गुमोसोस आणि अफ़सोस

आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत. तसा त्यांच्याकडे इतके दिवस स्वतःचा लॅपटॉप होताच, पण त्यांच्या पंच्याहत्तरीला त्यांच्या चिरंजीवांनी त्यांना एक सुंदर 'स्मार्ट फोन' आणून दिला आणि मामांनी अक्षरश: कात टाकली. धडाधड 'गुमोसोएक' (गुलमोहर सोसायटी एक्जिक्युटिव्ह कमिटी), 'गुमोसोस' (गुलमोहर सोसायटी सभासद) अशी दोन मंडळं तयार झाली. काही दिवसांतच बायकांनी आपलं एक वेगळं मंडळ तयार केलं. त्याचं नाव रोज बदलत होतं. 'गुल-शान' (आपण गुलमोहर सोसायटीची 'शान' आहोत असं अभिप्रेत असावं), 'गुल-फाम' (याची फोड माहिती नाही, बहुधा फेमस या शब्दाशी काहीतरी संबंध असावा) अशी अनेक नावं आली आणि गेली. या नावांचा आपल्या संकृतीशी (म्हणजे धर्माशी असंही काहींनी स्पष्ट केलं) संबंध दिसून येत नाही असं काही बायकांचं म्हणणं होतं. 'गुल-मोह' असंही एक नाव आलं होतं, पण त्या मोहात न पडता शेवटी 'गुलु-गुलू' या नावावर सगळ्यांचं एकमत झालं.
एकदा मंडळं तयार झाल्यावर मग मात्र कुणी मागे वळून पाहिलं नाही. मामा सभासदांना लागणारी सगळी माहिती, कमिटीचे निर्णय, बिलं, त्यांचे तगादे इ. सगळ्या गोष्टी एका नव्या जोमानं आम्हांला पाठवायला लागले. भुजबळांकडून रोज सकाळी न चुकता 'सुप्रभात' (रोज नवीन चित्र आणि संदेशासकट) चा निरोप येऊ लागला. शर्मानं रोज किमान दहा विनोद पाठवले नाहीत तर लोकांचा दिवस आनंदात जाणार नाही अशी आपली समजूत करून घेतली. नवीनच पहिल्या मजल्यावर राहायला आलेल्या उमेश आणि उमा या जोडप्यानं प्रत्येकाच्या वाढदिवसाला आपल्याकडून शुभेच्छा सर्वांच्या आधी गेल्या नाहीत तर आपली खैर होणार नाही अशी उगाचच आपली भावना करून घेतली. याशिवाय उमा प्रत्येक संकष्टी, एकादशी, शिवरात्र इत्यादींची आगाऊ माहिती द्यायला लागली. दोशी शेअर मार्केटमध्ये काय होणार याची भाकितं सांगू लागला आणि चाफेकर (जन्मगाव आणि शिक्षण पुणे) ट्रंप पासून किम पर्यंत कुठे काय खुट्ट होतंय हे कळवू लागला. याशिवाय मोदी, क्रिकेट, बॉलिवूड इत्यादी जिव्हाळ्याचे विषय... जो जे वांछील तो ते लिहायला (किंवा दुसऱ्यांनी लिहिलेलं पुढे सारायला) लागला.
अर्थातच, या सगळ्या विषयांवर चर्चा करताना एखाद्याच्या नाकी नऊ आले असते. पण आमच्या सभासदांचा उत्साह अफाट! त्यातून मुंबईत कितीही गर्दी भासली तरी अजूनही त्यात सहज सामील होते हे सिद्ध झालेलं आहेच, तेच ‘व्हॉटस ॲप’च्या बाबतीत झालं. अगदी येता-जाता आम्ही एकमेकांना 'आज चतुर्थी आहे? अरे, मी उमानं लिहिलं होतं तरी कसं विसरलो?', 'आजचा शर्माचा विनोद वाचलात?' किंवा 'फक्त ‘व्हॉटस ॲप’वरच नको, प्रत्यक्षात पण केक मिळू दे की तुमच्या प्रकटदिनाचा' असं म्हणायला लागलो.
