बोली भाषेतले लिखाण

मराठीत बोली भाषेत लिखाण करायची एक प्रवृत्ती आहे. अशा प्रकारचे लेखन हिंदी-इंग्रजी आदी भाषांत आढळून येत नाही.  मग मराठीतच ते का असावे?  आलं, मेलं,  गेलं,  हे शब्द अमराठी लोक आलम्, मेलम्, गेलम् असे वाचतात. बोली भाषेत लिखाण करायचा हा रोग मराठीला का लागला?  याचे मूळ १९६१-६२ सालच्या मराठी शुद्धलेखनाच्या नियमांत आहे.

१९५६मध्ये महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले, आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांना वाटले की आता फायलींवरती मराठीतून टीपा-टिपण्या लिहाव्या लागणार. त्याकरिता मराठीतले तथाकथित अनुच्चारित किंवा अर्धउच्चारित अनुस्वार कारकुनांना अडचणीचे वाटणार. त्यामुळे शुद्धलेखनाचे नियमच बदलून हे अनुस्वार कमी करावेत, म्हणजे कारकुनांची सोय होईल. त्याअनुसार सन १९६२मध्ये शुद्धलेखनाचे नवीन नियम आले. नवीन नियम सुचवण्यासाठी जी समिती नेमली होती, तिचे अध्यक्ष दत्तो वामन पोतदार होते. त्यांच्या विरोधाला न जुमानता समितीने नवीन नियम अंमलात आणायचे ठरवले. या नियमांच्या यादीच्या शेवटी 'हे नवीन नियम झाले असले तरी, जुने नियम वापरून केलेले लिखाण अशुद्ध मानू नये' अशी दत्तोपंतांची टीप होती. काही दिवस ही टीप होती, मग कुणीतरी काढून टाकली.

हे नवीन नियम फक्त सरकारी फायलींमध्ये लिहिण्यासाठी होते, सार्वत्रिक उपयोगासाठी नव्हते!

पुस्तक प्रकाशकांनी आणि मुद्रकांनी मात्र या नवीन नियमांचा आनंदाने स्वीकार केला आणि ते अंमलात आणले. नवीन नियमांनुसार अनुस्वार गाळले गेले असल्याने त्यांची चंदी झाली.

मराठीखेरीज मल्याळम भाषेच्या लेखनाचे नियम बदलण्याचा प्रयत्न झाला, पण तो
पूर्णपणे अयशस्वी झाला.  ऊंझा येथे भरलेल्या गुजराथी साहित्य परिषदेत
गुजराथी लिहिताना सर्व इ-कार दीर्घ आणि सर्व उ-कार ऱ्हस्व लिहावेत असा ठराव
पास झाला. मुद्रकांनी तो उचलून धरला. पण साहित्यिकांनी विरोध केल्यामुळे
बारगळला.

नवीन नियमांनुसार मराठीतले केलें-गेलें हे शब्द आता केलं-गेलं असे लिहिण्याचा प्रघात पडला, आणि बोली भाषेत लिखाण करायच्या दुष्प्रवृत्तीची सुरुवात झाली. अजून हा रोग बरा झालेला नाही.