नेटवरच्या मालिका

पाताळलोक, मिर्झापूर सेक्रेड गेम्स आपल्या येथील नेटवर चालणाऱ्या मालिका कलेच्या दृष्टिकोनातून खूपच वाईट आहेत. निर्मात्यांना कलाकृतीच्या नावाखाली विकृती दाखवण्यात जास्त रुची दिसते. त्याचे पडसाद आपण अनुभवत आहोतच. समाजात क्रूरता, आततायीपणा व विकृतीची झलक सभोवार दिसते. आपल्या शत्रूचे कौतुक करताना दुःख होते पण काही पाकिस्तानी मालिका (हमसफर, सदके तुम्हारे, जिंदगी गुलजार है इत्यादी) इतक्या चांगल्या तऱ्हेने रेखाटल्या आहेत हे पाहून आपल्या 'सास बहू' व बाकीच्या मालिकांच्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी त्यांच्या कला कौशल्याचा पूनर्अभ्यास करून स्वतःला बदलणे जरूरी आहे. थोडा 'हमसफर' किंवा 'जिंदगी गुलजार है' अशा मालिकांचा अभ्यास केला तर दर्जेदार मालिका तयार करता येते हे आपल्या इकडील दिग्दर्शकांच्या लक्षात येईल. भारतात दर्जेदार चित्रपट व मालिका पूर्वी बनत होत्या व तशाच दर्जेदार मालिका तयार करण्याची भरपूर क्षमता आजही आहे. पण भरकटलेल्या निर्मात्यांनी विकृत मालिका तयार करून कलेचा गळा घोटला आहे. एवढेच नाही तर त्यामुळे बघणाऱ्यांचा दर्जेचा स्तर पण खालावला आहे. हल्लीच्या बहुतांश प्रेक्षकांना विकृत बघणे हे सामान्य वाटायला लागले आहे. विकृत हे सामान्य वाटायला लागणे हे समाजाच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक आहे. वरचेवर विकृती बघून मेंदू सरावतो व माणूस कधी विकृतीच्या अधीन जातो ते त्याचे त्यालाच कळत नाही. नेट वर सेंसॉर (नियंत्रण) लागू होऊ शकणार नसेल तर आपल्या येथे चित्रपटांसाठी सेंसॉरचा (नियंत्रणाचा) काय उपयोग. नियंत्रण लागू होऊ शकत नाही म्हणून चालू द्यावे ह्याला काय अर्थ आहे. माहिती प्रसारण मंत्री काही करू शकतात का. करतील का.