दिन दिन दिवाळी !

नेहमीप्रमाणेच आठवड्याची भाजी, फळे इ.खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते.   बास्केट मध्ये सर्व सामान भरून मी बिलिंग काउंटर समोरच्या रांगेमध्ये उभी होते. रांग बरीच मोठी होती.. कदाचित तो सुट्टीचा दिवस होता म्हणून असेल. मी परत एकदा बास्केट तपासली, घरून निघताना काय काय घ्यायचे ठरवले होते त्याची उजळणी केली. सारे काही घेतले होते.. त्यात चार दोन अधिकच्या वस्तू देखिल अर्थातच होत्या. तिथल्या बाईंनी आमच्या सामानाचे बिल दिले.. आणि जायला निघणार तोच थांबा म्हणाली आणि तिच्या डेस्कमध्ये ठेवलेली दोन तीन पाकीटे  आमच्या सामानाच्या पिशवीत ठेवीत म्हणाली.. हॅपी दीपावली!! सुंदर मोराचे चित्र असलेली आणि हॅपी दीपावली असे लिहिलेली कागदी पाकीटे त्यांत होती. त्यावेळी लक्षात आले.. "खरंच की.. दिवाळी आहे नाही का काही दिवसांनी?" घरी येताना तोच विचार मनात होता. मलातर दिवाळीची चाहूलही नव्हती तोपर्यंत.    

तुमच्या लक्षात आलेच असेल की हा अनुभव परदेशातील आहे. कारण भारतात असे होणे कदापिही शक्य नाही. तुम्ही कितीही ठरवले तरी दिवाळी काही तुमच्यापर्यंत यायची राहतं नाही. दिवाळीच्या कितीतरी आधीपासून रोषणाई दिसायला लागते. बाजारपेठा आकाश कंदील, पणत्या आणि सुगंधी उटण्यांनी सजलेल्या असतात. सराफांची, कपड्यांची दुकाने गर्दीने ओसंडून वाहत असतात. दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी खरेदीची लगबग सुरू झालेली असते. गृहप्रवेशाचे, सोन्या चांदीच्या खरेदीचे मुहूर्त कोणते आहेत त्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात झळकत असतात. एकंदरीतच सर्वत्र उत्साही आणि उत्सवी वातावरण असते. 

मला पुण्याच्या लक्ष्मी रोड, तुळशी बागेतील गर्दी आठवत होती. तशी आजकाल जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वकाही, सर्वत्र मिळते. इथे देखिल सारे काही आहे पण तरीही ...  

पुण्यात आमचा वडिलोपार्जित वाडा होता. आजूबाजूला देखिल तसेच लहान मोठे वाडे, जास्तीत जास्तं दोन किंवा तीन मजले असलेले. घराच्या आसपास रहदारीचा रस्ता नव्हता. बहुतेक ठिकाणी पिवळसर प्रकाश देणारे दिवे असत. संध्याकाळी सात नंतर चांगलाच अंधार झालेला असे. दिवाळीच्या दिवसात मात्र हा सारा परिसर आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशात उजळून गेलेला असे. आजकाल दिसतो तसा झगमगणारा, चमचमणारा प्रकाश नसे तो. घरोघरी तयार होणाऱ्या फराळाच्या पदार्थांचे सुवास दरवळत असत. दिवाळी साऱ्या वातावरणात व्यापून राहिलेली असे.  

दिवाळीची सुरुवात वसुबारसाच्या दिवशी होते आणि ती  तुळशीच्या लग्नापर्यंत चालू राहते. परंतु आमची दिवाळी मात्र त्या आधीच सुरू होई. सहामाही परीक्षेच्या शेवटच्या दिवसापासून...

दुसऱ्या दिवसापासून दिवाळीच्या सुट्टीची सुरुवात होणार असे, परंतु परीक्षा संपवून घरी येतानाच दिवाळीने आमच्या मनात प्रवेश केला असे. दिवाळीत काय काय करायचे याचे बेत आखलेले असत. आता किमान पंधरा-वीस दिवस वह्या पुस्तकांना कपाटात बंद करून ठेवायचे नक्की असे. दिवाळीच्या सुट्टीत करण्यासाठी, गृहपाठ देणाऱ्या बाईंचा राग आलेला असे. परंतु तरीही दिवाळीच्या आनंदात तो राग कधीच विरघळून जाई.  

