चिंता करी जो विश्वाची ... (३९)

माया सगुण साकार । माया सर्वस्व विकार ।

माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥
माया दृश्य दृष्टीस दिसे । माया भास मनासि भासे ।
माया क्षणभंगुर नासे । विवेके पाहता ॥ 
असे मायेचे  वर्णन केले आहे. माया भासमान आणि अशाश्वत आहे.  तिच्यामुळेच दुःख उपजते. परमेश्वर, देवी, देवता हेही त्याच मायेचे स्वरूप आहे. मानवाने निर्मिलेले आहे. विवेक बुद्धीने पाहिले असता तिचे सत्यस्वरूप लक्षात येते. आणि शाश्वत अशा पूर्णब्रम्हाची महती कळते. माया पाश सोडवून, परब्रम्हाची उपासना करणे हितकारक आहे.
विकार, अहंकार यांचा त्याग  करून, सावध आणि एकाग्र विवेक बुद्धीने साधना केल्यावर, सत्यब्रम्हाच्या प्राप्तीची  शक्यता निर्माण होईल असे समर्थ म्हणाले. यांवर श्रोते विचारतात की हे सत्यब्रम्ह म्हणजे काय? आधी उल्लेखिलेले ब्रह्म आणि सत्यब्रम्ह यात फरक तो काय आहे? यास सत्यब्रम्ह का संबोधिले आहे? 
यावर समर्थ सांगतात की  ब्रह्म आणि सत्यब्रम्ह एकच. नावे फक्त वेगळी. खरे पाहता  ब्रह्म निराकार आणि अदृश्य आहे. त्यास ना रूप ना रंग की कसलाही गंध. त्यामुळेच ते अनाम आहे. कारण कशास संबोधण्यास त्याचे मूर्त रूप सामोरे असणे जरूरीचे. परंतु ज्याने जसे हे ब्रह्म अनुभवले, तशीच त्यांस नावे देखिल दिली.  परंतु ही असंख्य नावे धारण करणारे ब्रह्म एकच असते. 
म्हणे ब्रह्म येकचि असे । परी ते बहुविध भासे ।
अनुभव देही अनारिसे । नाना मती ॥
जे जे जया अनुभवले । तेंचि तयासि मानले ।
तेथेचि त्याचे विस्वासले । अंतःकरण ॥ 
ब्रम्हाला अनेकांनी अनेक नामे दिली. जसे की निर्मळ, निश्चळ, निजानंद, अरूप, अलक्ष, अच्युत, अनंत  अशी कितीतरी . ज्याची जशी क्ल्पना, तशीच नावे. 
नादरूप ज्योतिरूप । चैतन्यरूप सत्तारूप ।
साक्षरूप सस्वरूप । ऐसी नामे ॥
सून्य आणि सनातन । सर्वेश्वर आणि सर्वज्ञ ।
सर्वात्मा जगजीवन । ऐसी नामे ॥
सहज आणि सदोदित । शुद्ध बुद्ध सर्वातीत ।
शाश्वत आणि शब्दातीत । ऐसी नामे ॥
विशाळ विस्तीर्ण  विश्वंभर । विमळ वस्तू व्योमाकार । 
आत्मा परमात्मा परमेश्वर । ऐसी नामे ॥ 
अशी असंख्य नावे धारण करणारे ब्रह्म मात्रं एकच आहे. ही सारी नामे पाहू जाता कळते की ते ब्रह्माचे गुणवर्णनच आहे. ब्रह्म हे आदि आणि अंती देखिल आहे. ते जुने नाही, नवीन पण नाही.   भूत,  वर्तमान आणि भविष्य या त्रिकाली ते अस्तित्वात आहे.  ब्रह्म स्थिर आहे. ते कधीच बदलत नाही. त्यात अधिक, उणे होत नाही. ज्या कुणाला त्यात बदल जाणवेल, तर तो त्याचा दोष. त्याच्या आकलनातील ती उणीव आहे हे निश्चित जाणावे. 
शास्त्रामध्ये चौदा ब्रह्मे सांगितली आहेत. समर्थ त्यांची लक्षणे वर्णन करतात. आणि श्रोत्यांना सांगतात की या लक्षणांचे वर्णन ऐकल्यावर तुम्हांस कळेल की कोणते खोटे आहे. आणि मग यातून जे राहील तेच खरे,  एकमेव असे परब्रह्म आहे हे लक्षात असू द्यावे. 
