तुला पाहिले मी नदीच्या किनारी

ग्रेसच्या कविता अत्यंत गूढ तरीही मनाला मोहवणाऱ्या असतात. केवळ दुर्बोध म्हणून ग्रेसची कविता कितीही नाकारली तरी मन पुन्हा पुन्हा तिचा अर्थ शोधायचा प्रयत्न करत राहतं. कारण सगळीच कविता एकतर दुर्बोध नसते, तिच्यातल्या काही ओळी नाही म्हटलं तरी मनाला भिडतातच आणि ग्रेसचे शब्द ज्या रंगांची आणि रूपकांची उधळण करतात ते शब्द आपणही अनुभवावे अशी ओढ हरेक संवेदनाशील मनाला हमखास लागते. ग्रेसचे शब्द नादमय तर आहेतच, ते लयीशी कमालीची एकरूपता साधतात आणि ग्रेसनी स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी जणू स्वतःची स्वतंत्र भाषानिर्मिती केल्याप्रमाणे ते त्याच्या अनुभवाचा दिलखुलास पसारा मांडतात. ग्रेसच्या अशाच एका उत्कट अभिव्यक्तीला दाद देण्याचा आणि त्याच्या अनुभवविश्वाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

(हे गाणं श्रीधर फडक्यांनी स्वरबद्ध केलंय आणि सुरेश वाडकरांनी गायलंय.   ते इथे ऐकता येईल  गाणं ऐकताना रसग्रहण वाचत गेलात तर त्याची मजा काही औरच येईल.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे,

पहिल्या दोन ओळीतच ग्रेस अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात मनाचा ठाव घेतो आणि पुढे काय घडेल याची ओढ लावतो. पण पुढच्या दोन ओळी ग्रेसचा व्यक्तिगत अनुभव आहे :

इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे!

नदीकिनारी असलेल्या ग्रेसच्या वनराईतले रंग नुसते दृश्य नाहीत तर ते अंगोपांगी झरत जातात, म्हणून ग्रेस म्हणतो की घनदाट सावल्या देणाऱ्या या वृक्षांचे रंग बरसतात आणि ते तिच्या सावळ्या रंगाला आणखी गूढ करत जातात!

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली,

शब्दांनी एक गूढ आणि रम्य माहौल निर्माण करण्यात ग्रेस केवळ माहीर आहे. प्रेयसीचं चालणं इतकं अलगद आहे की या धुक्याच्या महालात तिच्या येण्याची किंवा वावरण्याची जरा सुद्धा चाहूल लागत नाही. ती त्या स्वप्नवत जगाला जरासुद्धा धक्का लावत नाही.

निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन तुला सावली

आकाशाचा निळारंग हा दृष्टीविभ्रम मानला गेलाय कारण खरं तर आकाश अशी काही चीजच नाही, एक सर्वव्यापी अथांग स्पेस आहे. तरीही कवीमनाला रंगांची भूल आहेच म्हणून ग्रेस म्हणतो की 'निळागर्द भासे नभाचा किनारा'. पण या अथांगतेत देह केवळ कालबद्धतेत प्रकटलेल्या प्रतिमा आहेत, त्यामुळे अशा उत्कट अनिश्चिततेत कुणाचाच कुणाला आधार नाही. किंबहुना असा एकमेकांचा आधार शोधणं व्यर्थ आहे. ग्रेस ही स्थिती किती कमालीच्या काव्यात्मकतेनं मांडतो पाहा  'न माझी मला अन तुला सावली'!

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे,

हे कडवं ग्रेसचा संपूर्ण व्यक्तिगत अनुभव आहे. डोंगरात मावळणारा चंद्र कमालीचा आल्हाद निर्माण करतो.   चंद्र हा मनाचा कारक मानला गेलाय, म्हणजे मनाची आंदोलनं सागराच्या भरती आणि ओहोटीसारखी चंद्रकलांनी प्रभावित होतात. ग्रेसनं या मन:स्थितीचं वर्णन किती सुरेख केलंय 'मनावेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे !

पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते?
जसे संचिताचे ऋतू कोवळे

ग्रेसच्या संपूर्ण साहित्यात दुःख वेगवेगळी रूपकं घेऊन येतं. सखीच्या दुःखाची जाणीव, ती समोर असल्यामुळे इतकी प्रत्यक्ष होतेय की जणू ते दुःख झरून कवीच्या मनाप्रत येतंय. पण तिचं दुःख सुद्धा इतकं हलकं आहे की तो तिच्या पूर्वजन्मीच्या संचिताचा भाग आहे, या जन्मीच्या कलहाचा नाही. त्यामुळे ते दुःख कोवळ्या पालवी सारखं आहे आणि मनस्वितेनं  जगतांनाच, उत्कटतेनं भोगण्यासारखं आहे.

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा,

या ओळीत कमालीची काव्यात्मकता आहे. सखी नदीकिनारी नहाते आहे, तिचे केस पाठीवर मोकळे आहेत आणि तिच्या देहाच्या स्पंदनातून ही ओल थरारत जातेय. हा सगळा अनुभवच इतका जीवघेणा आहे की त्याचा उरात उठलेला आकांत ही जणू तिच्या सौंदर्याला दिलेली दाद आहे!

आणि कवितेचा शेवट तर फारच बहारदार आहे. सखी अशा अवेळी नहाते आहे की चंद्र डोंगरात मावळतोय, अजून उजाडलेलं नाही त्यामुळे धुक्याचा गर्द अंमल वातावरण भारून आहे आणि अशा संदिग्ध प्रकाशात तिच्या कंकणाचा चुडा जणू तिमिरातल्या मंद ताऱ्यांप्रमाणे लखाखून जातोय!

तमांतूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा

_ ग्रेस