मला 'व्हॉटस ॲप’वर असं कार्यरत असणाऱ्यांचा मनापासून आदर वाटतो. 'मी तीस मंडळांमध्ये आहे आणि मला प्रत्येक ठिकाणी रोज पन्नास निरोप येतात' असं सांगणारे स्वतः त्यातले तीस-चाळीस विनोद/लेख/कविता/बातम्या पुढे पाठवून इतरांच्या ज्ञानात किंवा आनंदात भर घालण्यासाठी वेळात वेळ काढतात हे खरंच कौतुकास्पद आहे.
"कसा काय वेळ मिळतो बुवा लोकांना वाचायला?" असं एकदा मी मामांना विचारलं होतं.
"अहो, मला तर आनंद होतो. या वयातही आपल्याला इतके लोक संपर्क करतायत. आपल्यावाचून त्यांचं अडतंय असं उगाच वाटतं किंवा निदान वाटवून घ्यायला तरी मिळतं! आपण किती महत्त्वाचे आहोत या सर्वांसाठी, हे कळतं."
मामांचा सगळ्यांना इमोजी किंवा प्रतिसाद देण्यात पहिला क्रमांक असायचा. फक्त सेवानिवृत्ती हे एकच त्याचं कारण नाहीये याची त्यांनी मला या संभाषणातून जाणीव करून दिली होती. 
अर्थात, या निरोपांत कधी कधी रुसवे-फुगवे, हेवे-दावे हेही आलेच. पण सुदैवानं 'आता माझी सटकली' म्हणून कुणी मंडळं सोडली नाहीत. कुणाची मनधरणी करायला लागली नाही. असंच पुढे चालू राहील असं वाटत होतं आणि वॅलेंटाईन डे आला. 
प्रेमाचं प्रतीक असलेल्या या दिवसाचं निमित्त साधून एकाच दिवशी एकच गोष्ट तिन्ही मंडळांवर - एकदा हिंदीत आणि दोन वेळा मराठीत (आणि प्रत्येकाच्या अनेक इतर मंडळांमधे त्यांच्या त्यांच्या भाषेत) आली...
"वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले, 'प्रेमाचे प्रतीक कोणते?' 
सगळ्या मुलांनी (एक सोडून) 'ताजमहाल' हे उत्तर दिले. फक्त गण्या म्हणाला, 'रामसेतू'.
शिक्षकांनी विचारले, 'का?'
गण्या म्हणाला, 'बायकोच्या नावाने ताजमहाल बांधून झाल्यावर शहाजहान बादशाहाने त्या कामगारांचे हात तोडले. या उलट बायकोला आणण्यासाठी पूल बांधणाऱ्या वानरांचा रामाने सन्मान करून त्यांच्याशी प्रेमाचे नाते जोडले.'
असे इतिहास आणि पुराणाकडे आपण नवीन दृष्टीने बघायला हवे."
"गण्या, तोडलंस मित्रा, " असं एक वाक्य माझ्या मनात गुप्तपणे (की 'गुप्तें'प्रमाणे?) उगाचच जुळून गेलं. पण ते खोडून मी असा विचार केला की आपल्याला अलीकडेच चाळिशी लागल्यामुळे आपण या नवीन दृष्टीनं ही गोष्ट वाचायला हवी. कधी नव्हे ते मी (मामांना स्मरून आणि आपण फार महत्त्वाचे आहोत असं समजून) आमच्या मंडळात लिहिलं,
'पण नंतर रामानं आपल्या बायकोला सोडलं त्याचं काय?' 
शेवटी स्माइली टाकला की तो विनोद होतो या माझ्या भ्रमाचा भोपळा लगेचच फुटला. 
वास्तविक आमची सोसायटी तशी पुरोगामी. 'हॅपी वॅलंटाईन डे' आणि 'मातृ-पितृदिनाच्या शुभेच्छां'च्या निरोपांची मंडळांवर एकत्र देव-घेव झाली होती. काही विनोदही येऊन गेले होते. पण या एका वाक्यावरून आमच्याकडे जे रामायण घडलं ते जर रामानं वाचलं असतं तर बहुधा सीतेला रावणाकडूनच नाही तर पुढे वाल्मिकींकडूनही परत आणलं असतं असं मला वाटायला लागलं!
नमुन्यादाखल काही प्रतिक्रिया - 
'वाह ताज' असं म्हणायचंय का तुम्हांला? तुमचा खरा पक्ष कळला.' (भुजबळ, रागावलेल्या इमोजीसकट, शिवाय सोबत एक हिरवा आणि एक पाकिस्तानचा झेंडा. त्यांना बहुधा 'तुमचा खरा देश कळला' हे अभिप्रेत होतं.)
