नात्यांचा सोहळा

नाती हा शब्द आला की च  आपल्या डोळ्यासमोर आपली माणसे यायला लागतात. आता आपली माणसं म्हणजे काय, ज्याच्याशी आपले काही नाते असते, काही ऋणानुबंध असतो. ती अशी नाती आपल्या जन्माबरोबरच बांधलेली असतात. अश्या नात्यात अजून नवीन नाती जेव्हा निर्माण होतात तेव्हा ती अजूनच द्रुढ होतात.
आईशी आपलं नात सगळ्यात द्रुढ आणि अगदी जवळचे असते.त्यात आई जेव्हा मैत्रीण होते तेव्हा त्या नात्याला अजून नवीन छटा येते आणि ती फारच सुखावह असते.
बहिणी बहिणींची माया काही वेगळीच असते. जिच्या बरोबर हक्काने भांडू शकतो, वेळ प्रसंगी पाहिजे ते मागू  शकतो. या विश्वासाच्या नात्यामध्ये मैत्री समानतेचा भाव आला की मग लहान बहिणीची चूक दाखवून देऊ शकते, आधिकारवाणिने बोलू शकते.
असेच बाकीच्या नात्यांचे पण आहे. मग ते मुलगी-वडील, मुलगा-वडील, भाऊ-बहिण वा इतर. अश्या सगळ्याच नात्यांचा पाया विश्वासावर असतो. त्यात एकमेकांबद्दलचा आदर, मैत्रभाव असेल तर तीच नाती सोन्याची होऊन जातात.
ही सगळीच नाती आपल्या जन्माबरोबरच येतात, मग ती आपल्याला आवडो वा ना आवडो.
पण मैत्री हे नाते असे असते कि जे आपण आपल्या मनाने ठरवतो. ते कोणी आपल्यावर लादलेले नसते. ते आपले आपणच मान्य केलेले असते. मग ती होतात ऋणानुबंधाची नाती. ती रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळेला द्रुढ झालेली दिसतात, कारण त्यात काही अपेक्षा नसतात, काही देणे घेणे याचा हिशोब नसतो. म्हणूनच जीवाभावाची मैत्री हा वाक् प्रचार द्रुढ झाला. हा जीवाभाव म्हणजेच त्या नात्यातील ओढ, जिव्हाळा, आपलेपणा, खरेपणा. त्या खरेपणामुळे, त्या विश्वसामुळे हे मैत्र जीवांचे नाते अजून घट्ट होते. याच अश्या मैत्रीच्या नात्याने सुदामा पूर्ण विश्वासाने क्रुष्णाला भेटायला गेला होता. जेव्हा एकमेकांचा सहवास आवडायला लागतो, एकमेकांचे विचार पटायला लागतात तेव्हाच हे मैत्रीचे नाते निर्माण होते, एक बंध  निर्माण होतो. अश्या बंधाला कुठलेच बंधन नसते, कुठल्याच सीमा नसतात. विश्वबंधुत्वाची कल्पना या पेक्षा काय वेगळी आहे.
तसचं, जेव्हा आपण आपल्या सगेसंबंधी यांच्या पासून काही कारणासाठी दूर जातो तेव्हा कळत न कळत आपल्या त्या नात्यांची उणीव भासू लागते. क्वचित ग्रुहित धरलेल्या गोष्टी, विनाकारण अडून बसलेल्या गोष्टी, त्यातली पोकळी जाणवून त्या नात्याची किंमत कळायला लागते. उणीवेची जाणीव होते आणि त्याच त्या नात्यांना एक वेगळीच धार येते. नवनवीन पैलू जडले जाऊन त्याचेच कोंदण होते.
आता ह्या सगळ्यामध्ये अजून एक मुद्दा डोळ्यासमोर येतो तो असा की नातं ते मग कोणतेही असो, ते आरश्यातल्या प्रतिबिंबासारखे पारर्दशक असायला पाहिजे.
अशी ही नाती आणि असा हा नात्यांचा सोहळा.

नात्या नात्यांचा हा सोहळा
लाख मोलाचा हा मेळावा
दिवसांगणीत हा मुरणारा
वयांबरोबर हा वाढणारा
नात्यांतल्या नात्याने
नात्याला पैलू पाडणारा
अशी ही नाती
तुमची नी आमची
साऱ्यांचीच.