टोमॅटोच्या फ़ोडी!

टोमॅटोच्या फोडी!

जगण्यामध्ये यमक शोधणाऱ्या लोकांची एक गंमत असते. 
कधी कधी अगदी क्षुल्लक गोष्ट त्यांना त्यांच्या अशा मेहेफिलीत घेऊन जात असते. 
तुम्हाला दिसतो म्हणजे आम्ही,
पण क्षणभरासाठी लागलेल्या तंद्रीमध्ये आम्ही कितीही वर्षे मागे जाऊन कितीही वेळ घालवून येऊ शकतो! आणि शक्यतो कुठे आणि किती वेळ जायचे हे आमच्याही हातात नसते! 
"खाणार आहेस का ती कोथिंबीर?"
बायकोने असे विचारले आणि ताटात उरलेल्या टोमॅटोच्या २-३ फोडींकडे लक्ष्य गेलं. 
"गौतम" 
अभियांत्रिकी कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्याच हॉस्टेल मधल्या मेसमध्ये आमच्यासाठी जेवण बनवणारा एक मुलगा. 
एमओ (money order) चे ते दिवस, ती कितीही मोठी असली तरी जास्तीत जास्त २० तारखेपर्यंत टिकायची, मग मात्र नेमाने मेसमध्येच जेवावे लागत. 
खानावळ हा शब्द माहीत असून देखील मी "मेस" का वापरतो आहे हे, ती उपभोगलेल्या माझ्या मित्रांना कळू शकेल. 
असो, 
तिथे संपूर्ण महिनाभर नियमितपणे अगदी गुणी अभ्यासू मुले पण जेवत नसत, तिथे आमचा तर प्रश्नच येत नव्हता!
पैसे संपलेले..
अशा परिस्थितीत, आमचा एक ठेवणीतला कार्यक्रम असायचा;
त्या गौतमशी संगनमत साधून,  मेसमध्ये उरलेल्या भाताला, 
त्याच प्रचंड भांड्यात 
मध्यरात्री किल्ली ढापून 
फोडणी देऊन खायचा! 
"जे जे वर्ज्य ते ते प्रिय"
हा नियम अगदी पावलो पावली पटणारे ते वय... 
त्यात वाढीव गंमत अशी असे, की कळकट्ट सुतारी पात्याने, अंधारात जमतील तसे टोमॅटो कापायचे आणि त्या खाद्यपदार्थात वापरायचे. 
एकंदरीत अगदी सुका पडलेला भात,
कधीच योग्य प्रमाणात न पडलेले तेल,
खडे मिठाची ढेकळं, 
ह्या सगळ्या प्रकरणात सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे 
त्या टोमॅटोच्या फोडी!
अर्धवट जळलेल्या, 
पण त्यामधल्या ओलाव्यामुळे की काय कोण जाणे, 
सगळा मसाला चिटकायचा त्यांना.. 
हवे तसे ताटांत वाढून घेणे वगैरे प्रकरण अर्थात अशक्यच होते...
त्यामुळे त्या अजस्त्र पातेल्याभोवती जमून 
आम्ही त्या पूर्णब्रह्मावर दैत्यांसारखे तुटून पडायचो. 
सगळी मारामारी त्या टोमॅटोच्या फोडींसाठी असायची. मध्यरात्रीच्या त्या अंधाऱ्या स्वयंपाकघरात खुललेल्या त्या पूर्णब्रह्मातल्या त्या अप्सराच होत्या जणू... 
पोट भरण्याच्या सामान्य उद्देशाला प्रचंड चव आणायच्या त्या...
"अरे खाणार आहेस का त्या?"
माझ्याकडे पाहून परत माझ्या ताटाकडे तिने पाहिले तोपर्यंत मी त्या संपवल्या होत्या!