एक पाणचट सकाळ!

आज मी तुमच्या समोर काही गुन्ह्यांची कबुली द्यायला आलेलो आहे
गुन्हा क्रमांक १ 
ह्या संचारबंदीच्या काळात 
रिकामे नाहीच बसायचे, प्रतिकारशक्ती वाढवायची म्हणजे व्यायाम नको का करायला? वगैरे सुज्ञ विचारांना रोज नवे नवे पदार्थ उडवताना नाही म्हणजे नाहीच केलेला व्यायाम!
गुन्हा क्रमांक २  
एरवी मावशी झाडतात पुसतात तेव्हा त्यांना उड्या मारू मारू दाखवलेले आणि ह्या काळात दुर्लक्षलेले आणि म्हणून थोडे गडद झालेले
घरामधले कोपरे! 
आणि
गुन्हा क्रमांक ३
सोसायटीच्या व्हाट्सअँप ग्रुपवरती चाललेल्या घटणा पाहुन "एवढं साधं कसं कळत नाही लोकांना? " अशा आशयाच्या खाजगीत चवीने मारलेल्या गप्पा...  
आज सकाळी देवाने ह्या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र सूड घ्यायचा ठरवला होता बहुतेक!  
कारण "समुद्रवसने देवी, म्हणत पाय बेडखाली घेतले ते पडले  थेट ३ एक इंच साठलेल्या घरभर पसरलेल्या पाण्यात!  
एरवी बंद असलेली पाण्याची तोटी सुरू राहिली होती आणि सकाळी तासभरच येणाऱ्या पाण्याने घराचे तळे झाले होते.  
"आता काय करायचे? "
अशा नजरेने बायकोने आपल्याकडे पाहायचे प्रसंग तसे कमीच येतात.  
२०-२० पीएचडी होल्डरर्स होते आम्हाला इंजिनीअरिंगला, तरिसुद्धा कोणतीही पुस्तकी दीक्षा स्मरता स्मरेना!  
मग,  
"प्रसंग कितीही बाका असला तरी शांत राहायचे! " 
ही एकमेव शिकवण त्या गुरूमाऊलींनी त्यांच्याही नकळत दिली होती,  
ती आपोआप कामी आली!  
बाकी एक आहे हं,  
छोटं आणि अचूक करायचं असलं की घरामधलं कुठलं ही काम घरामधल्या पुरुषाला स्त्रीच्या अपेक्षेप्रमाणे जमणे जवळ जवळ अशक्य...  
म्हणजे,  
कॉलेजात बादलीभर कपडे सुमार प्रतीने का होईना धुण्याचा अनुभव असलेला इसम नवरा झाला की ह्या बाबतीत अगदी निरुपयोगी असतो. कारण पूर्वी धुवायचा त्याहून कमी कपडे पण कामाचा दर्जा चांगला राखायचा हे सूत्र त्याला पचणारे नसते 
नेमके तसेच, महिन्याभराचा किराणा भसाभसा आणून ओतायला त्याला अडचण नसते. पण ठराविक कंपनीची, ठराविक रंगाच्या पाकिटामध्ये मिळणारी, ठराविक स्त्रीचे चित्र असलेली, ठराविक प्रमाणात आणायला सांगितलेली मेंदी ही - दुकानात पोहोचेपर्यंत सगळ्या सूचना विसरून "थोडी मेंदी द्या हो! " इथवर प्रकरण घसरू शकते...  
घराच्या एका कोपऱ्यातल्या एका भागाला स्वच्छ करा म्हटलं की नवऱ्याला काटा येतो अंगावर...
पण छज्ज्यावरचा सगळा पसारा काढा म्हटलं की भसाभसा काढलाच म्हणून समजा!  
थोडक्यात सगळ्या घरभर झालेले पाणी हे  अर्थात "नवरा" डिपार्टमेंट होते! त्यामुळे "आता काय करायचे? " अशा नजरेने पाहणाऱ्या बायकोला जबाबदारीपूर्ण उत्तर देणे गरजेचे होते.  
उसनं अवसान हे अभियांत्रिकीत आणि फाजील आत्मविश्वास पुढे नोकरी करताना चांगलाच कमावला असल्याने, धडाधड आदेश दिले. प्रसंग बाका असेल तर शक्यतो लोकांचे आदेशामागील तर्कांकडे दुर्लक्ष होते.   चादरी, टॉवेल्स, बादल्या पायपुसणं जे मागेल ते क्षणार्धात मिळायला लागलं.  
अपघाताने आलेल्या ह्या नेतृत्वातून  काहीतरी करणे क्रमप्राप्तच होते.  
"उंबरा" नावाच्या प्रकाराला असेलसुद्धा बरं का सांस्कृतिक वगैरे महत्त्व! पण साडेतीन इंच उंच फारश्या आडव्या चिटकवलेल्या ज्या मॉडर्न उंबरा म्हणून पचवल्या होत्या इतके दिवस त्यांनी बेदम म्हणजे बेदमच त्रास दिला! एरवी बाथरूम मधले पाणी  बाहेर येऊ नये म्हणून बसवलेल्या ह्या फरशांनी बाहेर साठलेले पाणी बाथरूममध्ये जाण्यापासून व्यवस्थित अडवले! आणि तत्सम हॉलच्या दाराला लावलेल्या फारशीने मात्र सरळ हार पत्करली! म्हणजे पाणी  हॉलच्या दाराखालून बाहेर जाऊन शेजारच्यांच्या दाराखालून तिथल्या फारशींशी संगनमत साधून सरळ त्यांच्या घरात घुसलेले!   