'यात परकीय शक्तींचा हात आहे, आपल्या लोकांना ते असेच फितवतात.' (उमा... चक्क चपला, हाय हिल्स. ती घालते तशाच.)
'आपल्या लोकांतच एकी नसते.' (उमेश, दोन रागावलेले इमोजी. उमेश त्या मानानं शांत स्वभावाचा आहे.)
'असं नुसतं चालणार नाही, शब्द मागे घ्या. आपणच जर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला नाही आणि तिचा प्रचार केला नाही तर ती शिल्लकच राहणार नाही.' (चाफेकर, पाच ठेंगे, पाताळाच्या दिशेनं.)
'प्रभु राम की और शहाजहान की कोई तुलना हो ही नही सकती. भगवान जो भी करते हैं वो सही होता है. उसके पीछे उनका क्या कारन है वो समझनें की भी हमारी योग्यता नहीं है. ' (शर्मा, तीन नमस्कार - हे बहुधा रामाला आणि सहा रागावलेले इमोजी - त्यातले तीन शहाजहानसाठी आणि तीन माझ्यासाठी असावेत.)
'हे राम. ' (दोशी, दहा नमस्कार आणि दहा रागीट तोंडं - ह्यानं माझा रावणच करून टाकला. फक्त त्यापुढे एक धनुष्य-बाण घालायला हवा होता.)
सकाळी निघताना मी हा निरोप टाकला होता. संध्याकाळी आपली धडगत नाही हे माझ्या लक्षात आलं. मी 'गंमत केली, कुणाच्याही भावना दुखावायचा माझा हेतू नव्हता' असं लिहावं का असा विचार करायला लागलो. पण अचानक बघितलं तर मामांचा मला व्यक्तिगत निरोप- 
'उत्तर देऊ नका आणि यापुढचे कुणाचे निरोपही बघू नका.'
मी 'ठीक आहे' असं उत्तर दिलं. घरीही उशिराच परतलो, रात्रीचे आठ वाजायला आले होते. ऑफिसात आणि परतीच्या प्रवासात, आपण आधी नीट विचार का नाही केला अशी दूषणं स्वतःला देत होतो. आता पुढे काय होईल याची वेगवेगळ्या प्रकारे कल्पना करत होतो. 
अखेर सोसायटीच्या कमानीतून आत आलो तेव्हा आमच्या इमारतीखालच्या अंगणातच घोळका (चक्रव्यूह?) करून असलेले आमचे सभासद मला दिसले. त्यांना सामोरं जाणंच भाग आहे हे माझ्या लक्षात आलं आणि हळू हळू पुढे सरकलो. मामांनी माझी उजवी बाजू सांभाळली होती; पण डावीकडून भुजबळ, शर्मा, दोशी, चाफेकर, उमेश आणि उमा असं पूर्ण वर्तुळ (वाटोळं?) होतं.
मी जमलेल्या जमावात आपला शिरकाव करून घेतला. पहिल्या वाराला सिद्ध झालो.
अचानक, माझ्या खांद्यावर भुजबळांचा हात पडला.
"सॉरी."
आपण बरोबरच ऐकतोय ना असं वाटून मी चमकून त्यांच्याकडे बघितलं.
"हो, आम्ही जास्तच वाईट लिहिलं तुम्हांला." उमानं थोडं स्पष्टीकरण दिलं.
"म्हणजे... " मी बोलायचा प्रयत्न केला. ('थोडंसं वाईट चाललं असतं का?' माझ्या मनात प्रश्न. पण इथे मी उत्तरं देण्यासाठी उभा असणं आवश्यक होतं.)
"टेन्शन मत लो," शर्माचं प्राज्ञ हिंदी एकदम मुन्नाभाईच्या वळणावर गेलं.
"अरे, पण मला कोणी काही सांगेल का? मी तर अगदी घाबरूनच गेलो होतो. तुम्ही काही म्हणा, पण आधी मीच तुम्हांला.... "
"चालायचंच," चाफेकरनंही मला मध्येच तोडलं.
