सहप्रवासी

    रोल्ड डहल या ब्रिटिश लेखकाच्या "Going alone" या पुस्तकातील काही मजेदार भाग यापूर्वी मी मनोगत वर अनुवादित केले होते.त्याच्या कथाही अगदी भन्नाट आहेत असे आढळून आले.त्याच्या मला आवडलेल्या एका कथेचा हा अनुवाद 
    नुकतीच माझ्या हातात नवी कार आली होती. जणु हातात एक नवं खेळणं आलं होतं.गाडी  चमकदार बी.एम.डब्लू ३.३ लिटर,भलीमोठी, फ्युएल इंजेक्शन टाइप.तिचा वेग अगदी भन्नाट म्हणजे ताशी ताशी १२९ मैल होता.आणि ऍक्सिलरेशनही तितकेच अफाट.बाहेरून फिक्कट निळ्या रंगाची आणि आतल्या बैठकीही तश्याच पण अधिक गडद रंगाच्या  आणि त्या उत्कृष्ट प्रतीच्या मऊ मुलायम चामड्यापासून बनवलेल्या होत्या. अतिशय शक्तिशाली इंजिन त्यामुळे कमी वेगात जरा कुरकुरतच चालायचे पण एकदा का वेगाने साठी ओलांडली की त्याचा आवाज अगदी बिथोवेनच्या सिंफनीसारखा वाटू लागे.
  त्यादिवशी मी लंडनकडे जाण्यासाठी गाडी बाहेर काढली होती.जूनमधील उत्साहवर्धक सकाळ होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूस पिवळ्या रंगांच्या छोट्या हंड्यांच्या आकाराच्या  फुलांच्या रांगा दिसत होत्या आणि शेतात गुरांसाठी गवत कापून त्यांचे ढीग लावण्याचे काम चालू होते.मजेत शीळ वाजवत ७० मैलाच्या गतीने आपल्या बैठकीवर अगदी आरामात रेलून मी गाडी चालवत होतो.माझ्या थोडे पुढे एक माणूस हाताचा आंगठा हालवत लिफ्ट मागत असलेला मला दिसला.ब्रेकवर पाय दाबून मी गाडी अगदी त्याच्या जवळ नेऊन थांबवली.अश्या भटक्यांसाठी मी नेहमीच गाडी थांबवतो.कारण असे रस्त्यावर उभे राहून आंगठा दाखवून लिफ्ट मागताना कसे वाटते याचा अनेक वेळा मी अनुभव घेतला आहे.अश्या वेळी मला पाहिले न पाहिलेसे करून गाडी पुढे दामटणाऱ्या चालकांचा -- त्यातल्या त्यात मोठी गाडी असून त्यात बऱ्याच जागा मोकळ्या असतानाही--- मला अगदी राग येत असे.मात्र छोट्या आणि त्यातही जुन्या गाडीत ती अगदी पोराबाळांनी खच्चून भरलेली असली तरी त्यातल्यात्यात जागा करून गाडीचा मालक "काही हरकत नाही अजून एक बसू शकेल" म्हणून गाडीत घेतात हाही अनुभव माझ्या जमेस होता,आत्ता मला थांबवणाऱ्या व्यक्तीने उघडलेल्या खिडकीतून डोके आत घालत ,"काय दोस्त, कुठं लंडनला का?" विचारले आणि मी त्याला "हो" असे उत्तर देऊन म्हणलो,""चल चढ आत"तो आत चढला आणि मी गाडी सुरू केली.
    त्याचा चेहरा अगदी उंदरासारखा लंबुळका आणि दात पिवळे पडलेले दिसत होते.त्याचे डोळे मात्र कुळकुळीत काळे आणि चांगलेच तीक्ष्ण अगदी उंदराचे असावेत तसेच आणि कान वरच्या बाजूस निमुळते झालेले दिसत होते.त्याच्या डोक्यावर कापडी हॅट आणि अंगात राखी रंगाचे मळकट जाकीट ! हा वेष,चलाख डोळे आणि टोकदार कान यामुळे तो अगदी मानवी उंदीरच भासत होता.
"लंडनच्या कुठल्या भागात जायचे आहे तुला ?" मी विचारले.
"लंडनमधून जरा पलीकडे." एवढेच तो उत्तरला, पण नंतर "त्याच्यापलीकडे म्हणजे एप्सोमला घोड्यांच्या शर्यती असतात तिकडे जायचे आहे खरे तर"असं त्यानं आपल्या मुक्कामाचं वर्णन केलं.
"अच्छा,असं आहे तर," मी म्हणालो,"खरं तर मलाही तुझ्याबरोबर यायला आवडले असते,कारण घोड्यांवर पैसे लावायला मलाही आवडते,"
"पण मी काही घोड्यांवर पैसे लावत नाही"तो म्हणाला,"मी तर त्यांना पळतानाही कधी पाहिले नाही.असे करणे म्हणजे मूर्खासारखा वेळ वाया दवडणे आहे असे माझे स्पष्ट मत आहे."
