परिमार्जन ---- ?

            "माझ्या मुलाचे मी नावच असे ठेवले आहे की त्याला कोणी वेड्यावाकड्या नावाने हाक मारूच शकत नाही." मास्तर अगदी रंगात येऊन सांगत होते." असं बघ तुझे नाव विनायक असेल तर पोरे तुला म्हणणार विन्या.मधुकर असेल तर म्हंणणार मध्या तसे राजाचे अगदी राज्या केले तरी ऐकणाऱ्यास ते वाटणार राजाच.",मास्तरांचा आवेश "सुखाच्या सरींनी --- " असं   लांबलचक नाव असणाऱ्या एका मालिकेतील मातृदेवतेसारखा होता.तिच्या मुलाचे नाव सिद्धार्थ असून त्याचे सिध्या असे रूप केलेले तिला अजिबात खपत नाही. अगदी त्याच्या बहिणीनेसुद्धा ! !अगदी तस्सेच ! खरं तर मास्तर माझे खरोखरीच गुरुजी होते आणि मी त्यांच्याहून ३०-३२ वर्षांनी तरी लहान होतो तरी ते माझ्याशी मित्रासारख्या गप्पा मारत होते याचे एक कारण त्यांच्या मुलाबरोबर त्यावेळच्या इन्टर सायन्स चा अभ्यास मी करत होतो.व माझ्या संगतीत त्याला चांगले मार्क पडून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल अशी आशा त्याना होती.आदल्या वर्षी त्याने ड्रॉप घेतला होता त्यामुळे त्यांना विशेष काळजी होती. हा राजा हा त्यांचा धाकटा मुलगा.माझ्याबरोबर अभ्यास करणारा मोठा भाऊ मुकुंद नाव ठेवल्यामुळे "मुक्या" झाला होता त्यामुळे त्यानी ही दक्षता घेतली होती. ।
            मास्तर आम्हाला शाळेत शिकवायला होते. अर्थात त्यावेळी अश्या गप्पा ते मारायचे नाहीत कारण तेव्हांचे आमचे नाते वेगळे होते.आणि तसे ते स्वभावाने कडक म्हणूनच प्रसिद्ध होते.तसे ते शिस्तीचे भोक्ते आणि अभ्यासूदेखील.त्यावेळी शाळेत हिन्दी हा विषय नुक्ताच सुरू झाला होता आणि पूर्वीच्या शिक्षकांना हिन्दीचा ओ की ठो माहीत नव्हता पण त्या काळात त्यानी हिंदी राष्ट्रभाषा सनद पर्यंत परीक्षा देऊन हिन्दीत प्रावीण्य मिळवले व हिन्दी या विषयाचे शिक्षक झाले.अर्थात इतरही विषय जरुरीनुसार ते शिकवतच .
          त्यांचा स्वभाव जरा मजेशीर होता.काही वेळा ते खरेच विनोदी बोलत  स्वत:वरच करायचा त्यांचा एक खास विनोद म्हणजे ,"मी एकदा नदीत पोहत होतो आणि अचानक धारेला लागून अगदी बुडण्याच्या बेतात होतो.तेव्हां हा दाम्या (त्याच्याकडे बोट दाखवून ) काठाने चालला होता त्याने लगेच बुडी मारून मला पकडून कांठावर आणले. माझा जीव वाचवणाऱ्या दाम्याला काहीतरी बक्षीस द्यावे असे मला वाटले,त्यामुळे मी त्याला विचारले,"बाळ दामू,माझ्यावर केवढे हे उपकार तुझे,बोल तुला काय बक्षीस देऊ ?" त्यावर बाळ दामू हात जोडून म्हणाला,"मास्तर मला काही द्यायचेच असेल तर इतकेच करा की माझ्या मित्रांना हे  सांगू नका  की  मी तुम्हाला वाचवले नाहीतर ते मला जिवंत सोडणार नाहीत."  तसाच त्यांचा दुसरा एक ठरलेला विनोद म्हणजे बाळ्याला विचारले की पांडव किती? यावर बाळ्या काय उत्तर देतो,"मास्तर, बाजल्याच्या खुराइतके म्हणजे चार आणि हाताने दाखवणार बोटे तीन" येवढ्या वयात हिन्दी भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळवल्याचा अभिमान त्याना होता.त्यावेळी गावातली मुसलमान पोरं जरी मराठी येत असली तरी एकमेकाशी हिन्दीतच बोलायची त्यांच्यावर  भाष्य करताना मास्तर म्हणत यांच हिन्दी म्हणजे काय "भागते भागते आया और धबाकदिशी पड्य़ा " 
