मोनीचे लग्न

  सध्या लग्ने जमायला वेळ लागत असला तरी एकाच लग्नाच्या गोष्टी दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट वगैरे सारख्या चालूच आहेत.आणि त्यातही नवरा नवरी समोर असताना आणि एकमेकाला लग्न करायाचे आहे असे सांगत असतानाही लग्न लांबत जाते व  "आता केव्हां एकदा लग्न होतेय ?" असे म्हणण्याची पाळी   दर्शकांवर म्हणजे आपल्यावर येते..सुदैवाने आमच्या घरात कोणी लग्नाचे नसल्यामुळे जवळपासच्यांच्याच लग्नाच्या चर्चा ऐकायला मिळतात आणि त्यांच्याकडे मुलगा असेल तर मुलाचे आणि मुलगी असेल तर मुलीचे लग्न जमणे किती कठीण आहे हेच ऐकायला मिळते,म्हणजे पूर्वी मुलीचे लग्न जमणे हे एक अवघड काम असे वाटे आणि त्यामुळेच बाळकराम(गडकरी) आणि चिमणराव(चिं.वि.जोशी) यांना त्यावर विनोदी कथा /लेखही लिहिता आले पण आता मुलाचे किंवा मुलीचे लग्न एकदम फटकन जमून तरी जाते नाही तर मारुतीच्या शेपटासारखे लांबतच रहाते आणि हल्ली पालकांनाही त्याचे फारसे काही वाटेनासे झालेले दिसते.आणी असेल माझा हरी तर देईल बाजल्यावरी या म्हणिप्रमाणे असेल तिच्या किंवा त्याच्या नशिबात तर होईल त्याचे/तिचे लग्न असा विचार करताना ते दिसताहेत  त्यामुळे माझी भाची गीताच्या (म्हणजे तिच्या नवऱ्याच्या )पुतणीनं स्वत:चे लग्न जमवलं हे ऐकायला फार बरं वाटलं. 
         त्यादिवशी गीताचा फोन नेहमीप्रमाणे घाईघाईतच आला आणि मामी घरात असल्यामुळे मामाला म्हणजे मला घेण्याचे कारण पडले नाही.फोन बराच वेळ चालला होता व तिने मामाचा उल्लेख केल्यामुळे सौ.वतीने तो मलाही ऐकू यावा या कनवाळू दृष्टीने स्पीकरवर चालू ठेवला.
    "मामी आम्ही पुण्यास येतोय,शनिवारी " गीताच कायपण  हल्ली जो तो कामाच्या ओझ्याखाली इतका रगडून निघतोय की फोनवर बोलतानाही कमीतकमी वेळात जास्तीतजास्त शब्द कसे बोलता येतील त्याचबरोबर कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ कसा मावेल या दोन्हीचाही विचार त्याना करावा लागतो.त्यामुळे पुढे मामीला काही बोलू न देता तिनेच चालू ठेवलं,"मोनीनं आपलं लग्न ठरवलंय,नवरा तिच्याच ऑफिसमधला पुण्यातलाच आहे.तिनंच ठरवलंय. त्यामुळं मुलाकडील माणसांना भेटायला व पुढचा विचार करण्यासाठी आम्ही येतोय .पण एक प्रॉब्लेम म्हणजे वराकडील मंडळी लिंगायत आहेत म्हणजे मराठी बोलतात,पण तरी भूषण (म्ह.गीताचा नवरा )कडील लोक बिहारी व आता ही मंडळी लिंगायत त्यामुळे त्यांच्या पद्धती वगैरे---" "त्याचा इतका बाऊ करायचं कारण नाही,"स्पीकरवर बोलणे चालू असल्याने मी मध्येच चान्स घेतला,"मुलानं व मुलीनं एकदा ठरवलेले असेल तर सरळ त्या पार्टीला त्यांच्या काय पद्धती आहेत हे विचारून सगळं कागदावर लिहून दोन्हीकडच्या माणसांच्या सह्या घ्यायच्या,बस्स " एवढं मोठ्ठं वाक्य मला बोलून दिल्यामुळं मला बाजूला सारत,"त्यांचं काही फार मनावर घेऊ नको " असं म्हणत मामीन फोनचा ताबा घेतला  माझे तेथील अस्तित्व अपेक्षित नसल्याचा धडा घेऊन मी माझ्या कामाला लागलो व अर्थातच मामीने स्पीकर बंद करून गीताशी गुफ्तंगू सुरू ठेवले.