"मग तू कशाला चाललास तिकडॅ ?" मी न राहवून विचारले पण त्याच्या उंदरासारख्या छोट्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसले नाहीत आणि तो अगदी काही न बोलता समोरच्या काचेतून रस्त्याकडे पहात राहिला यावरून त्याला हा प्रश्न आवडला नसावा हे मला समजले, तरी आपलेच घोडे मी पुढे दामटले "मग बेटिंग मशीन किंवा तश्याच काही कामात मदत करायला तू जात असणार"
"ते तर आणखीच मूर्खासारखे काम आहे."तो उत्तरला,"असल्या मशीनवर काम करणे किंवा तिकिटे विकणे असल्या बिनडोक कामात तर मला मुळीच गम्य नाही ते म्हणजे अगदी रेम्याडोक्याचे काम आहे." आपल्या हुशारीवर त्याचा भलताच विश्वास आहे असे दिसले.
    यावर आता त्याला काही विचारणे योग्य आहे असे मला वाटले नाही.मलाही गाडीत लिफ्ट देणाऱ्यांचा अनुभव होता आणि गाडीत घेतल्यामुळे आपल्याला उगीचच,"मग तू कुठे चालला आहे?,तिकडॅच का निघाला आहेस? तू काय काम करतोस ? लग्न झाले आहे का तुझे ?एकादी मैत्रिण आहे का तुझी ? तिचं नाव काय ? वय काय तुझं ?" हे आणि असे काहीही प्रश्न विचारण्याचा अधिकारच मिळाला आहे अश्या थाटात प्रश्न विचारणाऱ्या गाडीच्या मालकांचा मलाही राग येत असे,त्यामुळे मी म्हणालो,
"मला माफ कर, खरं म्हणजे तू काय करतोस याच्याशी माझा काही संबंध नाही,पण मी एक लेखक आहे आणि अश्या प्रकारे काही कथाबीज सापडते का हे शोधण्यासाठी हे असे प्रश्न विचारायची वाईट खोड आहे मला. हा माझ्या पेशाचा दोषच समज ना " 
"म्हणजे तू पुस्तके लिहितोस?" त्याने विचारले आणि पुढे म्हणाला,"मग ठीक आहे.कारण लेखक व्हायलाही एक प्रकारचे कसब आवश्यक आहे.मी सुद्धा मीही असाच कसबी कलाकार आहे..खरं म्हणजे दररोज तेच तेच कंटाळवाणे आणि कुठल्याही कौशल्याचा अभाव असणारे काम करत सगळा जन्म घालवणाऱ्या लोकांची मला अगदी कींव करावी वाटते."
"खरं आहे"
"खर तर आयुष्याचं खरं सार्थक कश्यात आहे?" आता त्याला एकदम उत्साह आलेला दिसला आणि तो पुढे म्हणाला,"आयुष्याचं सार्थक एकादी करायला अतिशय अवघड गोष्ट अतिशय कौशल्याने पार पाडण्यातच आहे"
",जसं तू करतोस" त्याला उत्तेजन देत मी म्हणालो<
"अगदी बरोबर तू आणि मीही " तो खुषीत उद्गारला माझे हात मोकळे असते तर त्याने माझ्या हातावर टाळीही दिली असती.             
"पण माझे काम करण्यात मी अगदी तरबेज आहे हे तू कसे ठरवलेस ?"मी विचारले. " जगात अगदी टुकार लेखकही खूप आहेत,"
" पण तसे असते तर ही असली कार तुझ्या हातात दिसली नसती " त्याने उत्तर दिले आणि पुढे विचारले,
"ही घ्यायला किती पडले ? आणि काय वेग आहे या तुझ्या भन्नाट गाडीचा ?"
"ताशी एकशे एकोणतीस मैल" मी त्याला सांगितले.
"उगीच बंडल मारू नकोस,"माझ्यावर अविश्वास दाखवत तो उद्गारला,
"पैजेवर सांगतो ,या वेगाने ती मुळीच जाणार नाही "
"मीही पैजेवर सांगतो ती या वेगाने जाणारच " मीही हट्टाला पेटलो.
"हे कार विकणारे अगदी खोटारडे असतात काहीही ठोकून देतात, आपण कार विकत घेतो आणि जाहिरातीत जे सांगतात तसे प्रत्यक्षात काहीच होत नाही"
"पण या कारच्या बाबतीत असे होणार नाही"
"अस्सं, मग होऊन जाऊदे चालवूनच दाखव की तेवढ्या वेगाने.उगीच हातच्या कांकणाला आरसा कशाला ?" आता माघार घेणे मला शक्य नव्हते.
    पुढच्याच चौकानंतर आम्ही हायवेला लागलो आणि मी ऍक्सीलरेटरवर जोरात दाब दिला आणि पुढच्या दहा सेकंदातच गाडीने ९० मैलाच्या गतीने पळायला सुरवात केली."वा रे पठ्ठे !" माझ्या सहप्रवाश्याने एकदम उस्फूर्तपणे उद्गार काढले " मस्त ,जाऊ दे अशीच "मी ऍक्सिलरेटरवर खच्चून दाब दिला अगदी गाडीच्या तळाला टेकेपर्यंत आणि तसाच राहू दिला.
