पन्नाशीत पन्नास किल्ले

वयाची पन्नाशी ओलांडल्यावर एखादा नवीन
उपक्रम हाती घ्यावा असे सारखे वाटत होते. एखादा सायकल प्रवास, पुस्तक
लेखन, समाजकार्य, अशा अनेक पर्यायां वर विचार करताना एक प्रयत्न  म्हणून
पनवेल जवळच्या माथेरान च्या डोंगरावर  रविवारी गेलो. आधी खूप दुर्दम्य
वाटणाऱ्या चढणीवरून घरी परतल्यावर दोन दिवस पाय आणि पाठ खूप दुखत होती, पण
नंतर एकदम सर्व वेदना नाहीश्या झाल्या. पुढच्या रविवारी अलिबाग जवळचा
सागरगड सर केल्यावर मला साहसी उपक्रमाचे नाव सुचले ते "पन्नाशीत पन्नास
किल्ले". वर्षातील ४८ रविवार सुट्टी चे धरून आपण एका वर्षात ५० किल्ले सहज
करू असे धोपट गणित जमल्याने  नवीन हुरूप आला. मग काय, तयारी ला लागलो. ५०
किल्ल्यांची तारीखवार यादी करून भिंतीवर  टांगली, ट्रेकिंग चे साहित्य
जमवू लागलो आणि ठरल्याप्रमाणे किल्ले करीत गेलो. फक्त काही नियम ठरवून
घेतले होते ते म्हणजे फक्त उंच डोंगरावरील किल्ले करायचे, कोणत्याही
किल्ल्यावर एकट्याने जायचे नाही आणि कोणताही नियम मोडायचा नाही.  
सुधागड
किल्ला पाहिल्यावर तेथील महादरवाजा आणि तटबंदी पाहिल्यावर थक्क झालो.
तेथील वस्तू बद्दल कुतूहल जागृत झाले  आणि  ह्या पुढे किल्ले पाहायचे तर
त्याची संपूर्ण माहिती मी  "सांगती " , प्र. के. घाणेकरांची आणि भगवान
चीलेंची पुस्तके  GoogleMaps, Trekshitiz. com वरून घेऊ लागलो.
किल्ल्यावरील पायवाटांची, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, ऐतिहासिक वस्तूंची
नावे, शिलालेखांची माहिती, तिथला इतिहास, गुप्त दरवाजे वगैरेची  माहिती
करून किल्ला पाहणे म्हणजे ओळखीच्या व्यक्तीला बर्याच वर्षानंतर भेटल्या
सारखे वाटू लागले. हे किल्ले पाहण्या साठी जास्त खर्चही येत नसे. बहुसंख्य
किल्ले लोणावळा, जुन्नर, इगतपुरी, कर्जत, सातारा च्या जवळ असल्याने
शनिवारी रात्री प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्या जवळील गाव गाठायचे, पहाटे
गावातील हॉटेल मध्ये मिसळ-पाव किंवा पोहे ढकलून थेट किल्ल्याची वाट धरायची
आणि दुपार पर्यंत किल्ला पाहून रविवारी रात्री परत घरी यायचे, असा
कार्यक्रम आखू लागलो. नेट वर तर तारीखवार किल्ल्यांचे ट्रेक करणाऱ्या
संस्थांची नावे तपशिला सह पाहून ट्रेकची आखणी करू लागलो. मी अनेक अनोळखी
ग्रुप बरोबर ही  ट्रेकिंग केले आहे पण, कुठेही वाईट अनुभव आला नाही. कारण
ह्या ग्रुप्स मधील ट्रेकिंग चे नियम कडक असल्याने टिंगल-टवाळी करणारी आणि
व्यसनी मंडळी ह्या पासून लांबच राहतात. ग्रामीण भागातही ट्रेकिंग करणाऱ्या
मंडळी बाबत आदर आणि कुतूहल असल्याचे आढळले. अनेकांसाठी ते एक रोजगाराचे
नवीन साधन झाले आहे. किल्ल्यांची साफसफाई, जुन्या वस्तूंचा जीर्णोद्धार,
पायवाटांची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या साफ करणे, नाव फलक लावणे सारख्या
अनेक सुधारणा करण्यात पर्यटन, पुरातत्त्व, वनखाते आणि स्थानिक गड संवर्धन
संस्था पुढे आल्या आहेत त्यामुळे किल्ले पाहणे अधिक सोपे आणि आनंददायी झाले
आहे.  
शिवाजी महाराजांनी पावन केलेले सुमारे ३५० किल्ले
महाराष्ट्रा साठी एक अमूल्य ठेवा ठरला आहे. पट्टा गडावरील झोंबणारा थंड
वारा, रतनगडा वरील सोनकीच्या फुलांचे ताटवे, केंजळ गड आणि इंद्राई
किल्ल्यावरील कातळ कोरीव पायऱ्या, साल्हेर-मुल्हेर चे दगडात कोरून
काढलेल्या पायवाटा, कमळगडा वरील ४० फुटी शाडूची विहीर, हरिहर
किल्ल्याच्या उभ्या पायऱ्या, अंकाई-टंकाई किल्ल्यावरील कोरीव शिल्प,
राजगडावरील अरुंद माचीची रचना, अलंग-कुलंग-मदन च्या चढाईतील थरार हे सर्व
किती विलक्षण आहे ह्याचा अनुभव तर प्रत्यक्ष किल्ल्याला भेट दिल्याशिवाय
येणे शक्य नाही.  
माझे वर्षभरात ५० नाहीतर ६४ किल्ले पाहून झाले
पण माझे किल्ले –भ्रमंती अजूनही चालूच आहे. ट्रेकिंग मुळे माझी लहान-सहान
शारीरिक दुखणी कमी तर झाली, डॉक्टर च्या गाठी-भेटीही कमी झाल्या आणि अनेक
ट्रेकर मित्रां बरोबर ट्रेकिंग च्या तारखा ठरू लागल्या आहेत. अजूनही नवीन
किल्ला पाहताना काहीतरी नवीन पाहायला-अनुभवायला मिळतेच. प्रत्येक
किल्ल्याचे स्वरूपही ऋतू प्रमाणे बदलणारे असते. रविवारी घरी कोच वर रेलून 
टी व्ही चे चानेल बदलण्या पेक्षा उंच किल्ल्यावर बसून निसर्गाशी केलेला
संवाद अजूनही मला खुणावत असतो आणि माझे मन नकळत मित्राचे ट्रेकिंग साठी
आलेल्या फोनवर तारीख पक्की करू लागते.