आता दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू होई. आई घरीच धान्ये निवडून, धुऊन, वाळवून भाजून घेत असे. मग ते सर्व गिरणीतून दळून आणायचे. नेहमीच्या गिरणीतून नाही.. भाजण्यांची गिरणी निराळी होती. मग चकल्या, चिवडा, शंकरपाळे इ. चे वास घरभर पसरू लागत. त्याच सुमारास नवीन कपड्यांची खरेदी होई. माझे आई, बाबा त्यांच्या साठी काही घेतील किंवा न घेतील, पण आमच्या साठी (म्हणजे मी आणि माझे दोघे भाऊ) सारे काही आणत असत.               

मुख्यं आणि महत्वाची खरेदी म्हणजे फटाक्यांची. त्या काळी सारसबागेच्या समोर एक मोकळे पटांगण होते (अजूनही असेल), तिथे फटाक्यांचे स्टॉल्स लागलेले असत. मग एक दिवस फटाक्यांची खरेदी करण्यात येई. घरी आल्यावर लगेच त्याची वाटणी करायची असे. आम्ही तीन भावंडे, त्यांमुळे खरेदी केलेल्या फटाक्यांचे तीन समान वाटे करण्यात येत असत. ते करताना अर्थात वादावादी (बोली भाषेत - भांडणे) होत असे. करण्यात आलेल्या विभागणीवर कुणीही समाधानी नसे. आणि आपल्यावर अन्याय करण्यात आलेला आहे असा तिघांचा समज होई. ते फटाके एका लहानशा पेटी मध्ये ठेवून द्यायचे. त्या फटाक्यांना दोन तीनदा कडक उन्हात ठेवले जाई. फटाके घरी आले, की टिकल्या, नागगोळ्या, रंगीत प्रकाश देणाऱ्या काडेपेट्या इ. चा वापर लगेचच सुरू होई. त्या नागगोळ्या जाळण्यात आणि एक एक टिकली फोडण्यात आमचा कितीतरी वेळ जात असे.  

फटाक्यांच्या खरेदी प्रमाणेच दिवाळीचा किल्ला करणे फार महत्वाचे होते. मातीचे मावळे, महाराज, वाघ, सिंह इत्यादी आणले जात. वाड्याच्या एका कोपऱ्यात किल्ल्यासाठी जागा निश्चित केली जाई. मग आधी विटांचे, फरशीचे तुकडे, दगड, गोटे इत्यादीचा एक ढीग रचला जाई. आपापल्या कल्पनाशक्तीनुसार त्याला आकार देण्याचा सारेजण मनापासून प्रयत्न करीत. मग त्यावर एखादा पोत्याचा तुकडा किंवा जाडसर फडके टाकायचे. जवळपास जिथे मिळेल तिथून माती आणलेली असे. ती मोठ्या चाळणीने चाळून घ्यायची. त्यात पाणी मिसळून त्याचे लिंपण दगडविटांच्या तयार केलेल्या आकाराला करायचे. त्या निमित्ताने भरपूर वेळ, मनसोक्तं मातीत खेळायची परवानगी असे. त्या चिखलाचे जाडसर लिंपण ओले असतानाच त्यावर मोहरी, धणे असे काय काय टाकायचे. म्हणजे थोड्या दिवसात आमच्या गडावरची झाडे, झुडपे तयार होत असत. किल्ल्याच्या माथ्यावरची जागा अर्थात महाराजांसाठी राखीव असे. त्या नंतर आजूबाजूला त्यांची मावळे मंडळी उभी राहतं. गडावरच्या जंगलात वाघ, सिंह देखिल असत. काही वेळा, त्या वाघ, सिंह आणि मावळ्यांमध्ये एखादी मोटार किंवा ट्रक पण ठेवला जाई. पण ते आम्हाला चालत असे.         

त्यावेळी आकाश कंदील देखिल आम्ही घरीच बनवत असू. बुरूड आळीत त्या साठी लागणाऱ्या बांबूच्या काड्या मिळत असत. आप्पा बळवंत चौकातल्या दुकानामध्ये रंगीत कागद, डिंक आणि इतर सजावटीचे साहित्य मिळे. तो तयार केलेला कंदील, घरासमोर लावल्यावर त्यांमध्ये एक बल्ब सोडायचा. रात्री किंवा पहाटेच्या वेळी तो बल्ब उजळला, की आकाश कंदिलाचे रंगीत कागद आणि त्यावरची सजावट खूप छान दिसायची.   

दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी. त्या दिवशी पहाटे लवकर उठायचे. थंडी चे दिवस आणि बाहेर गर्द काळोख, पण त्यात घरापुढे लावलेल्या पणत्यांचा मिणमिणता प्रकाश असे. मंद वाऱ्यावर हेलकावणाऱ्या आकाश कंदिलाने सारा परिसर प्रकाशमान होई. दिवाळीच्या स्वागता साठी घरासमोर रांगोळीच्या पायघड्या घातलेल्या असत. ते वातावरणच जादूमयी असे. डोळ्यावर अजून झोप असे, परंतु झोपण्याची अजिबात इच्छा नसे. लवकरात लवकर फटाके लावण्यास सुरुवात करायची असे. काही दुष्ट मुले, आमचे आवरून होण्याच्या आधीच फटाके वाजविण्यास सुरुवात करीत. मग "मला अजून लवकर का नाही उठवलं?", म्हणून आई, बाबांवर राग निघे.    

सकाळी चांगले उजाडे पर्यंत फटाक्यांचा दणदणाट चालू असे. सर्वत्र धूर पसरून त्यांमुळे नंतरचे काही दिवस सर्वांचे घसे बसत असत. सकाळी, घरी दिवाळीचा फराळ असे. काही वेळा कुणी नातेवाईक आलेले असत. फराळाबरोबर आम्हाला गरम दूध किंवा नुसत्या दुधाची कॉफी मिळे. त्यावेळी आम्ही तिघेही अजून चहा पिण्यायोग्य वयाचे झालेले नव्हतो. क्वचित कधीतरी, आई चहा द्यायची, पण नेहमी नेहमी नाही.  

नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होईपर्यंत आमचा दारुगोळा (फटाके) संपत आलेला असे. मग बाबांकडे मागणी सादर होई. बाबासुद्धा उगीचच म्हणत, " सांगितलं होतं ना, हे फटाके पूर्ण दिवाळीला पुरवायचे. मग आधीच कसे संपले?" यावर चुपचाप बसून राहायचे, काय बोलणार?   पण अंदाज घेत राहायचा की बाबा अजून फटाके आणून देतील की नाही? मग संध्याकाळी बाबा एक मोट्ठी कापडी पिशवी (तो पर्यंत प्लास्टीक चा फारसा वापर नव्हता) आणून देत. त्यातले फटाके पुढे भाऊबीज आणि पाडव्यापर्यंत पुरवायचे असत.   

दिवाळी संपल्यानंतर देखिल किती तरी दिवस घरासमोरचा आकाश कंदील तसाच असायचा. आमच्या टिकल्या नागगोळ्या संपलेल्या नसत आणि आमच्या गडावरचे जंगल अजून घनदाट झालेले असे. पण सुट्टी संपायला आता दोन चार दिवसच राहिलेले असत. मग नाईलाजाने कपाटात बंदिस्त केलेल्या वह्या पुस्तकांची दखल घ्यावी लागे. बाईंनी दिलेला गृहपाठ मोठ्या अनिच्छेने कसाबसा उरकला जाई. परत सारे तेच रहाटगाडगे सुरू होणार म्हणून उदास वाटू लागे. दिवाळीतल्या अनुभवांची देवाण घेवाण करताना हळू हळू सारे काही पूर्वपदावर येऊ लागे. दिवाळीच्या लखलखत्या आठवणी मनात ठेवून नेहमीच्या आयुष्याला सुरुवात होई. 



घनदाट तमाच्या तीरी

तेजाच्या लक्ष ओळी ।


नाजूक, मोहक ज्योती

आसमंत उजळती ।


प्रकाश सुखाचा देती

आकाशदीप घरोघरी ।


रंग रांगोळीचे खुलती

 येई आनंदा भरती ।


पखरण फुलांची जणू

मीलन रंग-गंधां चे ।


हास्याचा नाद भरे

घराघरातून --मनामनातून ।


वर्षा सुख-समृद्धी ची

करी आपल्या जीवनी ।


दु:ख, दैन्य दूर सारे

ही दिवाळी ... ही दिवाळी । 



दु:ख आणि द्वेषाच्या तिमिरावर मात करून ही दिवाळी सर्वांना सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश देवो, ही शुभकामना!