"अरे वा शंभर "तो जोरात ओरडला,"एकशे पाच, एकशे दहा !एकशे पंध्रा,हं जाऊदे आता माघार घ्यायची नाही "मी रस्त्याच्या बाहेरच्या पट्ट्यात होतो आणि माझ्याशेजारून एक हिरव्या रंगाची मिनि,एक मोठी पिवळी सिट्रोजेन,एक पांढरी शुभ्र लॅन्ड रोव्हर,एक दणदणित मोठा ट्रक,तांबुस रंगाची फोक्सवॅगन मिनिबस अशी वाहने जणु रस्त्यावर उभी करून ठेवल्यासारखी सरकली.
"एकशे पंचवीस !" माझा सहप्रवासी आपल्या बैठकीवरच जणु उड्या मारत ओरडला,"चालू दे आणि जाऊदे तिला एकशे एकोणतीसच्या वेगाने."
    त्या क्षणाला मला एकदम पोलिस व्हॅनचा जोरदार आवाजाचा सायरन ऐकू आला.तो इतक्या जोराचा होता की जणु माझ्या कारमधूनच तो यावा.त्याच्या पाठोपाठ मोटारसायकलवर बसलेल्या पोलिसाने आमच्या पुढे जाऊन हात दाखवून आम्हाला थांबायचा इशारा दिला."अरे देवा, आता काही खरे नाही" मी मनातल्या मनात म्हणालो."पोलिसाची मोटारसायकल इतक्या वेगात जाईल असे वाटले नव्हते "
" ह्या पोलिसाची जाऊ शकते " माझा सहप्रवासी उद्गारला ,"त्याची गाडी तुझ्याच गाडीच्या कंपनीने तयार केलेली आहे BMW R90S जगातली सर्वात वेगवान मोटरबाइक आहे ती.हल्ली ते अश्याच गाड्या वापरतात."
माझी गाडी थांबल्यावर पाठोपाठच पोलिस त्याच्या बाइकवरून उतरला गाडी स्टॅन्डला लावून आपले ग्लोव्ज काढून त्याने गाडीच्या बैठकीवर शांतपणे ठेवले.आता त्याला घाई नव्हती.
"मोठीच आफत आली,मला हे मुळीच आवडत नाही"मी पुटपुटलो
"हो पण जरुरीपेक्षा एकही जास्त शब्द त्याच्याशी बोलू नकोस,"माझा सहप्रवासी उद्गारला,"नुसता बसून रहा "बळी द्यायच्या बोकडाकडे खाटकाने जावे तसा शांतपणे तो पोलिस आमच्याकडे आला.चांगला जाडजूड आणि ढेरपोट्या होता तो.त्याची निळी पॅन्ट त्याच्या घेराभोवती अगदी चापून बसवल्यासारखी बसली होती.आपले गॉगल्स त्याने डोळ्यावरून हेलमेटवर चढवले होते त्याखाली त्याचा गुबगुबित लालबुंद चेहरा दिसत होता.
    खोड्या करणाऱ्या शाळकरी मुलासारखे आम्ही त्याच्या येण्याची गप्प बसून वाट पाहू लागलो. "साचध रहा या माणसापासून, अगदी सैतानाचीच अवलाद दिसतोय"सहप्रवासी उद्गारला. पोलिस मी उघडलेल्या खिडकीपर्यंत आला आणि आपला गुबगुबीत पंजा खिडकीच्या खालच्या काठावर ठेवत म्हणाला,"काय कसली घाई आहे ?"
"घाई कसली आलीय दादा?" मी उत्तरलो.वखत पडे बाका तो गधेको कहना पडता है काका"ही म्हण माझ्या अंगवळणी पडली होती.
"कदाचित तुझ्या घराच्या पाठीमागील घरात रहाणाऱ्या शेजारणीच्या पोटात कळा येत असतील आणि ती प्रसूतीच्या अगदी मार्गावर असेल आणि तिला रुग्णालयात घेऊन जायचे असेल असे तर नाही ना?"
त्याच्या सुरातील उपरोध अगदी स्पष्ट जाणवत होता.
"नाही दादा तसे काही नाही."
"हां मग कदाचित तुझ्या घराला आग लागली असावी आणि तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी इतक्या घाईने तू जात असशील" आपल्या उग्र चेहऱ्यावर शक्य तेवढे प्रेमळ भाव आणत तो विचारू लागला   . "तसे मुळीच काही नाही दादा"स्वरात आणखीनच लडिवाळपणा आणत मी उत्तरलो. पण त्याचा काही परिणाम झाला नाही आणि मला म्हणाला,"तर मग तू भलत्याच अडचणीत सापडला आहेस.तुला माहीत आहे का या देशात वाहन जास्तीत जास्त किती वेगाने  चालवायची परवानगी आहे ? "  "सत्तर" मी आज्ञाधारकपणे उत्तरलो," तर मग तुझी हरकत नसेल तर मग मला सांग की आता तू गाडी चालवत होतास तिचा नक्की वेग किती होता?" माझ्या सहप्रवाश्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मी अगदी गप्प बसलो.आता पोलिसाचा आवाज इतका चढला की मी एकदम जागच्या जागी उडालोच,
"ताशी एकशेवीस मैल म्हणजे वेगमर्यादेपेक्षा पन्नास  किंवा अधिकच मैल जास्त "असे म्हणून जोरदार खाकरून एक बडका त्याने जवळच टाकला तो माझ्या गाडीच्या बॉनेटवरच पडला आणि त्याचा ओघळ खालपर्यंत येत असलेला मला दिसला पण त्याचा राग त्याच्यावर काढणे आता शक्य नव्हते. तोंड मोकळे करून माझ्या सहप्रवाश्याकडे वळून त्याने विचारले,"आणि तू रे तू कोण?"