           शालेय जीवन संपल्यावर माझा  मास्तरांचा आणि मुकुंद व राजा यांचाही संबंध कमीच झाला    तसा तो माझ्या खास मित्रापैकी एक होता अशातला भाग नव्हता.माझ्या धाकट्या भावाचा तो वर्गमित्र.पण छोट्या गावात सगळेच एकमेकाला ओळखत असतात तसे आम्ही एकमेकास ओळखत होतो. राजा  माझ्या भावाकडे कधी कधी यायचा व त्याच्या मित्राचा मोठा भाऊ म्हणून पुरेसा आदरही दाखवायचा.त्याचा मोठा भाऊ माझ्याबरोबर अभ्यास करायचा तर मोठी बहीण माझ्या बहिणीकडे यायची शिवाय माझे वडीलही त्याच्याच वडिलाचे सहकारी होते त्यामुळे आमच्या दोन्ही कुटुंबातील सगळ्याच भावंडांचे एकमेकाकडे जाणे येणे असे.राजाशी फार काही बोलणे झाले नाही तरी त्याच्याही बोलण्यात वडिलांच्या विनोदबुद्धीचा कधी कधी प्रत्यय यायचा.
    पण शिक्षणासाठी बाहेर पडल्यावर गावातली माणसे परत क्वचितच भेटू लागली कारण सुट्टीव्यतिरिक्त गावात जाणे घडत नसे व नंतर नोकरीमुळे प्रत्येकजण अगदीच वेगळ्या क्षेत्रात व शहरात गेल्यावर आम्ही गाववाले होतो याची आठवणच काय ती उरली.त्यात परत मी औरंगाबादी म्हणजे आमच्या गावापासून जरा आडवळणी ठिकाणी गेल्यामुळॅ मीच गावाकडील दोस्तांपासून लांब पडल्यासारखा झालो होतो. पण मध्यंतरी महाविद्यालयाच्या कामानिमित्त मला निरनिराळ्या अभियांत्रिकी उद्योगांना भेटी द्याव्या लागल्या.त्या मध्ये प्रशिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती पहाणे हा हेतू असे. त्यात एकदा कुर्ल्याच्या राजा काम करत असलेल्या कंपनीस कंपनीस भेट देण्याचा योग आला. तो पुण्याच्याच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून उच्च गुणांसह इंजिनिअर होऊन बाहेर पडला होता व शिवाय नंतर त्याने निटी मध्ये पदव्युत्तर शिक्षणही पार पाडले होते व तेथेच त्याची या उद्योगात निवड होऊन तो सध्या कार्यरत होता या सर्व गोष्टी मला माहीत होत्या त्यामुळे यावेळी त्याची गाठ घेण्याचे मी निश्चित केले होतेच.
    त्या कंपनीत असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मग मी तेथील पर्सोनेल ऑफिसरकडे चौकशी केली व त्याच्याबरोबरच राजाकडे गेलो.मला पाहून त्याला खूपच आनंद झाला. तसा तो बऱ्याच उच्च पदावर होता त्यामुळे त्याला स्वतंत्र केबिन वगैरे होती. तेथेच त्याने तिघांसाठी चहा व नास्ता मागवला.माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. आपल्या घरी येण्याचाही आग्रह त्याने केला. पण तो अंबरनाथला रहात होता.त्यामुळे ते मला शक्य झाले नाही.
   मधल्या काळात माझ्या धाकट्या बहिणीचे लग्न झाले व योगायोगाने तिचेही घर आता  अंबरनाथलाच होते त्यामुळे बहिणीकडे गेल्यावर मात्र राजाकडे जायचे असे मी निश्चित केले आणि अंबरनाथला गेल्यावर बहिणीला मी तसे सुचवले.माझे मेहुणेही आता राजाला ओळखू लागले होते,त्यामुळे त्यांना त्याचे वास्तव्यस्थान माहीत होते त्यामुळे आम्ही सगळेच राजाकडे गेलो.
