मिशन मंगलयान आणि माझा ५ वर्षांचा चिमुरडा!

"अरे त्याला काय कळणार आहे त्यातलं? " 
माझ्या ५ वर्षाच्या पिल्लाला मिशन मंगलयान हा चित्रपट दाखवायला घेऊन चाललो आहे, ह्यावर बायकोची प्रतिक्रिया!

खेळ बरा रंगला होता. एक वयस्क वैज्ञानिक स्कूटर वरून मुद्दामहून पडतो, ह्या व्यतिरिक्त माझ्या पिल्लाने खिदळावे असा एकही प्रसंग नव्हता आणि तसे अपेक्षितसुद्धा नव्हते मला!  

सगळं आधीच माहिती असून ही उत्कंठा वाढवण्यात बऱ्यापैकी यश आले होते चित्रपटाला!  

माझा ऊर आपल्या इस्रोच्या ह्या उत्तुंग मजलीबाबत आधीच भरून आलेला, त्यात खेळ संपला, पाट्या पडल्या आणि त्यांनी खऱ्या खुरया शास्त्रज्ञांचे फोटो दाखवायला सुरुवात केली. साराभाई, तरुणपणी चे कलाम, बैलगाडी - सायकल वरून रॉकेट चे वाहून चालवलेले पार्टस...  
झालं, मला माझं वितळण काही केल्या आवरता येईना!  

"बाप" ह्या प्राण्याला असं व्यक्त होण्याची मुभा नसते, कोणास ठाऊक कोणी भरवून ठेवलं होतं अगदी लहानपणापासून!  

मी आपली त्याची नजर चुकवून उगीच कडेवर घेतलं त्याला आणि जिने उतरणाऱ्या गर्दीच्या मागे छोटी छोटी पाऊले टाकत पुढे निघालो..

त्याने त्याचे दोन्ही हात माझ्या गालावर ठेऊन, माझ्याकडे बघत आणि बहुतेक थोड्यावेळ विचार करून मला विचारले...
"बाबा! ते आजोबा कसे मुद्दाम पडले ना! " आणि सपशेल खोटं हसला... हसता हसताच माझ्याकडे पहात चापसून पाहिलं की मी हसतोय का!

मी काय होतं आहे हे उमजायच्या आतच हसून गेलो होतो आणि त्याच्या खोटं खोटं हसणाऱ्या चेहऱ्यावर "विषय बदलल्याचा" आनंद पाहताना एकदा तपासून घेतलं परत की कोण कोणाच्या कडेवर आहे.  

कौतुकातीरेकाने घट्ट जवळ ओढलं तर माझा pda पाहून ओशाळला होता तो..
#missionmangalyan 
#parenting 
#shortstories