"तो माझा सहप्रवासी आहे,त्याला मीच माझ्या गाडीत लिफ्ट दिली आहे."मी उत्तर दिले,
"तुला नव्हतो विचारत मी, मी त्याला विचारत होतो " तो माझ्यावर डाफरला.
"काही चूक झाली की काय माझ्याकडून?" अतिशय मऊ आवाजात माझ्या सहप्रवाश्याने विचारले.
"ती शक्यता नाकारता येत नाही.काही हरकत नाही,तू साक्षिदार आहेस,तुझ्याकडे नंतर बघतो" आणि माझ्याकडे वळून त्याने हात पुढे करत सुरवात केली," ड्रायव्हिंग लायसेन्स ?"
मी मुकाट्याने माझे ड्रायव्हिंग लायसेन्स काढून दिले.आपल्या कोटाच्या वरच्या खिश्याचे बटण काढत आतले चालकांना ज्याची भीती वाटते असे आपले प्रसिद्ध तिकिटाचे पुस्तक त्याने बाहेर काढले,आणि माझ्या परवान्यावरील माझे नाव व पत्ता अगदी काळजीपूर्वक त्यावर नोंदून घेतला व परवाना मला परत देऊन गाडीच्या समोर जाऊन लायसेन्सप्लेटवरील क्रमांक वाचून पाहिला आणि त्याचीही नोंद केली..त्यावर त्याने मी केलेल्या गुन्ह्याची तारीख,वेळ आणि तपशील यांची नोंद केली आणि तो तिकिटाचा भाग फाडून त्याची कार्बन कॉपी नीट उमटल्याची खात्री करून माझ्या हातात ठेवला आणि ते पुस्तक पुन्हा व्यवस्थित आपल्या कोटाच्या खिश्यात ठेवून त्याचे बटण लावले.
"हं आता तू" गाडीच्या समोरून पलीकडे जात माझ्या सहप्रवाश्याकडे वळून तो म्हणाला. त्यापूर्वी त्याने कोटाच्या दुसऱ्या खिश्याचे बटन काढत त्यातून एक वेगळी काळ्या रंगाची वही बाहेर काढली "नाव?""मायकेल फिश"माझा सहप्रवासी उत्तरला."पत्ता?" चौदा,विंडसर लेन ,ल्युटन ""पुरावा काय ?" पोलिसाने विचारले. माझ्या सहप्रवाश्याने आपल्या खिश्यात हात घालून स्वत:चे ड्रायव्हिंग लायसेन्स ना काढून त्याला दाखवले आणि पोलिसाने त्याची नोंद करून घेतली.      
"तू करतोस काय ?"
"हमाली, म्हणजे सीमेंटच्या गोण्या वहातो मी "
"तुझा मालक कोण"
"कोणी नाही"
"म्हणजे ?"
"सध्या मी कुणाकडेच काम करत नाही,बेकारच म्हणाना"
"बर बर " पोलिसाने या सगळ्याची नोंद केली. आणि वही बंद करून खिश्यात ठेऊन खिश्याचे बटण लावत म्हणाला,"स्टेशबवर चाललोय आता मी तिथ करतो चौकशी मी तुझ्याविषयी "
"माझी चौकशी?माझी काय चुकी झाली?" माझ्या सहप्रवाश्याने विचारले.
"काही नाही हे तुझे उंदिरतोंड मला काही आवडले नाही चौकशी करणार असे म्हणून समज .आणि आमच्या कडे तुझ्या या तोंडाची नोंद कुठेतरी सापडेलच " असे म्हणून गाडीला वळसा घालत माझ्या बाजूला येऊन खिडकीतून डोकावत तो म्हणाला,
"तू चांगल्याच भानगडीत अडकला आहेस समजते ना तुला?"
"होय दादा "
" एकदा तुझ्या प्रकरणाची तड लावली की  असली महागडी गाडी तुला बरीच वर्षे चालवायला मिळणार नाही ,कदाचित तुला त्याबद्दल गजाआडही रहावे लागेल"
"म्हणजे तुरुंगात की काय?"मी घाबरत घाबरत विचारले"
"मग शंका आहे की काय?"आसुरी हास्य करत तो उद्गारला.
"गजा आड म्हणजे दुसरे काय वाटले तुला ? तुझ्यासारखेच कायदा मोडणारे आणखीही काही जण असतील तुझ्याबरोबर,आणि असं झालं तरच मला खरा आनंद होईल .ठीक आहे आपली गाठ आता कोर्टातच पडेल तुला तसे समन्स येईलच म्हणा लवकर" त्याने आपला मोर्चा आपल्या मोटर सायकलकडे वळवला आणि स्टॅडवरून खाली घेत तिच्या बैठकीवर आरूढ होता त्याने एक जोरदार किक मारून ती सुरू केली आणि क्षणार्धात तो निघूनही गेला.
