चिंता करी जो विश्वाची ... (२६)

श्री रामदासस्वामींनी ज्ञानदानाचा यज्ञ मांडला होता. ज्ञानोपासनांचे श्रेष्ठत्व ते जनमानसात चित्रित करीत होते. ज्ञान हे सुख-समाधान मिळविण्याचे साधन आहे. तसेच मुक्तीमार्गावरची वाटचाल करण्यास देखिल ज्ञानाची आवश्यकता आहे. अज्ञानी आणि अडाणी मनुष्यास संकटांवर आणि अडचणींवर मात करणे शक्य होत नाही. म्हणून प्रत्येकाने, आपल्या कुवतीनुसार ज्ञानसाधना करणे जरूरीचे आहे असे समर्थ त्यांच्या शिष्यांना आणि श्रोत्यांना सांगत असत. 

समर्थांची श्रीरामभक्ती तर सर्वज्ञात होतीच. कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांती परमेश्वर आपल्याला इच्छित फल नक्कीच प्रदान करेल असा त्यांचा दृढ विश्वास होता. ज्ञानोपासनेबरोबरच श्रद्धा आणि भक्तीचेही महत्त्व ते विशद करीत असत. 
हरिनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहू तारिले मानवदेहधारी ।।
तया रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ 
असा भक्तीचा महिमा समर्थांनी  वर्णन केला आहे. ज्याच्या मनी ईश्वरभक्ती वसते, त्याच्या ठायी दुर्गुण, दुराचार कधीच असू शकत नाहीत. सज्जन, सत्शील, आणि सात्त्विक मनुष्यास ज्ञानसाधना करणे अधिक सुलभ होते असे त्यांनी सांगितले होते. 
गुरू, शिष्य, ज्ञान, ज्ञानसाधना इ. ची चर्चा समर्थांनी या पूर्वी केली आहे. आता साधक, सिद्ध म्हणजे कोण? त्यांची लक्षणे कोणती या विषयी त्यांनी दासबोधामध्ये विवेचन केले आहे. ते म्हणतात, या विश्वात अनेक प्रकारांची माणसे आढळतात. परंतु ती सर्व चार मुख्य गटात विभागली जाऊ शकतील. 
सृष्टी जे का चराचर । जीव दाटले अपार ।
परी ते अवघे चत्वार । बोलिजेती ॥ 
ऐक तयांचे लक्षण । चत्वार ते कोण कोण ।
बद्ध मुमुक्ष साधक जाण । चौथा सिद्ध ॥ 
समर्थ सांगतात, या चाराआगळा मनुष्य प्रकार तुम्हाला या पृथ्वीतलावर सापडणार नाही. काही कुठल्यातरी बंधनात अखंड जखडलेले असतात, काही कुमार्गाचे यात्री असतात, काही सद्गुणी आणि परिश्रमी तर काही ज्ञानी असतात. समर्थांनी त्यांच्या "दासबोध" या ग्रंथात, या सर्वांची लक्षणे सविस्तर  वर्णीली आहेत. 
काही लोक स्वतःच स्वतःवर घालून घेतलेल्या बंधनात बद्ध असतात. आपली समज म्हणजेच ब्रह्मवाक्य अशी त्यांची धारणा असते. माझ्याहून कुणीही अधिक श्रेष्ठ, अधिक शहाणा असूच शकत नाही असा त्यांना विश्वास असतो. स्वतःच्या बुद्धीची, कुशलतेची आणि पात्रतेची त्यांना घमेंड असते. इतरांकडून अधिक ज्ञान, अधिक माहिती मिळविण्याची त्यांना गरजच वाटत नाही, कारण ते स्वतःला परिपूर्ण समजतात. त्यांच्या या दुराभिमानापायी अंततः ते स्वतःचेच नुकसान करून घेतात. 
आता बद्ध तो जाणिजे ऐसा । अंधारीचा अंध जैसा ।
चक्षुविण दाही दिशा । सुन्याकार ॥
भक्त ज्ञाते तापसी । योगी वीतरागी संन्यासी ।
पुढे देखतां दृष्टीसी । येणार नाही ॥ 
स्वतःविषयीच्या गर्वात जे बद्ध असतात, अथवा जे विचाराने अत्यंत एकांगी, एककल्ली असतात अशांना दुसऱ्याचे गुण दिसतच नाहीत. किंवा जाणून देखील ते अजाणपणाचा आव आणून तिकडे दुर्लक्ष करतात. स्वधर्म, सदाचार, सन्मार्ग, सत्संग या सर्वांची त्यांच्या लेखी काहीच किंमत नसते. याचे कारण त्यांचा "मी" पणा. मी करीन तेच योग्यं, इतरांनी मला काही सांगू नये, इतकेच नाही तर मी सांगेन तेच प्रमाण मानावे,  असा ताठा. अशांना त्यांच्या अज्ञानाचीही जाणीव नसते. इतरांसाठी आपण काही करावे असेही त्यांना वाटत नसते. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, अशा समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे हे त्यांच्या बद्ध झालेल्या बुद्धीला समजत नसते. 