   गीताचा नवरा भूषण त्याच्या पाच भावात सर्वात अधिक कर्तबगार व त्याला बायको (कर्तबगार मामाची तशीच भाची) ही तशीच मिळाल्यामुळे व सुदैवाने केवळ स्वत:पुरता पहाण्याचा तिचा स्वभाव नसल्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या त्या आपल्याच असे ती समजते.त्यामुळे त्याच्या भावाच्या ह्या मुलीची व तिच्या धाकट्या बहिणीचीही शिक्षणाची जबाबदारी तिनेच उचलली.त्यामुळे व त्याचबरोबर भूषणचा भाऊ वारल्यामुळे आता लग्नासाठी सुद्धा पुढाकार गीतालाच घ्यावा लागणार होता.त्या मुलीचे शिक्षण गीताने पूर्ण केल्यावर आता ती पुण्यात नोकरी करत होती व तिच्याच ऑफिसातील या मुलाशी तिने लग्न जुळवल्याचे कळल्यावर लगेच आता पुढील जबाबदारी आपलीच असे समजून गीता कामाला लागली होती.
  मुलाचे आई वडील सध्या बेळगावला असतात पण वडिलांची नोकरी पूर्णपणे पुण्यात झाल्यामुळे पुण्यात विमाननगरला त्यांनी घर बांधले आहे. पण ज्या काळात त्यांच्या मुलानं  रजनी गंधा म्हणजे मोनी ( हे तिचे लाडाचे नाव) ह्या भूषणच्या पुतणीशी सूत जमवले त्या काळात ते बेळगावलाच असल्यामुळे  ती पण विमाननगरलाच रहात असली तरी त्यानी तिला व तिने त्यांना म्हणजे बसव ( हे मुलाचे नाव)च्या आईवडिलांना पाहिलेच नव्हते ते. त्यामुळे मुला मुलीव्यतिरिक्त दोन्ही कुटुंबातील बाकी सर्वच जण एकमेकास अपरिचितच होते. 
     गीताने पुण्यात आल्यावर फोन करून शनिवारचा कार्यक्रम कळवते असे सांगितले.व जसे मोनीच्या बाबतीत गीताचाच पुढाकार अपेक्षित होता तसा आमच्या शनिवारचा कार्यक्रम ठरवण्यात मामीचाच पुढाकार अपेक्षित असल्यामुळे मी नेहमीप्रमाणे आज्ञापालनाच्या तयारीत राहिलो,तरी मध्ये एकदा माझ्या मित्राला फोन करताना अचानक तोही लिंगायतच आहे याची मला आठवण झाली त्यामुळे मी त्याला माझ्या नात्यातल्या एका मुलीन लिंगायत मुलाशी लग्न ठरवलं आहे असे सांगून , "अरे बरं झालां अनायासे फोनवर बोलतोच आहोत तर  तुमच्याकडे लग्नाची काय पद्धत असते  त्याविषयी जरा सांगशील का ?" असे मी विचारले आणि आता मामीपेक्षा मामा अधिक माहीतगार आहे असे भाचीला पटवण्यात मला यश येईल अशा  भ्रमात मी असताना ,"आता खरे सांगू-- मी इतकी लग्ने अगदी माझ्या लग्नासह पाहिली पण तरीही विधी वगैरेकडे माझे कधीच लक्ष नसते त्यामुळे याबाबतीत सांगण्यासारखे काही नाही" असे सांगून माझ्या मित्राने माझ्या अपेक्षांचा पार चुराडा केला.पण त्याचबरोबर आपल्यासारखाच कोणीतरी जगात आहे असा आनंदाचा प्रत्ययही  दिला.कारण मीही माझ्या लग्नासह इतकी लग्ने करण्यात भाग घेतला असला तरी एक मंगलाष्टके म्हणतात (कारण प्रत्येक लग्नात वधूवर व त्यांच्या नातेवाईकांची नावे एकत्र गुंफून मंगलाष्टके करण्याचे काम माझ्याकडे असते.) आणि नंतर गळ्यात हार घालतात आणि नंतर सगळे टाळ्या वाजवून लग्न लागले असे जाहीर करतात यापलीकडे माझ्या माहितीचीही मजल फारशी पुढे जात नाही.
