निशाण

हिमगिरीच्या धवल शिखरावर
फडफडणारे तिरंगी निशाण ...

त्याच्या वाटेवर शिंपले आहेत
रक्ताचे सडे ..
उधळले गेले आहे
सुवासिनींचे कुंकू ...

त्याचा लालस केशरी रंग
जाणवतो अजून नजरेला

मरणाची भिती , शिकवलीच नाही कुणी
बर्फाच्छादित वाटांवरुन चालताना
आठवले नाहीत कधीच आपले संसार

मातृभूमीच्या काळजात
खुपसलेल्या खंजिराची कळ
उठते आहे  मस्तकात
तळपत्या तेगीचा निर्धार
रुतला आहे  मनामनात

कुठून, कधी आणि किती येतील ते
आणि पडेल काळाचे जाळे
सांगता येत नाही काहीच
समोरुन येतील ,
की पाठीवर करतील वार
हे ही ठाऊक नाही

अंतरी आहे फक्त  एकच जाणीव
जपायचे आहे हे निशाण
प्राणांची ओंजळ करून

त्याच्या भोवती घोंघावणारे
अमंगल वारे,
त्याला वेढणारे ते
अभद्र कडे,
दूर करण्यासाठी
झुंजायचे आहे अथक

त्याच्यासाठी जगायचे,
मरायचे ही त्याच्यासाठीच

जेव्हा कोसळतील
श्वासाचे बांध आणि 
 जळेल देहाची समिधा
या रणयज्ञात

तेव्हा सांगतील माझी मुलं ..
आणि पूर्वज सुद्धा -
अभिमानाने ....

"इथे वाहणार्‍या रक्त नद्यांत
वाहतो  एक थेंब आमचा
या निशाणात मिसळले आहे
आम्ही आमचेही रक्त"

मग,  गुंजतील या अवकाशात
आनंदाचे पडघम
उठतील तृप्तीचे तरंग
या रक्तरंगी हिमनद्यांवर
होईल  जयजयकार
मनमुक्त  कंठातून
येतील हजारो वीर
सरसावून आपले बाहू
आणि  राहील निरंतर
या निशाणाची शान
अभेद्य , अभंग ..