वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहून झाल्यावर मग इतर मॉन्युमेंट्सकडे लक्ष्य केंद्रित केले. तसेच पुढे चालत गेलो आणि वर्ल्ड वॉर २ च्या मेमोरियलला पोचलो. हे मेमोरियल दुसऱ्या महायुद्धात भाग घेणाऱ्या अमेरिकन सैनिकांना व असैनिक अमेरिकनांना समर्पित करण्यात आले आहे. तसेच हे मेमोरियल वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि लिंकन मेमोरियलच्या मधोमध बांधलेले आहे.
इतर मेमोरियल्सच्या तुलनेने हे बरेच नवे आहे. २९ एप्रिल २००४ साली त्तकालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लु बुश यांनी या मेमोरियलचे उद्घाटन केले. या मेमोरियलचे स्वरूप म्हणजे एका मोठ्या चौकात प्रत्येकी १७ फूट उंचीचे ५६ ग्रॅनाइटचे खांब अर्ध वर्तूळ आकारात उभारले गेले आहेत. उत्तर आणि दक्षिण दिशेला भव्य अश्या दोन कमानी बांधल्या आहेत तसेच मधोमध असलेल्या मोठ्या जागेत अनेक सुंदर कारंजी आहेत. या प्रत्येक खांबावर अमेरिकेतील सन १९४५ साली असलेल्या ४५ राज्यांची नावे कोरली आहेत. तसेच डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबीया, अलास्का टेरिटरी, टेरिटरी ऑफ हवाई, कॉमनवेल्थ ऑफ द फिलिपिन्स, पोर्तो रिको, ग्वॉम, अमेरिकन समोआ आणि यूएस वर्जिन आयलंड्स अशी नावे कोरली आहे. उत्तरेकडील कमानीवर "अटलांटिक" तर दक्षिणेकडील कमानीवर "पॅसिफिक" असे कोरले आहे.




फ्रीडम वॉल - ४, ०४८ सोनेरी तारे असलेली अर्धवर्तुळाकार आकाराची एक मोठी भिंत या मेमोरियलच्या एका बाजूला आहे. यातला प्रत्येक तारा युद्धातल्या १०० शहिदांचे प्रतिनिधित्व करतो. या भिंतीसमोर "Here we mark the price of freedom" असे शब्द कोरले आहेत.


इथून पुढे गेल्यावर एका स्तंभावर पर्ल हार्बरचा उल्लेख दिसतो. सात डिसेंबर १९४१ रोजी जपानने पर्ल हार्बर या नाविक तळावर अचानक हल्ला केला होता. ज्यात अमेरिकेच्या नौदलाची खूप हानी झाली तसेच मोठी जीवित हानी झाली. या हल्यानंतर अमेरिकेच्या दुसर्या महायुद्धात भाग घेतला.




बरीच मंडळी इथे पर्यटक म्हणून भेट देतात. मात्र या गर्दीतही काही लोक असे होते जे या युद्धात आपल्या पूर्वजांच्या प्राणांतिक बलिदानाने काहीसे व्याकुळ होत होते.

फ्लोरिडातल्या एका शाळेची सहल तिथे आली होती. त्यांनी त्यांच्या राज्याच्या स्तंभासमोर पुष्पगुच्छ ठेवून शहिदांना आदरांजली वाहिली.
आम्ही या मेमोरियलला एक पूर्ण चक्कर मारली आणि इतर काही स्तंभ पाहिले. दुसऱ्या महायुद्धाचे हे मेमोरियल उभारताना त्यावर टीका झाली नाही असे नाही. विरोध करणार्यांचे काही मुद्दे होते की हे मेमोरियल उभारले गेले तर वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि लिंकन मेमोरियल यांच्या मध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होईल. तसेच ही मोकळी जागा कायम मोर्चे इत्यादींसाठी हक्काची मानली जात असे ती हातची जाणार. अजून एक मुद्दा असा होता की या मेमोरियलसाठी मंजुरी खूप लवकर देण्यात आली होती. ज्यासाठी अनेक वर्षे लागायची. खरे तर त्यावेळी काँग्रेसला (अमेरिकन प्रतिनिधीगृहला) अशी काळजी वाटत होती की तेव्हा हयात असणार्या दुसर्या महायुद्धातल्या अमेरिकन अधिकाधिकक सैनिकांना हे मेमोरियल पाहायला मिळावे. म्हणून मग काँग्रेसने हे उभारण्यास घाई केली आणि मेमोरियलच्या मार्गातील सर्व अडचणी त्वरेने दूर झाल्या.


मेमोरियलचा रात्रीच्या वेळी काढलेला हा फोटो जालावरून साभार.
यानंतर आम्ही लिंकन मेमोरियलच्या दिशेने चालू लागलो. त्याचे वर्णन वाचूया पुढच्या भागात.
माहितीचा स्रोत: विकीक्रमशः