आमरस आणि कर्मदाळीद्र्य

आमरस आणि कर्मदाळीद्र्य
ह्या मोसमामधला पहिला अंबा घरी आला! 
वाटी भरून आमरस! 
हात सुद्धा लावू वाटतं नाहीत काही अन्नपदार्थ मला, 
फक्त 
"संपतील खाल्लं तर!" 
एवढ्याच भीतीने! 
आमरस हे त्यांमधलंच एक प्रकरण! 
अगदी उच्च म्हणताना थोडी लाज वाटेल 
आणि 
फक्त मध्यमवर्गीय म्हणावं तर काही कमी वाटेल 
असाच आतापर्यंतच वारसा.
बाजारात आंबे आहेत, 
आणि 
घरी नाहीत 
असे जवळ जवळ अशक्यच! 
त्यात मामाकडे बेदम मोठी आमराई. 
आमरसाने अंघोळ करावी 
इतक्या विपुल प्रमाणात अगदी रत्ना हापूस 
नशिबात अगदी लहान असल्यापासूनच होता !
पण काही 'संस्कार' हे कोणी कधी न शिकवता 
असे चिकटतात की कोणतीही परिस्थिती ते बदलू शकत नाही! 
"मला एक वाटी आमरस ४ चापत्यांसोबत पुरतो."
ह्या विधानाचा मला सुप्त अभिमान आहे! 
मला नाहीच भरभरून घेता येत घास त्याचा! 
घरी अगदी रांजणभर असू देत आमरस, माझं आपलं लावू लावू चाललं असतं. 
भले चार चपात्या जास्त खाईन 
पण आहे म्हणून उगीच माज नाही होणार माझ्या कडून!
चोखून खावा तर कोय टकली होईपर्यंत... 
आधी आई 
आणि 
आता बायको पण म्हणते, 
"अरे, खा की जरा नीट!" 
(दोघींचं टोनिंग वेगवेगळं असतं, पण विषय तो नाही) 
मुद्दा हा की काही गोष्टींचं मूल्य असं बसलंय घट्ट आत की 
ते नाहीच जात....
आधी वडील आणायचे तेव्हा, 
आता मी आणतो तेव्हा 
पैशांचा सर्वसामान्य करतात तेवढा विचार इतर बाबींत नाही होत 
तर इथे कसा होईल? 
त्यामुळे बहुधा तो मुद्दा सुद्धा नसावा! 
इंजिनीअरिंग कॉलेज ला मला आठवतंय, 
कुठल्याश्या खानावळी मध्ये 
unlimited आमरस वाटी सुरू केली होती. 
ईश्वर साक्ष आहे, 
२०-२० फुलके हाणले आहेत आम्ही एका बैठकीत... 
पण तेव्हा पण माझं आपलं लावू लावू... 
कधी कधी, आमरस खात असताना वाटतं, 
"ह्यालाच बहुतेक खरे प्रेम म्हणत असावे!" 
आणि 
आमरसामुळे जेवण जरा जास्त झालं की वाटतं
"अरे गाढवा! कर्म दालिद्र्या म्हणतात याला!"