"छ्या भलतेच काहीतरी झाले"
"अगदी बरोब्बर पकडले गेलो"
"म्हणजे मीच ना ?"चिडून मी उद्गारलो
"मग आणखी कोण?"आणि तो पुढे म्हणाल,"आता काय करायचा विचार आहे राजे?"
"आता दुसरं काय करणार सरळ लंडनला जाऊन वकिलाची गाठ घ्यायला लागेल मला"कार सुरू करत मी म्हणालो.
"ते तुरुंगात ठेवण्याचे वगैरे जे तो म्हणाला त्याच्यावर नकोस विश्वास ठेऊ" तो म्हणाला,"फक्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल कॉणी तुरुंगात जात नाही "
"खरं सांगतोस तू हे?" जरा बरे वाटून मी म्हणालो
"अगदी निश्चित.तुझे लायसेन्स काढून घेतील आणि भला मोठा दंड वसूल करतील पण ते तेवढेच त्यापेक्षा आणखी काही नाही"मला खूपच बरे वाटले.
"पण मला एक सांग माझ्याशी तू उगीच तू खोटे का बोललास?" मी त्याला विचारले
"मी तुझ्याशी खोटे बोललो असे तुला का वाटतेय ?"
"तू पोलिसाला सांगितलेस की तू हमाली करतोस म्हणून आणि सध्या बेकार आहेस म्हणून आणि मला तर सांगितलेस की एक कसबी कलाकार आहेस म्हणून" मला त्याचा आलेला राग दाबून मी विचारले.
"मग खरेच आहे ते, म्हणजे माझे कौशल्य काय आहे हे मी तुला सांगितले नाही हे  मात्र खरे "
"मग सांग तरी तू असल्या कसल्या कौशल्यपूर्ण व्यवसायात  काम  करतोस." त्याला जणु आव्हानच देत मी विचारले.
"हं हे खरे आहे की मी तुला सांगायला हवं आहे—"जरा घुटमळतच तो उद्गारला.
"काय करतोस हे सांगायची लाज नाही ना वाटत तुला?" मी त्याची लाजच काढल्यावर एकदम उसळून तो म्हणाला," हूं लाज नाही उलट माझ्या व्यवसायाचा मला इतका अभिमान आहे की जगात कुणालाच तसा नसेल."
"मग मला का सांगत नाहीस तू ?" मी आपला हेका चालू ठेवला.
"तुम्ही लेखक मंडळी ना, अशी एकदा का मागे लागला की पिच्छा सोडत नसता, आता मी काय करतो हे तुला कलल्याशिवाय तुला काही बरे वाटणार नाही हो ना?"
"मला काय बाबा सांगितलेस तरी वाहवा न सांगितलेस तरी वाहवा" मी दोन्ही डगरीवर हात ठेवले
माझ्याकडे एक अर्थपूर्ण दृष्टिक्षेप टाकत तो म्हणाला,"तुला माहीत करून घ्यायचे तर आहेच.तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलेल दिसतंय मला.मी कुठल्या तरी विचित्र व्यवसायात आहे आणि तो जाणून घेतल्याशिवाय तुला चैन पडणार नाही."माझे विचार त्याने ज्या पद्धतीने व्यक्त केले ती गोष्ट मला फारशी आवडली नाही.
"तसे तुझे बरोबरच आहे म्हणा !" तो आणखी पुढे म्हणाला
"आणखी मी खरेच एका अगदी वेगळ्या व्यवसायात आहे हे तर खरेच !." मी ऐकत राहिलो.
"म्हणूनच त्या पोलिसाशी बोलताना मी अगदी सावधगिरीने बोलत होतो. कारण असे पहा कदाचित तूच साध्या वेषातला पोलिस नसशील कशावरून " आता अगदी खदखदून हसावे असे मला वाटले
"तुला काय मी पोलिस वाटलो?" त्याची कींव करणारा दृष्टिक्षेप टाकत मी म्हणालो.
"मुळीच नाही ,उगीच आपली तुझी मजा केली."असे म्हणून त्याने खिशातून तंबाकूची डबी काढली आणि त्याचबरोबर सिगरेट बनवण्याच्या कागदांचा एक गट्ठा ! त्यातील एक कागद निवडून त्यात तंबाकूची भुकटी घालून सिगरेट वळायला त्याने सुरवात केली.आणि ती अवघड क्रिया ज्या गतीने त्याने पार पाडली त्याकडे मी पहातच राहिलो.अगदी बघता बघता त्याने सिगरेट वळली पाच सेकंदाच्या आतच.कागदाच्या कडेवर जीभ फिरवत तो जरा ओलसर करत कागदाची कड चिकतवत त्याने सिगरेट तयार करून ओठात पकडली आणि क्षणार्धात याच्या हातात कुठून लायतर आला मला समजलेही नाही,आणि भर्र्कन लायटरची ज्योत पेटवून सिगरेट शिलगावून त्याचा लायटर एकदम दिसेनासा झाला.एकूणच त्याने ही कृती इतक्या जलद गतीने पार पडली की मी अगदी पहातच राहिलो.
