प्राची

प्राची गुर्जर

प्रश्न:यशोवाणीच्या सामाजिक कार्याचे बीज कधी रोवल्या गेलं ?

उत्तर: लहानपणीचा एक प्रसंग लख्ख आठवतोय व तो मनात घर करून बसला पण सुप्त होता. प्रसंग असा की एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यात अंधांचा (तेव्हा तसंच म्हणत आता आपण दृष्टीबाधित किंवा VIP visually impaired person म्हणतो) वाद्यवृंद होता ते त्या काळात (१९७६-६८) अनोखं होतं. माझी बहीण म्हणाली ते भीक मागत नाही ते स्वावलंबी, आत्मनिर्भर आहेत, ते खूप भावलं होतं. घरातल्या संस्कारामुळे हे बीज सुप्त होतं तरी जीवित होतं.माझ्या बालपणाबद्दल थोडं सांगते. माझे वडील उच्चपदस्थ सरकारी अधिकारी. मोठं सरकारी घर, घरात नोकर चाकर दाराशी गाडी असं सुखवस्तू पण मूल्याधिष्ठित, धार्मिक व आध्यात्मिक वातावरण होतं. माझी आई नाना महाराज तराणेकरांची अनुग्रहित. जे आपल्याकडे आहे ते दिवाळीचा फराळ , फटाके, नवीन कपडे किंवा पुस्तकं असू देत आजूबाजूच्या लोकांमध्ये वाटून मगच आम्हा भावंडांनी त्याचा उपभोग व आनंद घ्यायचा असा शिरस्ता होता.

हे असं समाजकार्याचं बाळकडू हे घरातूनच मिळालं होतं. यथावकाश शिक्षण, लग्न, मुलींचे संगोपन व त्याच बरोबर रिकामं बसण्याचा स्वभाव नसल्याने इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी हिंदी विषयाच्या शिकवण्या घेत वर्षे कशी उलटून गेली ते कळलंच नाही. मोठ्या मुलीचे लग्न झाले. रजोनिवृत्तीचा काळ व रिकामं घरटं (empty nest syndrome) ह्याची मनात कुठेतरी धास्ती होती. शिकवण्याचाही कंटाळा आला होता त्याही बंद केल्या होत्या. मन गुंतवायला ब्रेल शिकावं वाटू लागलं अन गंमत म्हणजे त्याचवेळेला पेपरमध्ये एक छोटीशी NAB (National Association for Blind) तर्फे एक महिन्याचा para professional कोर्सची जाहिरात पाहण्यात आली. तिथे गेले चौकशीसाठी पण प्रवेश सहजासहजी मिळाला नाही त्याची जरा लंबी कहानी आहे पण एवढंच सांगते की माझी तीव्र इच्छाशक्ती फळाला आली. घराच्या बाहेर न पडणारी मी रोज जाऊ नॅबला जाऊ लागले. मी जरी मुंबईत वाढले असले तरी ट्रेन, बस वै प्रवासाची सवय नव्हती. पहिल्यांदा गेले तेव्हा धाकटीने सोबत केली मग हळूहळू मला सवय झाली. सुरुवातीला दोन तास जायचे आणि जे पडेल ते काम करायचे. अक्षरश: पाच मिनिटेही वेळ वाया घालवायची नाही. सगळीच काम करताना रस वाटू लागला, मजा येत होती. दोनाचे,चार, सहा आठ तास काम करू लागले. कार्यकर्ते भरपूर असायचे पण त्यांना जमेल तसं ते वेळ द्यायचे त्यात सातत्य नसायचं.

त्यावेळचे संचालक आठलेकर सरांनी माझी माझ्या कामावरची निष्ठा जोखली मग ते माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकू लागले. आठलेकर सरांकडून खूप शिकायला मिळालं. मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. महत्त्वाची एक गोष्ट सांगते जी मी त्यांच्याकडून शिकले की हिरिरीने सगळ्यांना सगळी मदत करायलाच पाहिजे असं नाही त्यांना गरज असेल तरच मदत करायची. त्यांच्याबाबत कीव करुणा दाखवायची नाही कारण त्यांना आपल्याला सक्षम बनवायचे आहे. डोळे झाकून मदत करायची नाही. परीक्षांसाठी लेखनिक म्हणून जायचे. मुले उत्तरे तोंडी सांगतील तीच उत्तरे लिहायची चुकीची आहेत हे माहिती असतानासुद्धा. संस्थेत मुलांना पुस्तकं वाचून दाखवायचे तेव्हा लक्षात आलं की हे काम घरी बसून जर का केलं तर येण्याजाण्याचा वेळ वाचेल व त्या वाचलेल्या वेळात जास्त ध्वनिमुद्रण करता येईल. कॅसेट बनवून किंवा वाॅकमनवर पुस्तके रेकाॅर्ड करून देऊ लागले. काही मैत्रीणींशी गप्पा मारताना हे सांगितलं तर त्याही पुस्तक रेकाॅर्ड करून देऊ लागल्या. असा नॅबमधला माझ्या जीवनातला आनंदाचा, समाधानाचा काळ होता.

