गणपती बप्पा... मोरया!

गणपती बप्पा... मोरया!
नेहमीच्या रस्त्यांवरती एरवीच्या गर्दीमध्ये अगदी मध्यभागी असूनदेखील..
काचा उंच करून,
थंड उसासे सोडत,
तिच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणारा मी,
आणि
आज त्याच रस्त्यांवरती आजच्या ह्या गर्दीमध्ये 
टाचा उंच करून,
उष्ण उसासे सोडत,
पिल्लाला खांद्यांवर घेऊन तिचा एक भाग बनून बाप्पाचे दर्शन करवणारा मी!
कोण्या एका "'लोकमान्या" ने देव्हाऱ्यामधला देव, 
रस्त्यावरील मंडपामध्ये आणला आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी
गर्दीत राहूनसुद्धा एरवी गर्दीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करणारा एक 'मी'
आणि
अगदी असेच करणारे माझ्यासारखे लाखो 'मी'
आज तशाच मंडपांपुढे मध्यरात्री गर्दी करतात,
रस्ते अशा अनेक 'मीं'नी दुथडी वाहतात
तेव्हा मग 
माझ्या घरट्याचे क्षेत्रफळ, 
जागा, 
पगाराच्या आकड्यामधली तफावत, 
फिरायला वापरतो त्या वाहनांच्या चाकांची संख्या... 
काही काही  विषमता म्हणून राहत नाही!
मग धक्क्यांना वखवखलेला पण एक 'मी' मी असतो, 
अचकट विचकट गाणी लावणारा पण 'मी' एक आणि त्यावर अंगविक्षेप करीत नाचणारा एक 'मी' मीच असतो,
एक 'मी' पोरी-बाळींना घेऊन आलेला असतो,  
तर एक एरवी या वेळी मद्यधुंद होऊन मित्र-मैत्रीणींसोबत भलत्या ठेक्यावर नाचणारा असतो जो आज "bappa is so yo yaar! "म्हणत गर्दी झालेला असतो...   
एक गुन्हेगार मी असतो, 
एक भेकड मी!
एखादा मी निष्पाप श्रद्धाळू असतो 
तर एखादा बेदरकार आस्तिक मी!  
काही 'मी' तर फक्त व्हाट्सअँप स्टेटसच्या रेषाखंडाला उद्या ठिपक्यांची रांगोळी करायची म्हणून आलेले असतात,  
तर काही 'मी' घरीच थांबून माझ्यामधल्या थिल्लरपणाला थिल्लरपणा म्हणणारा एखादा थिल्लर लेख लिहिणार असतात!   
इतक्यात 'माझ्या' गर्दीमधला कोणी एक 'मी' मध्येच जणू प्रश्नच विचारतो,
"गणपती बाप्पा...? " 
आणि 'मी' माझ्या आजूबाजूच्या 'मीं'मधल्या,
एकसमान विषमतेबद्दलच्या विचारांना क्षणभरात दूर करून उत्तरतो 
"मोरया...! "