        शेवटी शुक्रवारी भाचीचा फोन आला त्यानुसार ती आपल्या नवऱ्यासह मोनीकडे संध्याकाळच्या फ्लाइटने पोचली होती व शनिवारचा कार्यक्रम नवऱ्याच्या वडिलांच्या मते सकाळी दहा पर्यंतचा काळ राहूकाळ असल्यामुळे त्यानंतर म्हणजे साधारण अकरा वाजेपर्यंत त्यांच्या घरी जमायचे असे ठरले आहे .मी त्यातल्या त्यात आपण माहीतगार आहोत असे दाखवण्यासाठी शिवाय या वेळी फोन माझ्या हातात असयाचा फायदा घेत माझ्या पूर्वीच्याच सल्ल्याची उजळणी केली पण तिच्यावर ओझे वेगळेच होते हे तिच्या नंतरच्या बोलण्यावरून जाणवले ,"अरे मामा मला ती काळजी नाहीच.ती मंडळी फारच साधी आहेत.मोनीचीच आई ,बहीण त्यांच्या अतिसाधेपणाला नावे ठेवत आहेत.कारण त्यानी टी..व्ही.मालिकांतील लग्ने ,हाय फाय साड्या आणखी काय काय पाहिलेले आहे आणि ही मंडळी म्हणजे त्यांच्यापुढे अगदीच गावठी वाटतात.तरी मी मोनीच्या आईला समजावले आहे,की मुलीनं चांगलं लग्न जमवलं आहे तर आता तू त्यात मोडता घालू नको म्हणून"असे गीताने सांगितल्यावर  "अच्छा म्हणजे मुलाच्या बाजूकडील लोक काय म्हणतील याची तुला काळजी नाही,तर तुमच्याच लोकांकडून धोका संभवतो" असे म्हटल्यावर,"yes perfectly correct" असा तिने मला दुजोरा दिला.
   शनिवारचा दिवस या मोहिमेसाठीच आम्ही राखून ठेवला.गीता पुण्यातील तिची इतर काही कामे करून गाडी घेऊन येणार व तिच्याबरोबर आम्ही विमाननगरला जाणार असे ठरले.जरी उशीराची वेळ ठरली होती तरी सौ.ला लवकरच जाग आली अर्थात त्यामुळे मलाही तयारीला लागावे लागले.
         नऊ साडॅनऊला गीताचा फोन आला की तिची काही कामे होण्यास वेळ लागत असल्याने ती गाडी पाठवत आहे व ती भूषणसह रिक्षाने विमाननगरला पोचेल यावर ही गोष्ट सौ.ला सांगून  त्यावर चर्चा होण्याचा धोका टाळण्यासाठी मी तिला होकार देऊन फोन खाली ठेवला.पण थोड्याच वेळात सौ.ला तिची आठवण झालीच व तिने गीताच्या मोबाइलवर फोन करून तू पण गाडीतूनच ये असे बजावले.पण शेवटी गीताच्याच पद्धतीने तिने गाडी आमच्याकडे पाठवून त्या दोघांनी रिक्षाने येण्याचे  ठरवल्याचा तिचा फोन आला व त्यापाठोपाठ गाडी पण येईल असे तिने कळवले.
    आमची सदनिका चौथ्या मजल्यावर असल्यामुळे ड्रायव्हरला वर येऊन आम्हाला बोलावण्यात वेळ जाऊ नये म्हणून आम्ही त्याचा फोन येताच खालीच जाऊन उभे रहावयाचे ठरवले व त्याप्रमाणे खाली गेल्यावर समोर उभ्या असलेल्या गाडीत आम्ही चढून गाडीत बसल्यावर आणि चालक भलत्याच मार्गाने जात असलेला पाहून नेहमीप्रमाणे आपण  खरोखर गीताने पाठवलेल्याच गाडीत बसलो की  नाही अशी शंका माझ्या मनात उपस्थित झालीच पण बरोबर असणाऱ्या अतिशंकेखोर व्यक्तीच्या भंरवश्यावर मी स्वस्थ राहिलो.आणि शेवटी गाडी विमाननगरच्या रस्त्याला लागल्यावर माझा जीव भांड्यात पडला. प्रथम गाडी विमाननगरमधील मोनीच्या सदनिकेच्या इमारतीपाशी थांबली.गीता व भूषण आपली कामे आटोपून तेथे आलेही होते. व ते इमारतीसमोरच उभे होते.