प्रश्न: मुंबईहून पुण्यात येऊन इथे कसा काय जम बसवलास?

उत्तर: पुण्यात आले इथे स्थिरस्थावर वेळ लागला घरच्याही काही अडचणी होत्या. मुंबईहून पुस्तकं आली की रेकाॅर्ड देत असे. मृत्युंजय कादंबरी रेकाॅर्ड करून एका संस्थेला दिली. बऱ्याच मुलांनी ती ऐकली. कुणीतरी मॅडम पुस्तकं रेकाॅर्ड करून देतात हे कळलं होतं. इथल्या काही संस्थांमध्ये काम करू शकले असते पण त्या दूर होत्या. एका संस्थेत जात होते पण वाहनाची सोय, खर्च व वेळ हे सगळं व्यवहार्य नव्हतं. घरी बसून पुस्तकं ध्वनिमुद्रित करून देणं जास्त सोयीचे व सोपं होतं. ध्वनिमुद्रित फिती करण्याच काम हळूहळू चालू होतं. एक मैत्रीण रश्मी पांढरा ती एका प्रसिद्ध कंपनीचा पिझ्झा घरपोच द्यायची ती सेवा देणाऱ्या मुलांबरोबर पुस्तकांची व कॅसेटची नेआण करण्यास मदत झाली. मग MP3, संगणक, इंटरनेट व आता आलेले ॲन्ड्राॅईड फोन अश्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जास्त लोकांपर्यंत पोचता आलं व अनेक स्वयंसेवकांना ह्या कामात सहभागी करून घ्यायला खूप मदत झाली. ह्या टेक्नाॅलाॅजीला मन:पूर्वक धन्यवाद! ह्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर मी ही नवनवीन गोष्टी शिकत गेले, तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वावलंबी होत गेले. तंत्रज्ञानामुळे ध्वनिमुद्रित केलेलं पुस्तक संपादित करून निर्दोष व उत्तम प्रतीचं ध्वनिमुद्रण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. स्वयंसेवक शक्यतो शांत वेळातच ध्वनिमुद्रण करण्याची खबरदारी घेतात. स्टुडिओत केल्याप्रमाणे होतं नाही, हे ही मान्यच आहे.

प्रश्न: आजघडीला किती स्वयंसेवक आहेत?

उत्तर: देशविदेशातली मिळून जवळपास तीनशेच्या घरात ही संख्या आहे. ही स्वयंसेवक मंडळी काय बोलू त्यांच्याबद्दल तीच माझी सगळ्यात मोठी शक्ती आहे. सुरुवातीला माझ्या मैत्रिणी होत्या. मग त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे नातेवाईक असे करत करत एक मानवी साखळी तयार झाली आहे एखादी कडी निसटली तरी दुसरा कोणीतरी पकडणारा हात तयार असतो. ह्यामधूनच आपण वेगवेगळे चमू तयार केले आहेत. फाइल एकत्रित करणारी, संपादन करणारी, काही विषय असे असतात जे समजवून सांगावे लागतात विशेषतः गणित, विज्ञान, अर्थशास्त्र अश्या विषयांचे ट्युटोरियल्स तयार करणारा, गणित विषयाचा, बहुश्रुतुता येण्यासाठीचा साहित्य चमू असे अनेक चमू आहेत. मला खूप अभिमान वाटतो सांगायला की खूप उच्च शिक्षित, तज्ज्ञ मदतीला तत्पर असणारी मंडळी आपल्या साखळीत आहे तशीच अगदी सुरुवातीच्या काळात आमच्या इमारतींचा सुरक्षा कर्मचारी पोस्टात कॅसेट्स द्यायला जायचा, बरेचदा पोस्टमन घरी येऊन जायचा आणि एक मुलं पुस्तकं द्यायला घरी यायचे ना तर नाक्यावर विचारायचे माझा पत्ता तर त्याही लोकांना मी अंघ लोकांसाठी काहीतरी काम करते हे माहिती झालं होतं ते बरोबर मुलांना घरी आणून सोडायचे, ही साखळी वाढवण्यात छोटासा का होईना त्यांचाही वाटा मोलाचा आहे असं म्हणीन. आपलं काम फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही इतर प्रांतातूनही पुस्तकं येतात ध्वनिमुद्रणासाठी.