    आम्हाला पाहून त्याला खूपच आनंद झाला.त्याच्यापेक्षाही अधिक त्याच्या वडिलांना, म्हणजे माझ्या गुरुजींना, कारण त्यांच्या सहकाऱ्याचा मी मुलगा शिवाय त्यांच्या मोठ्या मुलाबरोबर अभ्यास करायला मी त्यांच्या घरी जायचो.दुर्दैवाने त्यांना स्वरयंत्राचा कर्करोग झाला होता अर्थात तो आम्ही गाव सोडण्यापूर्वीच झाला होता पण सुदैवाने योग्य वेळी तपासणी झाल्यामुळे लवकर निदान झाले व त्या वेळी ताबडतोब शस्त्रक्रिया केल्यामुळे ते वाचले मात्र स्वरयंत्र काढून टाकल्यामुळे त्यांना बोलता मात्र येत नव्हते पण घशाला लावलेल्या नळीतूनच प्रयत्न करून जरा विचित्र व अगदी हलक्या सुरात बोलून ते आपल्या भावना प्रकट करू शकत होते त्यामुळे तशाही अवस्थेत त्यानी आमच्याशी खूपच गप्पा मारल्या.
   राजाचाही स्वभाव थोडाफार वडिलांसारखाच विनोदी होता त्यामुळे त्याने आम्हाला सांगितले,"मी अगोदरच ठरवले होते की बायकॉ नोकरी करणारीच हवी. कारण घरात ती किंवा आई यापैकी एकच राहू शकण्याची शक्यता आहे " राजाचे हे विधान एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत या थाटाचे होते आणि तसे खरेही होते कारण राजाची आई फारच कर्तबगार व कामाला अगदी वाघीणच त्यामुळे तिच्या झपाट्यापुढे या नव्या पिढीतील राजाची बायको टिकणार नाही हे त्याचे अनुमान बरोबर होतेच. त्यामुळे त्याने खरोखरच नोकरी करणारीच बायको शोधली होती. पण केवळ तेवढेच कारण त्याच्या या निवडीस होते असे नसून तिला मिळणारा पगार हे कारणही थोडेफार असले पाहिजे असे माझ्या मेव्हण्यांचे मत. हे मत त्यानी राजाच्या इतर वेळीच्या वागण्यावरून बनवले होते.      
           पण त्याला स्वत:ला चांगलाच पगार असताना बायकोच्या मिळकतीवर राजाचा डोळा असेल हे मला तरी पटत नव्हते. त्याच्या कद्रूपणाच्या कहाण्या त्यांनी सांगितल्या त्यावरून त्यांचे मत खरेही असेल असे वाटले.त्यावेळी त्याचा मुलगा लहान होता.मी तेथे असताना तो आम्हाला भेटायला म्हणून आला व त्याच्या मुलाच्या हातात ठेवलेली साधी लिमलेटची गोळी तो चोखू लागला आणि ती त्याच्या हातातून खाली पडली."अरे पडू दे त्याला दुसरी देतो" असे म्हणून दुसरी माझ्या बहिणीने त्याच्या हातात ठेवली,पण राजाने मात्र जाताना ती गोळी उचलून पुसून आपल्या खिशात टाकली ती घरी गेल्यावर मुलाला देण्याचे त्याने ठरवले असावे हे पाहिल्यावर मात्र आमच्या मेव्हण्यांच्या सांगण्यात तथ्य असावे असे वाटू लागले.
         तसे पहायला गेले तर त्याला पगार उत्तमच होता शिवाय त्याच्या बायकोचा पगारही घरी येत होता. शिवाय वडिलांची थोडी का होईना पेन्शनही होती. त्यामुळे त्याचा काटकसरीपणा चिकटपणा या सदरात मोडण्यासारखा वाटला.त्याने कधी कोणाला मुद्दाम घरॉ बोलावून चहा पाणी केले असे माझ्या बहिणीला दिसले नाही. भरपूर पैसा मिळत असून कार वगैरे घेऊन मजेत रहावे  असे त्याला वाटत नव्हते उलट आणखी पैसे मिळवण्यासाठी त्याने शेअर्समध्ये पैसे गुंतवणे सुरू केले.त्यातही त्याचे अंदाज बरोबर ठरल्यामुळे त्याला भरपूर अर्थप्राप्ती होऊ लागली.त्याची मुलेही-- एक मुलगा व एक मुलगी-- हुषार असल्यामुळे व पत्नी पण शिक्षिका असल्यामुळे त्यांचेही शिक्षण व्यवस्थित चालू होते. 
