बाबासाहेब

#Babasaheb
ह्या फोन बनवणाऱ्या कंपन्यांना "फोन" हा एखादा अवयव असल्यासारखा महत्त्वाचा करण्यात यश मिळालं खरं पण तो तसा निर्विकारपणे वापरता यावा ह्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्या काही ह्यांना बनवता आल्या नाहीत.
३% आणि टुण्क वाजला फोन की आता कधीही मारणार तो...

आम्ही बनवलेला मावळा हा बोर्ड गेम (The Mawala) जमेल तिथे स्वतः पोहोचवत होतो असे ते दिवस!!

एका भव्य सोसायटीखाली उभा मी आणि श्री. अमृत पुरंदरे ह्यांचा फोन आला!
"मेल तपासा!"
एव्हढं म्हणाले आणि फोन डिसकनेक्ट केला!

आमच्या बोर्ड गेमच्या पहिल्या आवृत्तीचा पहिला बोर्ड गेम आम्ही १ महिनाभर आधी अमृतजींना दिला होता, विनंती केली होती की बाबासाहेबांपर्यंत पोहोचवा म्हणून!त्यांचा असा अचानक अनपेक्षित फोन म्हणजे नक्कीच आमच्या पिलाने आमच्या प्रेरणास्रोतापर्यंत झेप घेतली असणार अशा शक्यतेने मीच आकाशात उडेन आता असे वाटायला लागले होते मला, तोवर फोनने पुन्हा एकदा बंद होण्याची धमकी दिली!

मी देवाचा जप करत पटकन मेल ओपन केले आणि त्यात ३ फोटो attachment म्हणून दिसले. डाउनलोड होणे अशक्यच होतं मग न राहवून ज्या ग्राहकाला बोर्ड गेम द्यायला निघालो होतो त्यालाच विनंती करून फोन चार्ज करून घ्यावा असे ठरवले.
बेल वाजवली आणि अवतारावरून अगदीच कुरिअर बॉय वाटत नसल्याने स्मितहास्याने स्वागत झालं. मी अतिउत्सुकतेने थेट "मला आत यायचं आहे!" असं अशा पद्धतीने म्हणालो की तुम्हाला नकाराधिकार नाही हे होतं त्यात!

बसलो. परिस्थिती समजावली.
चार्जिंगला लागलेल्या फोनच्या स्क्रीनकडे पाहून डाउनलोड सुरू केलं. क्षणार्धात डोळे चिंब ओले झाले आणि भान विसरून घळाघळा वाहायला लागले! दस्तूरखुद्द बाबासाहेबांनी आमचा मावळा हा बोर्ड गेम हातात घेतलेला आहे असे ३ फोटो होते....

अहो, मुलासाठी गमती गमतीत काहीतरी करायला गेलो आणि हे काय पाहायला मिळते आहे ह्यावर क्षणभर विश्वासच बसेना!

माझ्या जवळजवळ अनोळखी यजमानांना प्रसंग लक्षात आला आणि त्यांनी ग्लासभर पाणी पाजले. आयुष्यात पहिल्यांदाच अतिअस्वस्थ असताना मिळालेल्या पाण्याच्या एका ग्लासापुढे अमृतही फिके असते ह्याचा स्वानुभव घेतला. हडबडून जमेल तितका भानावर आलो आणि अमृतजींना फोन लावला. घोगऱ्या आवाजात आभार वगैरे मानले पण अशावेळी नाही म्हणजे नाहीच सुचत काही बोलायला....

यजमानांचे आभार मानले आणि मनातल्या मनात अजागळपणाबद्दल खेद व्यक्त करून तिथून सुटलो.
गाडीत फोनमध्ये परत उरले सुरले प्राण ओतायला सुरुवात केली.
इतक्यात अमृतजींचा परत फोन!
"कुठे आहेस?"
एखाद्या समवयीन मित्राचा असता तर उत्तर "थेट चंद्रावर!" असं गेलं असतं, पण त्यांना प्रामाणिकपणे भौगोलिक ठिकाण सांगितले. त्यांनी पत्ता दिला आणि सांगितले की "त्यांना खूपच आवडलाय मावळा, असशील तसा पोहोच बाबांना भेटायचे आहे!"

झालं, त्यापुढे Shantanu Kulkarniला फोन करून बोलावण्याचे एक काम भान ठेवत केलं बाकी सगळ्या हालचाली यांत्रिकपणे झाल्या.दिलेल्या पत्त्यावर मी, माझी बायको Prajakta Kulkarni आणि शंतनू असे पोहोचलो.
बाबासाहेब आम्ही आत जात होतो त्या मार्गात पाठमोरे बसले होते. फिरून जमेल ती जागा मिळवून अक्षरश: थरथरत शेजारी बसलो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी, त्यांच्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या गोष्टी सांगताना एक अनामिक स्फुरण येतं अंगात. ह्याचा अनुभव सगळा लॉक डाऊनभर मी घेतला होता. माझ्या पुढे एक वयाने शंभरी गाठलेलं एक चैतन्य बसलेलं होतं ज्याने तब्बल ८० वर्षे फक्त हेच केलेलं होतं. माणसांचा देव करू नये वगैरे वगैरे वालं मी पाळलेलं तत्त्वज्ञान लांब कुठेतरी फेकून दिलं माझं मीच आणि 
"ह्याहून वेगळं ते देवदर्शन काय?"असं झालं एकदम मला!

चेहऱ्यावर असलेला प्रसन्न भाव,
डोळ्यांत असलेली चमक
आणि बहुदा त्यांना आवडला होता आमचा मावळा म्हणून एकंदरीतच आपण समोर आल्याने त्यांना आनंद झाला आहे हे दिसत होतं आम्हाला!

काही तासांपूर्वी स्वतःचाच व्यवस्थित अनुभव आल्यामुळे मी खिशात हात घालून रुमाल काढला! पुढे काही मिनिटे ते कौतुक करत होते आणि आम्ही डोळे पुसत होतो. 

पायावर डोकं ठेवलं तेव्हा एकदम हलकं हलकं वाटलं, असं वाटलं की
जबाबदारीचं,
केलेल्या कष्टांचं,
आलेल्या दडपणाचं सगळं सगळं ओझं खांद्यावरून उतरलं आहे.

आपल्याकडे बहुदा वाकून नमस्कार त्यामुळेच करत असतील!

जाताना म्हणाले "आभाळाएव्हढं कौतुक केलं तरी कमीच आहे असं काही केलं आहे तुम्ही...मी धन्य झालो!"
.
.
.
.
.
.
गेल्या गुरुपौर्णिमेचा तो एक दिवस आणि आजचा दिवस....
बाबासाहेब आजपासून आपल्यासोबत चैतन्यस्वरूपात असणार आहेत.ते पाहणार आहेत आम्हाला त्यांनी प्रशस्थ केलेल्या राजमार्गावर उरलेले आयुष्य चालताना...
वेगवेगळ्या अभिनव पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज,
राज्यात; देशात काय तर जगात सगळीकडे अगदी घरोघरी पोहोचतीलफक्त एव्हढ्याच ध्येयाने उर्वरित आयुष्य घालवतानाते पाहणार आहेत आम्हाला!!!