एक भयावह प्रवास.... !!

 विशाल सोलापुराहून परत येत होता, मध्यरात्र कधीच उलटली..  एक डुलकी एक अपघात, चालकाने सावध राहा, रस्त्यात थांबू नका...  अश्या पाट्या वाचताना झपाझप पुढे निघायच्या नादात गाडी कशावर तरी ठेचकाळली!  टायरचा फुस्स्स्स्स आवाज आल्यामुळे पुढे जाऊन विशाल लगेचच थांबला त्याने पंक्चर झालेले टायर बदलून डिकीत जुना टायर ठेवला.... डिकी बंद करणार एवढ्यात मागून आवाज आला... "इथे जवळपास कोणते स्मशान आहे का हो ?" !!

हातातल्या स्पॅनरवरची पकड मजबूत करून विशाल झर्रकन मागे वळला, एक मध्यम वयाचा माणूस रक्ताळलेल्या चेहऱ्याने कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करत होता.... विशालच्या तोंडून काही शब्द फुटायच्या आतच त्याची नजर त्या माणसाच्या पायाजवळ गेली....रक्ताचा  लहानसा ओघळ आणि त्यापाठोपाठ एका लहान मुलाचा मृतदेह... जसे की हा माणूस लांबवरून तो ओढून आणत होता... विशाल ने स्पॅनर बाजूला ठेवून मोबाईल काढला, पण रेंज नव्हती, थोडा  हात लांब करून त्याने मागच्या सिटवरची पाण्याची बाटली काढली आणि त्या माणसासमोर धरली.

मला पाणी नको, ह्या पाण्याने तहान भागणार नाही. जीव होता तोवर पोराच्या तोंडात घालायला देखील पाणी मिळाले नाहीपण आता मात्र मसणात लवकर पोचणे आवश्यक आहे, निदान आत्म्याला तरी शांती मिळेल नाही तर इथेच ...

विशालने त्याला हातानेच थांबायची खूण केली, डिकीत ठेवलेला जुना टीशर्ट त्याने टराटरा फाडून २ तुकडे केले,पाण्यात बुडवून त्याने ते कपड्याने माणसाचे डोके, हात पुसून घेतले. त्या मुलाच्या मृतदेहाला मात्र त्याने काळजीपूर्वक हात लावला नाही.
पुढचे दार उघडून त्याने त्या माणसाला आत बसवले, त्या माणसाने मुलाचा मृतदेह कडेवर घेतला आणि तसाच रडायला लागला... !
गाडी सुरू करून विशालने विचारले - "बाबा, सांगा काय झालं, खूप वाईट वेळ आली आहे कबूल पण मी तुमची मदत करायला तयार आहे, त्यामुळे प्लीज मला सगळे सांगा...

मी आणि माझा मुलगा, काल रात्रीपासून असेच इथे पडलेलो आहोत, आम्ही सायकलवरून जाता जाता एका भरधाव वाहणाऱ्या गाडीने आम्हाला उडवले... सायकलचा चोळामोळा झाला, मी आणि पोरगा रस्त्याकडेला फेकलो होतो, रस्त्यातल्या दगडाला आपटून पोरगा तिथेच मेला असावा, मला साधारण २-३ तासापूर्वी थोडी शुदध आली... पण पायात ताकद नव्हती,थोड्यावेळाने धीर करून उठलो किर्र काळोखात नजर साथ देत नव्हती तरी चाचपडत शोधत फिरत होतो, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या अंधुक प्रकाशात कसेबसे पोराला शोधले...

३-४ रानटी कुत्री माझ्या पोराला हुंगत होती, नखाने उकरत होती... कसाबसा जीव लावून दगड उचला आणि खूप ओरडून फेकून माराला त्यांना, पळून गेली सगळी कुत्री... जवळ जाऊन पाहिले पण पोरगा निपचीतच पडला होता..श्वास घेत नव्हता.. त्याला शेवटचे पाणी पाजावे म्हणून कसाबसा रस्त्यावर आणला आणि पाणी मिळते का शोधेपर्यंत तुमची गाडी. . . .त्या माणसाने आवंढा गिळत पुन्हा मुसमुसून आक्रोश केला....

विशाल त्याच्या खांद्यावर हात ठेवून  धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाला...माझी गाडी पंक्चर झाली होती म्हणून मी थांबलो नाहीतर मला जाणवले हि नसते की तुम्ही इतक्या भयंकर परिस्थितीत आहात.... त्या माणसाने विशालचा हात झटकून तावातावाने त्याला दूर लोटले, "चांडाळा... गाडी पंक्चर कशाने झाली हे जाणून घेतलेस तू ??  माझ्या मुलाला पाणी पाजण्यासाठी सायकलचे मोडके मडगार्ड, सिट आणी २-३ दगड मी त्याभोवती लावले होते. तुम्ही गाडी चालवण्याचा नादात रस्त्याच्या कडेला एवढ्या कडेला आलात की आपली गाडी कशावरून गेली हे बघावे असे वाटले ही नाही ?  माझ्या पोराच्या मोडलेल्या बरगड्या आणि त्या आडोशाला लावलेल्या दगडांमुळे गाडी पंक्चर झालिये तुमची !!   बघा ... हे बघा... असे म्हणून त्याने पोराच्या  अंगावरचा कपडा बाजूला केला....