"इतकी झटपट एकाद्याने सिगरेट वळून तयार केल्याचे आयुष्यात मी प्रथमच पहातोय"
"म्हणजे एकूण तुझ्या लक्ष्यात आल तर " सिगरेटचा एक जोरदार झुरका घेत तो उद्गारला.आणि आरामशीर बैठकीत पाठ टेकून बसला.त्याचे हे कौशल्य माझ्या लक्षात आल्यामुळे त्याला आनंद झाला होता असे दिसले.
"मी कात करतो हे तुला जाणून घ्यायचे आहे तर "अगदी खुषीत येत तो म्हणाला,
"अगदी बरोबर बोल आता तू"मी त्याला उत्तेजन देत म्हणालो. 
"मी सिगरेट इतकी झटपट कशी बनवली हे जाणून घ्यायचे आहे तुला ?"
 "हो तर"
"त्याला कारण आहेत माझी ही बोटे"आपला हात पसरून माझ्यापुढे उघडत तो म्हणाला.
"माझी ही बोटे जगातील प्रसिद्ध पिअयानोवादकापेक्षाही जलद आणि कुशलतेने चालतात.
"तू पियानो वादक आहेस तर"मी एकादे कोडे सुटल्यासारखा उद्गार काढला
"वेडा आहेस की काय तू ?" माझ्याकडे तुच्छतेने पहात तो म्हणाला,"मी काय एकाद्या पियानोवादकासारखा दिसलो का तुला?"मी त्याच्या बोटांकडे पाहिले. अतिशय लांबसडक , निमुळती प्रमाणबद्ध आकाराची ती बोटे खरोखरच त्याला शोभत नव्हती जणु ती त्याच्या शरीराचा भागच नसावीत इतकी ती वेगळी दिसत होती.एकाद्या मेंदुशल्यविशारद किंवा घड्याळे दुरुस्तीचे नाजुक व कुशल कारागरीचे काम करणाऱ्या हाताची ती बोटे दिसत होती.
"पियानोवादकापेक्षाही अधिक अवघड माझा व्यवसाय आहे.प्रत्येक घरात एकादे तरी पोरसुद्धा पियानो वाजवताना दिसेल तुला.खरे की नाही ?"
"हो जवळजवळ तसेही म्हणता येईल " मी नाइलाजाने कबूल केले.
""आता कसे बोललास,पण लाखो किंवा करोडो घरात एकादाच माझ्यासारखे कौशल्याचे काम करत असेल"
"वा कमाल आहे" मी म्हणालो
"कमाल तर खरीच"
" आता मी निश्चित सांगतो तू जादूगार आहेस आणि हातचलाखीच्या गोष्टी करतोस काय बरोबर ना?" मी विजयी मुद्रेने त्याच्याकडे पहात म्हणालो.
"जादूगार ?"एकादे झुरळ झतकावे तसे मला झटकत तो उद्गारला,"तुला काय मी त्या पोरांच्यासमोर टोपीतून ससा वा कबूतर काढून दाखवणे किंवा पत्यांच्या करामती करणारा वाटतो का?"
"मग तू पत्त्यांचा बादशहा असणार आणि पत्ते पिसून बरोबर हवे तसे डाव मिळवून लोकांना फशी पाडणारा --*
"म्हनजे कार्डशार्पर असे म्हणायचे आहे का तुला,तसले नसते उद्योग नाहीत जमत मला "त्याच्या प्रामाणिकपणावर मी शिंतोडे उडवल्याचा त्याला राग आला असावा बहुतेक.
"हरलो बुवा मी"हार पत्करत मी म्हणालो,"आता तूच सांगून टाक" आता गाडी मी अगदी चाळीसच्याच वेगाने चालवत होतो उगीच आता धोका पत्करायचा नव्हता मला. लन्डन ऑक्स्फोर्ड मुख्य रस्त्यला आम्ही लागलो होतो. आणि डेनहॅमच्या दिशेन गाडी उताराला लागली होती.
अचानक माझ्या सहप्रवाश्याने आपल्या हातात एक काळा चामडी पट्टा उंचावून धरला आणि मला विचारले,
"काय हा पट्टा पाहिला आहेस का कधी?"पट्ट्याला असलेले पितळी बकल अगदी वेगळ्या धर्तीचे होते आणि मला ते आवडले होते म्हणून मी मुद्दाम खरेदी केले होते,
"अरेच्चा हा तर माझाच पट्टा "मी अग्दी आश्चर्याने ओरडलोच,"आणि तुला हा कोठे मिळाला ?" तो हसला "तुला काय वाटते मला कसा मिळाला असेल?" आणि पट्टा हातात धरून माझ्यापुढे नाचवत म्हणाला," "अर्थात तुझ्या पॅन्टच्या वरच्या भागामधून"मी कमरेवरून हात फिरवला आणि खरेच तेथे पट्टा नव्हता.
