लवचिक तत्त्वे?

लवचिक तत्त्वे?
"काय तत्त्व तत्त्व लावलं आहेस रे मघापासून! 
तत्त्वांमागे फक्त ती षंढ लोकं लपतात ज्यांना कायम हवे ते केले असता होणाऱ्या परिणामांची भीती असते!"
ऍडव्होकेट जयराज सूर्यवंशी यांनी एक मोठा घोट घेत अबोला सोडला!
पुढचा घोट आत ढकलून, ते पुढे बोलते झाले
"योग्यायोग्य, नीती-अनीती हे सगळे आपापल्या वैयक्तिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं. 
चांगलं वाईटाच्या रेषा आपण आपले ठरवतो."
एव्हाना त्यांचा हा तिसरा होता, हव्या त्या प्रमाणात द्रव्य मिसळली, ती स्टरर ने हालवत पुढे म्हणाले
"सौंदर्यवतीला भिडणाऱ्या (कौतुकाच्या?) नजरा ह्या 
नैसर्गिक, 
आणि पाश्चात्त्यांची स्वैर वागणूक म्हणजे 
व्यभिचार!"
"काय योग्य? काय अयोग्य?"
त्यांना त्यांचेच म्हणणे मनापासून आवडत होते, उदाहरणे देताना विषयांचे रूळ सटासट बदलत आहेत, ह्याचे भान हरवण्यासाठी त्यांना त्या द्रव्याची चांगलीच मदत होत होती
"भ्रष्टाचाराविरुद्धच्या रॅलीसाठी जाताना पोलिसाने पकडले, 
तर 
५००-६०० रुपये देऊन सोडवून घेणारे आपण सगळेच 
स्वतःशीच आखलेल्या चांगल्या-वाईटाच्या रेषांना बिलगून असतो कायम!"
क्षणभर ही न थांबता 
ते प्रत्येक वाक्यामधून 
अजूनच उंच उंच विषयांना हात घालत होते,
श्रीलंकेचा तो प्रभाकरन, 
जर जिंकला असता तर राष्ट्रपुरुष झाला असता त्यांचा!
मग त्याने केलेल्या हत्या वगैरे सगळं काही 
"काळाच्या गरजेच्या" सदरात बसवलं असतं लोकांनी!
मला ह्यावर मान देखील डोलवता येईना, 
पण त्याची वाटही न पाहता ते पुढे म्हणाले,
"तत्त्व तत्त्व करणाऱ्या महात्म्याने सुद्धा 
नेहरूंना 'देशाला सैनिकी सबलता नको' असे म्हणत 
उपोषणे नव्हती केली कधी!"
मोठ्ठा श्वास सोडत, 
विषय पुन्हा रुळावर आणत त्यांनी 
आता निर्वाणीचे बोलायचे म्हणूनच की काय, 
पण एक मोठ्ठा घोट रिचवला,
आणि म्हणाले,
"तर मूळ मुद्दा हा, 
की जे गरजेचे वाटते ते करा, 
चूक बरोबर ठरवायला समाज आहेच बिनपगारी तत्पर!, 
यशस्वी झालात तर हिच लोकं गोळा होऊन सत्कार करतील 
आणि 
बसवतील सगळे तथाकथित अयोग्य गोंडसशा एखाद्या तत्त्वज्ञानामध्ये!"
मी निमूटपणे, 
महात्मा गांधी, 
नेहरू 
अगदी तो प्रभाकरन 
आणि 
कोण ती अज्ञात सौंदर्यवती 
ह्या सगळ्यांचीच मनातल्या मनात माफी मागितली, 
आणि
वेटरला बिल आणायला सांगितले!