पुलवामाचे परिणाम (द पुलवामा आफ्टरमॅथ) - एक समकालीन रहस्यरंजन

समकालीन राजकीय पार्श्वभूमीवर बेतलेली भारतीय कादंबरी हा एक अप्राप्य प्रकार. त्यातून रहस्य/थरार कादंबरी म्हणजे अप्राप्यपणात अजूनच भर. तीन पायांच्या गायीला पाच पायांचे वासरू व्हावे तसे.

मराठीत राजकीय पार्श्वभूमीवर बेतलेली कादंबरी म्हटली तर 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' इथे गणना सुरू होते नि संपते. नंतर काही उथळ आणि हास्यास्पद प्रयत्न झाले, पण सुदैवाने तेवढ्यावरच निभावले.

हिंदी/इंग्रजीत असे काही माझ्या तरी वाचनात नव्हते. त्यातल्यात्यात सत्य व्यास या लेखकाची 'बनारस टॉकीज' ही कादंबरी वाराणसीतल्या बाँबस्फोटांना आपल्या कथानकात गुंफून घेते तेवढेच.

प्रतीक शाह या लेखकाची 'द पुलवामा आफ्टरमॅथ' फुकटात मिळाली या एका(च) कारणाने वाचायला घेतली. प्राईम रीडींगमध्ये जी दहा पुस्तके वाचायला मिळतात त्यात ती एक आहे.

पुस्तकाने खिळवून ठेवले असे म्हणणे थोडीशी अतिशयोक्ती ठरेल. पण खिळवून ठेवण्याच्या एक-अर्धी पायरी अलिकडपर्यंत लेखक नक्की घेऊन जातो. आणि तिथून हलू देत नाही.

भारतातले राजकारण गेल्या दहाएक वर्षात जे ढवळून निघाले आहे ते अजूनही सगळे आकलनाच्या टप्प्यात आले आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अजूनही 'हत्ती नि आंधळे' गोष्टीसारखेच चालले आहे. कुणाला घोषित/अघोषित आणीबाणी जाणवते आहे, कुणाला आपला अविश्वसनीय विकास झाल्याचा विश्वास वाटतो आहे, कुणाला असहिष्णुता वाढीला लागल्याची खात्री पटते आहे, कुणाला आठ वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाल्याचा साक्षात्कार होतो आहे, कुणी देश भांडवलदारांच्या दावणीला बांधला गेल्याची हाळी ठोकतो आहे तर कुणाला एक नवी पहाट होत असल्याने ऊर भरून आला आहे. मुळात अण्णा हजाऱ्यांच्या आंदोलनापासून बदलत चाललेली समाजाची मानसिकता ही केवळ (आणि केवळ) निवडणुकांमधूनच व्यक्त होते या एक-मिती सुलभीकरणाने हा गोंधळ माजला आहे. असो.

या कादंबरीत पुलवामा इथल्या सुरक्षा दलांवरचा हल्ल्यानंतरची झालेली राजकीय आणि सैनिकी घुसळण प्रामुख्याने मांडली आहे. त्यात लोकसभेच्या निवडणुका. त्यात यश मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे कडोनिकडीचे प्रयत्न. त्या धामधुमीत मुंबईत प्रचारसभेसाठी आलेल्या पंतप्रधानांवर हल्ला होतो. त्या हल्ल्यामागे कोण(कोण) आहे, काय साध्य करण्यासाठी कुठली साधने वापरली जातात, दिल्लीतली नोकरशाही आणि सत्ताधारी पक्ष त्याला कसे सामोरे जातात याचा लेखाजोखा मांडणारी ही कादंबरी.

बरेचसे संदर्भ फारच ओळखीचे आहेत. विशेषतः व्यक्तीसंदर्भ. पण ते टाळणे वा न टाळणे हा लेखकाचा अधिकार. पूर्णपणे नवीन पात्रे निर्माण करून कादंबरी रचायची तर त्या पात्रांना स्थापित करण्यासाठीच बराच वेळ जातो. 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' या दोन कलाकृती एकत्र मिळून खरेतर एक कादंबरी होते. तितका मोठा कॅनव्हास घ्यायचा नसेल तर काही संदर्भ तयार घेऊन त्यावर कथानक रचणे हे करावे लागते. पण संदर्भ ओळखीचे (किंबहुना अति-ओळखीचे) असले तरी त्यावर लेखकाने आपले संस्करण नीट केले आहे. मागे लिहिल्याप्रमाणे ह मो मराठ्यांसारखा 'कमिताप' आणि 'गुणबहू' असला बटबटीतपणा टाळला आहे.

कादंबरीतील रहस्य आणि थरार व्यवस्थित खुलवत नेला आहे. आता अगदीच 'द डे ऑफ द जॅकल' याच्याशी तुलना केली तर उणेपणा निश्चित जाणवेल. पण प्रत्येक कलाकृतीची तुलना त्या आधीच्या एकाद्या कलाकृतीशी करायलाच हवी या अट्टाहासाला तिलांजली दिली तर मोकळेपणाने आस्वाद घेता येईल.

कादंबरीतले नोकरशाहीचे नि राजकीय नेतृत्वाचे उल्लेख नि संदर्भ अगदी बिनचूक आहेत. दिल्लीतली नोकरशाही कशी हलते नि राजकीय नेतृत्व कसे डुलते हे ज्याने अनुभवले आहे त्याला तर पुनःप्रत्ययाचा अनुभव येतो. आता याने कुणाच्या वर्मी घाव बसू शकेल. पण रंगांधळ्या माणसांना जग काळेपांढरेच दिसणार म्हणून सोडून द्यावे.

शेवटी अगदी 'दि एंड' होण्याच्या बेतात असताना एक काहीशी अतर्क्य गिरकी मारून कादंबरी संपते. त्या गिरकीमुळे आपली अवस्था हलत्या झोपाळ्यावरून अचानक उतरल्यासारखी होते.

एकूण वाचनीय नक्की, संग्रहणीय आहे की नाही हे प्रत्येकाने ठरवावे.

कादंबरी इथे उपलब्ध आहे.

जाता जाता - आंतरजालावर फेरफटका मारताना पुलवामाबद्दल पाकिस्तानमधील एकाचा लेख इथे मिळाला. एक दृष्टीकोन म्हणून लक्षणीय वाटला. शेवटी भारतीय म्हणून आपल्याला कशा प्रकारच्या प्रसिद्धीला तोंड द्यायचे हेही माहीत असावे...