             आम्ही दोघे गाडीबाहेर उतरलो पण "इथे कशाला उतरला आपल्याला बसवच्याच घरी जायचेय" असे सांगून गीताने पुन्हा आम्हास गाडीत चढवले.तरी मधल्या काळात मोनीची धाकटी बहीण येऊन आमच्या पायाला स्पर्श करून गेली.भूषणनेही ती संधी साधली व पदस्पर्श केला.उत्तरेकडील तरुण पिढीचे एक मी निरीक्षण केले आहे ते म्हणजे वडील मंडळी दिसली की  पदस्पर्श तेही वाकून एकाच हाताने करण्याच्या बाबतीत त्यांचा कटाक्ष असतो मग भलेही त्यांच्या मनात काहीही आदर असो वा नसो.अगदी मी मिनिओपोलीसला असताना माझ्या मुलाचे जे मित्र यू.पी.मधून आले होते ते आम्हा दोघांना अगदी कटाक्षाने पदस्पर्श करीत आणि तेही अगदी रस्त्यात भेटले तरी. दक्षिणेकडे म्हणजे तमिळनाडूमधील आमची एक सूनबाई रस्त्यात नाही पण घरी मात्र अगदी जवळ जवळ साष्टांग नमस्कारच घालते. आपल्याकडील म्हणजे मराठी तरुण मंडळींना आता वाकण्याचे कष्ट करण्याचे जिवावर येऊ लागले आहे असे वाटते. गीता व मोनीच्या बहिणीसह आम्ही बसवच्या घरी गेलो व गाडी मोनी व तिच्या आईला आणायला गेली.
   बसवच्या वडिलांचे घर बऱ्यापैकी बांधलेले होते आणि वडील व आणखी एक नातेवाईक बहुधा जावई असावेत दारातच आमच्या स्वागतासाठी उभे होते.आम्ही सोलापूरला असताना गुमास्ता सोसायटीत राहिलो होतो व ती सर्व लिंगायत लोकांचीच सोसायटी होती.त्यांचीच मला आठवण झाली.अगदी ठार नाही तरी काळाच म्हणता येईल असा रंग असा घरातील सर्वच व्यक्तीचा होता.अर्थात मोनी व तिचे कुटुंबीयही काही गोऱ्यात जमा होणारी नव्हती.बसवच्या वडिलांनी व इतरांनी अतिशय मनापासून आमचे स्वागत केले.त्यांनी त्यांच्या एका उत्तर प्रदेशीय मित्रा (मिश्रा त्यांचे नाव)लाही पाचारण केले होते.बसवचे कुटुंबीय आपापसात कन्नडमध्ये बोलत होते पण पुण्यात चाळीस वर्षे काढल्यामुळे त्यांना मराठी चांगले बोलता येत होते.त्यामुळे सुरवातीस आम्ही मराठी चांगले बोलू शकतो आणि हिंदीही ( कारण मोनीची आई व बहीण हिंदीभाषक होते)  असे सांगून वातावरणात मोकळेपणा आणण्याचा प्रयत्न केला.
         मिश्रानेही आपणही पुण्यात बरीच वर्षे राहिल्यामुळे मराठी चांगले बोलू शकतो असे सांगितल्यावर माझा मराठी बाणा लगेच जागा झाला व तरीही आम्ही महाराष्ट्रीय लोक स्वभाषेविषयी फारच अनाग्रही असल्यामुळे बव्हंश परप्रांतीय मराठी येत असले तरी हिंदीमध्येच बोलतात व आन्हीही त्यांच्याशी हिंदीतच बोलतो असे सांगितल्यावर मिश्राने ते अमान्य केले मात्र त्याने शेवटपर्यंत मराठी एकही शब्द उच्चारला नाही व बसवच्या व मोनीच्या नातेवाइकांना त्यात काही हरकत नसल्यामुळे  माझा मराठी बाणा मला आवरावा लागला.आणि तसेही गीतालाही भूषणमुळे हिंदी अथवा इंग्लिश बोलणे सोयिस्कर वाटत होते.