प्रश्न: संस्थेच्या नावाबद्दल सांग व नोंदणीकृत आहे का?

उत्तर: हे विस्तारत गेलं तसं तिला एक चेहरा/ओळख द्यावी वाटू लागलं. बऱ्याच नांवांवर विचार करू लागलो. दृष्टी, नजर वै शब्दांशी निगडित नावाचा विचार करू लागलो. आठलेकर सरांशी बोलल्यावर ते म्हणाले दृष्टी, अंध निगडित शब्दाचा अट्टहास कशाला? मलाही ते पटलं. कोणी सुचवला आठवत नाही पण बारसं झालं खरी. ज्या वाणीने यश मिळतं ती 'यशोवाणी'!आपली संस्था नोंदणीकृत नाहीये. ही सगळी सेवा विनामूल्य आहे. इथं कुठेही पैशाची देवाणघेवाण नाहीये. एखाद्याला काही गरज समुपदेशानाची,आर्थिक किंवा इतर कोणती असेल तर ती आपण आपल्या ग्रुपवर टाकून लोकांपर्यंत पोचवण्या पुरती मदत करतो.

प्रश्न: दृष्टीबाधित व्यतिरिक्त इतर दिव्यांगासाठी काही विचार आहे.

उत्तर: नाही. तसा काही विचार नाही. जे करतो आहोत तेच उत्तमोत्तम करणे व जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे.

प्रश्न: हे काम करायला लागल्यापासून स्वतःत काय बदल झाले असं वाटतं?

उत्तर: खूप बदल झालाय नक्कीच! एकतर आपल्याला कुरकुर करायचा कुठलाच हक्क नाही.देवाने आपल्याला निरोगी शरीर दिलंय, हीच मोठी अमूल्य देणगी मिळालीये. कुठल्या तोंडाने तक्रार करायची? आपल्याला तो हक्कच नाही.सकारात्मक व समाधानी होतेच ती अधिक झाले. ह्या मुलांची जिद्द बघून आपण कुठल्या पायरीवर आहोत, ते कळायला लागलं. काम वेळेत दिलं नाही की चिडचिड व्हायची. ती कमी झाली. काय झालं पेक्षा काय झालं नाही ह्याचा जास्त विचार करायचे ते आता उलटं झालं. स्वतःला शाबासकी द्यायला शिकले. असं म्हणतात ना स्वत:वर जो प्रेम करतो तो दुसऱ्यावर प्रेम करू शकतो तसं मी स्वत:वर प्रेम करायला लागले.

प्रश्न: मुलाखतीत विचारायलाच पाहिजे असा प्रश्न म्हणजे घरच्यांची साथ कशी मिळाली?

उत्तर: मी पूर्णवेळ गृहिणीपद सांभाळत होते. सांसारिक जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर मी हे काम सुरू केलं. जेव्हा कामाचा आवाका वाढला तेव्हा यजमान निवृत्त झाले होते. आता ते गृहस्थपद सांभाळून अप्रत्यक्षरीत्या मदतच करतात.

प्रश्न: मान सन्मान कोणकोणते मिळाले?

उत्तर: जवळपास बारा तेरा पुरस्कार मला मिळाले असले तरी पण त्याचे खरे वाटेकरी ही सगळी आपली स्वयंसेवकाची फौज आहे. ही मुलं आत्मनिर्भर बनतात, यशस्वी होतात ते ही पुरस्कारच आहेत. त्यांची पोचपावती ही प्रशस्तिपत्रक आहेत. एक प्रसंग सांगते एका ब्रेलमधल्या पुस्तक प्रकाशनाला गेले होते. रंगमंचावर मला आमंत्रित केलं. माझं नांव एेकून इतका टाळ्यांचा कडकडाट झाला की मान सन्मान स्वीकारून खाली उतरेपर्यंत तो चालू होता. तो क्षण अविस्मरणीय होता. कृतार्थ !