संपूर्ण मांसळलेला छिन्न्विछिन्न झालेला छातीचा भाग पाहून विशालला प्रचंड टेन्शन आले...चटणी वाटताना पाटाखाली बोटं अडकले तर  कसे वाटते ? इथे संपुर्ण मुलगा गाडीखाली आला होता.. .. पुन्हा रक्ताळलेल्या हाताने त्याने विशाल चा हात घट्ट पकडून जोरात ओरडला... कसे फेडणार हे पाप ?? !! 

रक्ताचा चिकट हात लागून सर्रकन अंगावर काटा आल्यामुळे त्या माणसाचा हात मागे झटकून विशाल गाडीबाहेर आला... हातातली पाण्याची बाटली त्याने डोक्यावर रिकामी केली... आपल्या घरी असलेले आई-वडील-बायको-मुलगी, ऑफिसातले जवळ आलेले प्रमोशन,नवीन फ्लॅट, शेतीवाडी, समाजातले आपले स्थान  हे सगळे विचार एका क्षणात त्याच्या मेंदूला असंख्य चावे घेऊन गेले... पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतः:ला सावरले.. आपण खून केलेला नाही, परंतु एक मृतदेह आपल्यामुळे छिन्नविछिन्न झाला हेदेखील खरे... !!

ताबडतोब गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन त्याने धीर करून पुन्हा त्या माणसाला समजवण्यासाठी विचारले... बाबा, जे झालं ते वाईट ह्यात शंका नाही, पण तुमच्या मुलाच्या मृत्यूचे पाप माझे नाही, मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे... कृपया माझी मदत घ्या आणि मला मदत करा.... ह्या घडीला लागणारा सर्व खर्च मी करेन, ह्या उपर मी तुम्हाला महिन्याला काही रक्कम वरखर्चाला पाठवत राहेन फक्त माझ्या मनातला सल दूर व्हावा यासाठी.... ज्या कोणी तुम्हाला रस्त्यावर ठोकरले त्यांना शोधायचा देखिल प्रयत्न करू शकतो आपण, जेणेकरून खरा गुन्हेगार कोण आहे ते जगासमोर येईल पण तुम्ही धीर धरा... 

डोळ्यातून पाणी न थांबणारा तो माणूस हे शब्द ऐकून उठला... विशाल ला म्हणाला गेली कित्येक वर्ष आम्ही इथे राहतो, हे असे कधी घडेल असे वाटलेच नव्हते... ह्या मुलाची आई आणि माझी पत्नी काही वर्षांपूर्वी ऍसिड फॅक्टरीत काम करताना अर्धवट जळून मेली -

तेव्हापासून मीच त्याची आई-आणी मीच बाप... असो मी तुम्हाला जास्त बोललो असेल तर क्षमा करापण लवकरात लवकर मला स्मशानभूमीकडे न्या... निदान ह्या उपर पोराच्या देहाचे हाल होण्याआधीच त्याला... ! - विशालने वाक्य पूर्ण करू न देताच गाडी सुरू केली,

८-१० किलोमीटर गेल्यावर एक पानाची टपरी दिसली, त्याबाहेर झोपलेल्या माणसाला उठवून विशाल ने विचारले "इथे स्मशानभूमी आहे का कुठे " --- जबरदस्त शिवी हासडत त्या माणसाने विशालला जवळ जवळ कानाखाली मारली - जोरात ओरडला 'अभद्र माणसा, झोपेतून उठवून असे प्रश्न विचारतोस... जा मर पुढल्या चौकात उजवीकडे वळून १५ पावलावर आहे स्मशान !!एवढे बोलून त्याने टपरीचे दार उघडले... गाडीत बसून जाता जाता विशालने त्या माणसाकडे पाहिले तर तो हनुमानच्या फोटोपुढे दिवा लावून काहीतरी पुटपुटताना दिसला.. त्यातही विशाल पाहतोय हे लक्षात आल्यावर त्याने टपरीचे दार धाडकन लावून घेतले आणि पुन्हा एक सणसणीत शिवी !!

