गीतरामायणाचे मूळ गायक

रामनवमीच्या निमित्ताने गीतरामायण ऐकावे असे वाटत होते. आता गीतरामायण म्हणजे सुधीर फडके असे समीकरणच होऊन गेले आहे.  सुधीर फडक्यांनी असंख्य कार्यक्रम करून ते बरेच लोकप्रिय केले हे खरे आहे. पण जेव्हा गीतरामायणाला आकाशवाणीवरून १ एप्रिल १९५५ साली सुरूवात झाली तेव्हा त्यात अनेक गायक गायिकांचा सहभाग होता. पण या गायक गायिकांच्या आवाजातली गाणी आता विस्मृतीत गेली आहेत (आता... असे म्हणायचे पण खरे सांगायचे तर मी ही गाणी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती, एक लताच्या आवाजातल्या "मज सांग लक्ष्मणा" चा अपवाद वगळून) . सुदैवाने यूट्यूबवर १९५५-५६ मध्ये आकाशवाणीवर अनेक गायक गायिकांच्या आवाजात रेकॉर्ड झालेली मूळ गाणी उपलब्ध आहेत. खाली दिलेल्या दुव्यावर सर्व गाण्यांचा आस्वाद घेता येईल.

मला तरी ही गाणी  सुधीर फडक्यांनी गायलेल्या गाण्यांपेक्षा जास्त भावतात. सुधीर फडक्यांच्या आवाजाबद्दल/गायकीबद्दल वाद नाहीच पण स्त्रियांची गाणी गायिकांच्याच आवाजात ऐकायला आवडतात.  बाबूजींनी गायलेले "ज्योती कलश छलके" किंवा "मी तर जाते जत्रेला" या गाण्यांना (अनुक्रमे) लता व आशा यांनी गायलेल्या गाण्यांची सर नाही.