न कळे सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार ।
न कळे कैसा परोपकार । दान पुण्य ॥
नाही पोटी भूतदया । नाही सूचिष्मंत काया ।
नाही जनासी निववाया । वचन मृद ॥ 
अशा जनांना, देव, धर्म, संत, विवेक, अध्यात्म, परमार्थ या पैकी कशाविषयीच आदर, आत्मीयता नसते. त्यांचे सर्व  विचार आणि आचार फक्त "स्व" भोवती रिंगण घालत असतात. मनुष्य जन्माचे साध्य, साधनेचे फलित, तत्त्वज्ञान, शास्त्रार्थ या पैकी कशाचे त्यांना महत्त्व नसते. 
जयासी नाही आत्मज्ञान । हे मुख्य बद्धाचे लक्षण ।
तीर्थ व्रत दान पुण्य । काहीच नाही ॥
दया नाही करूणा नाही । आर्जव नाही मित्री नाही । 
शांती नाही क्षमा नाही । या नाव बद्ध ॥ 
आशा असंख्य दुर्गुणांनी हे लोक बद्ध असतात. त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या परिजनांची प्रगती खुंटते. समाजाच्या होत असणाऱ्या निरंतर प्रगतीची आणि समृद्धीची फळे त्यांच्या पदरी पडत नाहीत. पण त्यांना त्याची जराही पर्वा नसते. किंबहुना त्यांना हे मान्यच नसते की त्यांच्या सद्य स्थितीला तेच जबाबदार आहेत. असे लोक मत्सरग्रस्त असतात. इतरांचे सुख त्यांना सोसत नाही. म्हणून ते इतरांविषयी जनलोकांमध्ये वाईटसाईट बोलणे, दुसऱ्यांना दुर्वचने देणे, त्यांच्याशी दुर्व्यवहार करणे अशाप्रकारचे वर्तन करू लागतात. अशी माणसे समाजात अशांतता निर्माण करतात, समाजासाठी ती घातक असतात. 
बहु  काम हु क्रोध । हु गर्व  हु मद ।
हु द्वंद्व  हु खेद ।  या नाव बद्ध ॥
हु दर्प  हु दंभ ।  हु विषये  हु लोभ ।
बहु कर्कश हु अशुभ । या नाव बद्ध ॥
हु ग्रामणी (बळाचा वापर करून त्रास देणारा )  हु मत्सर ।
हु असूया तिरस्कार ।  
हु पापी  हु विकार ।  या नाव बद्ध ॥

असे दुर्वर्तनी लोक, स्वतःच्याच अवगुणात बद्ध असतात. वागण्या-बोलण्याच्या विवेकाचे त्यांना भान नसते. ऋजुता, आदरभाव, सहानुभूती इ, गुणांचे त्यांना वावडे असते. असे लोक कपट कारस्थाने करण्यात मग्न असतात. कारण आपल्याहून कुणी दुसरा वरचढ होतो आहे, ही कल्पनादेखील त्यांना सहन होत नाही. स्वगुण आणि स्वकर्तृत्वावर जर मोठेपणा मिळत नसेल, तर इतरांचे पाय खेचायला ते मागेपुढे पाहत नाहीत. असे करणे गैर आहे, असेही त्यांना वाटत नाही. 

बहु निष्ठुर हु घातकी । हु हत्यारा  हु पातकी ।
तापीळ कुविद्या अनेकी । या नाव बद्ध ॥
हु दुराशा हु स्वार्थी ।  हु कळह हु अनर्थी । 
बहु डाईक (दावा साधणारा ) दुर्मती । या नाव बद्ध ॥
असे दुर्गुणांनी बद्ध असलेले लोक लोभी असतात. स्वतःच्या आणि आप्तस्वकीयांच्या उन्नतीसाठी ते दुसऱ्याचे नुकसानही करू शकतात. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढविण्यात ते त्यांची बुद्धी खर्ची घालतात. अशा लोकांना परमार्थ, दया , सेवा इत्यादी गुण नकोसे असतात. स्वतःच्या प्रपंचाखेरीज अन्य कसलाही विचार त्यांना सुचत नाही. 
