खान काकांस पत्र!

खान काकांस पत्र,
खूप वर्ष एका ठिकाणी राहिलो की आपल्याही नकळत आपोआप काही नाती घट्ट होतात. पाटील काका - राज स्टोअर्स वाले - असेच एक. 
ह्या साथीमध्ये, बाहेर पडणं निषिद्ध झालं तसं आपोआपच त्यांना फोन केला. 
आता ते आधीच सामान बांधून ठेवतात, मग फक्त गाडीने जायचे आणि सामान घेऊन यायचे. हे अगदी सोयीचे होते.
परवा गेलो, तर ते तिथल्या मुलाला उद्देशून म्हणाले, 
"मन्सूर",  "ते पलीकडले ते त्यांचे आहे, दे त्यांना! "
नाकातून एरवी श्वास घेताना,
जात धर्म काय लिंग देखील ध्यानी येत नाही इतकं सहज चालते ते, 
तितकाच सहज एखादे नाव एरव्ही ऐकून सुद्धा मनाच्या कोपऱ्यात त्याची वेगळी दाखल घ्यावीशी नाही वाटत! 
पण सगळीकडे होत असलेल्या चर्चा आणि पाहिलेले व्हिडिओ आठवले, आणि 
"मन्सूर" 
हे नाव कुठेतरी नमूद झाले! 
कुठल्या धर्मविशेषावर नाही, पण एकंदरीत माणुसकीवरच असलेल्या विश्वासाने मुकाट्याने सामान घेऊन निघालो! 
आंबे सुद्धा घ्यायचे होते रस्त्यात.
दर मोसमाला, ठेवणीतल्या झाडाखाली उभ्या एका इसमाकडून घेतो मी आंबे! 
तो ह्या साथीच्या काळातसुद्धा तिथे होता, 
आता "शोधत बसावे लागणार नाही"  ह्या विचाराने बरं वाटलं.
२ डझन घेतले. 
ठरलेले पैसे गूगल पे ने दिले; तर नाव 
"आदिल खान"
परत तीच घालमेल! 
"पत्रास कारण की..." 
ह्यानंतर एका वाक्यात संपणारा आशय थोडा लांबला कारण घुसमट सरळसोट व्यक्त नाहीच होत मुळी कधीच!
असो! 
तर पत्रास कारण की, 
हे सगळे घेऊन घरी आलो आणि कुठलेही कारण न सांगता, 
बायकोला म्हणालो, 
"आंबे गरम पाण्यात ठेव रात्रभर! मगच घे रसासाठी"
निर्मितीत्याने योजलेल्या ह्या निघ्रुण घातपातामध्ये जर काही धर्मविशिष्ठ माथेफिरू जाणीवपूर्वक भर घालत असतील 
तर 
खरं म्हणजे मी निर्विकारपणे त्यांना - कसलीही शहानिशा न करता - टाळायलाच हवे.
पण तरीदेखील थोडे अपराध्यासारखे वाटले, म्हणून हा पत्रप्रपंच! 
मला पूर्ण कल्पना आहे, की तुम्ही सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. 
पण उद्या, 
माझ्यामधली अपराध्याची भावना जाऊन मी निर्विकारपणे जाणीवपूर्वक टाळायला लागलो, 
तर आपण 
"आधी कुठेतरी बोललेलो आहोत हे सगळं!"
कदाचित ह्याचं समाधान मला मिळेल तेव्हा. 
आता 
"ह्यावर काय करायचं?"
"आम्ही तसे नाहीत" 
"हे सर्वसामान्यांना कळावे म्हणून तिरंगी टोपी घालावी की काय?"
वगैरे विडंबनात्मक विचार आलेच तुमच्या डोक्यात तर खरे म्हणजे त्याला माझा नाईलाज आहे. 
उपाय कळण्याइतका मोठा आणि प्रगल्भ मी नाही. 
पण एकच सांगावेसे वाटते की
हे असे करताना,
अपराध्याची भावना जरी लुप्त झालेली असली,
तरी कोणता राक्षसी आनंद देखील होणार नाही तेव्हा एवढा विश्वास आहे!