वार्षिंक परीक्षा

मार्च एप्रिल महिना म्हणजे
परीक्षेचा मोसम. आणि या परीक्षांतली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा म्हणजे
वार्षिक परीक्षा. पहिलं आणि दुसरं महायुद्ध म्हणजेच दहावी आणि बारावी यांना
एक स्वतंत्र प्रकरण लागेल त्यामुळे सध्या आपण फक्त या वार्षिक परीक्षे
बद्दल बोलूया.      
  तीनमाही. सहामाही, नऊमाही अशा लुटुपुटूच्या लढाया झाल्यानंतर
प्रत्येकाला आपल्या मर्दुमकीचा चांगलाच अंदाज आलेला असायचा. आणि मग यायची
वार्षिक परीक्षा.
 
         
  कुठल्याही वर्गाचा उभा आडवा किंवा कसाही छेद घेतलात तर त्याचे
तीन घटक दिसून येतील. हे प्रवर्ग या शालेय वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण
होत.  
     
          प्रवर्ग पहिला
हुशार मुलांचा. वैयक्तिक जीवनातील यांची हुशारी हा वादाचा मुद्दा असेलही पण
परीक्षेच्या कसोटीवर मात्र यांचे निर्विवाद वर्चस्व. यांची परीक्षेची तयारी
शाळेच्या पहिल्या दिवसापासून सुरू व्हायची त्यामुळे नऊमाही परीक्षेनंतर
यांची पहिली किंवा दुसरी उजळणी सुरू असायची. काही जण तर चक्क नमुना
प्रश्नपत्रिका सोडवण्याचे अचाट पराक्रमही करायचे. स्लॅबच्या घरात
राहणाऱ्यांना जशी पावसाळ्यापूर्वी नळे परतण्याची चिंता नसते तशीच यांना
वार्षिक परीक्षेची नसायची.  
 
           
    दुसरा प्रवर्ग मस्तीखोर आणि ढ मुलांचा. यांचा
वैयक्तिक ढ पणा हा हुशार मुलांसारखाच वादाचा मुद्दा. पण आपण शाळेत येतो तेच
मुळात आई वडिलांवर आणि यच्चयावत प्राणिमात्रावर उपकार करायला ही यांची
धारणा. अभ्यास वगैरे फालतू गोष्टींपेक्षा उनाडक्या. टवाळक्या याकडे यांचा ओढा
जास्त. वार्षिक परीक्षा म्हणजे यांच्यासाठी क :पदार्थ. त्यामुळे यांना नळे
परतायची काय तर पावसाळ्याचीच भीती
नसायची.
     
           
    या दोन दक्षिणोत्तर ध्रुवांमध्ये पसरलेला तिसरा
प्रवर्ग म्हणजे माझ्यासारखा मध्यमवर्गीय बहुजन समाज. ज्यांचा सर्वसामान्य
पणा वादातीत. सगळ्यात जास्त टेन्शन वाला हा प्रवर्ग. त्यामुळे मग
पुस्तकांच्या शोधाशोधीपासून सुरवात. काही पुस्तक तर इतक्या विपन्नावस्थेत
असायची की पत्रावळीसाठी सुद्धा वापरता येणार नाहीत. मग नवीन पुस्तक नवनीत
प्रश्नसंच गाईड अशी शस्त्रसज्जता व्हायची. पुढचा मुख्य पाडाव म्हणजे
युद्धाची आखणी अर्थातच अभ्यासाचे वेळापत्रक. यामागची प्रेरणा अर्थातच
घरच्यांचा धाकवजा टोमणे. पण हा मात्र गंभीर मामला असायचा मला वाटत इतक्या
गंभीरपणे अभ्यास केला असता तर चार मार्क जास्त पडले असते कारण या
वेळापत्रकाचा दुसऱ्या दिवशीच बोजवारा उडायचा. मला सांगा पहाटे ५ ला उठणे
कोणाच्या बापाला शक्य झालंय क? मग ५ चे ८ व्हायचे आणि सगळं वेळापत्रक
कोलमडून पडायचं. नोकरदार माणसांचा पगार जसा महिना अखेर पर्यंत उडून जातो
तसाच वेळ उडून जायचा आणि मग वार्षिक परीक्षा तोंडावर येऊन ठेपायची. मग काय
रात्र रात्र जागर हा चॅप्टर महत्त्वाचा नाही तो सोडून देऊ असे अघोरी प्रकार
सुरू व्हायचे. अखेर तो दिवस उजाडायचा.
 
           
      पॅड आणि कंपास पेटी घेऊन वर्गात शिरताना
छातीत धाकधूक व्हायची. आपला नंबर शोधल्यावर बेंच पहिला नाही हे पाहताच जीव
भांड्यात पडायचा. काही दुर्देवी जिवांना मात्र स्वतंत्र बेंच मिळायचा.
हुशार मुलं वैराग्याच्या तटस्थपणे आणि स्थितप्रज्ञपणे बसायची. कॉपी नामक
रामबाण असल्यामुळे मस्तीखोर लोकांच्या वागण्यात राजकारण्यांचा बेदरकारपणा
असायचा. राहता राहिलो आम्ही देवाचा धावा करणे हा एकच पर्याय. या काळात नवसाचे
पेढे खाऊन बहुधा देवालाही मधुमेह होत असावा. परीक्षेचा  टोल झाला
आणि प्रश्नपत्रिका हातात पडली की मात्र घड्याळाशी झुंज सुरू
व्हायची. पेन, पेन्सिल पट्टी अशी शस्त्र भात्यातून निघायची. पुरवण्या वर
पुरवण्या आणि त्या बांधायला दोर. हुशार मुले  मात्र स्वतःचा
स्टेपलर घेऊन यायची. शेवटच्या दहा मिनिटात हाताचा वेग प्रकाशाच्या वेगाशी
स्पर्धा करायचा. पेपर हातातून खेचला गेल्यावर मग किती प्रश्न सोडवले आणि
किती मार्क्स मिळतील याचा अंदाज बांधला जायचा. पेपर मागून पेपर आणि अखेर
परीक्षा संपायची. महाराज गडावर पोचल्यावर बाजीप्रभूला झाला नसेल इतका
उन्माद नसानसातून वाहायचा कारण वेध लागायचे उन्हाळी
सुट्टीचे.  
   
           
          शाळा सुटली आणि
त्याच बरोबर सुटली ती वार्षिक परीक्षा. बरं वाटलं, वाटलं संपली ती एकदाची
कटकट. बघता बघता आयुष्याचं रहाट गाडगं सुरू झालं. आता रोजच होते एक नवीन
वार्षिक परीक्षा ज्याला असतो ना सिलॅबस ना अभ्यास ना कॉपी. नापास होण्याचा
तर पर्यायच नाही. सालं शाळेचे आयुष्य आता या चष्म्यातून सोपं वाटतं. आपलं
सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे पास होणे आणि पुढल्या वर्गात जाणे बस्स साधा
सोपा आणि सरळ हिशोब असायचा. आता सगळे वर्ग संपले  आणि आता जेव्हा
आपल्या स्वतंत्र बाकावर बसून आपली स्वतःची स्वतंत्र प्रश्नपत्रिका सोडवतो
ना तेव्हा आठवत राहते मला ती शाळेतली वार्षिक परीक्षा.