तलाव

तलाव (कथा)

    अपर्णा मिरजकरला गावाकडून शंकरकाकांचं पत्रआलं. वाड्याबद्दल. नंतर काकांचा आठवणीसाठी फोनही आला. लग्न होऊन मुंबईत आल्यावर अपर्णातिथेच स्थिरस्थावर झाली व वाड्याचा विषय विसरूनही गेली. तिला स्वतःची नोकरी होती. तिच्या वडिलांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलं होतं की, वाड्याचा निर्णय अपर्णाला विचारून घ्या. वाड्याचं काय एवढं, काका बघतील काय ते, आपण हो म्हणू, असा विचार तिनं केला होता. आज जवळजवळ वीस वर्षांनी अपर्णालात्या विषयावरचं पत्र आलं. जे काय हो म्हणायचंय ते फोनवरूनच म्हणू शकलो असतो, तिथे जाऊन काय करणार, असा विचार करत राहिली. पण काकांचा येऊनच जा, असा आग्रह होता.
   संध्याकाळी बँक संपवून ती घरी परतली तेव्हा शलाकाने सांगून टाकलं की, तिने ते पत्र वाचलंय आणि तिलाही गावाला यायचंय.
शलाका, अगं मी जाऊन येते.तू कशाला ?”
“मी येते ना. मलापाहायचाय वाडा. जाऊ ना आपण दोघी. तीन चार वर्षांची असताना एकदा नेलं होतंस त्यावर तूमला नेलंच नाहीयेस.”
“माझ्या ओळखीचेतरी आता किती लोक राहिलेत कोण जाणे. आई बाबा तर कधीच गेले. फक्त काका आहेत.”
जाऊ या ना...
“बरं, बघते. तुझ्या परीक्षेचं काय
?”
“परीक्षेला वेळ आहे अजून. तेवढ्यात आपण येऊ. “