"याचा अर्थ मी गाडी चालवत असताना तू तो काढून घेतलास?"आश्चर्यचलित होत मी विचारले. आपल्या उंदरासारख्या डोळ्याने माझ्याकडे पहात तो नुसता हसला आणि त्यातच त्याचा होकार दडला होता.
"शक्यच नाही ते" मी अगदी ओरडलोच,"त्यासाठी पट्ट्याचे बकल सोडवून तो पॅन्टच्या सात लूप्समधूब ओढून काढावा लागतो इतके सगळे करताना मला निश्चितच दिसले असते. आणि निदान मला जाणीव तरी झाली असती."
"पण तुला समजले नाही खरे ना?" विजयी मुद्रेने तो म्हणाला.पट्टा मांडीवर तसाच पडू देत त्याने एकदम बुटाचे बंद आपल्या बोटातून हलवायला सुरवात केली,
"आणि मग याचे काय?" तो विचारू लागला.
"कशाचे काय ?" मी गोंधळून विचारले
"इथं कोणाचे बुटाचे बंद हरवले आहेत ?" मी माझ्या बुटाकडे नजर टाकली आणि पाहिले तर खरच माझ्या बुटांचे बंद गायब झालेले होते.
"कमाल झाली कसे काय जमले बुवा हे तुला? मी तर तुला खाली वाकतानाही पाहिले नाही."
"खर आहे तू तर मला एक इंचभरही हाललेले पाहिले नाहीस. आणि का माहीत आहे ?"
"होय"मी उत्तर दिले "कारण तुला ती जादू करणारी बोटे दिली आहेत,काय बरोबर ना ?"   
"अगदी बरोबर "तो चित्कारला."फारच लवकर समजते बुवा तुला सगळे"
आपण बनवलेल्या सिगरेटचा झुरका घेऊन धुराचा भपकारा समोरच्या काचेवर सोडत तो म्हणाला.त्याच्या या दोन करामतींमुळे मी चांगलाच भारावून गेलो आहे हे समजून तो एकदम खुषीत आला होता.आणि पुढे होत म्हणाला,
"चल लवकर उशीर होतोय मला. किती वाजले?".
"घड्याळ तुझ्यासमोरच आहे की " गाडीच्या समोरच्या भागातील घड्याळाकडे बोट दाखवत मी म्हटले.
"गाडीतल्या घड्याळावर माझा विश्वास नाही , तुझ्या घड्याळात किती वाजले बघून सांग"
शर्टाची बाही वर करत मी पाहिले आणि तेथे घड्याळाचा पत्ता नव्हता.
"तेही तू घेतलेस वाटतं " आता मला काही सांगायची आवश्यकता नव्हती.
     त्याने आपला हात वर करून मूठ उघडली आणि त्याच्या उघड्य़ा तळव्यावर मझे घड्याळ होते.
"मस्त घड्याळ आहे,उत्तम दर्जा.अठरा कॅरट गोल्ड.विकायला गेलो तर सहज खपेल आणखी चांगल्या किमतीला.
"तुझी हरकत नसेल तर ते मला परत देशील?" मी चाचरत विचारले
ते घड्याळ समोरच्या ट्रेमध्ये त्याने ठेवले.
"मित्रा, तुझी एकही वस्तू मी घेणार नाही.तू तर माझा जानी दोस्त आहेस आणि मला तूच गाडीत लिफ्ट दिली आहेस."
"धन्यवाद,आनंद झाला हे ऐकून" मी म्हणालो.
"आता तू जो प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतो आहेस त्याचे उत्तर तुला मिळाले असेल.मी जगण्यासाठी काय करतो याचे उत्तर हवे होते ना तुला त्याचेच प्रात्यक्षिक दाखवत होतो मी तुला."
"आणखी काय काय गोष्टी लुटल्या आहेस माझ्या?"
तो हसला आणि आपल्या पाकिताच्या खिश्यातून त्याने एक एक वस्तू काढायला सुरवात केली.त्यात होते माझे ड्रायव्हिंग लायसेन्स,माझ्या चार किल्ल्यांचा जुडगा,काही पौंडाच्या नोटा,काही सुटी नाणी,माझ्या प्रकाशकाचे पत्र,माझी डायरी,पेन्सिलीचा एक तुकडा,सिगरेट लायटर,आणि सगळ्यात शेवटी एक अतिशय सुंदर व मौल्यवान अशी माझ्या बायकोची हिऱ्याची अंगठी.त्यात जडवलेला एक हिरा पडल्यामुळे सोनाराकडे मी तो बसवून घेण्यासाठी बरोबर घेतली होती.
" हा फारच पुरातन मौल्यवान ऐवज आहे, माझ्या अंदाजानुसार अठराव्या शतकातील तिसऱ्या किंग जॉर्जच्या काळातील असावा" आंगठी बोटांमध्ये धरून फिरवत तो म्हणाला.
