नैना - एक रहस्य-थरार कथा

दिल्लीतल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या टीव्ही चॅनेलची एक सूत्रसंचालिका. 'राष्ट्रीय भावना' ठासून मांडण्यासाठी प्रसिद्ध. खुद्द पंतप्रधानही तिला ट्विटरवर फॉलो करतात. तिचा भल्या पहाटे निर्मम खून होतो. सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेणारी घटना.

मग सुरू होते वेगवेगळ्या क्षेत्रांतली घुसळण. तिच्या स्वतःच्या टीव्ही चॅनलमधली अंतर्गत स्पर्धा, तिचे तिच्या वरिष्ठांबरोबर असलेले संबंध, माध्यमक्षेत्रात तिच्या आधीपासून असलेला परंतु सध्या बहुतांशी घरी बसलेला तिचा नवरा, तिच्याशी संबंधित राजकारणी, हे प्रकरण तपासाठी ज्या अधिकाऱ्याकडे दिले आहे त्याचा पूर्वेतिहास, आणि अखेरीस खुन्याची होणारी उकल.

पण यात यापेक्षाही बरेच वेगळे आणि जास्ती काही आहे.

नैना (हा उत्तर भारतीय उच्चार; मराठीत नयना) ही नक्की होती तरी कोण? कॉलेजात असतानाच प्रेमात पडून लग्न करून आणि त्यापाठोपाठ मुलाला जन्म देऊन बसलेली एक भारतीय नारी? मुलगा थोडा मोठा झाल्यावर कुटुंबाची आर्थिक गरज समजून घेऊन नोकरी करायला तयार होणारी पत्नी? आपल्याला या क्षेत्रात चांगली संधी आहे हे जाणवल्यावर पुरुषांना वापरून यशशिखरे चढत जाणारी महत्वाकांक्षी स्त्री? की वृद्धाश्रमात स्वेच्छेने जाऊन वेळ देणारी आणि आपल्या नोकरांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणारी एक आदर्श समाजहितैषी?

आणि तिच्याशी संबंधित इतर व्यक्तीही काळ्यापांढऱ्या रंगातच बघाव्यात का?आर्थिक गरज म्हणून तिला नोकरीला लावणारा, आणि तिचा जम बसल्यावर अलगद कमाईच्या व्यापातून मुक्त होऊन घरी 'ग्लेनफिडिक' पीत बसणारा तिचा नवरा? तिला 'वापरून' घेणारे तिचे वरिष्ठ? त्यातील तिच्याशी आत्यंतिक भावनिक जवळीक असलेला (आणि शारिरीक जवळीक नसलेला) तिचा एक घटस्फोटित वरिष्ठ, तो कोण? नि तिच्याशी शारिरीक संबंध ठेवणारा, पण भावनिक संबंध नसलेला तिचा दुसरा विवाहित वरिष्ठ, त्याला काय म्हणावे? तिच्याशी अर्ध-भावनिक नि शारिरीक संबंध ठेवणारा एक बडा राजकारणी, त्याला वासनांध म्हणून टाकावे का?

असे अनेकानेक पदर.

आणि त्यात माध्यमक्षेत्रातल्या काही तांत्रिक बाबी नि अंतर्गत चढाओढी यांचे नीटस वर्णन. टीव्हीवर कार्यक्रम होतो म्हणजे नक्की कसा, त्यामागे कुठकुठल्या मंडळींचा हातभार असतो याचे माफक वर्णन. आणि अंतर्गत हेवेदावे किती तीव्र नि विखारी असतात याचे थोडे सविस्तर वर्णन. तिच्या खुनापेक्षा ती खून झाला तेव्हा गरोदर होती का याबद्दल(च) बोलत राहणारी प्रतिस्पर्धी चॅनेलची सूत्रसंचालिका.

लेखक संजीव जयस्वाल काही दशके माध्यमक्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे हे सगळे अस्सल उतरले आहे. विकीपीडीया आणि तत्सम संदर्भ धुंडाळून मग त्यावर संगीतापासून अर्थशास्त्रापर्यंत कुठल्याही क्षेत्रातले 'तज्ञ' बनणाऱ्यांप्रमाणे उथळ नव्हे!

कादंबरी अमेझॉन प्राईम रीडींग येथे उपलब्ध आहे.