हातांची स्वच्छता आणि सॅनिटायझरचा वापर

सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विज्ञानकेंद्र या माहितीस्थळावरून प्रसिद्ध झालेला हा लेख विज्ञानकेंद्राच्या संमतीने इथे देत आहे.

हँड सॅनिटायझर कधी, कशासाठी ?

आपण मुख्यतः हाताने इकडेतिकडे स्पर्श करतो, म्हणून जो काही जंतूंचा संसर्ग झालेला असतो, तो धुवून टाकावा. त्यातील जंतू मारून टाकता आले तर उत्तमच. नुसत्या पाण्याने हात धुवून तो जंतू हातावरून जाईल, पण खात्रीने नव्हे. शिवाय तो बेसिनच्या भांड्यावर किंवा बाथरूमच्या फरशीवर जर राहीला तर धोका शिल्लक राहीलच.
म्हणून साबणाने, डिटर्जंटने, हॅंडवॉशने हात चोळून बोटांच्या बेचक्यात, तळहात, हाताची मागची बाजू आणि नखांच्या खाचा व कोपरे नीट स्वच्छ करणे हे उत्तम.
ज्यांना दिवसातून मोजक्याच वेळेला बाहेर जावे लागते, किंवा मोजक्याच वेळेला बाहेरच्या वस्तू, माणसांशी संपर्क येतो. त्यांना हा उपाय चांगला आहे.

पण ज्यांना अनेकदा असा संपर्क येतो, त्याना दिवसातून अनेक वेळा असे हात धुणे शक्य होत नाही, त्या लोकांना बाजारात हँडसॅनिटायझर म्हणून जो द्रव पदार्थ मिळतो तो वापरावा लागतो.

हँड सॅनिटायझरमध्ये काय व का असते ?
सर्वप्रथम हे स्पष्ट करावे लागेल की हा लेख हँड सॅनिटायझरमध्ये काय असते व ते का असते याची माहिती देण्यासाठी आहे. ही माहिती वापरून हँड सॅनिटायझर तयारही करता येऊ शकेल. पण त्यासाठी जी रसायने लागतात त्याची काही जणांना ऍलर्जी असू शकेल, काही रसायने ज्वालाग्राही आहेत आणि काही रसायने विशिष्ट रसायने विकण्याचा परवाना असलेल्या दुकांनातूनच खरेदी करावी लागतील.
थोडक्यात, या माहितीचा वापर करून व्यवसाय सुरू करणे अजिबात अभिप्रेत नाही. व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, परवाने आदी मिळवणे ही संपूर्णतया त्या व्यक्तीची जबाबदारी राहील.
या माहितीचा वापर कुणाला घरच्याघरी हँड सॅनिटायझर तयार करण्यासाठी करायचा असेल तर तेही संपूर्णतया वैयक्तिक जबाबदारीवर करावे. लेखक आणि/अथवा विज्ञानकेंद्र त्यासाठी कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत.

करोनाचाच नव्हे तर बहुतेक सारे विषाणू हे सजीव-निर्जिवाच्या सीमारेषेवरचे जीव आहेत. अनुकुल वातावरणात ते वाढतात, पुनरुत्पादन करतात. पण प्रतिकूल परिस्थितीत त्याचे स्फटिक-सदृश पदार्थात रुपांतर होते. पुन्हा योग्य परिस्थिती आल्यास ते पुन्हा क्रियाशील होऊ शकतात. शरीरातील प्रतिकार शक्तीने शरीरातील विषाणु निष्प्रभ करता येतात पण बाहेरील त्वचेच्या पृष्ठभागावरचे विषाणु नुसत्या पाण्याने धुवून मरत नाहीत.
साबण किंवा अपमार्जके वापरल्यावर विषाणुची बाहेरील भिंत (पेशी भित्तिका) त्या साबणाच्या द्रवात विस्कळीत होऊन फुटते आणि विषाणू मरतो. मग तो विषाणू सजीव असो वा स्फटिकसदृष. म्हणून साबणाने हात धुणे हे परिणाम कारक ठरते.

दुसरा पर्याय म्हणजे अल्कोहोल वर्गातील द्रवपदार्थ वापरणे.

सहजासहजी हवेतील तापमानाला उडून जाणारी तीन प्रकारची अल्कोहोल असतात मिथेनॉल (मेथिल अल्कोहोल ), इथेनॉल (एथिल अल्कोहोल ) आणि प्रॉपेनॉल (प्रॉपिल अल्कोहोल).
या द्रवांपैकी मिथेनॉल व इथेनॉल विकण्यावर व खरेदी करण्यावर काही कायदेशीर बंधने आहेत. तसेच ते सहजासहजी बाजारात उपलब्ध नसते. त्यामुळे ती वापरण्यात व्यावहारिक अडचणी आहेत. म्हणून हँडसॅनिटायझरमध्ये प्रॉपिल अल्कोहोल वापरतात.