   तोपर्यंत मोनी व तिची आई यांना आणावयास गेलेली गाडी परत आलेली नसल्यामुळे गप्पा लग्नाशिवाय इतर बाबींवरच चालू होत्या.त्या कालात आपण व मिश्रा कसे अगदी जवळचे मित्र आहोत,आपल्या घराच्या पायाभरणीपसून मिश्रांचे आपणास कसे साह्य झाले याविषयी बसवचे वडील बोलत होते.ते दोघेही एकाच कार्यालयात कामास होते व आता बसवचे वडील सेवानिवृत्त होऊन बेळगावजवळील त्यांच्या मूळ गावाकडे जाऊन तेथील घरात रहात होते.तेथे त्यांची बरीच शेती होती त्यातील काही शेतींचे उत्पन्न आपल्या तीन मुलींना मिळण्याची व्यवस्था त्यांनी कशी केली आहे व शेती घरी न करता खंडाने देणे कसे योग्य आहे यावर चर्चा झाली व शरद पवार यांनी शेतकऱ्यांनी शेती विकण्याचा सल्ला का दिला असावा याविषयी माझ्या ज्ञानात भर पडली पण बसवच्या वडिलांनी दोन एकर शेती स्वत:कडेच ठेवली आहे व त्यात एकरी एक लाख उत्पन्न ते मिळवतात असे सांगून माझा जरा गोंधळ उडाला.पण नेहमी रोख उत्पन्न देणारे सोयाबिन सारखेच पिक ते घेतात हे सांगितले व सध्या सोयाबीनला कशी मागणी आहे व सोयाबीनचे काय काय पदार्थ करतात या विषयावर चर्चा चालू झाल्यामुळे स्त्रीवर्गासही चर्चेत भाग घेता आला.
       तेवढ्यात मोनी व तिच्या मातोश्री आल्यामुळे वातावरण बदलले.मोनीने आत प्रवेश करताच सर्व वडीलधाऱ्यांना पदस्पर्श केला व सर्वांनी आपापले पाय आवरत त्याला प्रतिसाद दिला.आता दोन्ही पक्षाचे सर्व लोक उपस्थित झाल्यामुळे आता लग्न या मुख्य विषयाला सुरवात झाली.गीताने नेहमीप्रमाणे पुढाकार घेऊन लग्न कुठल्या पद्धतीने करायचे,केव्हांकरायचे व कोठे करायचे असे तीन मुद्दे उपस्थित केले.
  बसवच्या वडिलांनी पद्धतीचा फारसा बडिवार नसल्याचे सांगितले व आमचे स्वामी सांगतील तसे करू.स्वामी म्हणजे त्यांचे गुरुजी.बसवच्या वडिलांच्या मते त्या दिवशी चांगला मुहूर्त नव्हता नाहीतर साखरपुडाच करण्याचा विचार होता असे सांगितले.साखरपुडा हा काही फार आवश्यक आहे असे नाही असे मुलीकडील लोकांनी म्हटल्यावर साखरपुड्याचा आग्रह मुलीकडील मंडळींचाच असतो कारण त्यामुळे आपल्या मुलीचे लग्न कोणाशी ठरले हे जाहीर होते असा विचार प्रकट झाला यामध्ये मोनीची आई काहीच विशेष बोलत नव्हती कारण मराठी व इंग्लिश दोन्हीचे तिला वावडे होते.   
    लग्नाला किती मंडळी येणार व लग्न कोठे करायचे या चर्चेमध्ये गीताला हैदराबाद सोयिस्कर वाटत होते.बसवच्या वडिलांनी हैदराबाद किंवा पुणे कोठेही केले तरी त्यांच्या बेळगावकडील नातेवाइकांना तेवढेच अंतर पडेल असे सूचित केले. आणि त्यांचे मित्रगण बरेच असल्यामुळे लग्ना अगोदर साखरपुड्यासारखा समारंभ त्यांच्या गावी करावा व त्याला त्यांच्या जास्तीतजास्त मित्रांना बोलावता येईल म्हणजे लग्नासाठी फार तर दोन गाड्या करून त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाइकांना घेऊन येता येईल.त्यांच्या गावाकडील समारंभाचा खर्च तेच करणार होते व त्यामुळे लग्नासाठी येणाऱ्या मंडळींची संख्या मर्यादित राहील असे त्यांनी सूचित केले. साखरपुड्यासारखा जो समारंभ ते गावाकडे करणार होते त्यावेळी स्वामी उपस्थित रहातील व त्यावेळी लग्नाच्या पूर्ण  बाबींचा विचार करून आपण संपूर्ण विधीविषयी कागदावर लिहून त्यावर दोन्हीकडील व्यक्तीच्या सह्या घेऊ असे मत त्यानी व्यक्त केले, व दोन्हीकडील व्यक्तींना ते योग्यच वाटले.