"अगदी बरोबर" मी प्रभावित होऊन म्हणालो."अगदी बरोबर ओळखलेस" इतर वस्तूंबरोबरच त्याने ती आंगठीही समोरच्या ट्रेमध्ये ठेवली
"अच्छा तर एकूण तू पाकिटमार आहेस तर"
"हा जो शब्द तू वापलास ना तो अगदी अयोग्य वाटतो मला.पाकिटमार हे अगदी फालतू किरकोळ वस्तू उचलत असतात.एकाद्या म्हातारीची पर्स वगैरे.मी तसला नाही"
"मग तुला काय म्हणावे अशी तुझी कल्पना आहे ?"
"मी स्वत:ला फिंगरस्मिथ म्हणवतो अगदी तज्ञ फिंगरस्मिथ "
त्याने अश्या थाटात फिंगरस्मिथ हे शब्द उच्चारले की जणु तो रॉयल कॉलेज ऑफ सर्जरीचा प्राचार्य किंवा आर्चबिशप ऑफ कॅन्टरबरी असावा "
"हा शब्द मी कधीच ऐकला नाही "मी म्हणालो,"तूच शोधला असशील ना?’
"मी शोधला असेच म्हणता येणार नाही मी बोटे वापरण्यातील तज्ञ आहे.सोने किंवा चांदी यातील कुशल कलाकाराला तुम्ही गोल्डस्मिथ किवा सिल्व्हर स्मिथ म्हणता ना तसा मी फिंगरस्मिथ"
"फारच मजेशीर उद्योग " मी म्हणालो.
"फारच "स्वत:वरच खूष होत तो म्हणाला..
"आणि त्यासाठीच तू अश्वशर्यतींना जातोस तर ~"
"अगदी बरोबर,शर्यतींत हा उद्योग करणे म्हणजे माझ्या हातचा मळच आहे.शर्यतीत  कोण जिंकतो एवढेच पाहून ठेवायचे आणि जिंकलेली रक्कम घ्यायला ती व्यक्ती केव्हां जाते यावर लक्ष ठेवायचे.बस्स आपले काम झालेच म्हणून समज.पण त्यातही आपला नियम आहे,हरणाऱ्याला किंवा गरीब माणसांना आपण कधीच हात लावत नाही "
"त्याबद्दाल तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे. "मी जरा उपहासानेच म्हटले
"पण कधीतरी पकडला जातच असशील ना तू ?"
" छोड दे यार पकडले जातात ते साधे पाकीटमार, माझ्यासारखा फिंगरस्मिथ पकडला जाणे ही कल्पना तरी कशी करू शकतोस तू ? मी एकाद्याच्या दाताची कवळीसुद्धा त्याला न कळत लांबवू शकतो."  
"सुदैवाने माझे सगळे दात शाबूत आहेत" मी उद्गारलो.
"हो तेही मला माहीत आहे,नाहीतर तेही मी केव्हांच काढून घेतले असते "त्याच्यावर विश्वास ठेवणे आता भागच होते, त्याची ती लांबसडक कलाकार बोटे काहीही करू शकतील याची खात्री मला पटली होती.
   बराच वेळ आमचा प्रवास एक अवाक्षरही न बोलता झाला.
" पण तो पोलिसदादा आता तुझी सगळी अंडीपिल्ली बाहेर काढेल सावध रहा."मी त्याला सावध करण्याच्या उद्देशाने म्हणालो.
"काय बिशाद आहे कुणाची मला हात तरी लावयाची" नेहमीच्याच आत्मविश्वासाने तो उद्गारला.
" असे समजू नकोस आता तुझी सगळी कुंडली त्याच्याकडे आहे.त्याच्या काळ्या डायरीत सगळी नोंद आहे."
आपल्या उंदरासारख्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात उंदीरमुखी हास्य करत तो उद्गारला,
"हो त्याबे माझी माहिती उतरून घेतलीय खरी पण ती अगदी पाठ असायला त्याची स्मरणशक्ती इतकी तीव्र असेल असे वाटत नाही.या पोलिसांना कधी कधी स्वत:चे नावसुद्धा आठवत नाही "
"अरे बाबा पण ते त्याने लिहून घेतले आहे माहीत नाही का?"
"मित्रा ते खरे आहे पण आता त्याच्या त्या वह्या केव्हांच गायब झाल्या आहेत."आपल्या त्या लांबसडक कलाकार 
बोटात विजयी मुद्रेने त्या पोलिसाच्या खिश्यातून लंपास केलेल्या त्या दोन्ही वह्या नाचवत तो म्हणाला.
"माझ्या दृष्टीने हा तर अगदी डाव्या हाताचा खेळ "
माझी गाडी समोरच्या दुधाच्या ट्रकवर आपटण्याचे मोठ्या शिकस्तीने मी वाचवले इतका मी ते पाहून उत्तेजित झालो होतो.
"त्या पोलिसाकडे आता आपल्या दोघांविषयी एक अक्षरही नाही.
"भलताच हुशार आहेस बाबा तू"
" जरा पुढे जाऊन गाडी हायवेपासून बाजूला घेऊन थांबव,म्हणजे खाली उतरून या दोन्ही वह्या जाळून टाकता येतील"     
"तू म्हणजे एक भलताच अचाट माणूस आहेस "
" धन्यवाद ! कलेची अशी कदर झाली म्हणजे खूप बरे वाटते." तो उत्तरला.