गोळ्याचा दगड

कथा - गोळ्याचा दगड 

     शेलारवाडी तशी मोठी होती. काही जुन्या गढ्या हे गावाचं वैशिष्ट्य. गावात चार-पाच  घरं शेलारांचीच. गावाच्या आजूबाजूला तीस चाळीस किलोमीटरच्या त्रिज्येत इतर काही ठिकाणीही जुने वाडे होते. जुन्या गढ्यांचा वारसा जपून ठेवायचा, अशी सरकारची योजना जाहीर झाली. जाहीर झाल्यानंतर सरकारी काम लवकर सुरु होत नसल्याने गढ्यांचे मालक सुस्तावलेले होते. अचानक, गढ्यांचं काम सुरु होणार असल्याची घोषणा झाली. रानात झाडाखाली झोपलेल्या माणसासमोर अचानक रेडा उभा राहिल्यावर तो जितक्या त्वरेने उठतो, तितक्या त्वरेने गढीमालक जागे झाले. काहींना वाटलं, जपणार म्हणजे फक्त येणार आणि थोडी साफसफाई करणार, एखादा चिरा कुठे ढासळला असेल तर तो लावून देणार व आपल्या हाती काही पैसे डागडुजीसाठी सोपवणार. सगळा खर्च सरकारच करणार आहे व चिऱ्यावर मारायला दिडकीही मिळणार नाही हे काहींना कळलं तेव्हा त्यांचा पचका झाला.  
       योजनेअंतर्गत परिसरातील सर्व गढ्यांचे सर्वेक्षण झाले. प्रत्येक मालकाला योजनेची माहिती दिली गेली. गढीची डागडुजी करून तीन बाजूंना एक रंग व गढीच्या दर्शनी बाजूला वेगळा रंग अशी योजनेत कल्पना होती. दर्शनी बाजू रंगवल्यानंतर कशी दिसेल, याचं कॉम्प्युटर चित्र प्रकल्प समन्वयक इंजिनिअऱ इनामदारांपुढं आलं तेव्हा ते प्रसन्न झाले. दर्शनी बाजूच्या सगळ्या दगडांना काळपट रंग द्यायचा व दोन दगडांमधल्या रेषेवर पांढरा रंग द्यायचा अशी कल्पना होती. सर्व गढी मालकांना ती प्रिंट पोस्टाने पाठवण्यात आली. ईमेलही करण्यात आली. इनामदारांना बांधकाम व रंगकामाव्यतिरिक्त लोकांच्या मागे लागून मालकांकडून मान्यतेच्या सह्या घेण्याचे कामही करावे लागले.  एकदा मान्यतापत्रे मिळाली की रंगकाम सुरु करता येणार होतं. 
       इनामदारांच्या हाताखालच्या मंजुरी अधिकाऱ्याने सर्व मालकांकडून मान्यतापत्रे आणली. एका मालकाच्या  सहीसोबत एक चिठीही दाखवली. त्यात लिहिलं होतं  - बाकी सगळं रंगवावं. माझ्या इथल्या एका दगडाला हात लावू नये.  
     इनामदारांना अर्थबोध झाला नाही. त्यांनी दुर्लक्ष केले. वेळापत्रकानुसार एकेका गढीच्या मालकाशी बोलणी होत होती. एके दिवशी ते त्या सहीवाल्या गढीजवळ सहाय्यकासह पोचले. आत  शिरले. समोर मालक शेलार बसले होते. प्राथमिक बोलणी झाल्यावर इनामदारांनी सांगितले की ते आठवडाभरात कामाला सुरवात करतील. 
    शेलार म्हणाले, "माझी सरकारला विनंती आहे, मी सांगितलेल्या त्या दगडाला हात लावायचा नाही. "
     इनामदार म्हणाले, " त्या दगडाला का हात लावायचा नाही ?"
    "तो वेगळा आहे."
    "तो दगड रंगवला नाही तर दर्शनी बाजू विचित्र दिसेल. फक्त तो दगड सोडून दर्शनी भाग रंगवायचा, असं करता येणार नाही. बाजूची भिंत असती तर तसंही केलं असतं पण ही पुढची बाजू आहे. तो का स्पेशल आहे ?"
    " आमची पुढची बाजू कशी दिसावी, हे आम्ही ठरवू. आमचं  आणि त्या दगडाचं नातं आहे. "
    "तुमचं आणि दगडाचं नातं?"
    "पणजोबांनी इंग्रजांशी युध्द केले होतं इथंच. दर्शनी बाजूपाशी. इंग्रजांकडून आलेला एक बॉम्बगोळा त्या दगडाला लागला होता. अजूनही तिथे ती खूण आहे. ती खूण बुजाया नको. "
    "अहो, त्याला किती वर्षं झाली आता. त्या दगडाचा एक ढपला निसटलेला दिसतोय खरा पण त्या खुणेला बघायला कुणी आलं होतं का इतक्या वर्षांमध्ये?"
    " मला काही माहीत नाही. हे पहा, तुम्हाला जे काही रंगकाम करायचं आहे ते दगड सोडून करा."  
      वाद घालण्यात अर्थ नाही, हे इनामदारांनी ओळखलं. काही काळ जाऊ दिला पण एकाच गढीत अडकून पडण्यात अर्थ नाही, हे ओळखून  इनामदारांनी दगड सोडून दर्शनी भाग रंगवला. ते पुढच्या गढीच्या कामात दंग झाले. कोणत्या तरी पेपरमध्ये त्या गढीचा फोटो या ओळीसह आला – इंग्रजांच्या काळातील बॉम्बगोळा लागल्याचा दगड. 