      घरी परत येताना गीताने डिसेंबरमध्ये लग्न करणे बरे म्हणजे हैदराबादच्या गरमीचा व पाणी टंचाईचा त्रास होणार नाही.असा विचार जाहीर केला.मोनी व तिची आई मात्र फारसे बोलत नव्हत्या. कमीतकमी आपल्या पसंतीचा नवरा असल्यामुळे मोनीने तरी बोलणे अपेक्षित होते.
    पण मोनीला सोडून गीता व भूषण आमच्या घरी येताना ह्या लग्नाच्या गोष्टीत आणखीही एक वळण होते असे आम्हाला कळले.ते म्हणजे या पूर्वी मोनीचे एका मुलावर प्रेम होते आणि त्यानी लग्नाच्या आणाशपथाही घेतल्या होत्या पण नंतर मुलाच्या आईवडिलांकडून त्यांच्या लग्नाला होकार मिळाला नव्हता.त्यामुळे मोनीने ते प्रकरण संपवले होते आणि बसव हा दुसरा मासा गळाला लावला होता. पण आता तो भूतकाळ झाला होता.हीच गीता व भूषणची समजूत होती.आम्हाला कुठल्याच बाजूत रस नव्हता त्यामुळे ही गोष्ट आमच्या वर्तमान वा भूतकाळात कोठेच नोंदवण्यात आली नव्हती.कदाचित लग्न हैदराबादला झाले तर आम्हाला हैदराबादची एक वारी आम्हाला घडणार होती.या लग्नात जो काही पुढाकार होता तो एकट्या गीताचाच होता.अगदी भूषणही तिच्या आग्रहावरूनच या सगळ्या समारंभात सामील झाला होता.
   या गोष्टीला बरेच दिवस झाले.ही गोष्ट मी विसरूनही गेलो होतो.एक दिवस गीताचाच काही इतर कारणाने फोन आला होता तेव्हां सहज उत्सुकता म्हणून मी विचारले,"मग काय मोनीचे लग्न केव्हां?" " मोनीने बसवला नकार कळवला आहे" असे गीताने सांगताच मी चाटच पडलो. अर्थात अश्या बाबीत आपली उत्सुकता जरा अधिकच कार्यक्षम असते त्यानुसार मी विचारलेच,
"काय म्हणतेस काय,तू तर अगदी मुहूर्त काढून कार्यालय ठरवायला निघाली होतीस "
"हो बरोबर आहे ,पण आता भूषणने ठरवले आहे आणि मलाही तसेच वाटू लागले आहे की या सर्व गोष्टीतून आपण अंग काढून घेणेच योग्य.मोनीचा पहिला प्रियकर पुन्हा तिला भेटला होता आणि त्याने दुसऱ्या कोणाशी लग्न करायचे नाही असे तिला बजावले आहे " एकूण या गोष्टीला वेगळेच वळण लागले होते.म्हणजे अगदी दूरदर्शन मालिकेच्या सुरवातीस या मालिकेतील व्यक्ती व घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत,तरीही प्रत्यक्षातील व्यक्ती वा घटनांशी काही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावे असा अंग झटकण्याचा प्रकार केलेला असतो तो योग्यच असतो (हो नाहीतर उगाचच एकाद्या कोर्टकेसचे लचांड मागे लागायचे) असे आम्हाला वाटू लागले.सुदैवाने मोनीच्या प्रथम प्रियकराच्या पालकांचा त्यांच्या लग्नास विरोध मावळला व ते लग्न होणार वा आता झालेही असेल असे कळले पण बिचाऱ्या बसवचे काय झाले कोणास ठाऊक,किंवा तोही सुटला बिचारा असे मानावयाचे ?