नररत्नांची खाण

       मृणालिनी साराभाई या नृत्यांगनेचा शंभरावा जन्मदिन गुगल डूडल ने साजरा केला.त्यामुळे सहज त्यांच्या आयुष्याकडे नजर टाकल्यावर त्या आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यानी आयुष्यात जे कार्य केले त्यावरून त्यांचे साराभाई व माहेरचे स्वामिनाथन  ही कुटुंबे म्हणजे नररत्नांची खाणच असे म्हणावे लागेल.
     मृणालिनी यांचा जन्म केरळमधील स्वामिनाथन कुटुंबातील ! त्याचे पिताश्री डॉक्टर एस.स्वामिनाथन मद्रास उच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध बॅरिस्टर  वकील व मद्रास लॉ कॉलेजचे प्राचार्य होते तर मातोश्री ए.व्ही.अम्मुकुट्टी पण अम्मू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी होत्या.कॅप्टन लक्ष्मी सहगल (आझाद हिन्द सेनेतील एक सेनानी) या त्यांच्या ज्येष्ठ भगिनी.म्हणजे मृणलिनी यांच्या मावशी.१९९८ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने त्यांना भूषवण्यात आले. 
     मृणालिनी यांचा जन्म स्वित्झरलंडमध्ये झाला.(११मे १९१८).शान्तिनिकेतनात त्यांचे शिक्षण रवीन्द्रनाथ टागोरांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडले व आपल्या नृत्यातील आवडीची त्याना जाणीव झाली व आपल्या कर्तृत्वासाठी तेच क्षेत्र त्यांनी निवडले.१९४२ मध्ये डॉ.विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा परिचय व नंतर विवाह झाला.विक्रम साराभाई हे इस्रोचे संस्थापक म्हणून सुप्रसिद्ध आहेतच पण त्याशिवाय त्यानी इन्डीयन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट,अहमदाबाद टेक्स्टाइल इन्डस्ट्रीज् रिसर्च असोसिएशन मृणालिनींच्या साथीने,दर्पण ऍकेडेमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स याशिवाय अंतराळ संशोधनाशी संबंधित अनेक संस्थांची स्थापना केली आणि तीही केवळ अठ्ठावन वर्षांच्या अल्प आयुष्यात.त्यांच्या प्रयत्नातूनच आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या अंतराळ ग्रहाने १९७५ मध्ये अवकाशात झेप घेतली.विक्रम साराभाई यांना पद्मभूषण (१९६६ )व मरणोत्तर पद्मविभूषण (१९७२) या पुरस्कारांनी भूषवण्यात आले.
       मृणालिनी यांना १९६५ मध्ये पद्मश्री व १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्कारांने भूषवण्यात आले.त्यांची कन्या मल्लिका साराभाई याही विख्यात नृत्यांगना असून त्या क्षेत्रात त्यानी भरीव कामगिरी केली आहे व लिखाणही केले आहे व त्याही पद्मभूषण पुरस्काराच्या मानकरी आहेत.मृणालिनी यांचे चिरंजीव कार्तिकेय हेही विख्यात पर्यावरण तज्ञ असून पर्यावरण शिक्षणासाठी त्यानी संस्था स्थापन करून भारतात तिच्या ४० ठिकाणी शाखा आहेत.त्या क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील सर्वच व्यक्ती इतक्या कर्तबगार सर्वच जण पद्म पुरस्काराच्या मानकरी असणे या दुर्मिळ योगायोगाचा मृणालिनी यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त उल्लेख करणे एवढाच या लेखाचा उद्देश. (सर्व माहितीचा स्रोत गुगल हाच आहे)