उलटापालट ?

         सकाळी फिरायला जर कदाचित फार लवकर बाहेर पडलो  तर अगदीच कोणी भेटले नाही तरी सोसायटीच्या गेटपाशी  वॉचमन मात्र हटकून दिसतात.  गेटमधून बाहेर पडताना त्यांच्या गप्पा चालू असलेल्या ऐकू येतात. .काही काळानंतर दररोज राम राम केल्याने वॉचमन नावाने नाही तरी चेहऱ्याने लक्षात रहातात.   पण त्यादिवशी सगळे गप्पा मारत असताना एक वॉचमन मात्र कसलेतरी बरेच मोठे पुस्तक हातात घेऊन ते वाचण्यात दंग होता.मला मोठे आश्चर्य वाटले आणि मी त्याच्या जवळ जाऊन वाकून  त्याला विचारले "काय वाचन चाललेय वाटत ?"
        पुस्तकातून डोके वर करून त्याने माझ्याकडे पाहिले .गडी उमदा वाटला.अंगापिंडानेही अगदी सैन्यात जायला योग्य वाटला. "हो " माझ्याकडे हसत हसत पहात तो म्हणाला,आणि पुढे म्हणाला,"येथे बसून नुसताच वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी वाचन केले तर बरे वाटते."हे ऐकून मलाही बरे वाटले आणि  मी त्याला शाबासकी देत म्हणालो (कारण आता या वयात आम्ही तेवढेच करू शकतो) "छान ! आवडले मला, नुसतच येथे बसून वेळ वाया घालवणे नाहीतरी योग्य नव्हे , असाच वेळेचा सदुपयोग करा "त्यानेही त्याच्या या कौतुकाबद्दल मला धन्यवाद दिले व मी पुढे चालू लागलो.
        माझ्या मनात विचार आला अश्या व्यक्तीला आपणही चांगली पुस्तके देऊन उत्तेजन दिले पाहिजे, त्याला कोणती पुस्तके वाचावी याचे मार्गदर्शन करायला हवे. माझ्या ग्रन्थसंग्रहातील कोणती पुस्तके त्याच्या उपयोगी पडतील याचा मी विचार करू लागलो. त्यानंतर बरेच वेळा त्या रस्त्यावरून जाताना तो अगदी आवर्जून मला "दादा नमस्कार" असे म्हणायचा.आपल्याकडील पुस्तके देण्याचा विषय कसा काढावा याचा विचार मी करत असताना एके दिवशी तो वाचत असताना मी त्याच्या जवळून जात असताना मला नेहमीप्रमाणे नमस्कार करून तो म्हणाला,"दादा ,आपल्याकडे बरीच पुस्तके आहेत त्यातले तुम्हाला वाचायला  काही देऊ का ?"आणि माझी अवस्था पाण्यात पडलेल्या ढेकळासारखी झाली, पण तरी स्वतःला सावरून मी म्हणालो, "अवश्य ,माझ्याकडॅ पण बरीच पुस्तके आहेत तुम्हालाही काही हवी असल्यास सांगा " म्हणून मी पुढे चालू लागलो. पण आमच्या भूमिकांची उलटापालट झाली असे उगीचच मला वाटले.