         झालं ! लोक गढी बघायला येऊ लागले. शेलार तर जणू काही त्यांनीच इंग्रजांशी युध्द केलं होतं, अशा थाटात माहिती देऊ लागले. जेवणाखाणाचीही शुध्द राहिली नाही. दगडावरची ती खूण फोटोत खऱं म्हणजे पुरेशी दिसत नव्हती. नुसताच खोलगट भाग होता. त्याचं रसभरीत वर्णन शेलारांना रोज करावं लागलं. 
        तो फोटो व्हायरलही झाला. बॉम्बवाला दगड म्हणून पसरला सगळीकडे. एक साधा दगड अनेकांसाठी सेल्फी पॉईँट ठरला. तिथे जाऊन आलेले लोक आम्ही दगड पाहिला, असं अभिमानानं सांगू लागले.  त्या दगडाची अनेक बारशी झाली. शेलारांचा दगड, पणजोबांचा दगड, दगडाची गढी, गढीचा दगड, गोळ्याचा दगड, दगडातला गोळा ...अशा वाटेल त्या नावाने फोटो पसरले.  घराघरात पणजोबा व दगड या शब्दांना खूप महत्त्व आलं.
        काहींनी तर कुठल्याही दगडाचे फोटो काढून त्यावर कॉम्प्युटरच्या साह्यानं खोलगट रंगवून ते व्हायरल केले. फोटो काढायला येणाऱ्या एकाने सांगितलं की, दगडावर गोळा लागल्याची जागा फार लहान आहे. त्यामुळे बघणाऱ्यांना लगेच लक्षात येत नाही. अजून चार पाच जणांकडून शेलारांच्या कानावर हे पडलं होतं. त्यांनी छिन्नी घेऊन तो छोटा इतिहास मोठा केला.
      या गढीची इतकी प्रसिध्दी पाहून एक-दोन मालकांना आपल्या वास्तूत काहीतरी कमतरता आहे असं वाटायला लागलं. सगळे शेलारांची गढी पाहायला जात आहेत आणि आपल्याकडे कोणीच फिरकत नाही, या भावनेने त्यांना न्यूनगंड आला. त्यातला एक मालक होता नागूजी सुभेदार. त्याचा वाडा होता. स्वतःच्या वाड्याचा इतिहास त्याला ठाऊक होता पण भरीव असं काही घ़डलं नव्हतं. तो रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्याच वाड्याची तपासणी करू लागला. त्याचा दूरचा नातेवाईक मुंबईहून राहायला आला होता. नागूजी भाच्यासोबत रोज गूगलही करू लागला.  
     "भाच्या, कॉम्प्युटर काही सांगतंय का ?"
     "आपण दोन दिवस झाले पाहतोय. अजून तरी काही सापडलेलं नाही."
     "मला आमच्या वाड्याचा पूर्ण इतिहास म्हाईत करून घ्यायचाय."  
     "मामू, तुझ्या वडिलांनी काही सांगितलं नाही? काकांनी?"
      "ते फारच थोडं. आता ते दोघंही हयात नाहीत आणि आता आहेत ती जिवंत माणसं सांगू शकत नाहीयेत. कॉम्प्युटरनं तरी काही सांगायला पाहिजे. तुझी मामी, पोरं मागं लागल्याती जाऊन इतिहास विचारून या म्हणून. एकदा का इतिहास कळला की, आमचंबी नाव व्हायरल होईल."   
      "  एखादं पुस्तक बिस्तक ऐतिहासिक?
      "  इतिहासाचं वावडं. दहावीनंतर मी जो काडीमोड घेतला तो आजपर्यंत. आता इतिहासचाच अभ्यास करावा लागतोय. मला सांग, व्हायरल होण्याकरिता कशाची जास्त गरज असती ? बेसिक रिक्यारमेंट कशाची असते ? अगदी गोळा नाही, साधी गोळी जरी कुठे लागल्याची खूण दिसली ना तर फत्ते."
     "इतिहास कशाचाही असतो. मामू, दुसरं काहीतरी पहा. बायाबिया, गंजलेली तलवार, खुंटी.."
    "खुंटी ?"
     "हो म्हणजे पूर्वीचे वाड्यातले सरदार आपला अंगरखा ज्या खुंटीवर काढून ठेवायचे ती खुंटी वगैरे. मी कुठेतरी वाचलं होतं की, मातीच्या कणाकणाला इतिहास असतो ..." 
          नागूजी स्वतःच्या वाड्याच्या इतिहासाच्या शोधात बाहेर पडलेला आहे व तालुकाभर हिंडत आहे. काहीही करून आपल्या वाड्यात इतिहास घडवलाच पाहिजे म्हणून तो इरेला पेटलाय.नागूजीसोबत आणखी दोन ‘होतकरू- वाडामालक आपल्या हाताला काही लागतंय का, हे पाहण्यासाठी जात आहेत. समन्वयक इनामदारांची प्रसिध्दी ‘ रंगवून देणारे अधिकारी’ अशी झाल्याने तो डोक्याला हात लावून बसलेत. आमच्या मुलांच्या खेळण्यातले घोडे रंगवून द्या, अशीही एक मागणी त्यांच्याकडे आली होती.तालुक्याच्या ठिकाणांच्या मोबाईल दुकानांची चलती झाली आहे. कोणत्या मोबाईलमधे जुन्या खुणा चांगल्या दिसतील, हे सांगण्यात विक्रेते मश्गुल आहेत. इतिहासाच्या प्राध्यापकांचा मुलांना यंदा कुठे न्यायचं, हा प्रश्न सुटलेला आहे. 

(समाप्त)