          त्या काळात काही दिवस शेअरमार्केट चांगलेच तेजीत असल्याने राजाने खूपच कमाई केली आणि त्यात त्याला एवढा आत्मविश्वास वाढला की चक्क नोकरी सोडून त्याने शेअरमध्येच  सगळे लक्ष द्यायचे ठरवले.त्या काळात त्याने स्वत:च्या ,मुलाच्या,मुलीच्या व बायकोच्या नावावर प्रत्येकी पाच लाखाची रक्कम मुदत ठेवीत गुंतवली. पण एक दिवस हर्षद मेहताच्या कारवायांनी शेअर बाजार एकदम कोसळला.        
   अर्थात राजाला इतके काही घाबरून जायचे कारण होते अशातला भाग नाही.कारण त्याच्या मुदत ठेवी अगदी सुरक्षित होत्या .त्याच्या बायकोची नोकरी चालू होती आणि शेअरचे भाव काही सदैव कोसळत्या स्थितीत रहातील अशातला भाग नव्हता.पण आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशातली परिस्थिती झाली. त्यामुळे त्यानंतर राजाची गांठ पडली तरी तो काही फार नेहमीच्या खेळकर मनस्थितीत दिसला नाही. त्याचा चिकटपणा वाढलाच होता म्हणजे आम्ही कधी बहिणीकडे गेलो तरी आम्हाला बोलवून चहा देण्याचासुद्धा उपचार पाळेनासा झाला.आमच्या मास्तरांना मात्र आम्ही त्यांच्याकडे जावे बोलावे असे वाटे. त्यांना  घश्यातून उच्चार करून का होईना आमच्याशी बोलावे वाटे त्यांच्या बोलण्यातील प्रयत्नाचा त्यांच्यापेक्षा आम्हालाच अधिक त्रास व्हायचा कारण आम्हाला ऐकू यावे म्हणून घसा खरडून ते बोलत.   तरीही त्यांच्यावरील प्रेमामुळे व आदरापायी आम्ही त्यांच्याकडे जात असू. राजाची आई पण त्याच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून आमचे आदरातिथ्य करायची. 
     पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या  आपल्या मुलाच्या नावालासुद्धा कोणी वेडेवाकडे करू नये म्हणून जपणाऱ्या मास्तरांच्या त्या मुलाला आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना मात्र कसेबसे सांभाळणेही  नकोसे वाटू लागले हे अर्थात माझ्या मेव्हण्यांकडूनच मला कळले. हे खरे आश्चर्य म्हणावे लागेल कारण त्यानी राजावर जिवापाड प्रेम केलेले.तसा राजाला मोठा भाऊ होता व आई वडिल  त्याच्याकडे जाऊन राहू शकले असते.पण त्या जागेचे इतके वर्षे राहून वळण पडलेले त्यांना सोडवत नव्हते.मास्तरांची पेन्शन येत होती त्यामुळे आई वडिलांचा भार राजावर पडत होता अशातला भाग नव्ह्ता तरीही तो भार आपल्यावरच पडतो आहे असे राजाचे मत होते की काय कळत नाही.त्याच्या तश्या वागण्यामुळे मास्तरही हताश झाल्यासारखे वागू लागले.एक दिवस ते घर सोडून गेले आणि परत आलेच नाहीत.
    माझ्या मेव्हण्यांचे बारीक लक्ष राजाच्या घरातील सगळ्या घडामोडीकडे असायचे त्यामुळे ते राजाला घेऊन मास्तरांना शोधायला गेले,त्यामुळॅच राजाला जावे लागले असे वाटते. नाहीतर गेलेत ना बरेच झाले असा विचार त्याने केला असता.अर्थात आईने त्याला स्वस्थ बसू दिले नसते. .आणि शेवटी अंबरनाथ स्टेशनच्या आसपास विमनस्क स्थितीत भटकताना ते सापडले मग दोघे त्यांना घरी घेऊन आले.