रत्ने मिळविण्यासाठी जमीन खोलवर खणून माती बाजूला करावी लागते.  तसेच जे काल्पनिक आहे, मिथ्या आहे ते बाजूला सारल्यानंतरच सत्याचा शोध लागतो. अद्वैताची जाणीव होण्यासाठी, द्वैताला समजून घेणे आवश्यक असते.  संशय नक्की काय आहे हे समजल्यावर त्याचे निराकरण करता येते.  कुठल्याही सिद्धान्ताची सिद्धता करण्यासाठी, पूर्वपक्ष माहिती असणे अनिवार्य आहे. म्हणून आधी समस्त चौदा ब्रह्माचे गुणवर्णन समजून घेतले की खोटे किती आणि खरे ते कोणते हे आपसूक ध्यानात येईल. 
पहिले ते शब्दब्रह्म । दुजे मीतिकाक्षर ब्रह्म ।
तिसरे खंब्रम्ह । बोलिली श्रुती ॥
चौथे जाण सर्वब्रम्ह । पाचवे चैतन्यब्रम्ह । 
साहावे सत्ताब्रम्ह । साक्षब्रम्ह सातवे ॥ 
आठवे सगुणब्रम्ह । नवे निर्गुणब्रम्ह ।
दाहावे वाच्यब्रम्ह । जाणावे पै ॥
अनुभव ते अक्रावे । आनंदब्रम्ह ते बारावे । 
तदाकार तेरावे । चौदावे अनुर्वाच्य ॥ 
अशी ही चौदा ब्रम्हे वर्णिली आहेत. त्यांचे गुणवर्णनही केले आहे. 
प्रथम आहे शब्दब्रह्म. ते केवळ शाब्दिक. तेथे अनुभवाची वानवाच आहे. शब्द उच्चारल्यावर त्याचे अस्तित्व समाप्त होते . म्हणजेच त्यांचा लोप होतो.  आणि म्हणून ते मिथ्या आहे. 
शब्दब्रह्म ते शाब्दिक । अनुभवेविण माईक (मिथ्या)।
शाश्वताचा विवेक । तेथे नाही ॥
दूसरे आहे मीतिकाक्षर ब्रह्म म्हणजेच अक्षर ब्रह्म. ते नित्य आहे. जेथे विनाश  किंव्हा  शाश्वती असा काही फरक नाही. 
जे क्षर ना अक्षर । तेथे कैचे मीतिकाक्षर ।
शाश्वताचा विचार । तेथेही न दिसे ॥ 
तिसरे खंब्रम्ह म्हणजे आकाश ब्रह्म. ते तर केवळ शून्याकार आहे. शून्य म्हणजे अज्ञान. 
खंब्रम्ह ऐसे वचन । तरी सुन्याते नासी ज्ञान ।
शाश्वताचे अधिष्ठान । तेथेही न दिसे ॥ 
चौथे आहे सर्वब्रम्ह. जे नाशिवंत आहे. कारण प्रलयानंतर सर्वाचा नाश होणे निश्चित आहे. म्हणून ते मिथ्या आहे. 
ब्रम्हप्रळये मांडेल तेथे । भूतान्वय (पंचमहाभूतांचा समुदाय) कैचा तेथे ।
म्हणौनिया सर्वब्रम्हातें । नाश आहे. ॥ 
पाचवे  चैतन्यब्रम्ह. चराचरात चैतन्याचा संचार आहे. परंतु हे चराचर स्वतःच नाशिवंत आहे. अशाश्वत आहे. त्यामूळे त्यात चेतना जागृत करणारे चैतन्यब्रम्ह खोटे आहे. 
आता जयास चेतवावे । तेच माईक स्वभावे ।
तेथे चैतन्याच्या नावे । नास आला ॥ 
सहावे सत्ताब्रम्ह. ज्याचे अस्तित्वच भौतिकाशी निगडीत आहे. म्हणजेच अर्थात नाशिवंत आहे. 
आणि सातवे साक्षब्रम्ह. ज्याच्या सिद्धतेकरिता काही साकार, मूर्त अशा वस्तूंची, तत्त्वाची  आवश्यकता असते. ज्यायोगे त्याचे गुण, स्वभाव, उपयोगिता इ. तपासून पाहता येते. या कारणाने  ते अशाश्वत, म्हणून मिथ्या ठरते. 
परिवारेविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्त्वतां ।
पदार्थेविण साक्षता । तेही मिथ्या ॥ 
आठवे  सगुणब्रम्ह. गुणावगुण असलेले जे काही आहे ते अनंतकाळ टिकणारे नाही तर  नाश पावणारे आहे. त्यामूळे सगुणब्रम्हास अंत आहे. 
