रहाट

*रहाट*
दुःखाच्या सुकल्या डागण्या
झेलते भूमी काळीज फाटल्यावर
गिधाडेच दिसती आनंदी 
प्रत्येक डोह सुकल्यावर
बेचव पहाट घसरे 
निसरड्या कासऱ्यावर
लगबग बायाबापड्यांची
माळरानीच्या आडावर
आशेने झुकती नजरा
खोलवरच्या झऱ्यावर
सरासर घसरती घागरी
टिपण्या पाणी थेंबभर
केविलवाणे करकरणे रहाटांचे
वेदना असह्य झाल्यावर
पाणी पाणी पाणी
चित्कार हृदयाचे, 
चक्र डचमळणाऱ्या जीवनाचे
आणि अचानक त्या वेळी
पाऊस चिळकांडे विझल्या झाडांवर
पाझरती सुखाच्या लहरी
वाहती उसळत भू कायेवर
*अनिल रत्नाकर*