महाभारताचे जीवन सार: (भाग १)

महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com)
 #महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते. आपल्याच नातवांमध्ये सत्याने वागणारे पांडव दिसत असूनही धृतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या दबावाखाली आणि त्यांनी घेतलेल्या काही शपथेपायी त्यांनी चुकीच्या व्यक्तींचा म्हणजे कौरवांचा पक्ष घेतला आणि पांडवांना त्याचे नुकसान सोसावे लागले. म्हणजे मनात वेगळे करायचे पण करावे लागते वेगळेच असे मानसिक द्वंद्व भीष्म सोसत राहिले. पण शेवटी देव (कृष्ण) सत्याचा वाली असतो.
मग देवाने पांडवांची बाजू घेतली आणि विजय सत्याचा झाला आणि होतोच. कुणाच्या बाजू घेण्याने अथवा न घेण्याने सत्य बदलत नाही. आजच्या जीवनात सुद्धा आपल्याला तेच दिसते. नि:पक्षपातीपणा आजकाल क्वचितच आढळतो. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात कुणीतरी प्रभावशाली माणूस नियम लावताना "बाजू" कुणाची आहे हे पाहून निर्णय देत असतो. म्हणजे बाजू पाहून नियम वाकवले जातात. नियमांचा उपयोग स्वत:च्या फायद्यानुसार वाकवून केला जातो. नावडतीचे मीठ अळणी असा काहीसा हा प्रकार आहे. राजकारणात याहून वेगळे चित्र नाही. सत्ताधारी कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, पण सत्ताधारी चांगले निर्णय घेत असले तरी फक्त विरोधाला म्हणून विरोधी पक्षाकडून नावाला शब्दशः: जागून विरोध केलाच जातो आणि चांगल्या  गोष्टी अमलात आणल्या जात नाहीत आणि सत्याचा विजय व्हावा अशी वाट बघणारा सामान्य माणूस त्याची आशा गमावून बसतो. "विरोधी पक्ष" असे नाव बदलले आणि "देखरेख पक्ष" असे नाव ठेवले तर? मानसिकतेत बदल होईल का?