रामजी... आलोच!

रामजी... आलोच!

पहाटे ३ ची वेळ असावी. मोहिमेमध्ये काय आणि कसे करायचे ह्याच्या सूचना सुरुवातीलाच एकदा दिल्या जातात, ऐन वेळी वगैरे भानगड आम्हां स्वराज्याच्या मावळ्यांना माहीतच नाहीये मुळी. 
मशालींच्या प्रकाशात रामजी सगळ्यांवर नजर टाकत बोलायला लागले की वाटायचे की खुद्द भोलेनाथ कसले तरी तांडव करतो आहे. अशा वेळी भांबावलेले आम्ही ६००-७०० जणं रामजींच्या त्या शिवरूपाकडे पाहावे की त्यांच्या सूचनांकडे लक्ष द्यावे... 
"दिलेरकडे तीस हजाराची फौज आहे, बसला वेढा घालून तर त्याच्याकडे सवड पण आहे आणि रसद पण.. पण ह्या रामजीकडे सवड नाही! (आपली तलवार उंचावत तिच्याकडे पाहत रामजी पुढे निर्धाराने म्हणाले) ह्या समशेरीकडे सवड नाही! दुर्गावर अडकून खंगून मारायला हा रामजी नाहीये जन्मलेला..." 
छत्रपती शिवरायांच्या "पंच-अग्नींपैकी एक" 
काय हुबेहूब वर्णन केलं आहे आमच्या रामजींच.. मला वाटून गेलं, कोणी हे असं बोलताना पाहावं ह्यांना अक्षरशः धगधगते अग्निकुंडच हे...
जाणाऱ्या प्रत्येक क्षणी आमचा मृत्यू दुर्गाजवळ येत होता. 
वास्तविक कण्हेर गडावर दिलेरखान असा अचानक येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आजूबाजूचा एकही दुर्ग त्याला घेता आला नव्हता. इथली शिबंदी कमी असल्याची माहिती असावी म्हणूनच "सहज घेऊ!" असे वाटून निघाला असेल.  पण त्याला कुठे माहिती होतं की इथं दस्तूरखुद्द महाकाल त्याची वाट पाहतो आहे. 
"फक्त आकड्यांच्या गणिताला बांधून आपल्या राजांनी स्वराज्याचा निर्धार केला असता तर त्या अफजल्याला मारून त्याच्या बत्तीस हजारी फौजेला माती खायला घातली नसती आपण...", रामजी त्वेषाने बोलत होते, "आता निर्वाणीच्या लढाईची वेळ आली आहे! पुरंदर जसा लढला तसा कान्हेरा पण लढेल! त्याच ह्या दिलेरखानाला परत एकदा मुरारबाजी आठवून द्यायची वेळ आली आहे!"
क्षणभर थांबून शांततेत जवळ येणाऱ्या घोड्यांच्या टापाच्या आवाजाकडे लक्ष वेधत रामजीने दीर्घ श्वास घेत छाती फुलवली. शिवाचे पिंड दंडात घातलेला हात आसमंतात उंचावत घशाच्या शिरा फुटतील की काय एवढ्या प्रचंड आवाजात त्यांनी आरोळी ठोकली...
"हर हर......"
आम्ही सगळे आपोआपच मुठा घट्ट आवळत ओरडलो "महादेव.......!"
.
.
.
.
.
.
.
.
.
पुढे नेमके काय आणि कसे झाले त्या शिवशंभूलाच ठाऊक! मला गडाचे दरवाजे उघडून जल्लोषात खाली उतरल्याचे आठवते. त्या नंतर किती वार केले किती घेतले ह्याची मोजमाप कुणालाच नाही करता यायची. आम्ही विजेसारखे कोसळलो अक्षरशः मुघालांवर... १०००-१२०० पठाण तर पहिल्या धडकीत कापले गेले असतील. 
पुढे किती वेळ लढलो नाही माहीत!
आम्हां शिवाच्या रुद्ररुपाला घाबरून मुघल पळून जाऊ लागले होते.
शरीरावरील जखमांमुळे होणाऱ्या वेदना एव्हाना कळण्यापलीकडे गेलेल्या होत्या. माहिती एवढेच होते की आपण दुर्ग राखला आहे. ७०० जणांनी ३०००० जणांना पळवून लावलं आहे. 
माझ्याकडे वेळ थोडाच आहे असं आपोआप लक्षात आलं होतं माझ्या! नजर रामजींना शोधत होती. 
इतक्यात आमच्यामधले चार जण रामजींचे -चेहऱ्यावर स्मित हास्य असलेले- पार्थिव शरीर गडावर घेऊन जाताना दिसले. 
स्मित माझ्याही चेहऱ्यावर उमटले. 
"रामजी, आलोच!" म्हणत माझे डोळे मिटले गेले!