      एक दिवस ठरवून रात्रीच्या एस.टी.ने अपर्णा व शलाका दोघी निघाल्या. सकाळी पोचल्या. दोघींनीही दिवसभर आराम केला. रात्री जेवताना शंकरकाकांनी गावातल्या अडचणींचा पाढा वाचला. वाड्याच्या अडचणी सांगितल्या. वाडा थोडा मोडकळीला आला होता. डागडुजी केली तर तगणारही होता. काकांनी आलेला नवा प्रस्ताव सांगितला. एक बिल्डर वाडा पाडून नवी बिल्डिंग बांधू म्हणून मागे लागला होता. 
     शंकरकाकांना तो वाडा विकून पैसे आले तर पाहायचं होतं. भरपूर प्रस्तावनेनंतर काकांनी संवादाची अखेर केली.
बेटा, तू तिकडं. आम्ही इकडं. सारखा संपर्क होत नाही. बिल्डरचा प्रस्ताव चांगला वाटतोय.
“हं. बघते.”
“ शलाका कितवीत ?”
“फर्स्ट ईयरला.”
“छान. चला, हात धुतल्यावर पडवीत बसू. “
     काकू, काका व अपर्णा जेवणानंतर पडवीत गप्पा मारत बसले. शलाका तर केव्हाच झोपून गेली होती.
     दुस-या दिवशी संध्याकाळी काका, अपर्णा व शलाका फिरायला निघाले. बदललेल्या गावाची बरीच माहिती काका शलाकाला देत होते.शलाकाही सगळं पाहून घेत होती. फिरता फिरता ते तिघेही तलावापाशी आले. तो गावातला जुना तलाव होता. संध्याकाळी अनेकांचं फिरण्याचं  हक्काचं ठिकाण होतं. काही ठिकाणीपाय-या बांधलेल्या होत्या. भोवताली झाडं होती. बरेच मजूर तलावात उतरून गाळ काढत होते. एकेका फावड्याबरोबर काळा काळा गाळ बाहेर निघत होता. काही मजूर त रकंबरेपर्यंत गाळात होते. मुकादम त्यांच्यावर अधून मधून ओरडत होता. गाळातला एक दगड हलत नव्हता. सगळे मिळून निर्धाराने तो हलवायचा प्रयत्न करत होते.
     तिथल्या लोकांच्या बोलण्यावरून समजलं की, नगरपरिषदेने तलावातला गाळ काढून तो स्वच्छ करायचं ठरवलंय. मूळ स्वरुप थोडं ठेवून काही भाग नवाकरणार आहेत. 
    सगळे फिरून परत आले. बोलण्यात सतत वाड्याचा विषय होताच.
    दोन दिवस राहून दोघी निघाल्या. गावातली मोकळी हवा शलाकानं खूप वर्षांनी अनुभवली होती. अपर्णालाही रोजच्या रटाळ दैनंदिनीतून थोडी सुटका मिळाली होती. लोकलचा आवाज दोन दिवस तिला ऐकू आला नाही. एस.टी.त बसल्यावर शलाकाने विचारलं,
आई मला अभ्यासाला आपला वाडा मिळेल? “
   अ
पर्णाचं विचारचक्र सुरुझालं: बिल्डरला दिला वाडा तर भरपूर पैसे मिळतील. त्यातले बरेचसे काकाच घेतील कारण ते वाड्यात खूप वर्षे राहिलेत. वाडा त्यांच्याच नावावर आहे. तसाही त्यांचाच अधिकार जास्त. शिवाय, त्यांना मूलबाळ नसल्याने त्यांना पैशांची गरज आहे. आपल्याला काका किती पैसे देतील, ते नक्की नाही. बिल्डरला दिलाच नाही वाडा तर आपला वाडा जपल्याचं समाधान मिळेल. आल्यागेल्याला जुनी संस्कृती दाखवता येईल. पाहिजे तर तिकीट लावतायेईल. शलाका तर बी.ए.करून टूर अँड ट्रँव्हल्स करणार म्हणतीये, तिला पुरातनसंस्कृतीचाही अभ्यास करायची आवड आहे. वाडाजपला तर तिला अभ्यासाचं हक्काचं ठिकाण मिळेल.
    विचार करण्यात अनेक दिवस जात होते. अपर्णाला दोन्ही पर्याय चांगले वाटत होते. कालपरवापर्यंत ती या विषयातही नव्हती. आता निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जवळजवळ तिच्याकडे होते. वडिलांच्या एका ओळीमुळे तिला अचानक मालकच झाल्यासारखं वाटायला लागलं. अपर्णानं काही दिवस तो विषय टाळला. विचार करणंबंद केलं पण एक ना एक दिवस काकांचा फोन येणार हे तिला माहीत होतं. एके रात्री विचार करता करता तिला ते तलावातले मजूर डोळ्यांसमोर येऊ लागले. तिला कल्पना सुचली...
‘ शलाकाचं ग्रँज्युएशन होईपर्यंत थांबायचं. ते झाल्यावर आपण लवकर रियाटरमेंट घेऊन शलाकाला घेऊनच गावाला जायचं. कायमचं राहण्यासाठी. संपूर्ण वाडा पाडायचा नाही. काही भाग तसाच ठेवायचा. डागडुजी करायची.शलाकाच्या अभ्यासासाठी, करीअरसाठी तो भाग तिला द्यायचा. उरलेला भाग थोडा पाडून नवं बांधकाम करायचं. ते बांधकाम करण्याचं काम त्या बिल्डरलाच द्यायचं. काकांना आपणच सांभाळू. बिल्डरला व काकांना समजावण्याचं काम मात्र करावं लागेल. ते काम शलाका ग्रॅज्युएट होईपर्यंत चिकाटीने करावं लागेल. कालपर्यंत आपण नोकरदार होतो. यापुढे कदाचित् मालकाची, थोडीशी मध्यस्थाची भूमिका निभवावी लागेल. तिथंच जाऊन राहायचंअसेल तर शहर सोडून गावाची शैली अंगवळणीपाडून घ्यावी लागेल. जमेल ?        मजुरांसारखा निर्धार करावा लागेल. शलाकाशी बोलावं लागेल. तिला आनंदच होईल. मुलगी सोबत असेल तर अशक्य काही नाही. जावईही त्यागोष्टींची आवड असणारा पाहायचा...(समाप्त)