    आणि एक दिवस मास्तरांची प्राणज्योत मावळली.त्यांचा अंत्यविधी तरी योग्य त्या पद्धतीने व्हावा ही आईची इच्छाही राजाने पुरी केली नाही,पण माझे मेव्हणे फार आग्रही असल्यामुळे व इतरही लोकांच्यापुढे वाईट दिसेल म्हणून त्याने कसेबसे काही विधी उरकले,पण त्यानंतर आईची जणु नजरकैदच सुरू झाली.म्हणजे तशीतीही थकलीच होती पण नंतर तिची अवस्थाही अतिशय केविलवाणी झाली 
                 त्या कालात कुठल्याही उपक्रमात राजा भाग घेत नसे आणि अगदी समोर राहूनही माझ्या बहिणीकडे तो किंवा त्याची बायको फिरकले नाहीत.त्याच्या मित्रांनी एकदा त्यांच्या वर्गमित्रांचा मेळावा शाळेतून बाहेर पडून २५ वर्षे झाली म्हणून केला व त्यासाठी राजाला घेऊन जाऊच असा विडा उचलूनच त्याचे काही मित्र त्याच्याकडे आले पण त्याने त्याना पार धुडकावून लावले,"असल्या गोष्टींमध्ये मला मुळीच रस नाही"त्याने त्यांना धुडकावीत म्हटले.ते अगदी त्याला उचलून नेण्याच्या तयारीने आलेले पण त्यांनाही त्याने दाद दिली नाही.
    मास्तरांच्या निधनानंतर आपल्या आईचे त्याने केलेले हाल मला माझ्या मेव्हण्यांच्या कडूनच कळले. तिला त्याने कॉटच्या एका पायाला बांधून ठेवले होते.त्याच्यामागे काय उद्देश होता कळत नाही. शेवटी ती बाई पण एका दिवशी जग सोडून गेली.तिच्या अंत्यविधीसाठी कोणी इतर माणसे यावीत व तिचा शेवटचा प्रवास तरी सुखकर व्हावा असे राजाला मुळीच वाटले नाही.त्याने एक ऍम्ब्युलन्स मागवली व तो माझ्या मेव्हण्यांसह तीमधून आईचे शव स्मशानात घेऊन गेला व विद्युतदाहिनीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात ते देऊन फक्त त्यांनी दाहिनीमध्ये शव घालेपर्यंतच तो तेथे थांबला आणि बहुधा माझ्या मेव्हण्यांच्या स्कूटरवरून घरी आला.बस्स तेवढाच त्याचा आणि त्याच्या मातृदेवतेचा शेवटचा संबंध ! अर्थात त्यानंतर तिचे दिवस वगैरे करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
    माझ्या बहीणीसमोरचा तो गाळा राजाने लवकरच सोडला,त्या जागेतील आठवणीही नको असे वाटून की काय कोण जाणे ! नंतर मीही कित्येक दिवसात त्याच्याकडे जाऊ शकलो नाही कारण त्याचे घर आता सहज जाण्यासारखे राहिले नाही. पण माझ्या एका मुक्कामात त्याची गाठ रस्त्यावर पडली आणि योगायोगाने त्याचे घर तेथून जवळच होते,त्यामुळे नाइलाजाने त्याला घरी चल असे म्हणावे लागले. हा ब्लॉक पहिल्यापेक्षा खूपच चांगला होता हवेशीर जागी होता आणि त्याने बऱ्यापैकी सुशोभितही केला होता.त्यावेळी राजा घरात एकटाच होता,कारण आता त्याचा मुलगा दिल्लीत कामाला होता ,मुलगी कॉलेजला व बायको नोकरीवर गेली होती.तरीही त्याने काहीतरी थंड पिण्याचा आग्रह केला व फ्रीजमधील बाटलीतील रंगीत पेयात पाणी मिसळून मला प्यायला दिले.
