नमस्कार, गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात फ्लोरिडा ट्रीपला गेलो होतो. डिसेंबर महिन्यातही ओरलँडो शहराचे तापमान ८०-८५ फॅ असल्यामुळे आम्हा मिनेसोटाकराना चांगलेच वार्म वाटत होते!! (डिसेंबर महिन्यातील दोन्ही ठिकाणांतला तापमानातील फरक जवळजवळ ५० अंश फॅ :-) ) , तर असो. दोन- तीन दिवस सी वर्ल्ड, ओरलँडो आय, मॅडम तुसॉड्स म्युझियम इत्यादी गोष्टी केल्यावर जवळच्या क्लिअरवॉटर बीचला भेट द्यावी असे ठरले.क्लिअरवॉटर बीच ओरलँडोपासून पश्चिमेला गाडीने दोन तासांच्या अंतरावर आहे. तसेच टॅम्पा शहरा पासून सुमारे १७ मैल अंतरावर आहे. फ्लोरिडातील प्रसिद्ध बीचेस पैकी हा एक बीच आहे. फ्लोरिडाच्या पश्चिम किनार्यावर असल्याने तिथला सूर्यास्त पाहावा असा बेत ठरला. त्याप्रमाणे साधारणपणे दुपारी अडीचच्या सुमारास ओरलँडोहून निघालो कारण हिवाळ्यात सूर्यास्त संध्याकाळी ५:३० ला होतो. वाटेत टँम्पा सोडल्यावर एका ठिकाणी कॉफी ब्रेक घेतला. आता गाडी खाडीवरील पुलावरून जाऊ लागली. पुलावरुन जाताना खूपच मज्जा आली कारण दोन्ही बाजूना निळेशार पाणी दिसत होते.




पाण्यात पाय बुडवून आलो तर पाणी चांगलेच थंड होते. मात्र थोड्या वेळ पाण्यात थांबल्यास फारसे काही वाटत नव्हते. त्यामुळे जरा पाण्यात पाय घालून निवांत फिरू लागलो. थोड्या वेळाने सूर्य अस्तास जाऊ लागला. काय सुंदर दृश्य होते म्हणून वर्णावे :-). समुद्राचे पाणी केशरी लाल रंगाने चमकत होते. चालणे थांबवून सूर्य अस्त बघू लागलो. भरपूर फोटो काढले.
आता पियरच्या दिशेने चालू लागलो. मस्त संधी प्रकाश पसरला होता. लहान मुलांना खेळायला विविध आकर्षणे होती. पियरवर जायला १ डॉलर तिकीट होते. ते काढले मात्र प्रत्यक्षात हातात तिकीट असे काही दिलेच नाही. पियरच्या बाजूला बरीच गर्दी होती. तरी पियरच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलो. नजारा खूपच सुंदर दिसत होतो. तिथेही बरेच फोटो काढले.

या किनार्यावरच्या इमारती म्हणजे तिथली हॉटेल्स.
पियरच्या टोकाला पोचल्यावर डावीकडचा हा कोपरा.
पुन्हा परत येऊन इथे किमान दोन दिवस राहावे आणि बीचवर निवांत वेळा घालवावा असे ठरवून परतीच्या मार्गावर लागलो.