उजवीकडे वळल्यावर गाडी पुढे जाण्याच्या लायकीचा रस्ता नव्हता पण स्मशानभूमी ची पाटी दिसली, विशालने दार उघडले-- त्या बाबाने मुलाला तसेच कडेवर घेऊन स्मशानात चालू लागला... विशाल म्हणाला बाबा, आपण इथेच अग्नी देऊ, परंतु त्या बाबाने विशाल ला सांगितले की आमच्यात अग्नी नाही तर जमिनीत पुरतात.. मुलगा लहान आहे आपण एखादा लहान खड्डा खणून घेऊ. त्या बाबांची हालत खूपच खराब होती त्यामुळे विशालनेच आजूबाजूला थोडी मऊसर जागा पाहून हाताने आणि गाडीच्या स्पॅनरने उकरून थोडासा खड्डा केला... वळून पुन्हा वर पाहणार, तेवढ्यात अचानक त्या खड्यातून कसला तरी उग्र वास येऊ लागला...

क्षणार्धात विशालच्या डोळ्यातून आग होत पाणी येऊ लागले, खड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक कोणीतरी आपला पाय ओढत आहे असे त्याला जाणवले... अत्यंत तिक्ष्ण वेदना मस्ताकापर्यंत गेल्याने स्पॅनर उगारून त्याने डोळे मोठे करत खाली पाहायचा प्रयत्न केला आणि जे  दृश्य दिसले त्यामुळे त्याचे हातपाय गार पडले... डोके सुन्न झाले.. स्पॅनर गळून पडला आणि होते नव्हते तेवढे बळ आणून त्याने त्या बाबांना हाक मारली ... बाबा... बा. बा. बा.....

खड्याच्या तळाशी एक अर्धवट जळालेल्या महिलेने विशालचा पाय ओढून खायला सुरुवात केली होती... कचाकच लचके तोडत तिने गुडघ्यापर्यंतच्या भागाचा मिनिटभरात फडशा पाडला... विशाल आता पूर्णपणे खड्यात ओढला गेला...बेशुद्ध होण्या आधी त्याने वर पाहिले तर तो ऍक्सिडेंट झालेला माणूस आणि त्याचा मुलगा...वरून समाधानाने खड्यात बघताना दिसत होते.... हो जिवंत होता तो मुलगा आणि अत्यंत भेसुरपणे हसत होता.... विशालच्या मांडीच्या मांसल भागाला त्या बाईचे दात लागल्यावर रक्ताची मोठी चिळकांडी उडाली... विशाल ओरडत विव्हळत होता... की हे माझ्यासोबत तुम्ही काय केलंत ?? ... का केलंत....

गुडघ्याच्या वाटीचे उरलेले मांस चाटून खाताना ती अर्धवट जळालेली बाई म्हणाली, माझ्यावरच्या प्रेमापोटी हे दोघं नेहमी अशी सोंग घेत असतात... कधी बाप मेलेला दाखवतात तर कधी पोरगा... मी अशी अर्धवट, ना बाहेर जाऊ शकते ना कोणाची शिकार करू शकते, मग हेच अशी शक्कल लढवून माझे पोट भरतात..कितीतरी  वर्ष झाली पण काय करणार अतृप्त आत्म्याला माणसाचेच मांस शांत करू शकते.... लोकं थांबत नाहीत.... गेला आठवडाभर काही खाल्लेले नाही... तुमच्यासारखे कोणी थांबले की मगच आम्हाला जेवायला मिळते...

पांढऱ्या डोळ्यातून बुबुळे फिरवत  ती बाई वर बघत म्हणाली,  अहो, तुम्ही  पण या खायला.... तुम्हालाही भूक लागली असेल ना !... ये  बाळा तू  पण ... !!

बेशुद्ध होता होता विशाल ने डोळे मिटले.. शेवटच्या क्षणी केलेली सगळी पापे आठवतात असे म्हणतात... एवढ्यात त्याचा डोळा जबरदस्तीने उघडला गेला... मगाशी मृत्युमुखी पडलेला मुलगा त्याच्या उरावर बसलेला होता त्याने एका हाताने पापणीला धरून विशालचा डोळा उघडला होता आणि मिटक्या मारत म्हणाला... बाबा आज तरी डोळा मला  खाऊ द्या ना....  असह्य होऊन विशाल ओरडला... वाचवा.... ! ती त्याची शेवटची किंकाळी !!! 

त्या भयाण स्मशानात त्याचा आवाज काही सेकंदात विरून गेला... !!किर्र काळोखात पुन्हा रातकिड्यांचा आवाज प्रखर झाला... काही वेळांपूर्वी इथे काय झाले असेल हे कोणाला सांगताही येऊ नये इतपत निरवा निरव झाली....

उरला तो फक्त एक उग्र वास, काही हाडं, रक्ताचे डाग आणि विशाल ने खणलेला खड्डा !!!

-

आशुतोष दीक्षित !