ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - पुस्तकातील पुस्तक

कविता महाजन यांचे ठकी आणि....हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. मराठीतील प्रवाह बदलेली आणि धाडसी कादंबरी - तीही एका लेखिकेने लिहीलेली असे नुसते तिचे वर्णन करुन तिला न्याय दिल्या सारखे आणि तिची दखल घेतल्या सारखे होणार नाही म्हणून ही सविस्तर समीक्षा.
खरे तर ह्या पुस्तकाचा दोन- तीन अंगांनी विचार करायला हवा. एक म्हणजे, तिचा फॉर्मॅट अथवा आकृती बंध. ही नक्की एक कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे की निवेदनात्मक काल्पनिका आहे याच भोवर्‍यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे काम पहिली शंभर-दिडशे पानं करते. दुसरे म्हणजे तिचा गाभा किंवा कथासूत्र आणि तिसरे म्हणजे लेखिकेची खिळवून ठेवणारी कथनाची हातोटी व पकड!
या कादंबरीची (सोयी साठी म्हणूया  कादंबरी !) नायिका- पद्मजा सप्रे- एक गाजलेली चरित्र अभिनेत्री . तिने प्रामुख्याने आईच्या भूमिका केलेल्या आहेत. पण तिचे व्यक्तिमत्त्व तिने केलेल्या भूमिकांच्या विरुद्ध आहे...म्हणजे सोज्वळ- सात्विक असे मुळीच नाही. ती एक धडाडीचे निर्णय घेणारी, मदिरा आणि (मदिराक्ष?) यांत बुडालेली स्वैरिणी आहे. तिच्या व्यक्तित्वाचे, तिच्या आजूबाजूला वावरणार्‍या माणसांचे आणि घटनांचे वर्णन आणि परिचय करुन देण्यातच पहिली दिडेकशे पाने संपतात. त्या भागाच्या शेवटी ती आत्मचरित्र लिहीण्याचा निर्णय घेते..व पुस्तकातच एक स्वतंत्र आत्मचरित्र  ’कळसूत्र’ नावाचे पुस्तक (मुखपृष्ठ- मलपृष्ठा सहित  एंबेडेड!) सुरु होते.    
त्यात पुन्हा तिचे लहानपण, आईचा अबोल, स्वार्थी स्वभाव व बाहेरख्याली वृत्ती व त्यामुळे हिच्यावर (न) घडलेले संस्कार याचे (पुनरुक्त) वर्णन येते. लहानपणची गरीबी, वडिलांच्या मृत्यूनांतर झालेले हाल, आईबद्दल तिला वाटणारा राग व द्वेष, तिचे मित्र - प्रियकर, तिच्या मोलकरणी, अभिनेत्रींमधील स्पर्धा- हेवेदावे, तिची असफल लग्ने, नाटक- सिनेमाचे अधांतरी विश्व, तिने बापाशिवाय मुलीला - अनाहिताला- जन्म देण्याचा घेतलेला निर्णय , दारु व पैसा, तिचे घारे हिरवे डोळे व असामान्य रुप - त्यामुळे मिळालेले बरे वाईट अनुभव....यांचा धांडोळा घेत आत्मचरित्र संपते....
नंतर तिसरा भाग सुरु होतो- आत्मचरित्रा नंतर.-
हे थोडेसे एपिलॉग सारखे -  म्हणता येईल. त्यात तिच्या घसरत्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडलेला आहे. शिकून वकील झालेली अनाहिता- तिचे दिल्लीला जाणे- पद्मजाचे एकाकीपण, कुणी सरदेशमुख नावाच्या उद्योगपतीचा....आधी आत्मचरित्रात न आलेला उल्लेख-  - तिने त्यांचा उल्लेख पुस्तकात केला असेल की काय या भीतीने   अगदी हार्ट ॲटॅक येईपर्यंत- व्यथित झालेला सरदेशमुख...