प्रॉपिल अल्कोहोलचे दोन प्रकार असतात. एन् प्रॉपिनॉल आणि दुसरे आयसो प्रॉपिनॉल.
आयसोप्रॉपिनॉल हे इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करण्यासाठी आय.पी.ए. या नावाने द्रव वापरतात.
इथून पुढे जिथे प्रॉपिनॉल असे लिहिले असेल तिथे एन प्रॉपिनॉल, आयसो प्रॉपिनॉल किंवा त्यांचे कुठल्याही प्रमाणातले मिश्रण अभिप्रेत आहे. म्हणजे, १५० मिली प्रॉपिनॉल असे लिहिले असेल तर ते १५० मिली एन प्रॉपिनॉल किंवा १५० मिली आयसो प्रॉपिनॉल किंवा या दोन्हींचे कुठल्याही प्रमाणातले १५० मिली मिश्रण यातील काहीही असू शकते. रासायनिकदृष्ट्या त्यांचे कार्य सारखेच होते.

या प्रॉपिनॉलने काय साध्य होते? तर सजीव विषाणू मरतात. पण त्यांतील जे स्फटिकसदृष आहेत त्यांना काहीही होत नाही. त्यांच्या नायनाटासाठी साबण गरजेचा आहे. आणि साबण जरी प्रॉपिनॉलमध्ये विरघळत असला तरीही पेशीभिंती फोडून विषाणूंचा समूळ नायनाट करण्यासाठी साबणाला पाण्याची गरज लागते.

या साबणाचे प्रमाण किती असावे? तर मिश्रणाच्या ०.५% साबण व ०.५% पाणी. हा साबण अंगाचा साबण पाहिजे, कपड्यांचा नव्हे.
म्हणजे आपण ९९% प्रॉपिनॉल, ०.५% साबण व ०.५% पाणी हे एकत्र केले तर सॅनिटायझर तयार होईल का? तर हो. पण इथे अजून काही अडचणींचा सामना करावा लागतो.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठलेही अल्कोहोल त्वचेच्या संपर्कात आले तर त्वचा कोरडी पडेल, त्यावरील उपयुक्त पेशीही मरतील आणि त्यामुळे त्वचेचा दाह होईल.

त्वचा कोरडी पडू नये म्हणून काय करावे लागेल?
त्यासाठी ग्लिसरीन (वा ग्लिसेरॉल) नावाचे रसायन वापरावे लागेल. त्याचे प्रमाण किती लागेल? तर मिश्रणाच्या ३%.
म्हणजे आता ९६% प्रॉपिनॉल, ३% ग्लिसरीन (वा ग्लिसेरॉल), ०.५% साबण आणि ०.५% पाणी असे मिश्रण केले तर?
आता त्वचा कोरडी पडण्याचा प्रश्न सुटला तरीही त्वचेवरील उपयुक्त पेशी मेल्याने त्वचेचा दाह होण्याचा प्रश्न तसाच राहील.

त्यासाठी अल्कोहोल (प्रॉपिनॉल) चे प्रमाण कमी करावे लागेल. कमी म्हणजे किती? तर ७५% पर्यंत. त्यापेक्षा कमी प्रमाणात अल्कोहोल वापरले तर ते प्रभावी ठरणार नाही.

हे प्रमाण कमी करण्यासाठी काय वापरता येईल? तर शुद्ध पाणी (गाडीच्या बॅटरीत घालण्यासाठी वापरतात ते डिस्टिल्ड वॉटर). शिवाय पाण्याची किंमत अल्कोहोलच्या किंमतीपेक्षा खूपच कमी असल्याने हँड सॅनिटायझरच्या तयार करण्याच्या खर्चातही घसघशीत बचत होईल.
म्हणजे ७५% प्रॉपिनॉल, २१.५% शुद्ध पाणी, ३% ग्लिसरीन (वा ग्लिसेरॉल), आणि ०.५% साबण याने हँड सॅनिटायझर सिद्ध होईल.

गरजेप्रमाणे, व त्यातील रसायनांची क्षमता विस्कळीत न करता, त्यात रंग आणि / वा वास घालता येईल. पण त्याबाबतीत व्यावसायिक उत्पादक आपापले आराखडे मांडतात.

समारोप
हँड सॅनिटायझर कधी वापरावा? तर साबण-पाण्याने हात धुणे दरवेळी शक्य होत नसल्यास. हा सॅनिटायझर हाताला व्यवस्थित चोळून त्यातील अल्कोहोल (प्रॉपिनॉल) पूर्ण उडून जाईपर्यंत वाट पाहावी आणि मग परत कामाला लागावे. अल्कोहोल पूर्ण उडून जाण्यासाठी दहा ते पंधरा सेकंद पुरतात.
सॅनिटायझर वापरल्यावर हात पाण्याने धुऊ नयेत. त्याने सॅनिटायझर वापरण्याच्या हेतूलाच हरताळ फासला जाईल.
सॅनिटायझर वापरल्यावर साबण-पाण्याने हात धुतले तर आरोग्यदृष्ट्या चालेल. पण तो दोन्ही गोष्टींचा अपव्यय ठरेल.