सत्संगाची नाही गोडी । संतनिंदेची आवडी ।
देहेबुद्धीची घातली बेडी । या नाव बद्ध ॥
हाती द्र्व्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ ।
सत्संगाचा दुष्काळ । या नाव बद्ध ।।
स्वतःच्या देह आणि बुद्धीला स्वार्थाच्या बेडीत बद्ध केलेले लोक समाजाभिमुख देखिल नसतात. ते आणि त्यांचे कुटुंबीय हेच त्यांचे विश्व असते. पत्नीच्या अथवा अन्य कुणा स्त्री च्या संगतीत कालक्रमण करणे त्यांना अपरंपार सुखाचे वाटते. संत, सज्जन, ज्ञानी आणि कर्तृत्ववान जनाचा सहवास त्यांना नकोसा वाटतो. पत्नीच्या अथवा प्रिय स्त्रीच्या/व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे त्याचे वागणे, वावरणे असते. त्यांच्या सुखासाठी त्यांना आनंदी ठेवण्यासाठी असे लोक, ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तीचा देखिल अधिक्षेप करतात. अशाप्रकारे सुखोपभोगात बद्ध असलेले लोक गृहस्थधर्माचे देखिल पालन करीत नाहीत.
घटिका पळ निमिष्यभरी । दुश्चित नव्हता अंतरी ।
सर्वकाळ ध्यान करी । द्रव्यदाराप्रपंचाचे ॥
तीर्थ यात्रा दान पुण्य । भक्ती कथा निरूपण ।
मंत्र पुजा जप ध्यान । सर्वही  द्रव्य दारा ॥ 
सुखोपभोग, प्रपंच आणि द्रव्यसंचय याच कर्माने बद्ध झालेले लोक सदा सुख-दुःखाच्या आवर्तात फिरत राहतात. त्यातून त्यांची कधीच सुटका होत नाही. त्यावेगळा  विचार त्यांच्या बुद्धीस स्पर्श करत नाही. क्षुद्र स्वार्थाच्या मागे लागून ते शाश्वत सुख आणि समाधानाकडे पाठ फिरवितात. त्यांच्या मनात नेहमीच अशांती घर करून राहते. कारण अनेक वस्तू, विषयांचा हव्यास त्यांना सोडवत नसतो. दुसऱ्याच्या प्रगतीचे, उन्नतीचे त्यांना कौतुक वाटत नाही. त्याविपरीत ते मनात सतत द्वेष, मत्सर आणि कपट बाळगून राहतात. त्यांमुळे त्यांच्या मनात सतत अपूर्णतेची भावना जागृत असते. 
अशा लोकांना समर्थ उपदेश करतात. द्वव्य, स्त्रिया, आप्तं, उपभोगाची साधने तुम्हाला काही काळासाठी सुख देतील, परंतु ते क्षणभंगुर आहे. कायम टिकणारे नाही. कपट, लबाडी करून मिळवलेले यश, लोकप्रियता सर्वकाळ आनंददायी नसेल, कारण अंतर्यामी त्यामागचे सत्य तुम्हाला जाचत राहील. तुम्हाला कायमस्वरूपी मनःशांती आणि समाधान प्राप्तं करायचे असेल, तर या गुंत्यातून मोकळे व्हायला पाहिजे. प्रपंचा बरोबरच संत, सज्जन आणि धर्माचा देखिल विचार असायला हवा. स्वार्थ आणि परमार्थाचे संतुलन साधले पाहिजे. दुसऱ्यंविषयी आदरभाव आणि शिष्यत्व पत्करण्याची तयारी असायला हवी . स्वतःचा कमीपणा, चुका कबूल करण्याचे धैर्य अंगी असायला हवे. असे केल्यानेच शाश्वत शांतीचा लाभ होईल. 
अहंतागुणे नीती सांडी विवेकी । अनीतीबळे श्लाघ्यता ( मानसन्मान) सर्व लोकी ॥
परी अंतरी सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते ॥
बरा निश्चयो शाश्वताचा करावा । म्हणे दास संदेह तो विसरावा ।।
घडीने घडी सार्थकाची करावी ( मिळालेला प्रत्येक क्षण कारणी लावावा )। 
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ 
(क्रमशः)
संदर्भ :   (१) श्री मनाचे श्लोक 
              (२) श्री ग्रंथराज दासबोध