लेखिकेला तिचे प्रियकर कमी वाटले की काय नकळे, पण पुन्हा दोन तीन पात्रं आणली आहेत. डॉ. अरविंद - चांगला प्रथितयश, उच्चभ्रू डॉक्टर, घरदार- बायको असणारा..... हिच्या प्रेमात आकंठ - पण जपून जपून वागणारा......... तिला सत्तर लाखाची गुलाबाच्या आकाराची पर्स देणारा श्रीमंत  डॉकटर..आणि स्त्रियांना असं गोडी गुलाबीने, भावनिक आवाहन करुनच वश करावं लागतं अशी त्याची कारणीमिमांसा देणारा...डॉ. अरविंद   ...त्याची बायको ललीता...साधी , घरेलू, सेवाभावी!
तिला मदत करण्यास सदैव तत्पर असणारा दिग्विजय, अर्णव....आणि असे बरेच....
मग तिची झालेली विकलांग अवस्था, अल्झायमर ने स्मृतीभ्रंश झालेली पद्मजा, तिचे शून्य- संदर्भरहित विश्व, डॉ गायत्रीची लाभलेली साथ....ओसरलेले सौंदर्य व दुरावलेले चाहते.....
अशा वाटा वळणांनी कादंबरी अचानक एका अनपेक्षित , धक्कादायक वळणावर येऊन ठाकते.
वाचकाने कल्पनाही केली नसेल असे सत्य  सामोरं येतं. आपला कादंबरीचा वाचनाचा ॲगलच बदलून जातो. आधी बिनधास्त वाटणारी पद्मजा एकदम एकाकी , बिचारी होऊन जाते. पुन्हा पहिल्या पासून पुस्तक वाचून निसटलेले दुवे ह्या नवीन दृष्टिकोनातून तपासावेसे वाटतात. किंबहुना पुन्हा पुस्तक वाचून एका नव्या दृष्टीने तिच्या आयुष्यातील घटनांची आपण संगती लावतो...हे ह्या कादंबरीचे फार मोठे यश आहे असे मला वाटते.    
ते सांगून रसभंग करण्याचा मानस नाही.
या सगळ्या चढ उतारांत, नायिकेला कुठेही उदात्तता देण्याचा आणि ’करेक्ट’ ठरविण्याचा अट्टाहास दिसत नाही हे मात्र निश्चित उल्लेखनीय आहे. पण या प्रकारच्या कल्पनिका-कादंबरीला आवश्यक असणारी सलग, प्रवाही भाषाशैली, शारीर गोष्टींची धाडसी  मांडणी व सहज उल्लेख, एका नटीच्या जीवन चरित्रात अपरिहार्य असणारी अनैतिकता- तिचे केलेले संयत पण परिणाम साधेल व वातावरणनिर्मीती होईल असे वर्णन -  हे या पुस्तकाचे प्लस पॉईंट्स. 
तसेच ह्या विषयाचा आवाका पेलणारी लेखिकेची पुस्तकावरील एक अदृश्य मजबूत पकड मात्र जागोजागी जाणवत राहते; जी विषयाला आणि कथावस्तूला इकडेतिकडे फटकू देत नाही. यामुळे कादंबरी मोठी असूनही तिच्यात एकजिनसी बांधीवपणा आलेला आहे. 
एक वेगळा प्रयत्न आणि पारंपारीक कल्पनांना छेद देत एका लेखिकेने धीटपणे मांडलेला एका अभिनेत्रीच्या आयुष्याचा प्रवास व तिच्या समांतर जीवनकथेची न लागणारी संगती अनुभवण्या साठी  म्हणून हे पुस्तक वाचायला हवे. 
थोडेसे नावाबद्दल : तर ठकी म्हणाजे कळसूत्री बाहुली. नाचवाल तशी नाचणारी. पुरुषोत्तम हे तिच्या लाडक्या मांजराचे नाव ! 'मर्यादित' चा अन्वयार्थ लागू शकला नाही. पण नियतीच्या ह्या खेळात तिला मांजराच्या रुपाने मिळणारा "मर्यादित" आनंद व दिलासा असे काही अभिप्रेत असावे.