         त्यानंतर कित्येक दिवस आमचा संबंध नव्हताच म्हटले तरी चालेल.मास्तरांचा तर असण्याचा संबंधच नव्हता  त्यामुळे त्यादिवशी राजाचा फोन आल्यावर मला आश्चर्य वाटले," काय रे आहेस का घरी ? यायचेय तुझ्याकडे येऊका ?"  .अर्थातच येऊका असे विचारल्यावर त्याला नको म्हणणे शक्य नव्हते व तसे करण्याचे कारणही नव्हते.  राजा आता आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला येणार होता. त्यामुळे त्याचे हे येणे काहीसे अपेक्षितही होते.पण मधल्याकाळातील त्याच्या काही अनुभवामुळे तो येईल की नाही असेही वाटत होते.त्याच्या मुलाची लग्नपत्रिका पोस्टानेही त्याने पाठवली नव्हती. पण यावेळी मात्र तो आला नसता तरच आश्चर्य वाटले असते,कारण त्याची होणारी सून आमच्या दूरच्या नात्यातली होती. अर्थात तिच्याकडील पत्रिका आम्हाला येणारच मग आपण वेगळी कशाला द्यायची असाही विचार तो करू शकला असता म्हणा   त्याच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका नाहीतरी त्याने पाठवली नव्हतीच .पण यावेळी मात्र त्याने ती चूक सुधारण्यासाठी माझ्याकडे प्रत्यक्षच यावयाचा बेत केला असावा. यावेळी मात्र राजा खरोखरच आला.मधल्या काळात आपण असे का वागलो याचे स्पष्टीकरण द्यावे असे त्याला वाटत होते की काय कोणास ठाऊक.पण यावेळी त्याचा चेहरा प्रसन्न व बोलणेही मनमोकळे वाटत होते, 
 "तुला खरे सांगू का अण्णा,(माझ्या भावासारखे तोही मला अण्णाच म्हणे) शाळेत असताना तुझे दादा जेव्हां आम्हाला बातम्या सांगायचे ( त्यावेळी आमच्या शाळेत शाळा सुरू झाल्यावर प्रार्थनेनंतर ताज्या बातम्या सांगितल्या जायच्या व ते काम माझ्या वडिलांकडे होते.)त्यावेळी भारताचे भावी आधारस्तंभ तुन्ही आहात,तुमच्यातूनच कोणी नेहरू,सुभाष बनतील असे ते म्हणत तेव्हां आम्ही खरेच असे काहीतरी बनणार असे मला वाटायचे. आणि नंतर प्रत्यक्षात तसे काहीच न झाल्यामुळे मी अगदी अस्वस्थ झालो .त्यामुळे मी अगदीच एकलकोंडा बनत गेलॉ " अशी कबुलीच त्याने दिली तरीही नेहरू,सुभाष होऊ इच्छिणाऱ्या  व तसे होऊ न शकल्याबद्दल दु:खी होणाऱ्या मुलाने आपल्या आई वडिलांची आबाळ आणि इतका कंजूषपणा  का केला हे मला समजले नाही आणि ते मी विचारण्यात काही अर्थ नव्हता.पण लग्नासाठी त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले हे मात्र खरे..पण लग्नानंतर आमचा काही संबंध राहिला नाही कारण त्याचा मुलगा कधी दिल्ली तर कधी बंगलोरला असे व राजा व त्याची बायकोही बरेचदा त्याच्याकडेच असत.माझ्या बहिणींनेही अम्बरनाथ सोडले त्यामुळे राजावृत्त कळेनासे झाले.
     अनेक वर्षानंतर राजाने अम्बरनाथ कायमचे सोडले असे मेव्हण्यांनी माझ्या कानावर घातले व शेवटी त्यांनी जे सांगितले त्यामुळे मी अगदी आश्चर्यचकित झालो.राजाने अम्बरनाथ सोडताना आपला भलामोठा फ्लॅट एका वृद्धाश्रमास दान केला होता.संपूर्ण आयुष्यात केलेली काटकसर व वृद्ध आईवडिलांकडे केलेले दुर्लक्ष्य याचे अंशत: तरी परिमार्जन करावे अशी सद्बुद्धी त्याला सुचली असल्यास नकळे.मनुष्यस्वभावाचा थांग लागणे मोठे कठिण असते हे निश्चित !