडी नसून कापूस रेशीम व जर यांचे निरनिराळे धागे यथास्थानी योग्य रीतीने बसवून दिल्यावर कर्मयोग नावाचे मौल्यवान व मनोहर असे हे गीतारूपी सणंग अव्वलपासून अखेरपर्यंत अत्यंत योगयुक्त चित्ताने सलग विणले आहे.    
     त्यामुळेच या ग्रंथास त्यांनी गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र " असे नाव दिले आहे.व योग: कर्मसु कौशलम्‍ या गीतेतीलच सूत्रानुसार कर्मातील कुशलता म्हणजेच योग आणि योगशास्त्र म्हणजे कर्मयोगशास्त्र अशी उपपत्ती देऊन गीतेतील प्रत्येक ध्यायाच्या अखेरीस "श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे " या प्रत्येक शब्दाची फोड करताना हे योगशास्त्र म्हणजे कर्मयोगशास्त्रच अहे हे ते पुना पुन्हा बजावतात.