सकाळी उठल्यापासून चहाचा सुद्धा विचार नव्हता आला  फोनमधले मेसेजेस कुठून पाहणार! एरवी आम्ही खाजगीत लोकांच्या गाढवपणावर केलेल्या टिका ह्यावेळी आमच्यावर सोसायटीच्या व्हाट्सअँप ग्रुपवर सार्वजनिकपणे झालेल्या होत्या! पाणी  रिचत रिचत आमच्या बाराव्या मजल्यावरून आठव्या मजल्यावर पोहोचले होते. स्वात:च्या गाढवपणावर इतके वैतागलेलो आम्ही; 'दुसऱ्याच्या गाढवपणावर बाकी सदस्य किती वैतागले असतील' ह्याची फक्त कल्पनाच करू शकत होतो!
 
पण बाकी सगळं सोडून जंगी शारीरिक मेहनत सुरू केली. गाढवणाला शिक्षा ही  ढोरमेहनतच असू शकते.  
चादरीचा गुंडाळा करून इथून तिथून पाणी  ढकलत ढकलत बाथरूमपर्यंत हाकून हाकून घामाघूम झालेलो मी,  
"हम पे ये किसने... " वाली माधुरी झालेली बायको.. एकंदरीत ती सकाळ फारच पांचट झाली होती!   
त्यात  
घसरून पडून झालं,
गुडघा आपटून सुद्धा दिवसा चांदण्या दिसू शकतात ह्याचा शोध लागून झाला!  
हे सगळं सुरू असताना मुलाच्या दिव्य शंकांचा भडिमार सुरूच होता
"बाबा स्विमिंग टॅंकमध्ये पण असतं की पाणी, मग इथे झालं तर काय प्रॉब्लेम आहे! "
मी बघून ठेवलं आहे,
बिकट परिस्थिती आणि मुलांच्या शंकांमधली क्लिष्ठता हे सामान प्रमाणात बदलतात..
आता हा संवाद पहा 
त्याच्या आईचा त्याला सल्ला : "यश पाण्यात उतरू नकोस ते घाण आहे! " 
तो: बाबा??  
मी : (वास्तविक आईच्या सूचनेला शंका आईला विचारायला हवी) (पण त्या वादात न पडता बेडशीटने ओढून पाण्याला बाथरूमकडे वळवता वळवता) बोल!
तो : पाणी  घाण कशाने झाले?
मी : (मी किती कष्ट घेत आहे हे बायकोला कळावे ह्या बिलंदर उद्द्येशाने) अरे, माझा घाम पडतोय ना त्यात!
तो : (त्याच्या आईने पायपुसणं  पिळलं होत एका बादलीत, मळलेल्या पायपुसण्यामुळे बादलीमधलं पाणी चांगलंच पिवळं पडलं होत, त्याच्याकडे बोट करत) मग इथे काय केलंस तू?
वास्तविक ह्यामध्ये निरागसता की  काय म्हणतात ते शोधावे शोधणाऱ्याने पण माझी सद्यपरिस्थिती बघता माझ्याकडून तरी अपेक्षा परमेश्वराने करायला नको होती... हातामधली ओली चादर फेकून मारावी अशाच विचारात होतो मी पण त्याने अजून वाढणारे काम डोळ्यापुढे आणले आणि बायकोच्या दूरच्या चुलत बहिणीच्या मुलाच्या मुंजीत एखाद्या अनोळखी आजोबांनी हसून पाहिल्यावर आपण जसे प्रचंड प्रेमाने हसतो तसे हसलो!
व्हॅट्सऍपवर अजिबातच प्रतिसाद नाही म्हंटल्यावर एव्हाना बेदम संतापलेले शेजारी जाब विचारायला येऊ लागले... पण दार उघडल्यावर माझा एकंदरीत अवतार पाहून  "ह्याला आता काय बोलायचे? " असे म्हणून परतत होते!   सेक्युरिटी गार्ड सुद्धा एरवी जो ऑफिस च्या कपड्यात रुबाबात गाडी बाहेर काढताना आदरपूर्वक नमस्कार करायचा तो, "आयला, तुम्ही पण यडेच निघालात! " करून गेला होता!  
सांगायचे काय तर बाका प्रसंग सुरुवातीला सांगितलेल्या तिन्ही गोष्टींचा यथेच्छ सूड उगवून कसाबसा सरला!
पाणी ढकलू ढकलू साडेदहा झाले!  
"कर आता चहा! " अपघाताने आलेले नेतृत्व शिताफीने निभावून झाल्यावर विजयी सुरात मी फर्मान सोडले!  
बायकोने किचन ट्रॉली ओढली आणि पाहते तर काय सिंकभरून ओट्यावर पसरलेले पाणी झिरपून सगळ्या किचन ट्रॉल्यांत गेले होते. आणि आतमधली सगळी सरळ ठेवलेली भांडी तुडुंब भरली होती!  
तिच्या ह्या वेळेसच्या "आता काय करायचं? " कडे  संपूर्ण दुर्लक्ष केले!