शेवटी मामा म्हणाले, "चला, रात्र झाली आहेच, घरी जाऊ. " सगळे एकमेकांना पुनः एकदा 'हॅपी व्हॅलंटाईन डे' म्हणून आपापल्या फ्लॅटकडे निघालो. मामा आणि मी सगळ्यांत वरच्या मजल्यावर राहतो. वर पोहोचताच मी मामांना विचारलं,
"हा चमत्कार कसा झाला?" 
मामा हसून म्हणाले,
"विनीतमुळे झाला. ‘व्हॉटस ॲप’वर बघा. " 
विनीत - मामांचा नातू - तर आता इंग्लंडमध्ये असतो हे मला माहिती होतं. त्यानं इतक्या लांबून इतक्या थोड्या वेळात काय केलं असेल, असा विचार करत मी दार उघडलं आणि घरात शिरल्यावर फोनमध्ये डोकं खुपसलं. 
मामांनी अनेक यूट्यूब व्हिडिओज आमच्या सभासदांसाठी पाठवले होते. सगळ्या कार्यक्रमांचा विषय मात्र एकच होता - 'हॉरिबल हिस्टरीज'. प्रत्येक व्हिडिओनंतर मामांनी एकच वाक्य थोड्या-फार फरकानं लिहिलं होतं.
"राणी व्हिक्टोरिया, राणी एलिझाबेथ यांच्यापासून चर्चिल, शेक्सपिअरपर्यंत निदान त्यांच्या देशाच्या आणि भाषेच्या दृष्टीनं तरी आदरणीय, पूजनीय असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याकडे ते गंमतीनं बघू शकतात, त्यांची खिल्ली उडवू शकतात आणि त्यावर हसू शकतात, तर आपण का असं करू शकत नाही? एखाद्या गोष्टीतला विरोधाभास दाखवून देणं हा गुन्हा आहे का?"
अर्थात, एवढ्याशा शिकवणीमुळे लगेच मतपरिवर्तन होईल हे पटणं अवघड होतं. लोकांच्या प्रतिक्रियाही तशाच होत्या. 
"राम देव होता, ह्या सगळ्यांमध्ये कुठे देव आहे? "
"ब्रिटिश राण्यांपासून ते चर्चिलपर्यंत राज्यकर्ते क्रूरच होते. त्यांना फक्त जगावर सत्ताच चालवायची होती. "
"आपल्याकडे असं चालणार नाही. आपण फक्त हिंदू-देवतांवर टीका सहन करून घेतो. इतरांवर नाही."
मामांनी सगळं ऐकून घेऊन एकच वाक्य लिहिलं होतं. "एक निदा फाजलींचा शेर फक्त आता लिहितो -
'घर से मस्जिद है बहोत दूर चलो यूं कर ले
किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए'..."
यापुढे कुणाचीच प्रतिक्रिया नव्हती.
मी मामांना फोन लावला आणि म्हटलं,
"तुम्ही सांगितलंत खरं इतकं, पण म्हणून सगळ्यांना पटलंय - मतपरिवर्तन नाही, पण दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याइतपत तरी - असं वाटतं तुम्हांला? "
"अजिबात नाही. पण आपल्या मंडळावर मी मला जे पटतं ते लिहिलं आहे. यानंतर मी इतरांना संध्याकाळी भेटल्यावर काय सांगितलं ते तुम्हांला कुठे माहिती आहे? "
"काय सांगितलंत? "
"तुम्हांला पश्चात्ताप झालाय तुमच्या वागण्याचा. तुम्ही खूप उशिरा परत येणार आहात. तुमच्यावर अजिबात रागवायचं नाही. आपला मोठेपणा मेलेल्याला मारण्यावरून सिद्ध होतो का? शिवाय, आपल्यातच एकी नाही असं म्हणायचं आणि आपल्याच लोकांशी भांडायचं हे तरी योग्य आहे का?"
थोडक्यात, मामांनी माझीच विकेट काढली होती.... त्याचबरोबर सभासदांची आणि त्यांची स्वतःचीही!
फोन ठेवण्याआधी मामा मला म्हणाले,
"मी विनीतमुळे इंग्लंडमध्ये असताना हे हॉरिबल हिस्टरीजचे कार्यक्रम बघू शकलो होतो आणि खूप हसूही हसलो होतो. तुझ्या वाक्यामुळे ते आठवलं… अलीकडे मीही लिहायला लागलोय - आपल्या इतिहासावर असंच काहीसं!"
- कुमार जावडेकर