नववे  जे निर्गुणब्रम्ह.  गुणब्रम्ह मिथ्या असल्याने निर्गुणाचे  अस्तित्व  आधारहीन ठरते. कारण गुण नाही म्हणून निर्गुणही नाही. म्हणजे सगुणब्रम्ह आणि निर्गुणब्रम्ह,  सत्यतेच्या कसोटीवर निष्फळ  होतात. 
सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये । 
सगुणब्रम्ह निश्चये । नासिवंत ॥
निर्गुण ऐसे जे नाव । त्या नावास कैचा ठाव ।
गुणेविण गौरव । येईल कैचे ॥
दहावे ते वाच्यब्रम्ह. जे बोलून दाखविता येते. ज्याचे उच्चारण करता येते. म्हणजेच जे भौतिक स्वरूपात ग्रहण करता येत. त्याचा कधी ना कधी विलय निश्चितच संभवतो. म्हणूनच ते मिथ्याब्रम्ह आहे. 
अकरावे आहे अनुभवब्रम्ह. जो वृत्तीचा एक भाग आहे. ज्याचे वर्णन करता येते. ज्याच्या स्वरूपाची कल्पना करणे शक्य आहे. म्हणजेच ते नाश पावणारे आहे. 
बारावे आनंदब्रम्ह.  आनंद हा केवळ अनुभव आहे. वाणी ज्याचे वर्णन करू शकते. ज्याची कल्पना केली जाऊ शकते. म्हणून ते सत्यब्रम्ह  नाही. 
जे वाचें बोलता आले । ते वाच्यब्रम्ह बोलिले ।
अनुभवासि कथिले । न वचे सर्वथा ॥
या नाव अनुभवब्रम्ह । आनंद वृत्तीचा धर्म ।
परंतु याचेही वर्म । बोलिजेल ॥
तेरावे तदाकारब्रम्ह. तदाकार होणे म्हणजे तद्रुप होणे अथवा एकरूप होणे.  अनुभव अथवा भावने बरोबर एकरूपता साधणे, म्हणजेच सृष्टीतील भौतिक घटनेशी एकरूप होणे. जे अर्थातच मर्यादित असते. त्या अनुभव, भावना अथवा तत्त्वापुरती ही एकरूपता मर्यादित असते. म्हणून ते मिथ्याब्रम्ह आहे.
आणि चौदावे अनुर्वाच्यब्रम्ह.  ज्याचे स्वरूप पाहिले, उमगले, अनुभवले  ते अनुर्वाच्य आहे. शब्दात व्यक्त करता येत नाही.  परंतु ज्याचे स्वरूप वर्णनातीत आहे, त्याचे  प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वर्णन  कसे करणार?   
आनंदाचा अनुभव । हाही वृत्तीचाचि भाव ।
तदाकारी ठाव । वृत्तीस नाही ॥
अनुर्वाच्य या कारणे । संकेत वृत्तीच्या गुणे ।
तया संकेतास उणे । निवृत्तीने आणिले ॥ 
अशी चौदा ब्रह्मे वर्णिली आहेत. ती अनेकांच्या अनुभवावर अथवा ब्रह्मविषयक कल्पनांवर आधारभूत आहेत. परंतु ती सत्यतेच्या आणि शाश्वततेच्या निकषांवर यशस्वीपणे सिद्ध होऊ शकत नाही. ब्रह्म हे एकमेव आहे आणि हेच सत्य आहे. ते निर्विकल्प आणि निर्विवाद आहे. अमर्याद आणि अविनाशी आहे. नित्य आणि स्थिर आहे. तेथे अनुमानास अथवा  कल्पनेस वाव नाही. त्यास जाणणे अथवा अनुभवणे हे साधनेशिवाय अशक्य आहे. त्यासाठीच सद्गुरूचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरते. 
कल्पनेचे येक बरे । मोहरिताच मोहरे ।
स्वरूपी घालिता भरे । निर्विकल्पी ॥
निर्विकल्पासि कल्पिता । कल्पनेची नुरे वार्ता । 
निः संगास भेटो जाता । निः संग होइजे ॥
पदार्थाऐसे ब्रह्म नव्हे । मां ते हाती धरून द्यावे ।
असो हे अनुभवावे । सद्गुरूमुखे ॥ 
(क्रमशः)
संदर्भ :  श्री ग्रंथराज दासबोध